शुक्रवार, २ मार्च, २०१२

सदाचार पोखरणारी वाळवी कशी पसरते?


आजच्या तरुण पिढीला कळावे म्हणून मी काही मोठी नावे इथे सादर केली. मोदी, मृणालताई, इंदुमती पटेल यांच्यासारखी शेकडो मंडळी त्या का्ळात कसलीही अपे्क्षा न बाळगता संघटना व पक्षात काम करत होती. ज्यांना अधिकरपदे मिळायची त्यांचे प्रस्थ वगैरे नसायचे. त्यांना कोणी साहेब, मॅडम वगैरे म्हणत नसत. सगळेच कार्यकर्ते असायचे. नेता म्हणजे जबाबदारी घेतलेला म्होरक्या असायचा. एकूणच कार्यकर्ता म्हणजे विचारांनी, तत्वज्ञानाने भारावलेले लोक असायचे. आपण काहीतरी भले काम करतोय याची त्यांना नशा असायची. त्यांच्यात हेवेदावे नसायचे. जो निवडणूक लढवायचा वा निवडून यायचा, त्यालाही मोठेपणा नसायचा. आपण सोबत्यांच्या कृपेमुळे निवडून आलो, याची जाणिव त्याच्यात असायची. अशा कार्यकर्त्यांची व्याख्या क्रुरकर्मा हिटलरने छान केली आहे. तेवढेच नाही असा प्रामाणिक भारावलेला कार्यकर्ता दुरावला मग कय होते तेही त्याने सांगितले आहे. ’माईन काम्फ़’ या आपल्या आत्मकथनपर पुस्तकात तो म्हणतो,

    ’कार्यकर्त्यांना जोवर चळवळीतून आर्थिक वा अन्य प्रकारचे लाभ होत नाहीत, तोवरच त्या चळवळीचा आवेश टिकून रहातो. एकदा का अशा प्रकारचे लाभ मिळू लागले, की कार्यकर्ते त्या लाभाला चटावतात आणि चळवळीच्या मुळ उद्दीष्टांची त्यांना विस्मृती होते. भावी पिढ्यांकडून होणारा सन्मान आणि भविष्यात होणारी किर्ती, हेच फ़क्त आपल्या कार्याचे बक्षीस; या भावनेने कार्यकर्ते जोवर चळवळीसाठी खपतात तोवरच चळवळीच्या कार्यावर त्यांचे लक्ष राहाते. प्राप्त परिस्थितीचा जास्तीत जास्त फ़ायदा उठवायचा, या हेतूने प्रेरीत झालेल्यांचा ओघ चळवळीकडे सुरू झाला की चळवळीचे मुळ उद्दिष्ट बाजूला पडू लागले आहे असा अंदाज करायला कोणतीच हरकत नाही.’    

   आपण जेव्हा कृपाशंकर सारखे लोक एखाद्या पक्षात बघतो किंवा त्याचे व्यवहारी यश पहातो, तेव्हा तो पक्ष संघटना म्हणुन रसातळाला चालला आहे असे खुशाल समजावे. आणि तशी अवस्था आज कुठल्या पक्ष वा संघटनेची नाही? कॉग्रेस, भाजपा, शिवसेना सोडुन द्या. स्वत:ला समाजसेवी म्हणवणार्‍या रा. स्व. संघ, राष्ट सेवा दल, अशा सामाजिक संघटना त्याच वाटेवर कधीच चालू लागल्या आहेत. त्यांच्याशिवाय स्वत:ला एनजीओ म्हणजे स्वयंसेवी म्हणवून घेणार्‍या एकखांबी संस्था तर आधूनिक व्यापारी पेढ्य़ा झालेल्या आहेत. या संस्था तर पुर्णवेळ पगारी कार्यकर्ते नोकरीला ठेवतात. त्यासाठी त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन काय असते? सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या या संस्थांना कोण कशाला पैसे पुरवतो, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. त्यांचे जगणे वागणे एखाद्या कंपनीच्या मॅनेजरला लाजवणारे असते. त्यात कुठेही सेवाभाव ऒषधाला सापडत नाही. पण तो वेगळा विषय आहे. आपल्याला सध्या संघटना व पक्षीय कार्यकर्ता एवढ्याचाच उहापोह करायचा असल्याने स्वयंसेवी संस्था यावर पुढे कधी विवेचन करता येईल.

   राजकीय संघटना व पक्ष हे लोकांचे प्रतिनिधीत्व करत असतात, लोकहितासाठी कार्यरत असतात. त्यामुळेच आपल्याला राजकीय कार्यकर्ता इथे अभिप्रेत आहे. जो कार्यकर्ता समाजात परिवर्तन घडवून आणायची भाषा बोलत असतो. लोकांच्या समस्या, अडचणी यासाठी राजकीय बदलाची भाषा बोलत असतो. तो कार्यकर्ता कुठून आभाळातून खाली पडलेला माणूस नसतो, तर तुमच्या माझ्यासारखाच आईबापांच्या पोटी जन्माला आलेला असतो. पण सामान्य माणसाप्रमाणे हतबल न होता, तो परिस्थिती बदलाचे स्वप्न बघणारा असतो. असा चांगला बदल एका ठराविक विचारांचे अनुकरण केल्याने, त्यानुसार समाजाला प्रवृत्त केल्याने होऊ शकतो, अशा कल्पनेने तो भारावलेला असतो.  आज आपल्याला कोणते व्यक्तीगत लाभ होतील, फ़ायदे घेता येतील, याकडे त्याचे अजिबात लक्ष नसते. तर आपण आज जे काही करतो आहोत, त्यामुळे आपल्या समाजाचे मोठे कल्याण होणार असून, पुढल्या अनेक पिढ्या त्यासाठी आपल्या ऋणी असणार आहेत, अशीच त्याची पक्की धारणा असते. त्यात कुठेही व्यक्तिगत स्वार्थाला जागाच नसते. इंदुमती पटेल वा मृणालताई यांच्या जगण्यात बोलण्यात त्याचाच वास येतो ना? आपण महान कार्य केल्याचे त्या सुचवत सुद्धा नाहीत. उलट कृपाशंकर याच्यासारखी माणसे बघा. ते आपण काय काय महान काम लोकांसाठी केले, ते सतत सांगत असतात. पण प्रत्यक्षात त्यांनी समाजाची फ़क्त लूट केल्याचेच लोकांच्या साध्या डोळ्यांना दिसत असते.

    कॉग्रेस पक्षाचे सर्व नेते नेहमी स्वातंत्र्य चलवळीचा वारसा सांगतात. पण त्या चळवळीतले कार्यकर्ते आणि आजची कॉग्रेस यांच्यात दुरान्वये तरी तुलना करता येईल काय? जे सानेगुरुजींचा वा एस एम जोशींचा वारसा सांगतात, त्यांच्यात तरी आपल्या पुर्वजांचा वारसा दिसतो काय? डॉ. हेडगेवार किंवा गोळवलकर गुरूजी यांचा वारसा सांगणार्‍यांमध्ये तरी त्या नेत्यांच्या गुणांचा काही अवशेष आढळतो काय? त्या सर्वांचे विचार टोकाचे भिन्न भिन्न असतील. पण त्या सर्व पुर्वजांमध्ये साधेपणा, नि:स्वार्थीपणा ठासून भरलेला होता. त्यांच्याच आजच्या वारसांकडे त्याचा लवलेश तरी आढळतो काय? तो साधेपणा त्यांच्या त्यागाचे प्रतीक होते आणि कार्यकर्ते तोच आदर्श मानून वाटचाल करत होते. अगदी कॉग्रेसही त्याला अपवाद नव्हती. नेहरूंशी मतभेद झाले तर वल्लभभाई पटेल गृहमंत्रीपद सोडून बाजूला झाले. आजचा त्याच कॉग्रेसचा गृहमंत्री पंतप्रधानाची अब्रु रोजच्या रोज वेशीवर टांगतो आहे. पण सत्तपद सोडायचे नाव घेत नाही. हे आजचे आदर्श आहेत. हे कुठून सुरू झाले?

   ते खुप पुर्वी सुरू झाले, पण ते खालच्या पातळीपर्यंत आणि सर्व समाजात भिनायला इतकी वर्षे जावी लागली. गांधीजी आणि नेहरू यांच्यातला जमिन समानचा फ़रक त्याला कारणीभूत आहे. गांधीजींनी सेवाभाव पत्करला होता. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबाला सुद्धा दारिद्र्यात जगावे लागले. मुलांना उत्तम शाळांमध्ये घालता आले नव्हते. उलट घरच्या श्रीमंतीमुळे नेहरूंनी आपल्या कन्येला विलायतेत शिकायला पाठवले होते. ही अवस्था बघून एका धनिक पारशी व्यापार्‍याने गाधीजींच्या एका मुलाला विलायतेत शिकवण्याचा खर्च उचलण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्याला नकार देऊन बापूंनी ती संधी कुटुंबाबाहेरच्या तरुणाला दिली. त्यांच्या सहवासात वावरणार्‍या महादेवभाई देसाई या तरूणाला त्या पैशावर परदेशी शिक्षणासाठी पाठवले. म्हणजे सामाजिक नेतृत्व करताना जे मिळाले त्यावरही आपला घरगुती हक्क स्विकारण्यास नकार देण्याचा आदर्श बापूंनी समाजासमोर ठेवला होता. त्या पिढीने तो पत्करला. १९५० नंतर नेहरू हा कॉग्रेसचा व पुढे भारतियांचा आदर्श बनला. ज्यांनी आपल्या जिवंतपणीच आपल्या कन्येला आपला राजकीय वारस म्हणुन लोकांसमोर सादर केले होते. इंदिरा गांधी यांनी तर उघडपणे राजघराणे असल्याप्रमाणे आपल्या वारसांना पक्षाच्या डोक्यावर बसवले. पक्ष, सता, सार्वजनिक मालमता खाजगी असल्याप्रमाणे वापरण्याचा नवा प्रघात पाडला. आज सगळीकडे त्याचेच परिणाम दिसत आहेत. ज्याला आपण घराणेशाही म्हणतो ती अशी आली. नेतृत्व करणार्‍याने समाजाचा विश्वस्त म्हणून काम करावे, ही वृत्ती जोपासणार्‍यांचे आदर्श नेहरू व इंदिराजींनी असे समाजमनावरून पुसून टाकले. तिथून सार्वजनिक जीवनातील त्याग, नि:स्वार्थीवृत्ती, निरपेक्षता कुठल्या कुठे गायब होत गेल्या. आधी ते कॉग्रेसपुरते मर्यादित होते. हळूहळू त्याचा प्रादुर्भाव सर्वच पक्षात होत गेला. कृपाशंकर त्याचीच परिणती आहे. एक एक करित सर्वच पक्ष संघटना त्यात फ़रफ़टत गेल्या.

   ज्या मृणालताईंचा हवाला मी देतो, त्यांनी कोणा आपल्या वारसाला खुर्ची राखण्यासाठी लोकांवर, पक्षावर लादले नाही. पण त्यांचाच वंश म्हणजे डॉ. राममनोहर लोहियांचा वारसा सांगणार्‍या लालूप्रसाद, मुलायम यांनी राजकीय पक्ष, संघटना, सता यांना घरगुती मालमता बनवून सोडले आहे. थेट आपल्या कुटुंबातील कोण नसेल तर चुलत, मावस, सासरचे, माहेरचे असे नातेवाईक शोधून राजघराणी तयार करण्यात आलेली आहेत. समाजसेवा करताना, लाभ मिळू लागले मग लढण्याचा आवेश संपून जातो, चळवळीची उद्दीष्टे बाजूला पडतात, असे हिटलर सांगतो, त्याचे हे पुरावे आहेत. जसजसा अशा प्रवृत्तीचा प्रभाव वाढत गेला, तसतसा खराखुरा कार्यकर्ता मागे पडत गेला. तो कसा बाजूला पडतो वा बाजूला केला जातो त्याच्र्ही विवेचन अगत्याचे आहे. कृपाशंकर याच्याकडे एक भ्रष्ट भामटा म्हणुन बघण्यापेक्षा थोड्या शोधक नजरेने बघण्याची गरज आहे. त्या प्रवृत्तीला ओळखण्याची गरज आहे. असे लोक कसे पद्धतशीरपणे पक्ष, संघटना, नेतृत्व, मनोवृत्ती कुजवून सडवून भ्रष्ट करतात, ते ओळखण्याची आवश्यकता आहे. कार्यकर्ता संपवून दलाल. भाट, मध्यस्थ, उचापतखोरांना वाळवीप्रमाणे एखादी संघटना पोखरण्यास मोकळी करतात, तेही तपासले पाहिजे. (क्रमश:)  
भाग १९२   (१/३/१२)

1 टिप्पणी: