मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२

माध्यमे बुद्धीमंत दिशाभूल का करतात?



    "दुसर्‍याच्या चुका शोधणे खुप सोपे असते. पण आपल्या चुका ओळखणे अत्यंत अवघड असते." अशी भगवान बुद्धाची शिकवण आहे. त्याचा अर्थ इतकाच, की आपण कधी चुकत नसतो. ही समजूतच आपली सर्वात मोठी चुक असते. सर्व समस्या तिथूनच सुरू होत असतात. मग आपण आपल्या आयुष्यातल्या समस्यांकडे त्याच नजरेने पाहू लागतो. ज्या गोष्टी चुकल्याने आपल्याला त्रास होत असतो, त्यावर उपाय शोधण्यापेक्षा आपणच त्याचे खापर दुसर्‍याच्या माथ्यावर फ़ोडून समाधानी होतो. पण ते समाधान फ़सवे असते. कारण त्यातून समस्या सुटत नसते, की आपला त्रास संपत नसतो. उलट ती समस्या सोडवण्याची इच्छाच आपण गमावून बसत असतो. मग अशा समस्येचे निदान करायला वा त्यावरचा उपाय शोधायला आपण इतरांकडे आशाळभूतपणे बघू लागतो. त्यात त्या दुसर्‍याला धंदा दिसला, तर तो आपल्या या गरजेचे वा लाचारीचेच दुकान थाटत असतो. या सर्वामागे एकच कारण असते, आपण चुकतच नाही, ही आपली ठाम समजूत सर्वात मोठी चुक असते. तिथे अहंकार बाजूला ठेवून आत्मपरिक्षण करण्याची गरज असते.

   एक उदाहरण देतो. मला एका तरूण मुलाचा फ़ोन आला. तो उलटतपासणी नियमित वाचणारा आहे. त्याला वाटते मी खुप परखड सडेतोड लिहितो. म्हणून त्यातून लोकांना न्याय मिळू शकेल, मिळत असावा. मग मी कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्येवर लिहिले पाहिजे. माझ्या सडेतोड लिखाणाने कांदा उत्पादकांना न्याय नक्की मिळेल, असा त्याला विश्वास वाटत होता. हे सर्व ऐकायला बरे वाटणारे होते. पण ते अजिबात सत्य नव्हते. कारण मी वर्षभर लिहितो आहे, म्हणुन कुठल्या समस्या प्रश्नाचे निराकरण झाले, असा माझा तरी अनुभव नाही. मग ऊस वा कांदा उत्पादकांना मी लेखणीने न्याय मिळवून देऊ शकतो, यावर मी विश्वास कसा ठेवायचा? पण त्या मुलाची तशी गाढ श्रद्धा होती. मी त्याला खुप समजावले. पण तो हट्ट सोडत नव्हता. लेखनाने वा प्रसिद्धीने समस्या सुटत नसतात वा न्याय मिळत नसतो. त्यातून जी लोकजागृती होते, त्याच्या धाकाने सत्ता जागी झाली, तर न्यायासाठी हालचाली होऊ शकतात. पुर्वी काही प्रमाणात असे होत असे. मग त्याला माझा अनुभव सांगितला.

   १९७६ नंतर शरद जोशी यांच्या पुढाकाराने शेतकरी संघटना अस्तित्वात आली, तीच मुळात कांदा उत्पादकांच्या आंदोलनातून. त्यावेळी मी त्याच विषयावर लेख लिहिला होता. ’कांदा का कावला?’ असे त्याचे शिर्षक मला अजून आठवते. माझे लिखाण शेतकर्‍याला न्याय देऊ शकत असते, तर आज पुन्हा तो कांदा उत्पादक असा अन्यायग्रस्त कशाला राहिला असता? तेव्हा कांदा उत्पादकाला न्याय मिळाला. कारण तेव्हा त्याने संघटित होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. शेतकरी संघटना त्यातून उदयास आली. जेव्हा ती मरगळली, तेव्हा पुन्हा कांदा उत्पादक शेतकर्‍याचे हाल सुरू झाले. आज तीसपस्तीस वर्षांनी रडगाणे तसेच चालू आहे. तेव्हाही उत्पादन किंमतीच्या तुलनेत कांद्याला बाजारभाव मिळत नाही, हीच तक्रार होती. आज तीच तक्रार तशीच चालू आहे. तेव्हा कदाचीत त्या फ़ोन करणार्‍या मुलाचा पिता तेव्हा याच्या इतका तरूण असेल. मुद्दा इतकाच, की कठोर शब्दात लिखाण केले, म्हणुन न्याय मिळत नसतो; तर लोकशक्तीच न्याय मिळवून देत असते. पण आंदोलन हे एकावेळच्या उपायावर थांबता कामा नये, तर त्या समस्येवर कायम स्वरुपी उपाय काढला गेला पाहिजे. कोणाच्या आंदोलनाने वा लिखाणातुन आपल्याला न्याय मिळेल या समजूतीमधून लोकांनी बाहेर पडले पाहिजे. मग ते शेतकरी संघटनेचे आंदोलन असो किंवा अण्णा हजारे, स्वामी रामदेवांचे आंदोलन असो. त्यात प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्यावर सामुहिक न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होत असते. सहानुभूती हे न्यायाचे सुत्र झाले पाहिजे.

   अन्याय दुर करणे हे आपले उद्दीष्ट असले पाहिजे. मग तो अन्याय कोणावर झाला हे महत्वाचे नाही, अन्याय करणारा एका बाजूला व अन्याय सोसणारा दुसर्‍या बाजूला, अशी समाजाची विभागणी झाली पाहिजे. मग लक्षात येईल, की अन्यायग्रस्तांची संख्या प्रचंड आहे, तर अन्याय करणार्‍यांची संख्या नगण्य आहे. ही नुसती संख्या बघितली तरी अन्याय करणार्‍यांचे पाय चळचळा कापू लागतील. त्यांच्याकडे न्यायाची भिक मागावी लागणार नाही. तेच गयावया करीत तुमच्या पायाशी न्यायासह लोळण घेतील. पण तसे कधीच होत नाही. कारण सगळे अन्यायग्रस्त एकत्र येत नाहीत. कधी शाळेच्या देणगीने त्रस्त झालेले लढत असतात, तर कधी कांदा उत्पादक लढत असतात. कधी घरासाठी गिरणी कामगार लढत असतात, तर कधी ऊस उत्पादक, दुध उत्पादक लढत असतात. जेव्हा एका समाज घटकाचा लढा प्राणपणाने चालू असतो, तेव्हा वेगवेगळ्य़ा कारणाने अन्यायग्रस्त असलेले इतर समाजघटक, त्याकडे त्रयस्थ, तटस्थ म्हणून बघत असतात. थोडक्यात इतर अन्यायग्रस्त, त्या लढणार्‍या एका समाजगटाला एकाकी शत्रूच्या जबड्यात सोडुन देत असतात. तेव्हा प्रत्यक्षात असे इतर अन्यायग्रस्त त्या मुठभर अन्याय करणार्‍यांचे हातच बळकट करत असतात. तिथे त्या एका अन्यायग्रस्ताची शिकार होऊन जाते. मग पुढे कधी दुसरा अन्यायग्रस्त समाजगट त्याच अवस्थेत शिकार्‍याचे सावज होत असतो.

   गेले पाच सहा दिवस दिल्लीत जो प्रकार घडला, त्याने हे शिकारीच हादरून गेले आहेत. त्यात सरकार व सत्ताधार्‍यांसह सर्व राजकारण्याचा समावेश होतो. पण तेवढाच तो बदमाश माध्यमे व वाहिन्यांचाही होतो. म्हणूनच मग त्या लोकक्षोभाला मुठभर मध्यमवर्ग किंवा सुखवस्तूंचा उन्माद म्हणून रंगवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामागचा हेतू सामान्य माणसाने समजून घेतला पाहिजे. सर्व समाजघटक रस्त्यावर आले मग सिंहासन डोलू लागत असते. ते डळमळणारे सिंहासन संभाळण्याची जबाबदारी नेहमी स्वत:ला बुद्धीमंत समजणारा वर्ग उचलत असतो, जो खर्‍या अर्थाने मध्यमवर्ग असतो. ज्याला सर्व सुखसोयी मिळालेल्या असतात आणि सत्ताधारी त्यांची मर्जी संभाळत बाकीच्यांची मस्त शिकार करत असतात. दिल्लीच्या रस्त्यांवर जी गर्दी उसळली आहे, त्यात गरीबाघरची मुले नाहीत, तळागाळातली तरूण मुले नाहीत; ही शुद्ध फ़सवणूक आहे. नेहमी तुम्ही बघाल तर दोनपाच हजार लोकांमध्ये कुठे एखादे गरीबाचे मूल वा महिला असेल तेवढेच मुद्दाम टिपून दाखवले जाते. एखादी बुरखेधारी मुस्लिम महिला किंवा विशिष्ट टोपी धारण केलेला मुस्लिम दाखवून सर्वच समाजघटक सहभागी असल्याचा देखावा मस्त निर्माण केला जातो. पण आता दिल्लीच्या आंदोलनाने सत्ता डगमगू लागल्यावर माध्यमांची लबाडी सुरू झाली आहे. कारण त्याच राजकारण्यांचे प्रचंड भांडवल अशा माध्यमांमध्ये गुंतलेले असते. त्यांच्याच इशार्‍यावर माध्यमे नाचत असतात. सामान्य लोकाचे लढे प्रक्षोभक होऊ नयेत, म्हणून त्यांच्या वतीने आपण लढत आहोत; असा देखावा माध्यमे निर्माण करीत असतात. पण जेव्हा त्यातून खरेच लढे उभे रहातात, तेव्हा त्यांना सुरुंग लावण्याचे कामही माध्यमांनाच पार पाडावे लागत असते. सध्या माध्यमांतील बातम्यांचा सुर बघितला तर त्याचीच साक्ष मिळेल. तरुणांचे आंदोलन राजकीय पक्ष व संघटनांनी काबीज केल्याची भाषा त्यातूनच आलेली आहे. कारण ही माध्यमे व त्यांचे मालक हे सत्ताअधारी शिकार्‍यांचेच भागिदार व साथीदार आहेत व असतात.

   माध्यमांमुळे न्याय मिळत नाही की लढे यशस्वी होत नाहीत. त्यातून थोडीफ़ार प्रेरणा मिळू शकते. पण खरा न्याय लोकांना रस्त्यावर उतरूनच मिळवावा लागत असतो. मात्र जेव्हा खरोखरच लोक न्यायासाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा या माध्यमांची भाषा व भूमिका का बदलते? तर ते शिकार्‍याचेच साथीदार असतात आणि शिकारीतच त्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. अन्यायातच त्यांचे स्वार्थ सामावलेले असतात. बुद्धीमंत असा का वागतो? समाजातील असंतोषाला पहिली आग लावणारा किंवा हवा देणारा हाच वर्ग; खरे लढे हाणून पाडायला नेहमी पुढे आल्याचे इतिहासातही आढळून येते. त्याचे कारण त्याचे स्वार्थ अन्याय्य प्रणालीमध्ये सामावलेले असतात. म्हणूनच जेव्हा अण्णांचे नुसते उपोषण चालू होते, तेव्हा याच माध्यमांनी अण्णांना दैवत बनवण्याचा पवित्रा घेतला होता. पण जेव्हा अण्णांच्या सोबत जनता रस्त्यावर उतरू लागली, तेव्हा माध्यमांची भूमिका बदलली होती. आधी अण्णांवर संघाशी संबंधित म्हणून आक्षेप घेण्यात आले, त्यात काहीच तथ्य नसल्याचे आता सिद्धच झालेले आहे. कारण केजरिवाल संघासह भाजपावरही आरोप करीत असतात. आता ताज्या आंदोलनात तेच केजरिवाल रस्त्यावर आले; मग त्यांनी आंदोलनाचे राजकारण केले, असाही आरोप माध्यामांनी चालविला आहे. मुद्दा न्यायाचा असेल तर त्यात कोण येतो त्याच्याशी संबंध काय? बुद्धीमंत असे बुद्धीभेद का करतात? आंदोलन व न्यायाच्या लढ्याशी दगाफ़टका का करतात? ( क्रमश:)
भाग   ( ३७ )    २६/११/१२

1 टिप्पणी: