गुरुवार, १५ मार्च, २०१२

मतांची बेरीज नव्हे, लोकहिताची बेरीज म्हणजे लोकशाही



   आजकाल राजकारणात आघाडीचा कालखंड आहे असे सरसकट बोलले जाते. मग अशा आघाड्यांनी सत्तेचे गणित जमवून सत्ता समतोल राखण्याला आघाडी धर्म असे अगदी इंग्रजी माध्यमातूनही बोलले जात असते. ही आघाडी धर्म काय भानगड आहे? मला नेहमी असे वाटते, की स्वत:ला जाणकार विद्वान समजणारे मुद्दाम सामान्य माणसाला न कळणारे शब्द वापरत असतात. काही प्रसंगी जाणिवपुर्वक शब्दांना नवे अर्थ जोडले जातात. आघाडी धर्म हा तसाच शब्द आहे. धर्म म्हणजे नितीमुल्यांच्या आधाराने जगणे असते. किंबहुना जगण्यात काही किमान सभ्यपणा, लाजलज्जा पाळण्याच्या बंधनकारक वर्तनाला धर्म असे संबोधन आहे. बेताल मनमानी करण्याला वा नितीमुल्याच्या नावावर धिंगाणा घालण्याला धर्म म्हणत नाहीत. लोकांसाठी नव्हे तर आपल्या स्वत:च्या प्रामाणिकपणासाठी हे नियम असतात. ते कोणी तुमच्यावर लादत नसतो. तुमचे वागणे त्या नियमानुसार कोणी तपासून घेत नसतो. सद्सदविवेक बुद्धीने आपण स्वत:वरच जी बंधने घालून घेतो, त्याला धर्म म्हणतात. मग त्या व्याखेत आघाडी धर्म कुठे बसतो? ज्याला आघाडी म्हणतात तिच मुळी निव्वळ व्यवहारी तडजोड असते. तो शुद्ध व्यवहार असतो. जो सभ्यपणाच्या कचाट्यात येत नाही, धर्माच्या कसोटीवर उतरत नाही. त्याला धर्म ही संज्ञा कशी लागू शकते?

   दोन भिन्न मतांचे लोक एकमेकाच्या विरुद्ध लढायला लोकांसमोर येतात आणि दुसर्‍याला संपवण्याचे आवाहन करतात. त्यांनी निवडणूका संपल्यावर त्याच प्रतिस्पर्ध्याशी हातमिळवणी करणे ही त्या मतदाराची, जनतेची शुद्ध फ़सवणूक नसते काय? या फ़सवणूकीला धर्म ही संज्ञा कशी काय लागू शकते? अशा शुद्ध फ़सवणूकीत कुठेतरी सद्सदविवेकाचे लक्षण असते काय? इथूनच लोकशाहीची फ़सवणूक व जनतेची दिशाभूल सुरू होत असते. त्याचे ताजे उदाहरण मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालात सापडू शकते. पाच वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकीत कॉग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढले होते. त्यांना मिळालेल्या मतांची बेरीज करुन यावेळी त्यांनी निवडणुकपुर्व आघाडी केली. मात्र मतदानात ती बेरीज फ़सली. कारण त्याप्रमाणे मतदाराने मतदान केलेच नाही. म्हणजेच हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध लढत होते, तेव्हा त्यांना मत देणार्‍या सर्व मतदाराला त्यांचे एकत्र असणे मान्य नव्हते. असा जो मतदार होता, त्याने ते एकत्र येताच त्यांच्याकडे पाठ फ़िरवली. तो यावेळी सरळ मनसेकडे वळलेला दिसतो. याचा दुसरा अर्थ असा, की त्याची मागल्या वेळी या पक्षांनी फ़सवणूक केलेली होती. त्यांनी निकालानंतर एकत्र येणे ही त्या मतदाराची फ़सवणूक असते. त्या फ़सवणूकीला आघाडी धर्म हे नाव देणे ही सुद्धा म्हणूनच फ़सवणूक नाही काय?

   ती फ़सवणूक राजकीय नेत्यांनी, पक्षांनी केली, तर एकवेळ समजू शकते. कारण ते मतलबी व स्वार्थी लोकच असतात. निदान आपण सामान्य माणसे व टिकाकार त्यांच्यावर तसा आरोप नेहमीच करत असतो. पण अशा बाबतीत लोकांचे शंकानिरसन करण्याचा आव आणणार्‍या पत्रकार, माध्यमांचे काय? त्यांनीही अशा फ़सवणुकीला आघाडी धर्म संबोधून लोकांची दिशाभूल करावी काय? निवडणूकपुर्व आघाडी एकवेळ ठीक आहे. कारण ते निवडणूकीनंतर एकत्र रहातील म्हणून लोकांनी त्यांना मते दिलेली असतात. पण निवडणूकीत लोकांकडे परस्परांच्या विरुद्ध मते मागायची आणि मतदान संपले, मग त्याच दोघांनी एकत्र यायचे व सत्ता बळकवायची ही शुद्ध फ़सवणूक असते. सचिन तेंडुलकरने शतक ठोकले व तो मॅन ऑफ़ द मॅच होत असेल, तर सामना संपल्यावर द्रविड व गांगुली यांनी आपल्या धावांची बेरीज करुन, संयुक्तपणे त्याच बक्षिसावर दावा करणे योग्य आहे काय? ती जशी फ़सवणूक असेल, तशीच निवडणूक संपल्यावर आघाडी करणे शुद्ध फ़सवणूक असते. पण आपल्या या फ़सवणूकीबद्दल माध्यमांनी कधी आवाज उठवल्य़ाचे ऐकले आहे काय? उलट असे सेक्युलर पत्रकार त्यात पुढाकार घेऊन आघाड्या बनवण्याला पोषक वातावरण  तयार करतात. म्हणजे तेच मतदाराच्या फ़सवणुकीला प्रोत्साहन देत असतात. थोडक्यात राजकारणी नंतर आपली फ़सवणूक करतात. आधी पत्रकार व माध्यमे आपल्याला त्यांच्या सापळ्यात नेऊन अलगद अडकवत असतात. त्यात धर्म कुठला आला? त्यात सद्सदविवेकाचा राजरोस मुडदा पाडला जात असतो. आणि त्याच विवेकाच्या हत्येला माध्यमे आघाडी धर्म असे सोज्वळ नाव देतात. ती खरी फ़सवणूक आहे. ज्यांनी सामान्य माणसाच्या वतीने अशा भामटेगिरीला उघड्यावर आणायचे, तेच तिचे शुद्धीकरण करतात, त्याला पावित्र्य चिकटवतात. लोकशाहीची विटंबना मुळात तिथून सुरू होते.  

   त्रिशंकू विधानसभा किंवा सभागृह ही काय भानगड असते? लोक आपले प्रतिनिधी निवडून देत असतात. ते उमेदवार कुठल्याही पक्षाचे असोत, ते पक्षाचे बांधील नव्हे तर मतदारांना बांधील असायला हवेत. त्यांनी पक्षनेत्याचे नव्हे तर आपल्या मतदारांचे समाधान करायला हवे. त्यांचे काम त्या सभागृहात हजर राहून सामान्य जनतेच्या इच्छे्प्रमाणे निर्णय घेण्यास हातभार लावणे असते. त्यामुळेच कुठल्या पक्षाचे किती निवडून आले त्याला काहीही महत्व नसते. असता कामा नये. महापौर, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे एका पक्षाचे असत नाहीत. ते सभागृहाचे नेता असतात. सभागृहात त्यांच्यामागे बहुमत आहे म्हणजे सभागृह बहुमताने त्यांच्यामागे आहे एवढाच त्याचा अर्थ असतो. त्यासाठी एकाच पक्षाला वा आघाडीला बहुमत असायची काय गरज आहे? एकदा अशा प्रकारे नेता निवडला. मग त्याने मनमानी करावी, एवढ्यासाठी हुकमी बहुमत हवे असते. सरकार चालवायला किंवा जनहिताचे निर्णय घ्यायला बहुमत आवश्यक नसते. सता व अधिकार प्रामाणिकपणे लोकहितासाठी राबवले जाणार असतील, तर हुकमी बहुमताची गरज उरणार नाही. त्याचप्रमाणे अशा तत्वशून्य आघाड्या करण्याची गरज उरणार नाही. आज ती भासते आहे, कारण सता जनहितासाठी राबवण्यापेक्षा ती व्यक्तीगत हेतू साध्य करण्यासाठी वापरली जात असते. त्यात बहुमत पाठीशी असले नाही तर मनमानी करायची सोय उरत नाही. म्हणुनच आधीपासून बहुमताची फ़िकीर केली जात असते. या भामटेगिरीला लोकांसमोर आणण्याऐवजी आमची माध्यमे व पत्रकार त्याच बहुमताच्या खेळाला मॅजिक फ़िगर असे नाव देऊन लोकशाहीची बेरीज वजाबाकी बनवून टाकतात. परिणामी लोकशाही हाच एक भ्रष्टाचार होऊन बसला आहे. आपली धोरणे, कार्यक्रम, तत्वज्ञान, विचारसरणी, जाहिरनामा यांच्या आधारे निवडून येण्यापेक्षा, नेतेमंडळी आता निवडून येणारे शोधतात, निवडून आलेले पळवतात, त्यांना विकत घेतात. मग लोकहिताचा बोजवारा उडत असतो. लोकांना कोणीही विचारत नाही.

   ठाण्यात निवडणुका संपल्यावर मॅजिक फ़िगर जमवण्यासाठी जो बेशरम तमाशा चालू होता, तो त्याचाच परिणाम आहे. त्यात भाजपा, शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच जुन्याजाणत्या पक्षांचा सहभाग होता. आपण लोकशाही तत्वाचा मुडदा पाडत आहोत, याची कोणाला तरी फ़िकीर होती का? सत्ता मिळवायला धडपडणार्‍यांची गोष्ट बाजूला ठेवा. त्यावर पाळत ठेवण्याचा आव आणणार्‍या पत्रकार, संपादक, वाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून मिरवणार्‍यांचे काय? त्यांनी या मॅजिक फ़िगरसाठी चाललेल्या विवेकशून्य पळवापळवी, अपहरण, त्यासाठीच्या तक्रारी, त्यानंतरचा बंद अशा गोष्टींचा गवगवा खुप केला. पण हाच लोकशाही नितीमुल्यांचा मुडदा पाडणे आहे, याकडे लोकांचे वा राजकीय पक्षांचे लक्ष तरी वेधले काय? त्यांना त्याबद्दल जाब विचारला काय? लोकशाही म्हणजे निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या संख्येची, बहुमताची बेरीज नाही तर लोकहितासाठी अधिक सदस्यांची सहमती होय. हे त्यांना आठवत नसेल तर कोणी सांगायचे? ज्यांना लोकांनी अधिक मते दिली वा ज्यांच्या बाजूने कौल दाखवला, त्याचा आदर करणे म्हणजे लोकशाही हे कोणी सांगायचे असते? पत्रकार व संपादक विश्लेषकांचेच ते काम नाही काय? दुर्दैवाने त्यांना त्याची साधी आठवण सुद्धा राहिली नव्हती. ती राजकारणातला कोवळा, नवशिका नेता राज ठाकरे याने करून द्यावी, त्या शहाण्यांसाठी ही शरमेची गोष्ट आहे. वयोवृद्ध राजकीय नेतेच नव्हे तर अनुभवी संपादक पत्रकारांसाठी सुद्धा ही अतिशय लज्जास्पद बाब आहे. राजने एका फ़टक्यात ठाण्यातला घोडेबाजार थांबवला. तीनचार वाक्यात त्याने लोकशाहीच्या बहुमोल सुत्राची या शहाण्यांना आठवण करून दिली. पण ज्यांची बुद्धीच शेण खाते आहे, त्यांना ते कळावे तरी कसे? राज काय म्हणतो त्यापेक्षा हे दिवटे विद्वान त्याने भावाला पाठींबा देऊन नाशिकचा महापौर मिळवला असले निष्कर्ष काढत बसले.  (क्रमश:)
भाग ( २०५ )  १५/३/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा