शुक्रवार, २ मार्च, २०१२

रोगालाच उपचार ठरवणारे डॉक्टर असले मग?


कालपरवाच महापालिका निवडणुका संपल्या. यांचे निकालही आता लागले आहेत. पण त्या रणधुमाळीत काय, काय आरोप एकमेकांवर चालू होते? नारायण राणे, छगन भुजबळ, कृपाशंकर सिंग, असे सगळेच एकमेकांवर भय़ंकर आरोप करत होते. आज अशी अवस्था आहे, की काल कुठल्या पक्षात असलेला नेता कार्यकर्ता आज कुठल्या पक्षात असेल त्याची हमी तो स्वत:च देऊ शकत नाही. आणि असे लोक साधे नसतात, खुप महत्वाकांक्षी असतात. संघटनेपेक्षा त्यांना आपल्या महत्वाकांक्षेशी कर्तव्य असते. त्यापुढे विचार, भूमिका, संघटना, तत्वज्ञान, सचोटी, लोकलज्जा, प्रतिष्ठा यांना कवडीचीही किंमत ते देत नाहीत. अशा माणसांचा ओघ पक्षात वा संघटनेत सुरू झाला मग तिचा लढण्याचा, क्रांतीचा, चळवळीचा आवेश संपला म्हणुन खुशाल समजावे. कारण अशा लोकांना आपल्यात सहभागी करून घेताना त्या संघटनेने आपल्या अस्तित्वाशी सौदा केलेला असतो. उमेदीचे आयुष्य़ समाजवादी, पुरोगामी, डाव्या विचारसरणीचे प्रवचन करण्यात घालवलेले माझ्या पिढीतले कित्येकजण आज तो नैतिक व्याभिचार करताना दिसतात, तेव्हा मनाला खुप यातना होतात. आणि हे कुणी सामान्य बुद्धीचे कृपाशंकर नाहीत, तर उच्चशिक्षीत बुद्धीमान लोक आहेत. कर्तृत्वहिन महत्वाकांक्षा त्यांच्या अध:पतनाचे कारण आहे.  

   कुठल्या तरी वाहिनीवर पुरोगामीत्वाचे विवेचन करताना डॉ. कुमार सप्तर्षींना मी पहातो, तेव्हा मला तीनचार दशकांपुर्वी क्रांतीच्या गप्पा मारणारा आवेशपुर्ण कुमार आठवून खेद होतो, १९७७ च्या जनता लाटेत सतापदाच्या मागे धावताना त्यांची झालेली तारांबळ आणि नंतरच्या काळात अस्तित्वासाठी चाललेली केविलवाणी धडपड ही कार्यकर्ता संस्कृतीची शोकांतिकाच आहे. त्याच काळात कुमारचे शेपुट पकडून आशाळभूत वागणारे डॉ. रत्नाकर महाजन; जनता पक्ष, जनता दल, कॉग्रेस, राष्ट्रवादी, पुन्हा कॉग्रेस असा प्रवास करत फ़िरले, हे मी बघीतले आहे. त्यांच्या या सर्वकाळातील वैचारीक तात्विक कोलांट्या उड्या अस्सल भामट्यांनाही लाजवणार्‍या आहेत. डॉ. निलम गोर्‍हे यांचीही वाटचाल तशीच आहे. तिसरीकडे डॉ. भालचंद्र मुणगेकर वा हुसेन दलवाई यांचा राजकीय प्रवास तेवढाचे करुणास्पद आहे. दहा, पंधरा, पंचविस वर्षापुर्वी जेवढ्या तावातावाने ही मंडळी कॉग्रेस-शिवसेना यांच्या विरोधात वैचारिक भूमिका मांडत होती, त्याच्या एकदम विरुद्ध टोकाची भूमिका आज तेवढाच विचारवंताचा आव आणून हे बोलतात; तेव्हा मजा वाटण्यापेक्षा त्यांची कीव येते. एक अधिकारपद सत्तापद त्यांच्या बुद्धीमत्तेला माकडाप्रमाणे नाचवू शकते, मग बाकीच्या सामान्य बुद्धीच्या कार्यकर्त्याने स्वार्थासाठी तडजोडी केल्या तर काय मोठे? उपरोक्त सर्व नावे १९६०-७० च्या जमान्यातील युवक क्रांती दलातील तरूण विचारवंतांची आहेत. ते एका सुरात कॉग्रेस-शिवसेना यांच्यावर वैचारिक हल्ले चढवत होते. ती कॉग्रेस आजच्यापेक्षा खुप सभ्य व कमी भ्रष्ट होती. शिवसेनाही तेव्हा आजच्यापेक्षा खुप स्वच्छ होती. मग बदल कोणात झाला आहे? जे त्यांच्यावर टिका करत होते, त्यांना दुषणे देत होते, त्यांच्यात बदल झालेला आहे ना? काल जे कोणाच्या फ़ाटक्या मळक्या कपड्यावर झोड उठवत होते, तो आज राजरोस नागडा फ़िरत असताना, तेच निंदक त्याच्या पेहेरावाचे कौतुक करत असतील तर कोणाची बुद्धी फ़िरली म्हणायचे?    

   अशा बुद्धीभ्रष्टतेने समाजातील चांगले वाईट यातली सीमारेषा धुसर होत असते. त्याचाच फ़ायदा कृपाशंकर घेत असतात. अशा माणसाच्या सोबत बसताना, वागताना मुणगेकर, दलवाई, महाजन यांना कधी लाज का वाटली नाही? यातले काहीच त्यांना ठाऊक नव्हते असे म्हणायचे काय? अशा भ्रष्ट वागण्याचे समर्थन त्या पक्षात असल्याने जेव्हा हे विचारवंत करतात, तेव्हा ते अधिकच केविलवाणे दिसू लागतात. त्यांच्यात आणि कृपाशंकर यात काडीचा फ़रक उरत नाही. तो केवळ पैशासाठीच सार्वजनिक जीवनात आलेला होता. पण वर सांगितलेली नावे तशी नाहीत. ते सुशिक्षीत, सुखवस्तू, विचारी, तारतम्य असलेले व समाजात काही वेगळे चांगले करून दाखवण्यासाठी सार्वजनिक जीवनात आलेले तरूण हो्ते. त्यानी आज एका सत्तापदासाठी वा अधिकारपदासाठी अशी लाचारी पत्करावी हे भुषणावह आहे काय? अशी त्यांची अवस्था का व्हावी? एक म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणाला त्यांनी तिलांजली दिलेली असू शकते. नसेल तर त्यांनी त्या प्रामाणिकपणाचा दाखला देण्यासाठी, आपल्या अशा कोलांट्या उड्य़ांचे बौद्धिक विवेचन तरी करायला हवे होते. ते त्यांनी कधीच केलेले नाही. पण त्यांच्या या अवस्थेचे उत्तम विश्लेषण त्यांच्या उमेदीच्या काळात एका सामान्य कार्यकर्त्याने करून ठेवलेले आहे. तो त्यांच्या इतका जाडीजुडी तत्वज्ञानाची पुस्तके वाचलेला विचारवंत वगैरे नाही. तर मुंबईत कामगार वस्तीत कष्टकरी जीवन जगलेला अतीसामान्य दलित कार्यकर्ता आहे. आर. जी. रुके असे त्याचे नाव आहे. सत्तापदे व लोभ कार्यकर्त्याचा कसा र्‍हास घडवून आणतो, त्या दुखण्यावर रुके यांनी ४५ वर्षापुर्वी नेमके बोट ठेवलेले आहे. पण गांधी, मार्क्स, लोहिया, इत्यादि थोर महापुरुषांचे साहित्य वाचणार्‍या याच युक्रांदियांनी रुकेसारख्या सामान्य कार्यकर्त्याचे मनोगत कधी वाचलेले असणे शक्य नाही. म्हणुनच डॉक्टर असुनही त्यांना आपल्याच दुखण्याचे योग्य निदान करता आलेले नसावे किंवा त्यावर उपाय सुचले नसावेत.

   १९६७ साली रिपब्लिकन पक्षात कॉग्रेस बरोबर निवडणूक युती करणाचे वारे वाहू लागले होते. त्यातून धुसफ़ुस सुरू होती. त्यासाठी झालेल्या बैठकीत अशा युतीला जोरदार विरोध करणार्‍या गटात रुके यांचा समावेश होता. सत्ता नसलेल्या रिपब्लिकन पक्षाला सत्तापदे कशी रसातळाला घेऊन जातील व त्यातल्या कार्यकर्त्याचा विनाश घडवतील त्याचे भाकितच रुके यांनी पुढील शब्दात केले होते.

    ’आज आपला पक्ष स्वाभीमानी आणि आंबेडकर निष्ठा बाळगून आहे. कारण कार्यकर्त्यांसमोर कोणत्याही प्रकारचे आमिष नाही. ते सत्तेपासून दुर आहेत म्हणुनच ते ताठ आहेत. कॉग्रेसचा आहारी गेलो तर, कार्यकर्त्यांमध्ये स्वार्थाची लागण होईल, त्यांच्या स्वार्थापुढे पक्षहित नगण्य ठरेल. त्यांना एकदा का सत्तेच्या सावलीत बसायची सवय लागली, की मग त्यांची आपण सुटका करू शकत नाही. सत्तेसाठी स्पर्धा नाही म्हणुन आज कार्यकर्त्यांमध्ये बंधूभाव आहे. उद्या सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली तर एकमेकांचे गळे कापायला हेच कार्यकर्ते मागे-पुढे पहाणार नाहीत. बाबासाहेबांच्या विचारसरणीची जागा कॉग्रेस घेईल आणि मग आपल्या पक्षात बजबजपुरी माजेल.’  

   ज्या काळात रुके यांनी हे भविष्य रिपब्लिकन पक्षासाठी वर्तवले होते, त्याच काळात बिहारमध्ये दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलेल्या मुंबई पुण्यातल्या काही सुशिक्षीत तरुणांनी एक वैचारिक संघटना किंवा अभ्यासगट सुरू केला होता, त्यालाच पुढे युवक क्रांती दल म्हणून ओलखले जात होते. वरील सर्व महान विचारवंत नामवंत त्यातलेच क्रांतीकारी तरूण आहेत. आज ४५ वर्षानंतर ते तरूण राहिलेले नाहीत. साठीच्या पलिकडे गेलेले यृद्ध झालेले आहेत. त्यांनी आज रुके यांचे तेच भाकित खरे करून दाखवले आहे. तरूणपणी ज्या थोर विचारांचे गोडवे गाईले ते गाडून तेच तेव्हाचे क्रांतीकारी तरूण आज कॉग्रेसी प्रवृत्तीला विचारसरणी म्हणु लागले आहेत. कारण आता त्यांना ’सत्तेच्या सावलीत बसायची सवय लागली आहे.’ बापू नावाचा गांधी त्याना आठवत सुद्धा नाही. गांधी म्हणजे राहूल किंवा सोनिया असे बेधडक ते महात्मा गांधी समोर उभे राहिले तरी त्यांना दमदाटी करुन बजावतील. कारण त्यांनी आपल्यातला झुंजार कार्यकर्ता कधीच मारून टाकला आहे. तो कधी डोके वर काढू लागला, तरी त्यांना त्याची भिती वाटते. आपल्यातला सोडाच, त्यांना दुसरा कोणी कार्यकर्ता दिसला, तरी जुने दिवस भुतासारखे घाबरवू लागतात आणि ते सर्व शक्तीनिशी त्या डोके वर काढू पहाणार्‍या कार्यकर्त्याला ठेचून काढायला पुढे सरसावतात. त्यासाठी कृपाशंकरची मदत घेतात. आता तर त्यांच्यासाठी कृपाशंकर हीच विचारसरणी झाली आहे. सवाल कृपाशंकर सारख्या रोगराईचा नसतो. त्याची भिती जास्त नसते. त्यापेक्षा भयंकर असत्तात ते त्या रोगालाच उपाय ठरवून उपचार करणारे डॉक्टर. आणि मी वर सांगितले त्या जुन्या युक्रांदीयांमध्ये डॉक्टरांचाच भरणा आहे ना?

   मृणालताईंना भ्रष्टाचार संपवता आला नसेल. पण झुंज सोडून त्यांनी भ्रष्टाचाराशी हातमिळवणी तरी केली नव्हती, त्याचे समर्थन तरी केले नव्हते. त्याच्याशी भागिदारी केली नव्हती. त्याच्याशी लढताना हौतात्म्य स्विकारण्यात धन्यता मानली. त्यांचे हे आजचे वारस त्याच भ्रष्टाचारासमोर नुसते हरले नाहीत. त्याच्यासमोर पराभव पत्करून त्यांनी त्याचे मांडलिकत्व स्विकारण्यात पुरूषार्थ शोधला आहे. त्या हौतात्म्यावर मग कृपाशंकर आपले सिंहासन स्थानापन्न करीत असतात. आणि त्यांची पालखी उचलण्यातले पुरोगामीत्व सांगण्यात या बुद्धीमान युक्रांदीयांचे घसे कोरडे होत असतात. आणि हे सर्व निष्प्राण डोळ्यांनी मेलेला कार्यकर्ता बघत असतो. मुलाने आईला वा बापाने मुलीला कोठीवर ढकलावे तसाच हा प्रकार नाही का? (क्रमश:)
भाग १९३    (२/३/१२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा