रविवार, ५ मे, २०१३

सनाउल्लाला मारायच्या चिथावण्या कोणी दिल्या?




  गुजरात दंगलीच्या तपशीलात शिरण्यापुर्वी ही दंगल का झाली वा कोणी पेटवली; त्याचेही विश्लेषण आवश्यक आहे. कारण सरसकट ती मोदी व संघ परिवाराने कारस्थान शिजवून अंमलात आणलेली दंगल आहे; असाच आरोप होत राहिला आहे. दिसणार्‍या व दाखवल्या जाणार्‍या गोष्टी सत्यशोधनात पुरेशा नसतात. कारण ज्याला काही मुद्द्दे सिद्ध करायचे असतात, तो त्याला पुरक ठरतील, अशाच गोष्टी आपल्या समोर आणत असतो आणि त्याला बाधक ठरतील, अशा गोष्टी म्हणजे वास्तव नेमके लपवून ठेवत असतो. २००२ च्या दंगलीचे खापर मोदी यांच्या डोक्यावर फ़ोडण्यासाठी असेच कारस्थान झाले काय? त्याचा शोध घ्यायचा असेल, तर अगदी ताज्या घटनेचे पोस्टमार्टेम करता येईल. कालपरवा पाकिस्तानात व भारतात घडलेल्या दोन अगदी समान घटना आहेत. पहिली घटना पाकिस्तानच्या कोट लखपत तुरूंगात घडलेली आहे. जिथे दोन पाकिस्तानी कैद्यांनी, तिथे असलेल्या सर्वजीत नामक भारतीय कैद्यावर प्राणघातक हल्ला चढवला आणि त्यात अखेर त्याचा करूणास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्य़ूनंतर नेमक्या चोविस तासाच्या फ़रकाने भारतामध्ये जम्मूच्या कोट बहावल तुरूंगामध्ये तशीच भीषण घटना घडली. लाहोरच्या विमानतळावरून सर्वजीतच मृ्तदेह घेऊन विमान भारतात येण्यासाठी उडाले, त्याच वेळी जम्मूच्या या तुरूंगात सनाउल्ला नामक पाक कैद्यावर तिथल्या भारतीय कैद्याने प्राणघातक हल्ला चढवला. आता तोही तसाच मरणासन्न अवस्थेत इस्पितळात पडला आहे. मग दोन्ही घटनांमध्ये फ़रक तो कुठला? आपण पाकिस्तानच्या तुरूंगात घडले, त्यासाठी पाकिस्तान सरकार व तिथल्या प्रशासनाला जबाबदार धरत असू; तर मग तितकेच भारत सरकार व जम्मू तुरूंगाचे प्रशासनही जबाबदार नाही काय? सर्वजीतच्या हत्येसाठी पाकिस्तानात कारस्थान शिजवले व अमलात आणले गेले म्हणायचे असेल; तर तशाच घटनाक्रमासाठी भारत सरकारवरही सनाउल्लाच्या हत्याकांडाचे कारस्थान शिजवल्याचा आरोप का होऊ शकत नाही? पाकिस्तानने तसा आरोप केला आहे. तो आरोप आपण कुठल्या तोंडाने फ़ेटाळत आहोत?

   तिथे पाकिस्तानी कैद्यांच्या गर्दीत सर्वजीत एकटाच होता. तसाच इथेही सनाउल्ला भारतीय कैद्यांच्या गर्दीत एकाकीच होता. तुरूंगाच्या आवारातच दोघांवर प्राणघातक हल्ले झालेत व दोघांची स्थिती तशीच मरणासन्न होती. पण तरीही पाक तुरूंगात झाले, त्याला आपण कारस्थान म्हणतो आणि भारतीय तुरूंगात झाले, त्याला मात्र योगायोग किंवा अपघात ठरवू बघतो. दोनचार दिवस त्यासाठी वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर किती मोठमोठे युक्तीवाद चालले होते. मग दोन्हीतले बारीकसारीक फ़रक व तपशील कथन केले जात होते. सर्वजीतला पहिल्यापासूनच खुनाच्या धमक्या दिल्या जात होत्या; तशा सनाउल्लाला कोणी धमक्या दिलेल्या नव्हत्या. धमक्यांची तक्रार केल्यावरही पाक तुरूंगात सर्वजीतला तिथल्या सरकारने संरक्षण दिले नव्हते. इथे भारत सरकारने आधीच असा धोका ओळखून देशभरच्या सर्वच तुरूंग प्रशासनांना पाक कैद्यांना खास संरक्षण देण्याचे आदेश जारी केले होते. पण जम्मूच्या कोट बहावल तुरूंगात त्याचे पालन झाले नाही. म्हणजेच आदेश दिले हे केवळ भारत सरकारचे नाटक होते; असेही पाकिस्तान म्हणू शकतो. कारण कागदावरील आदेश उपयोगाचा नाही; तर त्याची अंमलबजावणी महत्वाची असते. तो नुसता आदेश सनाउल्लाला वाचवू शकला नाही. मग सरकारने निव्वळ देखावा म्हणून आदेश काढले, पण सनाउल्लाच्या बाबतीत त्याचे पालन होणार नाही, असे कारस्थान केले; असेही पाकिस्तान म्हणू शकतो. पण हे सगळे युक्तीवाद कामाचे नाहीत. कारण भारत सरकारने परस्पर आदेश जारी केले होते आणि सरकारच्या उद्देशाबद्दल शंका घ्यायला जागा नाही. घडला तो स्थानिक अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा होता हेच सत्य आहे. पण सत्य स्विकारण्याची सक्ती आपण करू शकत नाही, कारण त्याचे परिणाम दिसलेले नाहीत. नेमके हेच कुठल्याही दंगल वा सार्वजनिक हिंसाचाराच्या बाबतीत म्हणता येईल. अगदी गुजरातच्या दंगलीबाबतही असेच म्हणता येईल. कारण २००२ च्याही अगोदर अनेक दंगली झाल्या होत्या आणि त्यातही निरपराधांचे हत्याकांड नेहमीच होत राहिले आहे. मग त्यावेळचे मुख्यमंत्री दोषी व गुन्हेगार नसतील; तर एकटा मोदीच कसा गुन्हेगार ठरवला जाऊ शकतो? गुजरातच नव्हेतर देशातील प्रत्येक दंगलीही तीच कहाणी आहे. पण त्यातले तपशील व मुद्दे गेली दहा वर्षे लपवले गेले आहेत.

   चित्र असे निर्माण करण्यात आले, की जणू देशातील त्यापुर्वीच्या व नंतरच्या प्रत्येक दंगलीत सरकार व पोलिस प्रशासनाने अत्यंत कर्तव्यकठोर भूमिका पार पाडलेली असावी; असाच एकूण गुजरात दंगलीबद्दल बोलणार्‍यांचा दावा असतो. पण प्रत्यक्षात गुजरातची दंगल आणि देशात झालेल्या आजवरच्या दंगली; यातल्या घटना व परिणाम थोडेही वेगळे नाहीत. दोनच फ़रक आहेत, एक म्हणजे दंगलीसाठी मुख्यमंत्र्याच्या, सत्ताधार्‍याच्या डोक्यावर खापर फ़ोडले गेले अशी एकमेव दंगल आहे ती गुजरातची आणि दुसरा फ़रक आहे तो दंगेखोरावरील कायदेशीर कारवाईचा. गुजरातच्या दंगलीसाठी जितक्या गुन्हेगारांना पकडले गेले व खटले भरले गेले; तेवढे अन्य कुठल्याही दंगलीत घडलेले नाही. म्हणजेच दंगल हाताळण्यापासून गुन्हेगारांना शिक्षा देण्यापर्यंत सर्वात उत्तम हाताळली गेलेली दंगल कुठली, हे तपशीलात जाऊन शोधले, तर ती एकमेव गुजरातची दंगल असेच म्हणता येईल, थोडक्यात दंगल या विषयात देशातल्या आजवरच्या सर्वच सत्ताधार्‍यांची तुलना करायची म्हटल्यास; नरेंद्र मोदी हाच एकमेव सत्ताधीश सर्वोत्तम ठरवण्याची पाळी येईल. आणि ते कोणी साक्ष देऊन सांगायची गरज नाही. आकडे व घटनाच त्याचे साक्षीदार आहेत. राहिला मुद्दा दंगल भडकवण्याचा व चिथावण्या देण्याचा. त्याचेही खापर मोदी यांच्याच नावे फ़ोडण्य़ात आलेले आहे. त्याचे काय? आपल्या हिंदूत्वासाठी मोदी यांनी अशी दंगल घडवून आणली होती काय? गोध्रा येथे जे साबरमती एक्सप्रेस पेटवायचे जळीतकांड घडले, त्यानंतर दंगल गुजरातमध्ये पेटवण्याचे श्रेय कोणाला द्यायचे? त्यावेळचे तपशील शोधण्यापेक्षा ताज्या घटनाक्रमाकडे बघा. सर्वजीतवरच्या हल्ल्यानंतर आणि त्याच्या मृत्यूनंतर भारत सरकारने अत्यंत शांततेने सर्वकाही पार पडावे व त्यातला भावनेचा आवेग सौम्य व्हावा; यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. थेट त्याचा देह इथे आणण्यासाठी खास विमान पाठवण्यापासून त्याला सरकारी सन्मानाने निरोप देण्यापर्यंत सर्वकाही उपाय सरकारने योजलेले होते. कारण सर्वजीतच्या हत्याकांडाने लोकमत बिथरलेले होते. प्रक्षुब्ध जनमानसाला चिरडून काढणे शक्य नव्हते, म्हणुन त्याला सौम्य करण्याचे सरकारने सर्व उपाय योजले होते. पण ते जनमानस प्रक्षुब्ध करण्याचे पाप कोणी केले होते?

   सर्वजीतवरच्या हल्ल्यानंतर सलग तीन दिवस वाहिन्यांवरून जो गदारोळ चालू होता; त्यातून लोकमत चिथावण्याचा प्रयास चालू नव्हता काय? सरकारने काही केले नाही, सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही करत नाही. त्याला मारण्यात भारत व पाकिस्तान सरकारचे संगनमत होते, इथपर्यंत प्रक्षोभक विधाने कोणी केली व देशातल्या सव्वाशे कोटी लोकांपर्यंत कोणी नेली? उत्तर भारतातल्या अनेक शहरात त्यातून लोक रस्त्यावर आले व पाकसह भारत सरकारचाही निषेध करू लागले. कोमात गेलेल्या भावाला सोडून माघारी परतलेल्या दलबीर कौर या सर्वजीतच्या बहीणीचे वाघा सरहद्दीवरचे बोलणे काळीज पिळवटून टाकणारे होते. त्याचे थेट प्रक्षेपण सरकारने केलेले नव्हते. टाहो फ़ोडून रडणार्‍या व ऊर बडवणार्‍या दलबीरच्या किंकाळ्या ऐकणार्‍या कुणाही भारतीयाचे मन इतके हेलावून जाऊ शकत होते, की बदल्यासाठी उठून कुणा पाकिस्तान्याचा मुडदा पाडावा, अशीच भावना शक्य होती. असे प्रत्येकाला वाटले, तरी प्रत्येक माणूस असे करतोच असे नाही. पण हजारात लाखात एखादा असा माथेफ़िरू असतो, ज्याला भगिनी दलबीरच्या आक्रोश व अश्रू पुसण्यासाठी हाती शस्त्र घेण्याचा मोह आवरत नाही. तो बेभान होऊन धाव घेतो. जम्मूच्या कोट बहावल तुरूंगात असाच एक कैदी होता, जो भारतीय सेनादलात सेवा केलेला माजी सैनिक होता. एका क्षणाच्या आवेशात त्याने संधी साधली आणि समोर असलेल्या पाकिस्तानी सनाउल्लावर प्राणघातक हल्ला चढवला. त्याचे सर्वजीतशी कुठले नाते नव्हते, की त्याचे सनाउल्लाशी कुठले भांडणही नव्हते. मग त्याने असे का करावे? त्याला अशा हत्याकांडाला प्रवृत्त कोणी केले? भारत सरकारने नक्कीच नाही. कारण सरकार व त्याची संपुर्ण यंत्रणा सर्वजीतचा मृतदेह मायभूमीत परत आणायच्या कामाला जुंपलेली होती. मग हे काम कोणाचे होते? त्या कोट बहावलच्या अधिकार्‍यांनी त्याला चिथावणी दिली होती काय? असे काही कोणी केल्यास आपल्यावरच निलंबनाची कारवाई होऊ शकते; असे माहित असलेला कुठला अधिकारी त्याप्रकारची चिथावणी देणार नाही. उलट नुसती शंका आली असती, तरी त्यांनी आधीच सनाउल्ला याला सुरक्षित जागी हलवले असते. त्याचवेळी हल्ला करू शकणार्‍या संशयिताला अन्य कोठडीत डांबले असते. पण कुठला तुरूंगाधिकारी हल्ल्याची चिथावणी देणेच श्कय नव्हते. आणि सनाउल्लाला मारणार्‍याने चिथावणी मिळाल्यानेच असा प्राणघातक हल्ला केलेला आहे. मग त्याला चिथावण्या दिल्या कोणी? ज्यांनी सनाउल्लावरच्या हल्ल्याला चिथावण्या दिल्या, त्यांनीच गुजरातच्या दंगलीला चिथावण्या दिल्या आणि भडकलेल्या दंगलीच्या आगीत तेल ओतले, हे विसरता कामा नये. हे गुन्हेगार कोण आहेत?     ( क्रमश:)
 भाग   ( १६१ )    ६/५/१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा