शुक्रवार, ३० मार्च, २०१२

लबाड लांडगं ढ्वांग करतंय



   रोज आपण ज्या वाहिन्यांवर कुठल्या तरी विषयावर भांडण सादृष चर्चा बघतो. बघतो असे मी मुद्दाम म्हणतो. कारण त्या चर्चा अशा रंगवल्या जात असतात, की त्यात गोंगाट व्हावा. कोण काय बोलतोय ते कुणालाच ऐकू येऊ नये याची संयोजक पुर्ण काळजी घेत असतात. त्यात कुठलाही सभ्यपणा नसतो. दुसर्‍याचे निदान ऐकून घ्यावे, ही लोकशाहीतील किमान सभ्यता असते. त्याचाच संपुर्ण अभाव असलेल्या ह्या चर्चा, आपल्याला लोकशाहीची महती सांगत असतात. त्यातले विद्वान सुद्धा आपण काय बोलावे त्यापेक्षा दुसर्‍याचे प्रेक्षकांना ऐकूच येऊ नये, यासाठी आटापिटा करत असतात. त्यालाच चर्चा म्हणायचे असेल, तर कुठल्याही वस्तीत गावात नळावर, पाणवठ्यावर होणार्‍या हमरातुमरीचे थेट प्रक्षेपण करायला हरकत नाही. आणि मजेची गोष्ट म्हणजे अशा त्या गोंगाटात सहभागी होणारे, स्वत:ला विद्वान म्हणवून घेण्यात धन्यता मानत असतात. त्यांची लायकी काय आहे ते सामान्य प्रेक्षक त्यांच्या वागण्यावरूनच ओळखत असतो. त्यातले चांगले कोण, विद्वान कोण व योग्य वाद प्रतिवाद करणारे कोण, हे संयोजकाने कितीही झाकले तरी बघणारे छानपैकी ओळखत असतात. नसलेली अक्कल वापरून भाव खाऊ बघणारे व कमी पण नेमके बोलून मुद्दा जिंकणारे, प्रेक्षकांना आवडतात सुद्धा. म्हणून तर एकीकडे चाललेली निर्बुद्ध चर्चा तर दुसरीकडे त्यावर व्यक्त होणारे मतदान यातली तफ़ावत बोलकी असते.

   या चर्चेत नेहमी आपण सामान्य जनतेच्या वतीने बोलतोय, असा आव त्यातले चर्चा संयोजक म्हणजे टीव्हीच्या भाषेतले ऍंकर आणत असतात. पण त्यांचा कुठेतरी सामान्य जनजीवनाशी संबंध असतो काय? असता तर चर्चा व मतदान यात कुठेतरी सुसंगतपणा आढळून आला असता. आपल्या हाती माध्यम आहे म्हणून आपण कुठलाही कचरा लोकांच्या गळ्यात बांधू शकतो, अशा मस्तीत हे सर्व चालत असते. पण कधी तरी अशी वेळ येते, की पळता भूई थोडी होऊन जाते. अनेक वाचक मला रोज फ़ोन करत असतात. त्यांना ह्या चर्चा कशा चालतात व कशा आयोजित होतात, याची कल्पना नसते. मग त्यातले काही निरागसपणे मला विचारतात, तुम्ही एखाद्या चॅनेलवर येऊन चर्चेत का भाग घेत नाही? तेव्हा त्यांना समजावणे भाग पडते, की या चर्चा लोकहिताशी संबधित नसून तिथले मालक, व्यवस्थापन व संपादक, यांच्या सोयीनुसार होत असतात. त्यातून सत्य वगैरे लोकांसमोर मांडण्याचा हेतू नसतो तर त्या वाहिनीच्या चालकांना जे धोरणात्मक मुद्दे लोकांच्या डोक्यात घालायचे असतात, त्याच दिशेने चर्चा घडवायची असते. मग त्याचे भलेबुरे काहीही परिणाम झाले तरी बेहत्तर. मग अशा चर्चेत मला कोण कशाला आमंत्रित करणार? जो माणूस त्यांच्या पापाचा पाढाच आपल्या लिखाणातून रोज वाचकांसमोर मांडतो, त्याला ते कशाला बोलावतील? त्याला आणलेच आणि त्याने त्यांच्याच व्यासपीठावर त्यांचेच पितळ उघडे पाडले तर काय? त्यापेक्षा जी बनवेगिरी चालली आहे ती छान आहे. नाही तर किती गंभीर परिणाम होतात त्याचे एक अमेरिकन उदाहरण पुरेसे आहे.

   कायबीइन लोकमत वाहिनीची जी पणजी कंपनी आहे, तिला जगभर सीएनएन म्हणून ओळखले जाते. ती किती पक्षपाती व बोगस बातम्या देते त्यावर निखील वागळे यांनी न्युयॉर्कचे मनोरे उध्वस्त झाले तेव्हा लिहिले होते. तेव्हा ती बातमी समजून घेण्यासाठी आपण सीएनएन न बघता बीबीसीची बातमी कशी बघितली ते निखीलने लिहिले होते. आज तोच निखील त्याच कंपनी वाहीनीच्या एका प्रादेशिक वाहिनीचा संपादक झाला आहे. तर तिथेही खोटेच दडपून सांगायचे या बोलीवरच तो आला असणार ना? ही निखील व कायबीइन लोकमतच्या विश्वासार्हतेची पावती आहे. ज्याचा दहा वर्षापुर्वी सीएनएन वाहिनीवर विश्वास नव्हता, तोच आता त्यांच्या प्रादेशिक उपवाहिनीच्या विश्वासार्हतेची ग्वाही देतो आहे. असो तर अशा त्या सीएनएन वाहिनीवर अलिकडेच एक मोठा बॉम्बगोळा अमेरिकेतल्या एका विनिदवीर व कलाकाराने टाकला. ज्या पद्धतीचे चर्चा व वादाचे कार्यक्रम इथल्या वाहिन्यांवर चालतात, तसाच एक कार्यक्रम सीएनएनवर चालत असे. त्याचे नाव होते क्रॉसफ़ायर. निखील, राजदीप सारखे अर्धवटराव त्याचे संयोजन करायचे. त्यात कुणा नामवंताला बोलावून त्याची खिल्ली उडवायची, असे त्याचे स्वरूप होते. माधव भंडारी, जनार्दन चांदुरकर, भाई जगताप, देवेंद्र फ़डणविस यांच्यासारखे सभ्य लोक त्यात निमुट ऐकून घेतात, तसेच तिकडेही होत असे. पण त्यातून अशा बदमाशांची हिंमत वाढत असते. त्यांनी एकेदिवशी त्यात जॉन स्टीवर्ट या विनोदवीर  फ़टकळ माणसाला आमंत्रित केले. तोही त्यांना सहन करील ही त्यांची अपेक्षा होती, म्हणुनच त्यांनी थेट प्रक्षेपणाचा धोका पत्करला. पण स्टीवर्ट प्रसिद्धीसाठी लाचार नव्हता. म्हणुनच त्याने एका मर्यादेपर्यंत सभ्यपणे सर्व सहन केले आणि मग तो या दोन्ही उथळ पत्रकारांवर असा तुटून पडला, की त्यांची त्याने साफ़ भंबेरी उडवून दिली.  

   त्याने नुसता त्यांच्या प्रश्न व चर्चेच्या उथळपणावरच हल्ला चढवला नाही, तर अशा उथळ बिनबुडाच्या व निरर्थक भांडणाच्या उखाळ्यापाखाळ्या काढणार्‍या चर्चा कशा समाजात दुफ़ळी माजवतात व हानी करतात, त्याचाच पाढा वाचून दाखवला. मग या दोघा ’शूर’ पत्रकारांना पळता भूई थोडी झाली. त्यांचे इतके वस्त्रहरण त्यातून झाले, की त्यांचा तो लोकप्रिय मानला जाणारा कार्यक्रम चालू ठेवणे सीएनएन वाहिनीला अशक्य झाले. प्राईमटाईम म्हणुन दाखवला जाणारा तोच कर्यक्रम, त्यानंतर त्या वाहिनीने रद्दबातल व बंद करून टाकला. कारण स्टीवर्टच्या त्या सडेतोड, परखड, व फ़टकळ सवालांना या फ़ुटकळ पत्रकारांकडे उत्तरे नव्हती. त्यांच्या पापाचा पाढा असा थेट प्रक्षेपणातून जगापुढे गेला आणि त्या वाहिनीची अवघ्या जगात छी:थू झाली. त्यामुळेच त्यांना तातडीने तो उठवळ भिकार कार्यक्रम बंद करावा लागला. ही अमेरिकन वाहिन्यांची अवस्था आहे. आपल्यापेक्षा तिथे लौकर प्रतिक्रीया उमटतात. त्यामुळे वाहिनी असो की माध्यम असो त्यांना प्रतिष्ठा खुप जपावी लागते. आपल्यासारखा बेशरमपणा खपत नाही. त्यामुळेच मग क्रॉसफ़ायर हा कार्यक्रम त्या दिवा्ळखोरीनंतर तात्काळ थांबवण्यात आला.

   एवढे आपण समजून घेतले तर आज आपल्या वाहिन्या व माध्यमातून काय चालले आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. खोटे बोलायचे, रेटून खोटे बोलत रहायचे, कोणी त्यावर आक्षेप घेतला तर त्याची दखलसुद्धा घ्यायची नाही, याला आता बुद्धीवाद म्हणतात. जोवर त्याचे परिणाम जमा होणार्‍या गल्ल्यावर होत नाहीत, तोवर रेटून न्यायचे अशी स्थिती आहे. म्हणुन तर नेहमी शिवसेना व ठाकरे यांच्यावर शिवीगाळ करण्यात धन्यता मानणारे महापालिका निवडणूकीत टीआरपी घसरताच मातोश्रीला शरण गेले होते. बाळासाहेबांच्या खाजगी गोष्टी प्रक्षेपित करण्याची स्पर्धा सुरू झाली होती. झी २४ तासने त्याची सुरूवात केली नसती व टीआरपी मिळवली नसती, तर बाकीच्या वाहिन्या तिकडे धावल्या असत्या काय? लोकपाल व अण्णांचा लाईव्ह रिऍलिटी शो कशाला दाखवला जात होता? त्यांना कोण रोजचे जेवण करून वाढते, अण्णा कुठे झोपतात, अण्णा काय खातात, अशा बातम्या कशासाठी दिल्या जातात? ही सगळी टीआरपीची लाचारी असते. त्या लाचारीला झाकण्यासाठी मग उगाच वायफ़ळ चर्चेचे गुर्‍हाळ चालवले जात असते. त्यात मग रिकामटेकडे विद्वान आमांत्रित केले जातात. जे संपादक वा संयोजकाच्या तालावर चर्चेचा नाच नाचतील, त्यांना हे मदारी खेळवत असतात. त्यांच्या पापावर मुर्खपणावर बोट ठेवील असा ते कधी आमंत्रीत कशाला करतील? एकदाच असे घडले. मातोश्रीवर निखीलला बाळासाहेब हलकट म्हणाले. ते निमुटपणे त्याने ऐकले. मग त्यावर पांघरूण घालण्यासाठी ’त्यांना त्यांच्या शिव्यांसह महाराष्ट्राने स्विकारले आहे’ असा पलायनवादी युक्तीवाद केला जातो. ज्या महाराष्ट्राने त्याना शिव्यांसह स्विकारले आहे, त्यात निखील वा तत्सम शहाणे अलिकडेच वास्तव्याला आले काय? आधीपासून असतील तर त्यांनी त्याच शिवराळ्पणाबद्दल आदळआपट कशाला चालविली होती? हे सर्व पुराण एवढ्यासाठी सांगायचे, की जे विद्वान आपण वाहिन्यावर बघतो, त्यांची ही कधीतरी झाडाझडती घेणे गरजेचे आहे. त्यातलेच एक आहेत डॉ. कुमार सप्तर्षी. वाहिनीवर त्यांचा कायम हसणारा चेहरा बघितला, मग वाटते त्यांचे थोडे अर्क काढून पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाजावे. पण तुर्तास त्याची घाई नाही. या महान गांधीवादी विचारवंताची थोडी झाडाझडती घ्यायची आहे. कारण हे सेक्युलर विचारवंत कसे भंपक, निर्बुद्ध, अर्धवटराव असतात, त्याचा दाखलाच एका सुजाण वाचकाने माझाकडे पाठवला आहे.  (क्रमश:)
भाग  ( २२० )   ३०/३/१२

https://www.hollywoodreporter.com/news/jon-stewart-takes-down-tucker-carlson-crossfire-video-961127

https://www.youtube.com/watch?v=aFQFB5YpDZE

1 टिप्पणी:

  1. ​​
    भाऊ,
    ​आपण जे म्हटलेत ना ते अगदी खरें आहे. आजकालच्या निरर्थक आणि बाष्कळ चर्चा आणि त्यातल्या फुटकळ वल्गना ऐकल्या कि असे वाटते आपली प्रसार माध्यमे अगदीच बोगस आहेत. कारण ज्या नरेंद्र मोदींना गुजरातच्या जनतेने तीन वेळा बहुमताने निवडून दिले त्या गुजरातच्या जनतेचा उपमर्द हि इलेक्ट्रोनिक प्रसार माध्यमे करताहेत. हे या नाठाळांच्या लक्षातच येत नाहीये ​...

    उत्तर द्याहटवा