सोमवार, १९ मार्च, २०१२

भवानी आई रोडगा वाहिन तुला



   राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा पाठींबा ठाण्यात सेना भाजपा युतीला दिला, त्या संदर्भात मी हा जुना इतिहास मुद्दाम सांगतो आहे. कारण लोकशाहीची जी विकृत प्रतिमा किंवा स्वरूप अलिकडल्या काळात लोकांसमोर मांडले जात असते, त्याचा खोटेपणा सांगणे आवश्यक आहे. त्याचवेळी खरे व चांगले लोकशाहीचे रुप लोकांना समजणे तेवढेच आवश्यक आहे. ती विकृतीच आजच्या भयावह भ्रष्टाचाराला कारणीभूत झाली असेल तर तिची उपज कुठून झाली, तेही लोकांसमोर यायला हवे ना? विशेषत: जेव्हा स्वत:ला अभ्यासक वा निरिक्षक, विश्लेषक म्हणुन लोकांसमोर पेश करणारेच, लोकशाहीचे विकृत स्वरूप सादर करत असतील; तर ती आवश्यकता अधिकच वाढत असते. त्यामुळे खुप जुना नाहीतर अलिकडला इतिहास मोलाचा होऊन जातो. तेवढेच नाही तर त्या विकृतीचे साथीदार, भागिदार व निर्मातेच तिचे उदात्तीकरण करत असतील, तर सत्य नागडेउघडे करुन समोर आणणे अगत्याचे होऊन जाते.

   उदाहरणार्थ आज जे अनेक अभ्यासक, पत्रकार संपादक, विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी विचारवंत वा नेते  म्हणुन आपण वाहिन्यावर पहातो, वृत्तपत्रातून वाचतो, त्यातले बहुसंख्य त्याच १९७७ च्या जनता लाटेवर स्वार होऊन नावारूपाला आलेले आहेत. किंबहूना त्यांनीच या सेक्युलर विध्वंसक नाट्यात लहानमोठ्या भुमिका पार पाडलेल्या आहेत. डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. रत्नाकर महाजन, निखिल वागळे, निळू दामले, हुसेन दलवाई, प्रताप आसबे, प्रकाश बाळ अशी जी नावे आपण वाचतो वा ऐकतो, हे सगळे तेव्हाचे त्याच सेक्युलर नाटकाचे भागिदार आहेत. ज्यांनी प्रत्येकवेळी जन्तेच्या कौलाची नासाडी केली आहे. लोकांसमोर जाताना कॉग्रेस व त्याच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध कौल मागायचा. मात्र निकाल लागले व बिगर कॉग्रेस सरकार आले, मग सेक्युलर व जातियवादाचे भांडण उकरून काढायचे आणि चाललेली सत्ता उलथून पाडत, कॉग्रेससाठी मार्ग साफ़ करायचा, हेच काम त्यांनी नेहमी केले आहे. जेव्हा त्यांना तो खेळ करायला स्वत:चे पक्षच उरले नाहीत, तेव्हाच त्यांनी मग उघडपणे कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  

   मध्यंतरी वर्षभरापुर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसने आता आता आपला गाशा गुंडाळावा, असा सल्ला त्याच पक्षाचे तेव्हाचे प्रवक्ते असलेल्या डॉ. रत्नाकर महाजन यांनी दिला होता. तेव्हा पक्षातुन त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. त्यात तोंडाळ नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली प्रतिक्रिया भडक असली तरी वास्तविक होती. ते म्हणाले होते. ’महाजन असोत की सर्व पक्षात पसरलेले कुणीही जुने युक्रांदीय असोत, ती विकृती आहे. जिथे जातील तिथे ते फ़क्त घाणच करतात’. उपरोक्त सगळी नावे युक्रांदीयांची नसतील पण एकाच जातकुळीची आहेत. मला आठवते, तेव्हा जनता लाटेत नव्याने मुंबईतील गिरणी कामगारांचे संघटन करण्याचा प्रयत्न प्रभाकर मोरे नावाचे समाजवादी नेते करीत होते. मुंबई मिल मजदूर सभा असे बहुधा त्याचे नाव होते. आज ज्या दादरच्या इंदू मिल जमीनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दावा केला जात आहे. त्याच मिलमध्ये हे मोरे कामगार होते. तिथल्या कामगारांचे नेतृत्व त्यांनी दिर्घकाळ केले होते. त्यांच्या या धडपडीत त्यांच्या मागून मागून फ़िरणारे दोन चेहरे मला अजून स्पष्टपणे आठवतात. एक आहेत आजचे राज्यसभेतील कॉग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, तर दुसरे आहेत आजच्या स्टार माझा वाहिनीचे ’ज्येष्ट पत्रकार प्रताप आसबे सर’. कुमार सप्तर्षी व रत्नाकर महाजन थे्ट जनता पक्षातच होते. कुमार दक्षिण अहमदनगरचे आमदार होते. बाकीचे आत बाहेर असलेले जनता पक्षातले पुर्वाश्रमीचे समाजवादी.  

   पहिली गोष्ट म्हणजे १९७७ सालात कॉग्रेसने जागा गमावल्या तरी मतांची टक्केवारी गमावली नव्हती. जे सत्तेवर येऊन बसले, त्यांनी सत्ता राबवून  जनतेला शासन देणे ही त्यांच्यासाठी प्राथमिकता होती. त्याऐवजी जनता पक्षात एकत्र आलेले समाजवादी व जनसंघीय यांच्यातल्या वैचारिक मतभेदासाठी सरकार पाडण्यापर्यंत समाजवाद्यांनी मजल मारली. पुन्हा कॉग्रेस तरी जिंकली चालेल, जनमताचा भ्रमनिरास झाला तरीही चालेल, अशी टोकाची भुमिका दिवाळखोरी होती. शेवटी आयुष्यात प्राथमिकता ठरवून निर्णय घ्यावे लागतात. तुमचे प्राधान्य हिंदुत्ववाद्यांना संपवणे व त्यासाठी संघापेक्षा कॉग्रेस परवडली असे असेल, तर तुम्ही जनसंघासोबत जाण्याचे काहीही कारण नव्हते. कारण लोकांनी जनता पक्षाला मते व सत्ता दिली, ती कॉग्रेस विरोधात दिलेली होती. त्यात समाजवादी व जनसंघीय (आजचा भाजपा) असे दोघांनी गुण्यागोविंदाने नांदावे, अशीच मतदाराची अपेक्षा होती. जनता पक्ष हे त्यासाठीचे दोघांनी मतदाराला दिलेले आश्वासन होते. मग वर्षभरात जुन्या जनसंघीयांनी संघाशी संबंध तोडावेत, हा आग्रह कशासाठी होता? तो मतदाराचा विश्वासघात नव्हता काय? तो सेक्युलर बाधा झालेल्यांनी केला होता. त्यातूनच लोकांचा विश्वासघात झाला. मग कंटाळून लोक पुन्हा इंदिरा गांधी व कॉग्रेसकडे वळले. की त्यासाठीच जुन्या समाजवादी व सेक्युलर शहाण्यानी हे कारस्थान केले होते?

   कारण हे तेव्हाच घडलेले नाही. प्रत्येक वेळी कॉग्रेसचा विरोधात मतदाराने कौल दिला व सत्तेअभावी कॉग्रेस संपण्याची चिन्हे दिसू लागली, मग सतत कॉग्रेस विरोधी नारे लावणार्‍या तथाकथीत सेक्युलर पक्ष, संघटना व शहाण्यानी लोकांची व राजकारणाची दिशाभूल करून कॉग्रेसला जीवदान, संजिवनी देण्याचे पाप केलेले आहे. त्याची सुरूवात अशी १९७९ सालात झाली. मजेची गोष्ट म्हणजे कोणीही कॉग्रेसवाला कधी त्या कालात संघ वा जनसंघ भाजपाबद्दल बोलत नव्हता. पुर्वाश्रमीचे समाजवादी सोडल्यास संघाबद्दल कोणी बोलत नसे. जोवर कॉग्रेस स्वत:च्या बळावर बहुमत मिळवत होती, तोवर ते काम त्यांनी जणु जुन्या समाजवादी सेक्युलर लोकांना कंत्राटावर दिले होते. की त्यांचे हस्तक त्यांनी या पक्षसंघटनात पेरून ठेवलेले होते?  कारण अशा हस्तकांनी कधीच निवडणुकीपुर्वी आपले आक्षेप बोलून दाखवले नाहीत. कॉग्रेसने मार खाल्ला, मगच त्यांचा संघविरोध उफ़ाळून आल्याचे इतिहास सांगतो. त्याची सुरुवात १९७७ सालात झाली. मग त्याच इतिहासाची थोड्याफ़ार फ़रकाने पुनरावृत्ती नियमित होत राहिली.

   त्यात ही हस्तक मंडळी समाजाच्या वेगवेगळ्या घटकात क्षेत्रात जाऊन आपली कामगिरी पार पाडत राहिली. आसबे, वागळे, बाळ असे काही पत्रकार झाले.  हुसेन दलवाई, महाजन, निलम गोर्‍हे, विविध पक्षात गेले. भालचंद्र मुणगेकर प्राध्यापक कुलगुरू झाले. कोणी कलावंत लेखक झाले, तर मेधा पाटकर विवेक पंडित यांनी समाजसेवकाचे रूप धारण केले. आज माध्यमात, कुठल्या वाहिनीवर ते एकमेकांची तशीच ओळख करून देतात. आपण एकाच भुमिकेत आहोत, एकाच विचाराचे आहोत, हे लपवून ते प्रेक्षक वाचकाची दिशाभूल करत असतात. बारकाईने तुम्ही त्यांच्या बोलण्याचा, लिखाणाचा सुर पाहिलात तर तो एकमेकांना पुरक असलेला दिसेल. कारण नसताना ते संघ, भाजपावर घसरताना दिसतील. त्यापेक्षा कोणी वेगळा सुर काढू लागला, तर एकाच वेळी कालवा करून ते तो वेगळा सुर दाबून टाकताना दिसतील. कुठलेही खापर आणुन संघाच्या, भाजपाच्या डोक्यावर फ़ोडण्याची कसरत करताना आढळतील. यातला कोणीही तावातावाने कॉग्रेस विरुद्ध बोलत असेल, लिहित असेल आणि त्यात चुकून भाजपावाल्याने तोंड घातले, तर तात्काळ तो सेक्युलर कॉग्रेसची तोंडातली शिकार सोडून भाजपाच्या मागे धावत सुटलेला तुम्हाला दिसेल. कारण हे सगळे त्याच सेक्युलर दिवालखोरीतले भागिदार आहेत.

जुना इतिहास अभ्यासला तर असे आढळून येते, की त्यांनी म्हणजे त्यांच्यातल्या या मनोवृत्तीने, तेव्हाचा जनता पक्ष बुडवला, मग जनता दल पक्ष बुडवला, जुना समाजवादी पक्ष रसातळाला नेला. ह्यांच्या प्रवेशाने कुठला पक्ष संघटना उभी राहिली नाही, उलट त्यांनी बांडगुळाप्रमाणे त्या त्या पक्ष संघटनांची वाट लावली आहे. त्यांची विश्वासार्हता संपुष्टात आणली आहे. हे लोक कायम आपल्या मोठेपणाचा टेंभा मिरवत आयत्या बिळावर बसलेले आहेत. एकाची वाट लावली, मग दुसर्‍याकडे वळले आहेत. आपण काही केले नाही आणि संघ वा दुसर्‍या कोणी काही उभे केले असेल, तर त्यांच्या नावे बोटे मोडत बसायचे  यापेक्षा त्यांनी काही केलेले दिसत नाही. आपण काही करायचे नाही. आपल्याला काही जमत नाही. तर इतरांना शिव्याशाप देत जगणार्‍या बोडकीचे एकनाथ महाराजांनी केलेले भारूडातील वर्णन आठवते. कारण तीच विकृती आज राजकीय विश्लेषण होऊन बसली आहे.

एका जनार्दनी सगळेच जाऊदे,
एकटीच र्‍हाउदे मला, 
भवानी आई रोडगा वाहिन तुला.

(क्रमश:)       भाग ( २१० )   २०/३/१२  

२ टिप्पण्या: