सोमवार, १२ मार्च, २०१२

लोकशाहीत संसद नव्हे, तर मतदार जनता सर्वश्रेष्ठ
   या निवडणुकीत केवळ लोकपालसाठीच कॉग्रेसचा पराभव होणे आवश्यक नव्हते. आपल्या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी व वाचवण्यासाठी कॉग्रेस नामोहरम होणे आज अगत्याचे आहे. कारण हा पक्ष व त्याचे आजचे नेतृत्व इथला लोकशाहीचा पायाच उखडून टाकण्याचे उद्योग करते आहे. जेव्हा कॉग्रेसला प्रचंड बहुमत असायचे, तेव्हा त्याने नेहमीच सत्तेचा वापर नव्हेतर गैरवापर करून इतर पक्षांना संपवण्याचेव खेळले आहेत. कधी राज्यपालांचा वापर केला तर कधी घटनात्मक अधिकारांचा गैरवापर केला. आज तर त्याच्यापाशी स्वत;चे बहुमत सुद्धा नाही. तरी तशीच मस्ती चालू आहे. याला राजकारण म्हणायचे तरी ठिक आहे. एका पक्षाने दुसर्‍याच्या विरुद्ध सत्तेचा वापर समजू तरी शकतो. पण अण्णा वा स्वामी रामदेव यांच्यावरही पोलिसांची लाठी उगारण्यापर्यंत मजल गेल्यावर उरले काय?

संसद म्हणजेच सर्वोच्च असा दावा केला जात होता. ते खरे असले तरी संसद म्हणजे त्यात बसणार्‍यांची मनमानी असा होत नाही. त्यांनीही नियमानुसार काम करणे आवश्यक असते. रामलिला मैदानावर पोलिसांनी रामदेव समर्थकांवर उगारलेल्या लाठ्या  हा सत्तेचा अतिरेकी वापर असल्याचा निर्वाळा आता  सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे. तो अतिरेक कशाच्या बळावर सरकारने वा त्याच्या गृहमंत्र्याने केला? संसदेतील बहुमताच्या आधारे मिळालेल्या सत्तेमुळेच ना? ती कारवाई कोर्ट चुकीची म्हणते तेव्हा संसद श्रेष्ठ म्हणणार्‍यांचे दावे संशयास्पद होत असतात. तुम्हाला घटना व कायद्यानुसार सत्ता राबवण्याचा अधिकार पाच वर्षासाठी जनतेने दिलेला असतो. त्याचा अर्थ आपले सर्व अधिकार जनतेने गमावलेले नसतात. तिने पाच वर्षे निमुटपणे तुमची मनमानी सहन करावी म्हणजे घटनेचा सन्मान नसतो. हे ज्यांना समजत नाही त्यांना मग जनता मतदानातून समजावत असते. ते त्यांना समजावण्याची वेळ आली आहे असेच अण्णा सुचवत होते. विधानसभा निवडणूकीत कॉग्रेस विरुद्ध प्रचार करणार असे अण्णा म्हणाले, याचा  अर्थ ते दुसर्‍या कुणाला मते द्या असे सांगत नव्हते. तर ज्यांना निवडून आल्यावर आपणच सर्वोच्च झालो असे वाटू लागले होते, त्यांना जनता सर्वोच्च आहे हे दाखवून द्या असेच प्रचारातून जनतेला समजावण्यचा अण्णांचा हेतू होता. पण त्या विरुद्ध केवढे काहूर माजवण्यात आले, जे इथल्या शहाण्यांना, पत्रकारांना, माध्यमांना, अभ्यासकांना, जाणकार-विश्लेषकांना कळले नाही, ते सामान्य जनतेला व मतदाराला नेमके कळले होते. त्याचेच प्रतिबिंब आपण निकालातून पाहू शकतो.    

    परवा निकाल लागलेल्या निवडणुकात नेमका कोणाचा पराभव झाला? कोणाला मतदाराने नाकारले? ज्यांच्या संरक्षणाला तमाम पत्रकार माध्यमे व सेक्युलर धावले होते, त्याच कॉग्रेसला मतदाराने नाकारले आहे. त्याने तसे करताना भाजपाला स्विकारले असेही नाही. त्याने मुलायमसारख्या तथाकथित सेक्युलर पक्षालाच सत्तेवर आणले. म्हणजेच त्याने अण्णांना हवे तेच केले आहे. त्याने कॉग्रेसला पाडले. पण काहुर माजवणार्‍या पत्रकारांना भिती वाटत होती त्याप्रमाणे भाजपाला निवडून दिले नाही. कारण तशी अण्णांची इच्छा नव्हती की हेतुसुद्धा नव्हता. मग जे घडणारच नव्हते त्यासाठी माध्यमांनी काहुर माजवण्याचे कारणच काय होते? त्यांनी एवढी आदळआपट केली म्हणून कॉग्रेस वाचली नाही की जिंकली सुद्धा नाही. पण या निमिताने सेक्युलर पत्रकार व अभ्यासकांचे पितळ मात्र उघडे पडले. त्यांना अण्णा राजकारण खेळतात याच्याशी कर्तव्य नव्हते. त्यांना कॉग्रेसला पाडायला निघाले याची भिती वाटली होती. आणि अण्णांना गप्प बसवले तरी ती खरिच ठरली. कारण असे आवाहन अण्णांनी करायची गरजच नव्हती. जेव्हा कॉग्रेसने शिरजोरी केली तेव्हा तेवहा मतदाराने त्याची सजा कॉग्रेसला दिलेली आहे. मतदाराच्या हेतुची जाण नसलेल्या अर्धवट अभ्यासक व राजकारण्यांनी मात्र कॉग्रेसला पुन्हा जिवदान दिलेले आहे. त्यामुळेच देशातल्या काही राज्यात कॉग्रेस पुर्णपणे नेस्तनाबुत झली आहे. जिथे प्रादेशिक पर्याय मिळाला तिथे स्थानिक नेतृत्व जनतेने स्विकारले. नसेल तिथे भाजपा किंवा मार्क्सवाद्यांसारखा एकदम डावा पर्याय सुद्धा जनतेने स्विकारला आहे. दुर्दैवाची गोष्ट इतकीच की इथल्या शहाण्यांना ते लक्षात आलेले  नाही समजत नाही.  

   कॉग्रेस ही आता कालबाह्य गोष्ट झाली आहे. देशाचे राजकारण पुढे न्यायचे असेल व त्याला वैचारिक वळण द्यायचे असेल तर त्यात कॉग्रेस हा मोठा अडथळा आहे. तो संपवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आजच्या कॉग्रेसला विचार तत्वज्ञान उरलेले नाही. त्यामुळेच सोयीचे असेल तेव्हा कुठल्याही तत्वशून्य आघाड्या व युत्या करुन सत्ता टिकवणे व मिळवणे एवढेच कॉग्रेस करत असते. पंजाबात अकाली दलाकडून सत्ता हिरावून घेण्यासाठी कॉग्रेसचे नेते सच्चा सौदा पंथाच्या गुरुचरणी शरण गेले होते ना? त्याला जातियवाद नाही तर काय म्हणायचे? मायावती मुलायम यांच्याकडून मुस्लिम मते आपल्याकडे वळवण्यासाठी मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या नियमबाह्य घोषणा त्यांच्याच कायदामंत्र्याने केल्या नाहीत काय? अशा पक्षाने भाजपावर जातियवादाचा, धार्मिक मतांचे राजकारण खेळण्याचा आरोप करणे बनवेगिरी नाही काय? ती सामान्य मतदाराला कळते आणि शहाण्या बुद्धीमंताना कळत नाही यावर कोणी विश्वास ठेवायचा? त्यामुळेच अण्णांवर संघाचे हस्तक असल्याचा आरोप केल्याने काहीही फ़रक पडला नाही. काय करायचे ते मतदाराला ठाऊक होते. म्हणुनच अण्णांना गप्प करून कॉग्रेसला वाचवणे पत्रकार माध्यमांना शक्य झाले नाही. आणि तुम्ही वाचवणारे कोण? तिथे चिदंबरम, कपिल सिब्बल, दिविजयसिंग कॉग्रेस बुडवायला सज्ज बसले आहेत. अखंड राबत आहेत. मग बाहेरचे तिला वाचवणार कसे?

मतदार जनतेने यातुन शहाण्यांना व पत्रकारांना संसदेपेक्षा कोण सर्वोच्च आहे त्याचा पुरावा दिला आहे. ह्या देशात सोनिया, त्यांचे घराणे वा त्यांच्या तालावर नाचणारा कॉग्रेस पक्ष वा सरकार सर्वोच्च नसून जनताच सर्व्श्रेष्ठ आहे असे मतदानातून दाखवुन दिले आहे. ते कोण आधीपासुन सांगत होता? तो सामान्य मतदार रस्त्यावर येऊन तसे सांगत नव्हता, त्याने पत्रकारांना ते वाहिनीवर येऊन वा लेख लिहुन कळवले नाही. तो आपला डाव येईपर्यंत थांबला आणि संधी मिळताच त्याने एक फ़टक्यात देशातल्या सर्वशक्तीमान म्हणुन मिरवणार्‍यांना जमीनीवर आणले आहे. हेच अण्णा सांगत होते, पण शहाण्यांना ते कळले नाही. मतदाराने ते छान समजावले आहे. आणि त्याला कोणी जाब विचारू शकत नाही. कारण तोच सर्वोच्च आहे ना?(क्रमश:)
 भाग ( २०२ )   १२/३/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा