मंगळवार, ६ मार्च, २०१२

खोट्याचा कपाळी गोटा बसणारच ना?


ख्रिश्चन धर्मातील प्रोटेस्टंट पंथाचा प्रवर्तक संस्थापक, पहिला मार्टीन ल्युथर हा कॅथॉलिक पंथ व पोपचा कडवा विरोधक होता. नुसता विरोधकच नाही तर द्वेष्टा होता म्हटले तर वावगे ठरू नये. अमेरिकेतील कृष्णवर्णियांची चळवळ करणारा मार्टीन ल्युथर ज्युनियर म्हणुन ओळखला जातो. त्याचा आणि याचा संबंध नाही. दोघे वेगवेगळ्या कालखंडातील आहेत. तर हा प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक ल्युथर, स्वत:च्या धर्मश्रद्धेविषयी काय म्हणतो; ते समजून घेण्यासारखे आहे.

"परमेश्वराचे नाव घेण्याइतका उत्साह माझ्या मनाला वाटत नाही, तेव्हा मी माझ्या शत्रुच्या, म्हणजे पोपच्या आणि त्याच्या हस्तकांच्या दगलबाजीच्या, त्यांच्या ढोंगबाजीच्या आठवणी आठवतो. त्या आठवणी जाग्या होताच, माझा संताप आणि द्वेष फ़ुलून येतो. माझा नैतिक अहंकार खुलतो आणि नव्या नव्या उत्साहाने मी देवाचे नाव घेऊ लागतो. माझ्या संतापाचा पारा वाढताच, परमेश्वरा, तुझ्या नावाचा जयजयकार असो, या भुतलावर तुझे राज्य येवो, मी तुझ्या मनासारखे करीन, ही प्रार्थना मी दुप्पट जोराने म्हणु लागतो."

जेव्हा माणसाचा आशावाद संपतो तेव्हा त्याच्या निष्ठा, उत्साह, आवेश यांचे रुपांतर द्वेषात होत असते. मग त्याच द्वेषाला वापरून, नव्याने मनातल्या नैराश्यावर मात करता येते, असे मानसोपचारशास्त्र सांगते. मार्टीन ल्युथर त्याचे उत्तम उदाहरण आहे. पण तो खुप ऐतिहासिक व पुरातन काळातील दाखला आहे. अलिकडल्या काळातील ताजे उदाहरण वाचकाला आवडू शकेल. कदचित लवकर समजू शकेल. दुर कशाला जायचे? आपल्या ठोकपाल हेमंत देसाई यांचेच उदाहरण घ्या. अनायसे पुण्यनगरीच्या वाचकांसमोर ते नियमित येत असतात, लिहित असतात. आपल्या सेक्युलर निष्ठा व भूमिका मोठ्य़ा आवेशात मांडत असतात. आव तर असा असतो, की साक्षात लढाईसाठी मर्द मैदानात उतरला आहे. पण जेव्हा लढायची वेळ येते, तेव्हा कुठल्या कुठे धूम ’ठोकून’ पळ काढतो. मागल्या काही दिवसात त्यांच्या अनेक खोटेपणावर मी भडीमार केला आहे. पण माझ्या एकाही आक्षेपाला ते उत्तर देऊ शकलेले नाहीत. फ़ार कशाला मला निरुत्तर करू शकलेले नाहीत. आव आणायचा बुद्धीमंत असल्याचा, पण बौद्धिक प्रतिवाद करायची वेळ आली, मग पलायन करयचे. खरा बुद्धीमंत वादाला घाबरत नसतो. प्रतिवाद करायला सामोरा येतो. पण ठोकपाल तेवढी हिंमत दाखवू शकले आहेत का?

आपल्या बौद्धिक फ़ोलपणाची खात्री असल्याने ते प्रतिवाद करत नाहीत. पण त्याचवेळी आपले नैराश्य इतरांच्या द्वेषाने भारावून व्यक्त करत असतात. शुक्रवारी त्यांनी ’केजरीवालांची कर्तव्यपुर्ती, असा लेख लिहिला आहे. त्यात त्यांना अण्णा टीमबद्द्ल जो राग व्यक्त करायचा आहे, त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण अण्णा टीमवर लिहितांना भाजपा संघावर घसरण्याचे कारण काय, प्रयोजन काय? तिथे आपल्याला ल्युथरची द्वेषप्रवृत्ती दिसून येते. हेमंत देसाई ज्या सेक्युलर मानसिकतेतून आलेले आहेत ती त्यांची आपली उपजत मनोवृत्ती अजिबात नाही. त्यांना सेक्युलॅरिझमशी काडीचे कर्तव्य नाही. तेच कशाला आजकाल जे स्वयंघोषित सेक्युलर विचारवंत उदयास आलेले आहेत, त्या सर्वांची तीच मनोवृत्ती आहे. गेल्या तीन दशकात त्यांनी आपल्या कर्माने आपली राजकारणातील पत दिवाळखोरीत गमावली आहे. त्याची कारणमिमांसा करण्यापेक्षा ही मंडळी आपल्या अपयशाचे खापर संघ भाजपावर फ़ोडून मोकळी होत असतात. देसाई त्याच मानसिकतेचे बळी आहेत. आपले अपयश कबुल करता येत नाही वा पचवता येत नाही. मग ते पचवण्यासाठी त्यांना संघ भाजपाला शिव्या घातल्याशिवाय काही जमत नाही. ते काय लिहितात बघा;

"आम्हाला संसदेबद्दल आदर आहे. पण सर्वच संसद सदस्यांबद्दल तो नाही,' असा युक्तिवाद केजरीवाल करतात. पण मतदानाबद्दलचे त्यांचे बिंग फुटल्यावर चॅनल्सवर झालेल्या चर्चेत भाग घेण्याचे केजरीवाल यांनी टाळले. त्यांचे जे प्रवक्ते सहभागी झाले त्यांनी खासदारांचा दर्जा व टीम अण्णाच्या सदस्यांची गुणवत्ता अशी तुलनाच करू नका, असे उद्गार काढले. म्हणजे खासदार पापी आणि आम्ही मात्र निष्कलंक! रा. स्व. संघ-भाजपालाही असाच टेंभा मिरवायची सवय आहे. टीम अण्णा व संघ परिवाराने परस्पर सहकार्याने काँग्रेसविरोधी मोहीम चालवली. सहवासामुळे एकमेकांवर थोडा परिणाम होणारच."  

केजरीवाल यांच्यावर टिका करताना मध्ये संघ भाजपा कशाला? कारण अण्णांना शिव्या घालायच्या तर जोश कुठून आणायचा? आवेश कुठून येणार? त्यासाठी आपला जो शत्रु संघ भाजपा आहे त्याचे स्मरण अवश्यक असते. ल्युथर पोपचे स्मरण करतो, देसाईसारख्या सेक्युलरांन संघाचे नामस्मरण केल्याशिवाय आवेश येत नाही. ल्युथरला देवाचे नाव घेण्याची इच्छा उरली नाही, मग तो पोपची आठवण काढतो. देसाईंना शिव्या देण्याची इच्छा झाली मग संघाचे स्मरण करावे लागते. कारण शिव्याशाप देण्यासाठी आवेश आवश्यक असतो. सेक्युलॅरिझम बोलायचा कंटाळा आला, मग त्यांना पुन्हा संघाची आठवण करावी लागते. नशा चढण्यासाठी त्यांना संघाचे स्मरण करावेच लागते. शिव्याशाप कोणालाही द्यायचे असोत, त्यासाठी आधी संघ स्मरण केल्याशिवाय पुढला शब्दच सुचत नाही. ही अवस्था देसाई यांचीच नाही. त्यांच्या पठडीतले सुरेश द्वादशीवार, प्रताप आसबे. प्रकाश अकोलकर, कुमार केतकर असे सर्व टोळभैरव घ्या, त्यांना संघावर घसरल्याखेरीज चालताच येते नाही. कारणकाय असेल?

