काही वर्षापुवी ‘मशाल’ नावाचा एक हिंदी चित्रपट आलेला होता. दिलीपकुमार, अनील कपूर व निळू फ़ुले; अशा नटांनी त्यात अप्रतिम भूमिका केल्या होत्या. पण उतारवयात असूनही त्यातली प्रमुख भूमिका दिलीपकुमारनेच सादर केली होती. त्याने त्यात एका झुंजार पत्रकाराचे पात्र रंगवले होते. आज जे अविष्कार स्वातंत्र्याचे नाटक करणारे वास्तव पत्रकार आहेत, त्यांच्या वास्तव जीवनापेक्षा दिलीपकुमारने रंगवलेला पत्रकार खुप प्रामाणिक होता आणि जेव्हा परिस्थितीचे चटके बसू लागतात, तेव्हा त्याने परिस्थिती बदलण्यासाठी रौद्ररुप धारण करण्य़ापर्यंत मजल मारलेले ते कथानक होते. पत्रकार म्हणून नुसतेच लिखाणातले पोकळ शहाणपण न सांगता तो अनील कपूर या टपोरी तरुणाला सुधारतो. पत्रकार बनवतो. पण दरम्यान अशा घटना घडतात, की स्वत: दिलीपकुमारच गुन्हेगार वनून जातो. या दरम्यान त्याचे एक वाक्य माझ्या कायमचे स्मरणात राहून गेले आहे. हल्ली त्या वाक्याची प्रतिदिन आठवण मला होत असते. अमरिश पुरी हा त्या चित्रपटातला पैसेवाला मुजोर शेठ व गुन्हेगारी व्यवसायातून कमाई करणारा असतो. त्याच्या भानगडी चव्हाट्यावर आणायच्या हट्टामुळे दिलीपकुमारला चांगल्या मोठ्य़ा वृत्तपत्रातली नोकरी सोडावी लागते. कारण पैसेवाला अमरीश पुरी मालकालाच खरेदी करतो आणि मग त्याच्या भानगडी छापायची बंदी येते. आजचा वास्तवातला कोणी संपादक असता, तर त्याने एव्हाना अमरीश पुरीच्या बुटाला पॉलिश करून आपली नोकरी परत मिळवली असती आणि परत अविष्कार स्वातंत्र्याचे साग्रसंगीत व्याख्यान देऊन ढेकरही दिला असता. बाकी भानगडी व घोटाळे सांगताना व दाखवताना आवेशपुर्ण बोलणार्या निखिल वागळेच्या आजच्या सवालाला दर्डांच्या कोळशाच्या खाणीचा बोभाटा झाल्यावर तोंड काळे करायची वेळ आलीच ना? पण म्हणून एकट्या निखिलला बेशरम मानायचे कारण नाही. आजकाल पत्रकारितेला अशाच निर्लज्ज लोकांनी काबीज केले आहे. कोणाला झाकायचा आणि कोणाला दाखवायचा अशी परिस्थिती आहे. पुन्हा बेशरमपणा इतका बेमालूम असतो, की किती सांगायचे असाही प्रश्न असतो.
पण चित्रपटातला पत्रकार दिलीपकुमार खोटा पत्रकार असल्याने मालकाला शरण जात नाही, की अमरिश पुरीच्या पैशासमोर झुकत नाही. तो नोकरीवर लाथ मारून निघतो. तेव्हा त्याला खिजवायला आलेला अमरिश पुरी त्याला पुन्हा खरेदी करायला त्या मोठ्या वृत्तपत्राच्या दालनात येतो, ऑफ़र करतो. तेव्हा दिलीपकुमार चारचौघात त्याच्या सणसणीत थोबाडीत हाणतो आणि शांतपणे म्हणतो, तुझ्या ऑफ़रचा यापेक्षा योग्य जबाब माझ्यापाशी दुसरा नव्हता. आजच्या बहूतांश पत्रकारांचा आवेश असतो असाच. पण तो तुम्हाआम्हाला दाखवण्यापुरता. बाकी कोण डोळा मारतो याची प्रतिक्षा करणार्या या पतिव्रता म्हणाव्यात अशी वस्तुस्थिती आहे. ‘बेरक्या’ नावाचा कोणी अनभिज्ञ त्याची लक्तरे ऑनलाईन धुवत असतो. असो. चित्रपटात दिलीपकुमार स्वत:चे छोटे वृत्तपत्र चालू करतो आणि पैशाची ओढाताण सहन करीत चालवित असतो. तेव्हा पुन्हा त्याच्या त्याही कार्यालयात जाऊन अमरिश पुरी त्याला खिजवतो. पैसे नसले तर काही चालत नाही; वगैरे वगैरे सुनावतो. सर्वकाही ऐकल्यावर दिलीपकुमार जे उत्तर देतो, ते महत्वाचे. इतकी वर्षे उलटून गेल्यावरही ते कायमचे मेंदूत कोरले गेले आहे. आपल्या बुद्धीचा सार्थ अभिमान असलेल्या दिलीप उत्तरतो, ‘तू एक फ़डतूस गुंड आहेस. तुझ्याकडे हाणामारीची ताकद असेल. पण मी बुद्धीमान आहे आणि मी जोपर्यंत माझी बुद्धी गुन्हेगारीसाठी वापरत नाही, तोपर्यंतच तुझी चलती आहे. ज्या दिवशी माझ्यासारखा बुद्धीमान गुन्हेगारीच्या क्षेत्रात येईल ना, त्यादिवशी तुझी सद्दी संपेल. ताकदवाल्या गुंडापेक्षा बुद्धीमान गुन्हेगार अधिक धोकादायक असतो हे कधी विसरू नको’
आजवर जगाने अत्यंत खतरनाक अशा ज्या गुंड गुन्हेगारांचा इतिहास वाचला व अभ्यासला आहे, त्यांना दिलीपकुमारचे ते शब्द पटतील. कारण ज्यांनी गुन्हेगारीला ताकदीने सुरूवात केली असेल, पण थोडी संधी मिळताच बुद्धीचा योग्य वापर केला; तेच टिकून राहिले व त्यांनी गुन्हेगारीचे मोठे साम्राज्य निर्माण केलेले दिसेल. मग तो आपल्याकडचा दाऊद असो, की अमेरिकेतले माफ़िया असोत. त्यातले बुद्धीमान होते त्यांनी आपली साम्राज्ये उभी केली. आज अनेक पत्रकार थेट गुन्हेगारीच्या क्षेत्रात उतरलेले नाहीत, पण गुन्हेगारीला साथ देण्यास आपली बुद्धी राबवत असतात. म्हणूनच मला त्या चित्रपटाचे स्मरण झाले. गुन्हा म्हणजे तरी काय असते? तुम्ही दुसर्याची फ़सवणूक केली म्हणजे गुन्हाच केलेला असतो ना? एखाद्या वयात येणार्या मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिला कुंटणखान्यात अलगद आणून विकणारा आणि आपल्या बुद्धीचातुर्याने कुणा माणसाला टोपी घालण्यास हातभार लावणारा; यात फ़रक नसतो. मग तुम्हाआम्हाला बातमी वा लेखाच्या माध्यमातून गाफ़ील ठेवणारे आणि अलगद शत्रूच्या हाती सोपवणारे; त्या भामट्या प्रियकरापेक्षा वेगळे असतात काय? अशा कामात जेव्हा बुद्धी पणाला लावली जाते; तेव्हा त्याला गुन्हाच म्हणायचा असतो. आज जे दिल्लीतील बलात्काराच्या निमित्ताने आंदोलन भडकले आहे, त्याच्या बातम्या देताना चाललेली बौद्धिक कसरत म्हणूनच मला घातक व भामटेगिरी वाटते. त्या आंदोलनाला अराजक ठरवण्याची काही ठराविक पत्रकार व माध्यमांची बौद्धिक कसरत बनवेगिरीच आहे. त्याचा एक किस्सा मी काल सुभाष तोमर या पोलिस शिपायाच्या मृत्यूसंबंधाने स्पष्ट केला होता. आता गेल्या दिड वर्षातल्या अण्णा हजारे व इतरांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा विषय घ्या. त्यातही पत्रकारांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला दिसेल. हे सर्व कोणाच्या इशार्यावर चालू असते? कशासाठी चालू असते?
बलात्कारानंतर लोक खवळून रस्त्यावर आले, मग त्याला व्हायरस किंवा झुंडशाही म्हणायचे तर दिल्लीत वा अन्य शहरांमध्ये जे राजरोस बलात्कार व खून होत आहेत, त्याला कायद्याचे राज्य म्हणायचे काय? जेव्हा अशी भाषा संपादक, पत्रकार लिखाणातून बातम्यातून वापरतात, तेव्हा ठीक असते. पण त्याच बातम्या ऐकून वा वाचून लोक रस्त्यावर आले; मग अराजक होत असते? तसे असेल तर ते अराजक पेटवण्याचे पाप त्याच पत्रकार व माध्यमांचेच नाही काय? गुजरात पेटला असताना तिथे जाऊन मोदी सरकार विरोधात भडकावू भाषण देणार्या व विधाने करणार्या सोनिया गांधी दंगल मिटवण्याचे प्रयास करत नव्हत्या. तर आगीत तेलच ओतत होत्या. त्याच दंगलीत पोळ्या भाजून घेत होत्या. त्याबद्दल बोलायचे नाही. पण भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी बलात्कार संबंधातील कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेचे खास अधिवेशन बोलवायची मागणी केली; मग मात्र पोळी भाजून घेतली, अशी भाषा कशाचे द्योतक आहे? माध्यमांना लोकांची दिशाभूल करायची, असाच त्याचा अर्थ होत नाही काय? थोडे संयमाने घ्यायला हवे असे बौद्धिक देणार्यांना अरुणा शानभागवर बलात्कार होऊन चार दशके उलटल्यानंतर आज लोक रस्त्यावर आले; म्हणजे संयमाचा अंत झाला एवढेही कळत नाही काय? पण लोकांमध्ये गोंधळ माजवायचा असेल तर असेच चालणार. मग त्यासाठी भलतेसलते प्रश्न उपस्थित केले जाणार. गुजरातच्या दंगलीचा न्याय मागायच्या वेळी हे तरूण कुठे होते? गरीबांच्या प्रश्नांची तड लावतांना हे लोक कुठे होते? असले प्रश्न केवळ दिशाभूल करण्यासाठी उपस्थित करणारे पत्रकार बौद्धिक गुन्हेगार असतात. दिलीपकुमार त्या चित्रपटात जे वाक्य बोलला, त्याचा अनुभव मला म्हणूनच आजकाल नित्यनेमाने येत असतो.
अशा बदमाशांचे किस्से ऐकले किंवा तपासून बघितले तर लोक गुंडापेक्षा पत्रकारांना रस्त्यावर खेचून मारतील अशी स्थिती आहे. आज आपला समाज व देश ज्या दुरावस्थेल पोहोचला आहे, त्याला सर्वाधिक जबाबदार कोण असेल तर आपल्या देशातली दगाबाज प्रमुख माध्यमेच होत. गुंडांच्या तावडीतून सोडवायचे नाट्क करणार्यानेच नंतर बलात्कार करावा, तशी आजच्या बौद्धीक वर्गाची स्थिती झाली आहे. देशाला व समाजाला लुटणार्या सतावणार्यांच्या सेवेत त्यांची बुद्धी राबते आहे आणि त्याचेच दुष्परिणाम अवघ्या समाजाला भोगावे लागत आहेत. कारण आता गुन्हेगारी वा गुंडगिरी भुरटी राहिली नसून त्याच्यामागे बौधिक ताकद उभी राहिली आहे. खर्या माफ़ियांपेक्षा हे दिशाभूल करणारे बुद्धीवादी भामटे, आपल्याला विनाशाकडे घेऊन चालले आहेत. दिलीपकुमार तरी बरा होता. गुंड होताना त्याने अमरिश पुरीसारख्या मुजोर गुन्हेगाराला संपवायला आपली बुद्धी पणाला लावली होती. आजचे अनेक संपादक व बुद्धीमंत त्याच गुन्हेगारांचे सहाय्यक बनले आहेत, त्यांच्या सेवेत रुजू झाले आहेत. ( क्रमश:)
भाग ( ३९) २८/११/१२
हा निव्वळ योगायोग असावा पण गम्मत वाटली - 'मशाल' चित्रपट पहायचा राहूनच गेला होता म्हणून मी कालच त्याची सीडी मागवली. आता पोस्ट वाचल्यावर तर पहावाच लागेल :)
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख. जोवर या देशात भोले भाबडे अशिक्षित अडाणी लोक आहेत तोवर हे असेच चालेल.शिक्षण व दारिद्र्य निर्मुलन हेच यावर दूरगामी स्वरूपाचे उपाय आहेत. पण हे होण्यासाठी खूप काळ लागेल. आणि तोपर्यंत हा देश टिकेल याची शाश्वती आता राहिलेली नाही.
उत्तर द्याहटवामशाल बरोबर 'अश्रुंची झाली फुले'या कानेटकरांच्या नाटकातील विद्यानान्दाने दिलेला लढा देखील आठवायला हरकत नाही. बुद्धिवान्तानी गुन्हेगारी जगात शिरणे आणी वरचढ ठरणे यात मला काहीतरी गफलत दिसते. बुद्धिवंत हा नीर-क्षीर सोडून काही करेल अशी अपेक्षा नाही. केवळ 'विजय'ही काही सार्वकालीन कसोटी नाही ठरू शकत. आज बहुतेक क्षेत्रात हा समतोल सुटलेला दिसतो. मिडियाचे तर सगळेच बिघडलेले आहे. त्याच धर्तीवर 'बुद्धिवंत' बिघडले तर आपण भारतीय' म्हणून राहू तरी का याची भीती वाटते. वैर्याची ही रात्र स्वकीयांनी आणली तर तक्रारj
उत्तर द्याहटवाकुठे करायची....? जयंत राळेरासकर, सोलापूर
-
मशाल’चे कथासुत्रच मुळात ‘अश्रूं’वरून उचललेले होते.
उत्तर द्याहटवाAaplya deshat Raktaranjit krantichi aavshyakta àahe tyashivay basal ashkya àahe
उत्तर द्याहटवा