सोमवार, ९ सप्टेंबर, २०१३

काल रात्री मला मिळालेला दृष्टांत



   पुढले काही दिवस तुम्ही मुंबईच्या गिरणगावात गेलात, तर सगळीकडे गणेशभक्तांची गर्दी लोटलेली दिसेल. त्या गर्दीत अर्ध्याहून अधिक लोक नवस करायला किंवा नवस फ़ेडायला आलेले असतील. कारण इथला ‘लालबागचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा बाजारातला गणपती, अलिकडे भलतीच गर्दी खेचतोय. गेल्या वर्षी एकाच दिवसात तिथे अठरा लाख भक्तांनी दर्शन घेण्याचा विक्रम प्रस्थापित केल्याचे आताच एका वाहिनीवर ऐकले. गणपती बाप्पाच नव्हेतर कुठलाही चमत्कार कसा सुरू होतो, त्याचा साक्षात्कार हल्ली या उपग्रह वाहिन्या घडवित असतात. कारण आज सकाळपासून लालबागच्या विविध सार्वजनिक गणपतीचे अनेक चमत्कार व साक्षात्कार मी प्रथमच ऐकत होतो. आज वयाची पासष्टी ओलांडलेल्या माझे पुर्वायुष्य़ याच लालबागमध्ये गेले. निदान तीन दशकांचा कालखंड मी तिथे घालवला आहे. पण इतक्या चमत्कार घडवणार्‍या भूमीत इतकी वर्षे नुसतीच गमावल्याचा मला स्वत:लाच थांगपत्ता नव्हता. मग माझ्या आयुष्य़ातल्या या चमत्काराचे दर्शन मला कोणी घडवले? उपग्रह वाहिन्यांनी नव्हेतर आणखी कोणी? कारण अशा वाहिन्यांच्या जमाना सुरू होईपर्यंत आणि देशातल्य घराघरात त्यांचे जाळे विस्तारण्यापुर्वी कधी, लालबागचे हे गणपती नवसाचे असतात, हे तिथे पंचवीस वर्षे जगूनही मलाच ठाऊक नव्हते. आणि असे म्हणायला मी कोणी बुद्धीवादी, विवेकवादी वा नास्तिक अजिबात नाही. कारण वयाच्या विशीत असताना एक वर्ष मी सुद्धा त्याच लालबागमधल्या सर्वात जुन्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सवाचा सुवर्ण महोत्सवी वर्षातला एक सहचिटणिस म्हणून काम केलेले आहे. म्हणूनच गणपतीची वा भक्तीभावाची हेटाळणी अंधश्रद्धा म्हणून करण्यासाठी, असे काही मी लिहीलेले नाही. इथले नवस व कौतुके मला इतकी जगप्रसिद्ध असल्याचे वाहिन्यांवरच्या बातम्या ऐकल्या नसत्या तर कधीच कळले नसते. असो.

   ते सुवर्ण महोत्सवी वर्ष होते १९६९ आणि तेव्हा मी माहिमच्या रुपारेल महाविद्यालयात विद्यार्थी होतो. तिथेच आजचे राज्यसभा सदस्य असलेले हुसेन दलवाई बीएच्या वर्गातले विद्यार्थी होते. त्या उत्सव काळात मी कॉलेजमधून गायब होतो. सहाजिकच उत्सवाचा उद्योग संपल्यावर हजर झालो; तेव्हा अनेक मित्रांप्रमाणे हुसेननेही मी कुठे होतो अशी विचारणा केली होती. मग मी गणेश उत्सवात एक कार्यकर्ता वा पदाधिकारी म्हणून गढलेला असल्याचे ऐकून हुसेनने माझी खिल्ली उडवली होती. अर्थात तेव्हा मला समाजवाद वा सेक्युलर पुरोगामी असण्यातला बुद्धीवाद वगैरे फ़ारसा उमगलेला नव्हता. ‘अरे गणपती कसले बसवता? देशात गरीब, दलित, कष्टकर्‍यांची दुर्दशा बघा. पोस्टर लावायला, मोर्चात घोषणा द्यायला यायचे सोडून उत्सव साजरे करतोस?’ हुसेनच्या त्या पांडीत्याने माझ्या मनात कमालीची अपराध भावना निर्माण करून ठेवली होती. शिवाय तेव्हा मुस्लिम सत्यशोधक विचारवंत हमीद दलवाईचा भाऊ अशीच हुसेनची ओळख होती. सहाजिकच तो काही महान विचार सांगतोय, हे गृहीत होते. म्हणून गप्पच रहाणे शहाणपणाचे होते. असा तो काळ होता. पण त्यामुळे अर्थातच मला गणेश उत्सवात जाऊन आपण काही पाप केल्यासारखे अजिबात वाटले नाही. तसेच त्यात सहभागी झाल्याने माझी अंधश्रद्धा वाढली असेही काही होऊ शकले नाही. कारण श्रद्धा वगैरे व्यक्तीगत बाबी असतात अशीच माझी समजूत होती आणि घरी देवधर्म पाळला जात असला तरी माझ्यावर कोणी कधी त्याची कुठलीच सक्ती केलेली नव्हती. माझ्या श्रद्धा व धर्म वगैरे व्यक्तिगत सोयीनुसार चालत असत व आजही तशाच चालतात. त्या वर्षीच्या उत्सवात दमछाक झाली आणि नंतर मी त्यातून आळशीपणाने बाजूला झालो.

   तेव्हा कुठल्याही गणपतीची मदार स्थानिक रहिवाश्यांच्या वर्गणी व दुकानदार, व्यापार्‍यांच्या देणगीवर अवलंबून असायची. चार फ़लक वा जाहिराती मिळवताना कार्यकर्त्यांची तारांबळ उडत असे. आमच्या सुवर्ण महोत्सवात माझ्यासोबत असलेला पारकर नावाचा एक सहचिटणीस विक्रीकर विभागात नोकरी करीत होता. त्याच्या ‘अधिकारामुळे’ त्याने स्मरणिकेत काही हजारांच्या जाहिराती एकहाती आणल्याचे आम्हा सर्वांना केवढे कौतूक होते. कारण सव्वा रुपया घरगुती वर्गणी होती. एकूण जमा खर्च पन्नास हजारापर्यंत गेला, तरी आभाळ ठेंगणे वाटण्याचा तो काळ होता. शिवाय त्या सव्वा रुपयासाठीही दोन तीनदा लोकांची दारे वाजवावी लागत. आणि पन्नाशी गाठणारा चिंचपोकळी हा लालबागचा पहिलाच गणपती होता. उंच व भव्य गणपतीची पारंपरा त्यानेच सुरू केली, त्याचाही एक वेगळा इतिहास आहे. तेव्हा बघायला जमणार्‍या गर्दीसाठी कौतुकाचे दोनच गणपती असायचे, एक चिंचपोकळीचा आणि दुसरा तिथेच जवळ असलेला रंगारी बदक चाळीचा गणपती. हे दोन्ही भव्य चित्रप्रसंगाचे गणपती सारंग नावाचे दोन बंधूच बनवित असत. श्याम सारंग आणि राम सारंग. त्यांच्या कलेला दाद द्यायला गर्दी लोटत असे. पण अशा गर्दी लोटणार्‍या उत्सवात जाहिरात करून माल खपवण्याचा जमाना तेव्हा आलेला नव्हता. सहाजिकच मंडपाचा खर्च आणि व्यवस्थेसह अन्य खर्च जमा करताना कार्यकर्त्यांच्या नाकी दम यायचा. उत्सवाच्या परिसरात मुख्य प्रवेशद्वारी भव्य कमान उभारायची, तर तिचा खर्च उचलणारा जाहिरातदार मिळवायला दाताच्या कण्या कराव्या लागत. अशाच जाहिरातीसाठी तेव्हा स्थानिक नगरसेवक भाई शिंगरे आम्हाला घेऊन इंडीयन ऑईलचे सहव्यवस्थापक असलेल्या अभिनेता आत्माराम भेंडे यांच्याकडे घेऊन गेले होते. ड्युक वा गोल्डस्पॉट अशा खाद्यपेयांच्या कंपन्या हा आणखी एक पटणारा जाहिरातदार असायचा. अन्यथा जाहिरातीचे फ़लक हा मंडळासाठी तोट्याच्याच व्यवहार असायचा.

   अशा या गिरणगाव लालबागच्या गणपतीचे नवस तरी किती मोठे असायचे? पाच पंचवीस नारळाचे तोरण बांधायचे नवस कोणीतरी केलेले असायचे आणि त्याचा मंडळात कोणाला पत्ता नसायचा. जेव्हा असा कोणी भक्त नवस फ़ेडायला यायचा, तेव्हा तसा नवस झाल्याचा पत्ता लागायचा. बाकी नवसाला पावणारा असे कुठल्याच गणपतीचे लालबागमध्ये कौतुक नव्हते. पण अप्रतिम देखावे, सजावट व भव्य मुर्ती; असेच लालबागच्या गणपतीचे वैशिष्ट्य होते. चिंचपोकळी व रंगारी बदक चाळ हे गणपती बघितल्यावर गणेशगल्ली, मार्केटचा (लालबागचा राजा) गणपती. जयहिंद सिनेमाच्या वाडीतला, अभ्युदय नगरचा आणि कॉटनग्रीनचा गणपती बघून लोकांचा दर्शन सोहळा संपत असे. त्याखेरीज काही बिनपूजेचे हलणारे गणपतीही असायचे. आसपासच्या कंपाऊंडमधले शेडगे, फ़ाटक व कांबळी यांचे चित्रमय प्रदर्शनाचे गणपती असायचे. म्हणजे त्या देखाव्यात हलणार्‍या मुर्ती चित्रे असायची. पौरणिक ऐतिहासिक घटनांवर आधारीत हालचाली करणार्‍या मुर्ती; असे त्या प्रदर्शनाचे स्वरूप असे. त्यासाठी तिकीट काढावे लागत असे. थोडक्यात संपुर्ण दिवस खर्ची घालूनच लालबागचे गणपती बघायला जत्रेसारखी गर्दी उसळत असे. ती आजच्यापेक्षा कमी नक्कीच होती. कारण तेव्हा गणपतीसाठी गावी गेलेले वा घरोघर अडकून पडलेले गणेशभक्त प्रामुख्याने गौरीगणेश विसर्जन झाल्यावरच लालबागकडे वळत असायचे. त्यामुळे मग पहिले निदान चारपाच दिवस लालबागला गर्दी नसायची. अखेरच्या पाचसहा दिवसात मात्र दिवसरात्र असा फ़रक होत नसे. आता पहिल्या दिवशी सकाळ उजाडल्यापासूनच जत्रा सुरू होते. त्याचे प्रमुख कारण आता अमराठी लोकही लालबागच्या जत्रेला लोटू लागले आहेत. ही सगळी किमया उपग्रह वाहिन्यांची आहे. गेल्या पंधराविस वर्षात उपग्रह वाहिन्यांचा पसारा वाढला आणि त्यातून लालबागच्या गणपतीची किर्ती व ख्याती जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचली. इतकी की आता चार दशकांपुर्वीचे अनेक सेक्युलर पुरोगामी सुद्धा गणेशभक्त होऊन गेलेत. मी उत्सवाचा सहचिटणिस असताना कॉलेजमध्ये माझी खिल्ली उडवणार्‍या हुसेन दलवाईचा उल्लेख आलेला आहे ना? तोही आता मोठा गणेशभक्त होऊन गेला आहे. कारण गेली काही वर्षे हुसेन अगत्याने बांद्रा परिसरात गणेशभक्तांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देणारे फ़लक झळकवत असतो.

   पुण्यात एका गाफ़ील क्षणी ओंकारेश्वराच्या पुलावर डॉ. नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या घालून त्यांची हत्या झाली, त्या घटनेला आज नेमके वीस दिवस पुर्ण होऊन गेलेत. त्यानंतर दोनतीन दिवस घसा कोरडा होईपर्यंत विवेकवाद व अंधश्रद्धांवरील आपल्या निष्ठांचे प्रदर्शन मांडणार्‍या बहुतेक वाहिन्या आज दाभोळकर विसरून नवसाला पावणार्‍या विविध गणपतींचे हवाले लाखो करोडो भारतीयांना देत आहेत. त्यापैकी कोणाला दाभोळकर आज आठवलेले सुद्धा नाहीत. तेव्हा दाभोळकर हत्येमुळे शरमेने खाली गेलेल्या माना, आज नवसाचे गणपती दाखवताना अभिमानाने ताठ झालेल्या आहेत. याला विवेकवादाचा चमत्कार म्हणावे की त्या नवसाला पावणार्‍या लालबागच्या राजाची किमया म्हणावे, तेच मला उमगलेले नाही. हुसेनभाईला विवेकवादाला तिलांजली देऊन गणेशभक्त व्हायला तीन दशकांचा कालावधी लागला, वाहिन्यांवरील नास्तिक बुद्धीवादी पत्रकारांना गणेश ‘पावायला’ तीन आठवड्याचा कालावधी पुरला. त्यांना दाभोळकरांच्या हत्येमुळे शरम वाटली, तो चमत्कार होता की आज लालबागचा राजा नवसाला पावतो; असे जाणवले हा साक्षात्कार आहे? तुमच्यामाझ्यासारखा सामान्यबुद्धीचा माणूस हे कोडे कधी उलगडू शकणार आहे काय?

   कधीकधी मला वाटते की बुद्धीची देवता मानल्या जाणार्‍या त्या गणरायाचे वाहन असलेले उंदिरच आजकाल बुद्धीची देवता म्हणून तोतयेगिरी करतात की काय? आपल्या कानीकपाळी रोजच ओरडून मारला जाणारा हा सगळा बुद्धीवाद त्या उंदरांप्रमाणे असा या बिळातून त्या बिळात किंवा इथल्या अडगळीतून तिथल्या ढिगात दडी मारायला का पळत असतो? ‘तुमचा नरेंद्र निवडा’ असे तुम्हाआम्हाला आवाहन करणार्‍या एबीपी वाहिनीला लालबागचा राजा ‘प्रसन्न’ होऊन त्याने दोन्ही नरेंद्रांकडे पाठ फ़िरवत तीन आठवड्यात गजेंद्रच निवडला. तेव्हा मला त्या बुद्धीदात्या गणरायाचीही खुप दया आली. त्यानेही माझ्या सहानुभूतीचा मन:पुर्वक स्विकार करताना मंडपात जाऊन स्थानापन्न होण्यापुर्वी मनमोहन सिंगांप्रमाणेच माझी समजूत काढली. दृष्टांत देत मला काल रात्री म्हणाला, ‘सोकावलेल्या उंदरांच्या राज्यात सगळी बुद्धीच कुरतडली जातेय रे. जमल्यास बुद्धी सुरक्षा विधेयक संसदेत संमत करून घेणारा कुणी पक्ष असेल, तर त्याला बहूमत देऊन बघ. माझा अगदी मनमोहन झालाय.’

२ टिप्पण्या:

  1. गणपती या तत्वाचा आदर राखून मी असे म्हणतोय की विघ्नहर्ता , सुखकर्ता वगैरे वगैरे या सर्व गोष्टी पूर्वीपासून गणेशोत्सवासाठी खास तयार केलेल्या मार्केटिंग हाइप्स आहेत. आता नवसाला पावणारा सार्वजनिक गणपती ही एक नवीनच टुम गेल्या १५ /२० वर्षात सुरु केली/झाली आहे.

    लालबागच्या गणपतीला १९८२ साली गिरणगावचा अभूतपूर्व संप मिटून कामगारांना योग्य ती न्याय मिळावा आणि त्यांचा विजय व्हावा म्हणून नवस आणि बऱ्याच ब्राह्मण पुजार्यांनी/भिक्षुकांनी मंत्र-जप-यज्ञ याग असे काहीतरी केले होते म्हणे. काय झाले शेवटी?? गिरण गावातील कामगार विशेषतः कोंकणातील गिरणी कामगार देशोधडीला लागला. गेल्या २/३ वर्षात या मंडळांच्या परिसरात कितीतरी मोबाईल चोरीला गेलेत. पाहिजे असेल तर जवळच्या काळाचोकी पोलिस स्टेशन कडे चौकशी केल्यास समजतील. सार्वजनिक गणेशोत्सव हा निव्वळ बाजार झालाय .

    काय करणार? आपण टीका केलीत तर उगाच अपमान केलात म्हणून हिंदू धर्मातील काही लोकांच्या (सर्व हिंदू धर्मियांच्या न्हवे, दक्षिणेकडे तेथील लोक कार्तिकेय स्वामीला गणपतीपेक्षा श्रेष्ठ मानतात) भडकतील आणि मग गणपतीचा कोप होईल "विघ्नहर्ता" :)

    उत्तर द्याहटवा