शुक्रवार, १० मे, २०१३

कर्नाटकच्या जनतेचा कोणता अपेक्षाभंग झाला?   कर्नाटकात भाजपाचा पराभव झाला त्याला कॉग्रेसपेक्षा त्याच पक्षातल्या लाथाळ्या अधिक कारणीभूत झाल्या, हे वेगळे सांगायची गरज नाही. जनतेने सत्ता दिली म्हणजे तुम्ही मौजमजा करण्यासाठी दिलेली नसते. लोकशाहीतील सत्ता कुठल्याही विश्वस्तनिधीसारखी असते. लोकांनी तुम्ही काही चांगले करून दाखवाल, अशा आशेने तुम्हाला मते व सत्ता बहाल केलेली असते. त्याचप्रमाणे आधी जे कोणी सत्तेवर होते, त्यांना त्याच जनतेने सत्तेवरून बरखास्त केलेले असते. मग नव्या सत्ताधीशाने एक गोष्ट पहिली लक्षात घ्यायची असते, की आपल्यावर तीच जनता नाराज होता कामा नये. मग पहिला विषय असतो, की जनता कशामुळे नाराज होते? सामान्य जनतेच्या खुप कमी अपेक्षा असतात. दिवसभर पोटापाण्याच्या मागे पळणारा सामान्य माणूस फ़ुकटात काही मिळेल, अशा आशेवर नसतो. पण निदान आपण कष्ट करून मिळवतो, ते आपल्याच ताटात पडावे आणि आपल्या तोंडचा घास काढून हिसकावून घेतला जाऊ नये, अशी त्याची किमान अपेक्षा असते. त्यापेक्षा अधिक काही मिळाले, तर बोनसच असतो. पण पुढले अधिक काही न मिळता; आपले आहे तेच सुखरूप भोगता आले, तरी सामान्य माणुस सत्ताधार्‍यांविषयी समाधानी असतो. पण दुर्दैव असे, की बहुतांशी सत्ताधारी नेमकी तेवढीच गोष्ट विसरतात आणि आधीचा सत्ताधीश बरा होता म्हणावा; इतका गोंधळ घालून ठेवतात. त्यातूनच मग संधी मिळाली, की पुन्हा आधीच्याच नालायकालाही सत्तेवर आणून बसवतात. आज पुन्हा कर्नाटकाच्या जनतेने कॉग्रेसला सत्ता कशाला बहाल केली, त्याचे हे इतके सोपे उत्तर आहे. कॉग्रेसला पुन्हा सत्ता दिली, म्हणजे भाजपापेक्षा कॉग्रेस परवडली, असेच लोकांना दाखवायचे आहे. त्याचा अर्थ कॉग्रेस उत्तम असा होत नाही. आधीच्या कॉग्रेस (एस एम कृष्णा) किंवा कॉग्रेस-जनता दल सेक्युलर (धर्मसिंग वा कुमारस्वामी) यांच्या गोंधळाला कंटाळून लोकांनी भाजपाच्या येदीयुरप्पा यांना संपुर्ण बहूमत दिलेले होते. त्यांनी काय गोंधळ घातला होता?

   तेव्हा भाजपा सर्वात मोठा पक्ष असला तरी त्याच्यापाशी बहूमत नव्हते आणि सेक्युलर सरकार हवे म्हणून देवेगौडा यांनी आपल्या पक्षाचे आमदार कॉग्रेसच्या बाजूला आणुन उभे केले. बदल्यात त्यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते. आज कॉग्रेसने ज्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे ते सिद्धरामय्या, तेव्हा देवेगौडांच्या सेक्युलर जनता दलात होते व त्यामुळेच कॉग्रेसने त्यांना उपमुख्यमंत्री केले होते. पण त्या पदावर डो्ळा असलेल्या गौडापुत्र कुमारस्वामी यांनी ते सरकार चालू दिले नाही आणि भाजपाशी साटेलोटे करून सत्तांतर घडवले होते. त्या सौदेबाजीनुसार उरलेल्या अडिच वर्षात प्रत्येकी सव्वा वर्षे दोन्ही पक्षांना मुख्यमंत्री पद मिळणार होते. त्यापैकी सव्वा वर्ष कुमारस्वामी मुख्यमंत्री राहिले आणि येदीयुरप्पा उपमुख्यमंत्री म्हणून गुण्यागोविंदाने नांदले. पण जेव्हा येदींना मुख्यमंत्री करायची वेळ आली; तेव्हा देवेगौडा व कुमारस्वामी यांनी खुप नाटके केली. आधी पुत्राने बंड केल्यावर देवेगौडा आपले सेक्युलर नाटक रंगवत बाजूला झाले होते. पण सत्ता सुखरूप चालताना दिसल्यावर त्यांनीच आपल्या पुत्राचे मुख्यमंत्रीपद अधिक मुदतीसाठी वाढवून घ्यायला, भाजपाच्या श्रेष्ठींचे उंबरठे झिजवले होते. पुढे त्यातून काही निष्पन्न होत नाही म्हटल्यावर येदींना मुख्यमंत्री व्हायला पाठींबा दिला. पण सरकार मात्र चालवू दिले नाही. सहाजिकच विधानसभा बरखास्त करून मुदतपुर्व निवडणुका घ्याव्या लागल्या होत्या. तेव्हा मग देवेगौडांच्या पक्षाची सेक्युलर मते आपल्याला मिळतील व पुन्हा बहूमत आपल्याकडेच येईल; अशी गाजरे कॉग्रेस पक्ष खात होता. पण त्याचा भ्रमनिरास झाला. कारण मते जातीयवादी वा सेक्युलर नसतात. ज्यांनी सरकार चालू दिले नाही त्यांना म्हणजे देवेगौडांच्या पक्षाला लोकांनी धडा शिकवला होता व त्यांच्याकडली कॉग्रेस विरोधी मते मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळली व सत्ताही भाजपाला मिळण्याचा मार्ग सोपा झाला. पण तो आणखी सोपा करण्यासाठी भाजपाने ज्या उचापती केल्या त्याच पुढल्या काळात त्याला महागात पडल्या.

   उत्तर कर्नाटकामध्ये ज्या खाणींचे साम्राज्य आहे, तिथे माफ़ियागिरी करणार्‍या रेड्डीबंधूंना भाजपाने पवित्र करून पक्षात सामावून घेतले. असे लोक कुठल्याच पक्षाचे नसतात. त्यांच्या पापकर्माला भ्रष्टाचाराला सत्तेचा आशीर्वाद आवश्यक असतो, म्हणून ते विजयाची शक्यता असलेल्या पक्षात दाखल होतात. मग त्यांच्या पापाचे ओझे घेऊनच नव्या पक्षाला वाटचाल करावी लागत असते. रेड्डीबंधूंनी तीच वेळ भाजपावर आणली. नवे सरकार स्थापन झाल्यापासून रेड्डी बंधू आपल्याला हवी तशी मनमानी करीत होते व त्यांनी आमदारांना फ़ूस लावून मुख्यमंत्र्यालाच ओलिस ठेवण्यापर्यंत मजल मारली होती. प्रत्येकवेळी दिल्लीत बसलेले काही श्रेष्ठी रेड्डीबंधूंना पाठीशी घालत होते. त्यात भर म्हणून कॉग्रेसने २००९ नंतर कर्नाटकात हंसराज भारद्वाज नावाचा राज्यपाल आणून बसवला, त्याने येदींना सतावण्याचा खेळच आरंभला होता. म्हणजेच प्रथमच सत्ता मिळाल्यापासून भाजपाचे नवे मुख्यमंत्री येदीयुरप्पांना कॉग्रेसी राज्यपाल त्रास द्यायला होताच. पण पक्षातही रेड्डीबंधू व त्यांच्या आडोशाने सतावणारे दिलीतील काही भाजपा नेते होते. या दुसर्‍या गटातल्या लोकांच्या पापाचे खापर अन्य पक्षावर फ़ो्डता येणार नाही. येदीयुरप्पा हा स्थानिक प्रभावी नेता असताना दिल्लीतल्या नेत्यांनी काही दुय्यम नेत्यांना हाताशी धरून गटबाजीला प्रोत्साहन देणे; शेवटी पक्षालाच घातक ठरणार होते ना? आणि ही कॉग्रेसची राजकीय संस्कृती आहे. तिचे जसेच्या तसे अनुकरण भाजपामध्ये होणार असेल तर सत्तांतर होऊन लोकांच्या जीवनात कुठले स्थित्यंतर घडणार होते? गेल्या आठदहा वर्षात बंगलोरचे लोक हैराण होऊन गेले होते. सत्ता व बहुमत संभाळणे यापेक्षा मुख्यमंत्र्याला कुठलेच काम नव्हते. सत्तेत बसलेले लोक एकमेकांवर कुरघोड्या करण्यात रममाण झालेले होते व ज्यांनी सत्तेवर आणून बसवले; त्याच जनतेच्या अपेक्षा, आकांक्षा किंवा किमान गरजांचीही भाजपाच्या सरकारला पर्वा असल्याचे कुठे दिसले नाही. मग सामान्य जनतेने काय करावे? 

   येदीयुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले व त्यांचा लोकायुक्तांशी खटका उडालेला होता. शेवटी त्याच आरोपाखाली येदींना राजिनामा देऊन गजाआड जायची वेळ आली. तेव्हा दिल्लीतील नेत्यांनी आरोप खोटे पडले, तर पुन्हा येदीच मुख्यमंत्री होतील असे जाहिर केले होते. मात्र हायकोर्टाने त्यांच्यावर्ल आरोप फ़ेटाळून लावले व आरोप करणार्‍यांवर ताशेरे झाडल्यावर येदींची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छाच नव्हेतर आग्रह धरला होता. मात्र त्यात दिल्लीत बसलेले कर्नाटकी नेते व काही श्रेष्ठींनी टांग अडवून ठेवली. येदींची इतकी अडवणूक करण्यात आली, की त्यासाठी मुख्यमंत्री बदलला, पण येदींना संधी नाकारण्यात आली. इतकेच येदी भ्रष्ट होते अशी दिल्लीच्या नेत्यांना खात्री होती, तर त्यांनी त्यांची पक्षातूनही हाकालपट्टी करायला हवी होती. पण त्याऐवजी येदींशी नुसताच लपंडाव खेळला जात होता. जेणेकरून त्यांनी स्वत:च कंटाळून पक्ष सोडावा; असेच डावपेच दिल्लीतून चालले होते. शेवटी तेच झाले. पण परिणाम काय झाले, ते निकालांनी दाखवले आहेत. हा सगळा प्रकार कोणासाठी व कशासाठी दिल्लीतल्या भाजपा नेत्यांनी खेळला? कारण असे आत्मघातकी व पक्षाचेच खच्चीकरण करणारे दिल्लीतील श्रेष्ठीचे हे पहिलेच डावपेच नव्हते. उमा भारती, कल्याणसिंग, वसुंधरा राजे यांच्याही बाबतीत तोच प्रकार झालेला होता. मात्र त्यातून पक्षांतर्गत सत्तेची साठमारी यशस्वी होत असली, तरी सामान्य जनतेचा पुरता भ्रमनिरास होत असतो. जनतेच्या किमान अपेक्षा पुर्ण केल्यावर साठमारी वा लपंडाव खेळल्यास काही हरकत नसते. पण तेच खेळत बसाल तर लोकांना राग येतो. कारण सत्ता व राजकारणाची किंमत सामान्य जनता आपल्या कष्टाच्या कमाईतून मोजत असते. 

   कर्नाटकात लोकांनी भाजपाला धडा शिकवला, तसाच धडा लोकांनी गुजरातमध्ये भाजपालाच शिकवायची तयारी केली होती. किती लोकांना तो सगळा तपशील व घटनाक्रम माहीत आहे किंवा आठवतो? मग तिथे त्याहीनंतर भाजपाने तीनदा निवडणूका का जिंकल्या? हा फ़रक एका माणसाने करून दाखवला हे कोणी नाकारू शकतो काय? कर्नाटकात जितक्या लाथाळ्या भाजपामध्ये झाल्या; त्याहीपेक्षा अधिक लाथाळ्या गुजरात भाजपामध्ये १९९५ ते २००१ दरम्यान चालू होत्या. फ़रक इतकाच, की दोनदा संधी देऊनही भाजपामध्ये अधिकच लाथाळ्या माजलेल्या होत्या. लोकांनी दोनदा विश्वास व्यक्त करूनही भाजपाच्या लाथाळ्या संपत नाहीत, म्हणून लोकांनी भाजपाला अर्धा धडा त्यावेळी शिकवला होता. विधानसभा निवडणूकीची संधी मिळाली असती; तर आज कर्नाटकात जे घडले, तेच दहा वर्षापुर्वी गुजरातमध्ये घडलेले आपल्याला बघायला मिळालेले असते. पण दोन गोष्टी अशा होत्या, की त्यामुळेच गुजरातमध्ये भाजपा अधिक मजबूत झाला. कॉग्रेसने पुन्हा गुजरात जिंकायची आशाच सोडून दिली. २००२ ची दंगल व गोध्रा जळीतकांड सर्वांना आठवते. पण त्याही आधी सहा महिने गुजरातमध्ये काय घडले होते? कशामुळे नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्यात आले होते?    (क्रमश:)
 भाग   ( १६५ )    १०/५/१३२ टिप्पण्या:

  1. tumhalaa Mahrashtra pekshaa karantak ani gujarat ci jasst kalaji ahe vatate

    उत्तर द्याहटवा
  2. "जनतेच्या किमान अपेक्षा पुर्ण केल्यावर साठमारी वा लपंडाव खेळल्यास काही हरकत नसते. पण तेच खेळत बसाल तर लोकांना राग येतो. कारण सत्ता व राजकारणाची किंमत सामान्य जनता आपल्या कष्टाच्या कमाईतून मोजत असते. (तेंव्हा)सामान्य जनतेचा पुरता भ्रमनिरास होत असतो."
    भाऊ आपण म्हणता ते खरे आहे.

    उत्तर द्याहटवा