शनिवार, २४ मार्च, २०१२

बौद्धिक भ्रष्टाचाराचे दुसरे नाव सेक्युलॅरिझम   जातियवाद म्हणजे भाजपा किंवा शिवसेना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आता तमाम वाचक व वाहिन्यांच्या प्रेक्षकांना तोंडपाठ झालेले समीकरण आहे. त्यात  मुस्लिम लीग वा जमाते इस्लामी यांचा समावेश होत नाही. कु्णीही हिंदू म्हणून संघटित हॊण्याचा विचार केला, तर त्याच्यावर लगेच जातियवादाचा आरोप होत असतो. १९८० साली स्थापन झालेल्या भाजपाचे इतर पक्षांप्रमाणेच १९८४ च्या राजीव लाटेत पानिपत झाले. त्याचे अवघे दोनच खासदार लोकसभेत निवडून आले होते. पण त्याच पक्षाने १९८७ नंतर राममंदिराचा विषय हाती घेतला आणि १९८९ सालात त्याचे ८९ खासदार निवडून आले. एवढ्यासाठी त्याला जातियवादी म्हणायचे काय? तसाच चमत्कार जनता पक्ष व लोकदल आदि पक्षांच्या विलयातून निर्माण झालेल्या जनता दलाने तेव्हा घडवला होता. त्याचेही दिडशे खासदार निवडून आले होते. एकाच निवडणुकीत राजीव लाट फ़िरवून दोन पक्षांची ताकद वाढली तर एकाला जातियवादाने जिंकला म्हणायचे, तर दुसरा सेक्युलर मतांनी जिंकला कसे म्हणता येईल? दोघेही बोफ़ोर्स प्रकरणामुळेच जिंकले होते. जिथे ज्याची पारंपारिक संघटना प्रबळ होती, तिथे तो जास्त जागा मिळवू शकला होता. पण आपली वाढलेली ताकद जपणे जनता दलाला शक्य झाले नाही. त्यांची नेहमीची विघ्नसंतोषी वृत्ती उफ़ाळून आली. त्यामुळेच त्यांचे नुकसान झाले. त्याचे अर्धा डझन पक्ष झाले. देवेगौडा, मुलायम, लालूप्रसाद, नितीशकुमार, अजितसिंग, ओमप्रकाश चौताला, रामविलास पासवान यांचे आज वेगवेगळ्या नावाचे पक्ष आपण बघतो. ते मुळच्या  जनता पक्ष वा जनता दलाचे अवशेष आहेत.  ते कधी कॉग्रेस विरोधात असतात तर कधी कॉग्रेस बरोबर सत्तेत सहभागी होताना सेक्युलर शाल पांघरतात. त्यातला एकच गट शेवटपर्यंत आपली कॉग्रेस विरोधी भुमिका टिकवू शकला आहे आणि त्याने लोकांचा विश्वास प्राप्त केला आहे. तो आहे नितीशकुमार व शरद यादव यांचा संयुक्त जनता दल पक्ष.

   आता भाजपाच्या वाढीचा तपशील बघा. पुर्वापार भाजपा हा हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यातला प्रभावी कॉग्रेस विरोधी पक्ष होता. त्याचे तिथले यश नवे नाही. १९८९ नंतर अयोध्येचा मुद्दा घेतल्यापासून भाजपाने जिथे नव्याने पाय रोवले, त्यात गुजरात, बिहार, उत्तरप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र याच राज्यांचा समावेश होतो. त्याखेरिज ओरिसा, बंगाल, आंध्रप्रदेश, हरयाणा, आसाम, केरळ, तामिळनाडू अशा मोठ्या राज्यात भाजपाला आपला ठसा उमटवता आलेला नाही. देशातल्या प्रत्येक राज्यात हिंदू वास्तव्य करतात. मग हिंदुत्वाने पक्षाचा प्रभाव वाढत असता व हिंदु समाज इतका धर्मवादी असता; तर त्याचा लाभ भाजपाला त्याही राज्यात मिळायला हवा होता. स्थिती उलट दिसते. केरळ, तामिळनाडू, बंगाल मध्ये भाजपाला अजुन विधानसभेत खातेही उघडता आलेले नाही. मग तिथला हिंदू सेक्युलर आणि बाकी राज्यातला हिंदु जातियवादी असतो काय? पंधरा वर्षापुर्वी भाजपाला भरभरून मते व बहुमत देणारा उत्तरप्रदेशचा हिंदु आज त्याच पक्षाला सत्तेबाहेर का बसवतो आहे? तेव्हा त्याने राममंदिरासाठी मते दिली आणि आता ते झाले नाही म्हणून भाजपाला वाळीत टाकले आहे काय? तसेच असेल तर अन्य राज्यातला हिंदु अजून भाजपाला मते का देतो आहे? आणि जिथे भाजपा जिंकत नाही, तिथल्या हिंदुला अयोध्येत मंदिर नको आहे काय? असे शेकडो प्रश्न विचारता येतील. पण त्यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर सेक्युलर विचारवंत देऊ शकणार नाहीत. कारण त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांच्या सेक्युलर विरुद्ध जातियवादी विभागणीच्या सिद्धांताची लक्तरे करणारे असेल. निवडणुकीत वा राजकारणात हिंदु माणूस कधी जातियवादी वा सेक्युलर असे मतदान करतच नाही. त्यामुळेच भाजपावर असे आरोप करणेच मुळात एक थोतांड आहे. त्याचा पुरावा भाजपाची ताकद १९८९ नंतर कुठे कुठे वाढली त्या राज्यांच्या घडामोडी तपासल्या तरी मिळू शकतो.  

   सतत ज्या नरेंद्र मोदीचा उद्धार चालतो त्या गुजरातचीच गोष्ट घ्या. १९८९ घेतले तरी त्यात भाजपा तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष होता. तिथला प्रमुख विरोधी पक्ष परंपरेने जुना समाजवादी पक्ष होता. तोच जनता पक्ष झाला, मग जनता दल झाला. आता तर त्याचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. मग तो कुठे गायब झाला? कर्नाटकात सुद्धा परंपरेने समाजवादीच विरोधी पक्ष होता. तोही आता संपला आहे. उत्तरप्रदेशात, बिहरामध्ये तेच होते. महाराष्ट्रात शेकाप, समाजवादी असे पारंपारिक विरोधी पक्ष होते. ज्याला कॉग्रेस विरोधी मतदान करायचे, त्याला त्यातला पर्याय निवडावा लागत होता. पण १९७७ नंतरच्या काळात जे सेक्युलर थोतांड आले त्याने कॉग्रेस विरोधाऐवजी जातियवादा विरुद्ध या पक्षांनी पवित्रा घेत कॉग्रेसशी चुंबाचुंबी सुरू केली. त्यामुळे ज्याला कॉग्रेसविरोधी मतदान करायचे होते, त्याला अशा पक्षांना विसरून दुसरे पर्याय शोधावे लागले. जिथे तो पर्याय शिवसेना होता तिथे सेना, तर भाजपा असेल तिथे भाजपाकडे मतदार वळत गेला. उलट जिथे पारंपरीक विरोधी पक्ष सेक्युलर थोतांडाला बळी न पडता ठामपणे कॉग्रेस विरोधात टिकून राहिले ते राजकारणातही टिकून राहिले. ओरिसात बिजु जनता दल, केरळ, बंगालमध्ये मार्क्सवादी, आंध्रप्रदेशात तेलगू द्देसम, तामिळनाडूत द्रविड पक्ष आजही कायम आहेत. भाजपा तिथे वाढू शकला नाही. दुसरीकडे हरयाणात लोकदल, पंजाबात अकाली दल, बिहारमध्ये नितीशचा संयुक्त जनता दल. भाजपा सोबत कॉग्रेस विरोधी राजकारण करत राहिल्याने, त्यांची जागा भाजपा व्यापू शकलेला नाही. यातला शेवटचा बळी मार्क्सवादी पक्षाचा काही महिन्यांपुर्वी पडला. कोलकात्यात कॉग्रेस विरोध आणि दिल्लीत सेक्युलर नावावर कॉग्रेसला पाठींबा देणार्‍या मार्क्सवाद्यांची, तीन दशकातली सत्ता ममताने उलथून पाडली. तो सेक्युलर थोतांडाने घेतलेला अलिकडला बळी आहे.

   याचीच दुसरी बाजू सुद्धा तपासून बघता येईल. मायावती, मुलायम यांनी कॉग्रेसला आपल्या सोयीनुसार पाठींबा दिला आहे. पण सेक्युलर थोतांड जपण्याच्या नादी ते लागले नाहीत, म्हणुनच टिकून राहिले आहेत. त्यांचेच भाईबंद लालू वा पासवान संपले आहेत. यातून धडा शिकलेली ममता बंगालमध्ये आपली प्रतिमा जपण्यासाठी आता कॉग्रेसपासून दुर होण्याची धडपड करते आहे. मुद्दा इतकाच की भाजपा हा हिंदुत्व किंवा जातियवादी मतांनी वाढला नाही, की कॉग्रेसचे यश म्हणजे सेक्युलर विचारांचा विजय वगैरे काही नसते. भाजपाची वाढ कॉग्रेस विरोधक म्हणून झाली होती आणि त्याच भाजपाला जिथे विसर पडला तिथे त्याचाही बोजवारा उडाला आहे. काही मुठभर शहाण्यांनी आपल्या पुस्तकी ज्ञानाच्या आधारे या जातियवाद विरुद्ध सेक्युलर संघर्षाचा जो आभास निर्माण केला, त्याला फ़सलेल्या पक्ष व संघटनांनी आपल्या हातांनी आपला विध्वंस घडवून आणला. सामान्य लोक त्या आभासाला कधीच फ़सले नाहीत. असे का व्हावे? तर लोक आपल्या जगण्यातून अनुभवातून शिकत असतात, आपले निर्णय घेत असतात. उलट शहाणे विद्वान अभ्यासक पुस्तकातुन शिकत असतात. त्यांचा वास्तवाशी सहसा संबंध येत नाही. त्यांना समोरचे सत्य बघता येत नाही. त्यासाठीही पुरावा किंवा प्रमाणपत्र बघावे लागत असते. त्यामुळेच व्यवहारी सामान्य माणूस त्यांचे तमाम आडाखे खोटे पाडत असतो. जे अशा नाकर्त्या मुर्ख शहाण्यांच्या नादाला लागतात ते भोंदू भगताकडे, मांत्रिकाकडे जाणार्‍या भोळसट माणसाप्रमाणेच फ़सत असतात. महाराष्ट्रातल्या तमाम डाव्या पक्षांची आज दिसणारी दुर्दशा, त्याच सेक्युलर अंधश्रद्धेचा दुष्परिणाम आहे. १९८९ पर्यंत प्रमुख विरोधी पक्ष असलेले जनता दल, शेकाप, कम्युनिस्ट यांचे आज नामोनिशाण का उरलेले नाही?    

महाराष्ट्रात शरद पवारांनी मोक्याच्या वेळी कॉग्रेसमध्ये जाऊन सेनेला विरोधी राजकारणातील जागा मोकळी करून दिली हे खरेच आहे. पण तीच जागा विरोधी डाव्या पक्षांनाही व्यापण्याची संधी होती. पण त्यांना तसा प्रयत्नही सेक्युलर शहाणे व पत्रकारांनी करू दिला नाही. आधीच्या दहा वर्षात जी जागा सेनेने व्यापली, त्यातूनही जे तुटपुंजे डावे शिल्लक उरले होते, त्यांना सेक्युलर पत्रकार अभ्यासकांनी १९९९ सालात कॉग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी योजलेल्या यज्ञात बळी देऊन संपवले. १९९९ सालात युतीला सत्तेपासून दुर ठेवण्याचे जे सेक्युलर सरकार बनवण्याचे प्रयास झाले, त्याने कोणाला संपवले? तेच डावे पक्ष महाराष्ट्रातून नेस्तनाबूत झाले ना?  हा सगला बौद्धिक भ्रष्टाचार होता व आहे. किंबहूना आता सेक्युलॅरिझम हे बौद्धिक भ्रष्टाचाराचे दुसरे नाव झाले आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण त्याच शब्दाची ढाल करून राजकीय व बौद्धिक भ्रष्टाचार सोकावला आहे व त्याने बाकी संपुर्ण सार्वजनीक जिवनाच्या प्रत्येक अंगात धुमाकूळ घातला आहे. (क्रमश:)
भाग ( २१४ )        २३/३/१२

२ टिप्पण्या:

  1. तथाकथीत secular व बुध्दिवादी तसेही निवडणुकीत मतदान न करता आपले शहाणपन गाजवत असतात हे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या secular पणाचा भारताच्या निवडणुक राजकारणात कसा काय फरक पडतो? अन् त्यामुळेच निवडणुकीतील यश वा अपयशाला पक्षांचे ध्येयधोरणच पूर्णत; अवलंबुन असे वाटत नाही. निवडणुकीत उभे राहणारे अाणी सर्वसामान्य मतदानात भाग घेणारे मतदार हे पूर्ण देशावासीयांचे प्रतिनिधीत्व करतात अशी अजून तरी परिस्थीती नाही असे वाटते.

    प्रत्युत्तर द्याहटवा