जेव्हा तुमच्या श्रद्धा वा विचार पक्के नसतात, त्यावर निष्ठा पक्की नसते, तेव्हा ती द्वेषातून तुम्ही ती जगवू पहात असता. आपल्या विचारांपेक्षा अशी माणसे दुसर्‍या कशाचा तरी द्वेष करण्यासाठी त्या विचाराला चिकटलेली असतात. आता दे्साई यांचीच गोष्ट घ्या. ते केजरीवाल यांचा खोटेपणा दाखवायला लिहितात,  "मतदानाबद्दलचे त्यांचे बिंग फुटल्यावर चॅनल्सवर झालेल्या चर्चेत भाग घेण्याचे केजरीवाल यांनी टाळले." ठीक आहे. केजरीवाल मीडियापासून लपून बसले. मग देसाई किती शुर शिपाई आहेत? याच सदरातून त्यांचा खोटेपणा मी पाच सात लेखातून उघडा पाडला आहे. पुण्यनगरीचे व्यासपीठ त्यांच्यासाठी खुले आहे. त्यांनी माझ्या उलट तपासणीतला एक तरी आरोप खोडून दाखवला आहे काय? केजरीवालांना कोरडे पाषाण म्हणताना स्वत: देसाई किती कोरडे आहेत? त्यांनी कधी प्रतिवादाची हिंमत दाखवली आहे काय? का नाही? जेव्हा आपण खोटे आहोत याची खात्री असते, तेव्हाच माणूस केजरीवालांप्रमाणे प्रतिवादापासून पळ का्ढतो. आणि खुद्द हेमंत देसाई सुद्धा त्यातलेच आहेत.  

इतर जगाच्या चारित्र्य पावित्र्याची भिंग घेऊन तपासणी करताना आपल्या पायखाली काय जळते आहे याची खबरबात कोणी ठेवायची? देसाई यांच्या अशा लिखाणातील नैतिक अहंकाराचा दर्प मैलोगणती वाचकांपर्यंत जाऊन पोहोचणारा आहे. केजरीवाल सोडा, निखील वागळे यांना लोकमतच्या पेडन्युजबद्दल विचारण्याची हिंमत देसाई कधी करणार आहेत? तिथे ते नेहमीच दिसतात. अण्णा टीमवर वाटेल तसे आरोप करणार्‍याने निदान आपल्यावरच्या आरोपांना सामोरे जाण्याची हिंमत केली पाहिजे ना? केजरीवाल तरी मीडियामधले नाहीत. त्यांना त्यासून लपायची तरी सोय आहे. देसाईबुवांचे काय? ते तर रोज माझ्यासोबतच पुण्यनगरीच्या वाचकांसमोर येत असतात. त्यांच्या समोर तरी आपला प्रामाणिक चेहरा ठेवायची त्यांना गरज वाटत नाही काय? मी चुकत असेन, कदाचित खोटासुद्धा असेन. त्यांनी प्रतिवादापासून पळायचे कारण काय? हिटलरचा प्रचारमंत्री गोबेल्स म्हणायचा, सतत लोकांच्या कानीकपाळी खोटे ’ठोक(पाल)त चला. त्यांना ते खोटेच खरे वाटू लागते. देसाई कंपू त्याचेच अनुयायी आहेत. त्यामुळेच ते कधी आरोपांना उत्तर देत नाहीत. खुलासे छापत नाहीत. म्हणुन मग अशा वृत्तपत्रावर कचेर्‍यांवर हल्ले होत असतात. म्हणतात ना, शहाण्याला शब्दाचा मार. ज्याला शब्दाचा मार कळत नाही, त्याला मग त्याच्याच भाषेत लोक उत्तर देऊ लागतात. ’ठोक’पालांना समजणारी भाषा कुठली असते? (क्रमश:)
भाग ( १९६ )   ५/३/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा