सोमवार, २ एप्रिल, २०१२

औषधाऐवजी जडीबुट्टी सांगणारा डॉक्टर



   आता आपण मूलभूत प्रश्नाकडे वळूया. समजा अण्णांचे हे आंदोलन झालेच, नसते तर लोकांचे काय नुकसान झाले असते? अण्णा म्हणतात तसे लोकपाल येण्याची आजतरी शक्यता नाही. म्हणजेच ज्यासाठी आंदोलन झाले ते साध्य सिद्ध होताना दिसत नाही. मग अण्णांच्या या आंदोलनाने लोकांचे लोकशिक्षण व प्रबोधन झाले असे स्वत: सप्तर्षीच सांगतात. पण दुसरीकडे त्यांच्या या विधानाने एक गंभीर प्रश्न निर्माण होतो, की मागल्या साठ पासष्ठ वर्षात हे प्रबोधन का होऊ शकले नव्हते? जे स्वत:ला लोकशाहीचे मोठे पुरस्कर्ते म्हणवून घेतात, त्या सप्तर्षी यांच्यासारख्या विद्वानांचे काय? आपण आणिबाणीत तुरूंगवास भोगला, याचा त्यांना मोठा अभिमान आहे. पण त्यांच्यावर याच घटनाधिष्ठीत लोकशाहीत तुरूंगामध्य खितपत पडायची वेळ का आली, याचा काही खुलासा त्यांच्याकडे आहे काय? जे काम आज अण्णांच्या आंदोलनाने केले, ते पाच सहा दशकांपुर्वी सप्तर्षी वा तत्सम विद्वानांनी यशस्वीपणे केले असते; तर या महाशयांना तुरूंगात खितपत पडायची वेळ आली असती काय? त्यांच्या तुरूंगवास व अण्णांचा तुरूंगवास यात जमीन अस्मानाचा फ़रक आहे.

   त्यांना तुरूंगात जावे लागले, कारण यांची लोकशाही त्यांच्यासारख्या बुद्धीमंतांच्या दिवाणखान्यातच बंदिस्त झाली होती. तिचे मुल्य वा महत्ती त्यांनी कधी सामान्य माणसापर्यंत पोहोचू दिली नव्हती. त्यांचे अविष्कार स्वातंत्र्य, कलास्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य अशा कर्मकांडापुरती लोकशाही त्यांनी कुंठीत केली होती. तिचा सामान्य माणसाच्या जिवनाशी काडीमात्र संबंध नव्हता. मग ती लोकशाही त्यांच्यासाठीची चैन असावी असेच लोक समजत होते. त्या लोकशाहीचा गळा ईंदिरा गांधी यांनी आणिबाणी लादून घोटला, तर सामान्य भारतिय नागरिकाने गळा काढावा कशाला? रडावे, लढावे कशाला? तो शांत आपल्या कामात मग्न राहिला आणि सप्तर्षी सारखे शहाणे तुरूंगात खितपत पडून राहिले. अण्णांसारखा कोणी अडाणी तेव्हा किंवा त्याच्या आधी कामाला लागला असता व त्याने लोकांना लोकशाही प्रक्रिया समजावली असती, तर सप्तर्षी सारख्या शहाण्यांना निदान दिर्घकाळ तुरूगात विनाकारण सडावे लागले नसते. ती त्यांच्याच शहाणपणाने ओढवून आणलेली आपत्ती होती. लोकांना शिकवण्यापेक्षा लोकांची, म्हणजे सामान्य जनतेची हेटाळणी करून आपले शहाणपण मिरवण्याच्या पापाचे ते फ़लित होते. आणि हे आजकाल्चे पाप नाही. हजारो वर्षे लोकांना अडाणी ठेवण्यात व त्यांच्या अज्ञानावर हुकूमत गाजवण्यातच धन्यता मानणा्री जी मानसिकता आहे, त्याचेच प्रतिनिधीत्व सप्तर्षी करीत असतात. फ़रक एक क्षुल्लकसा आहे. तेव्हा सनातनी मुंज करून जानवे परिधान करायचे आजचे हे सप्तर्षी मार्क्सवाद व गांधीवाद यांचे पठण करून सेक्युलर जानवे परिधान करतात. बाकी मनोवृत्ती सारखीच. किंबहूना आजची ही सेक्युलर जानव्यातली तुच्छतावृत्ती तेव्हाच्या जातियवृत्तीपेक्षा अधिक लबाड व घातक आहे. ब्राह्मण्याला शिव्याशाप देत तिची शिरजोरी चालत असते.  

   डॉ. सप्तर्षी यांचा हा लेख मुळातच लबाडीचे अर्क म्हणावा असाच आहे. महात्मा फ़ुल्यांच्या काळातील एखाद्या महामहोपाध्यायाने ’शिंच्या’ अशी शिवी हासडत समोर यावे, तसे ते अण्णांच्या अंगावर येताना दिसतात. वाचकाची दिशाभुल व फ़सवणुक करण्याची वृत्ती झाकून अतिसावध रितीने त्यांनी आपला चेहरा लपवण्याचा प्रयास केलेला आहे. अण्णा अडाणीपणाने बोलतात व रेटून बोलतात, असे सांगताना त्यांनी कुठलाही पुरावा दिलेला नाही. पण या लेखात असो, की वाहिनीवर बोलताना असो, सप्तर्षी नेहमी बेछूट खोटे बोलतात, पण रेटून बोलतात त्याचे काय? इथे त्यांनी अण्णांवर जो आरोप केला आहे, तो प्रत्यक्षात त्यांनाच तंतोतंत लागू पडणारा आहे. आपला नाकर्तेपणा त्यांना लपवायचा तर आहे. पण आपणच कर्तृत्ववान आहोत, असेही दाखवायचे आहे. मग ते अण्णांना लोकप्रबोधनाचे अर्धे श्रेय देतात. पण उरलेले अर्धे श्रेय कोणाला, ते अजिबात सांगत नाहीत. मग लोकांनी ते यांच्या उपरण्यात घालावे, ही अपेक्षा असते. अण्णांनी कुठलेही श्रेय कधी मागितलेले नाही. मग ते देण्याची घाई सप्तर्षींनी का करावी? तर उरलेले आपल्या उपरण्यात पडावे, अशी ही धडपड आहे. अण्णांची गोष्ट बाजूला ठेवा. सप्तर्षी व त्यांच्या सेक्युलर समाजवादी गोतावळ्याने आजवर कुठले श्रेय घेण्यासारखे काय कर्तृत्व गाजवले आहे? आणिबाणीत तुरूंगात जाणे हे कर्तृत्व असेल तर अण्णांचे कर्तृत्व शुन्यच म्हणायला हवे. मुद्दा इतकाच, की हे महोदय वा त्यांच्यासारखे हजारो शहाणे निमुटपणे तुरूंगात जाऊन पडले, तेव्हा लोकशाही धारातिर्थी पडली होती. यांच्यातला कोण तिला वाचवू शकला? कधी इंदिराजींची विवेकबुद्धी जागी होईल त्याची वाट बघत बसण्यापलिकडे त्यांनी कोणता पराक्रम गाजवला?  

   हे असले विद्वान व पुस्तकी शहाणे तुरुंगात टाकले, मग लोकशाही कोणालाच नको आहे; हे इंदिराजी जाणून होत्या. म्हणूनच त्यांनी या मुठभरांना गजाआड ढकलले व देशात शांतता होती. कोणाची तक्रार नव्हती. अगदी घटनेच्या चौकटीत इंदिराजींनी आपली हुकूमशाही बसवली होती. सप्तर्षी व तत्सम शहाणे, काय शिव्याशाप देतात व प्रवचने देतात, त्याची इंदिराजींना कधीच फ़िकीर वाटली नाही. आणि लोकशाही वाचवायला हे शहाणे काहीही करू शकले नाहीत. ज्या लोकांनी बंड करून उठावे व इंदिरा गांधी यांची हुकूमशाही मोडून काढावी, अशी यांची अपेक्षा होती, त्या लोकांना लोकशाहीच ठाऊक नसेल, तर बंड होणार कसे? सगळा शहाण्या लोकांचा जमाना होता. अण्णासारख्या अडाण्याचे तेव्हा कोण ऐकत होता? सप्तर्षी वा तत्सम विद्वानांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तरी अण्णासारखा अडाणीपणाने लोकशाहीवर बोलणारा लोकांपुढे ठेवला असता, तर त्यांच्यावर तुरूंगात खितपत पडायची वेळ आली नसती. यांच्याच विद्वत्तापुर्ण मुर्खपणाने त्यांच्यावर गजाआड पडण्याची वेळ आलेली होती. कारण लोकांना समजेल व लोक शिकतील, असे काही बोलायचे व लिहायचे नाही, अशा हट्टाने त्यांनी लोकांना अज्ञानी ठेवल्याचा तो परिणाम होता. अण्णांवर ती पाळी आली नाही. त्यांना अटक होताच हजारो व शेकडो लोक रस्त्यावर  उतरले. त्याला सरकार घाबरले. अण्णांची सुटका करायला काही तास पुरले. कारण लोकशाहीसुद्धा शेवटी पुस्तकापुरते तत्वज्ञान नसते. तिचा प्रभावही लोकसंख्येतून दिसावा लागतो. त्यात लोकांचा सहभाग असावा लागतो. जिथे लोकच मुर्ख आहेत अशी ठाम श्रद्धा असलेले शहाणे असतात, तिथे लोकशाहीचे वाटोळेच होते. कारण असे शहाणे लोकशाहीत लोकांना किंमतच देत नाहीत. त्यांना आपला भ्रम म्हणजे शहाणपण, तत्वज्ञान व विचारधारा वाटत असते. आणि जे वाटते ते असायची त्यांना गरज भासत नाही. समजुती, भ्रम व आभास हेच त्यांच्या विचार व निर्णयाचे आधार असतात. सत्य व वास्तवाशी त्यांनी कधीच फ़ारकत घेतलेली असते. म्हणूनच सप्तर्षी व सामान्य माणसे यांच्या लोकशाहीत मुलभूत फ़रक असतो. त्यांची लोकशाही पुस्तकात व शब्दात अडकून पडलेली असते तर तुमची आमची लोकशाही जिवनाशी निगडीत असते.

   त्यामुळेच असे विद्वान नेहमी आपल्या भ्रमात वावरताना दिसतील. तुरूंगात जाऊन आलो असे अभिमानाने सांगणार्‍या सप्तर्षींना, आपण इंदिरा कृपेने सुटलो हे सुद्धा आठवत नाही. त्यांनी तेव्हाचा मोजक्या शब्दात सांगितलेला इतिहास त्यांच्या भ्रमिष्टपणाची साक्ष देतो. ते लिहितात, ’राज्यघटनेतील या व्यवस्थेमुळे स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे झाली, तरी देशात हुकूमशाहीचा उदय झाला नाही. 1975 साली पं. इंदिरा गांधींनी घटनात्मक चौकटीत राहून देशावर आणीबाणी लादली. लोकशाहीचा एक खांब - कार्यकारी विभाग - उर्वरित दोन खांबांना तुच्छ लेखू लागला. त्यावेळी त्यांनी भारतीय नागरिकांची मूलभूत स्वातंत्र्ये नष्ट केली होती. तरीही आंतरिक शक्तीच्या आधारे 1977 च्या निवडणुकीत देशाने इंदिरा गांधींना पराभूत केले. कॉग्रेस पक्षाची सत्तेवरून हकालपट्टी केली. लोकशाहीची पुनर्स्थापना केली. भारतीय राज्यघटनेने संकटकाळी आपले अंतर्भूत सामर्थ्य आणि तेज दाखविले.’

   आता याला काय म्हणायचे? हुकूमशाहीचा उदय झाला नाही म्हणायचे आणि लोकशाहीची पुर्स्थापना झाली असेही म्हणायचे. हा काय प्रकार आहे? तुम्हाला स्वाईनफ़्लूची बाधा होऊ शकली नाही आणि तुम्ही स्वाईनफ़्लूमधून मुक्त झालात, असे कोणी डॉक्टर सांगू लागला तर तुम्ही आय म्हणाल? कुमार सप्तर्षी डॉक्टर आहेत. ते औषध देतात की जडीबुट्टी देतात? ही असली विद्वत्ता लोकांना कळायची कशी? त्यापेक्षा अडाणी अण्णा बरे. लोकांना कळेल असे काहीतरी बोलतात. तर कुमार त्यांना अडाणी म्हणतात. मग अडाणीपणाची व्याख्या काय होते? जो समजण्यासारखे बोलेले तो अडाणी आणि ज्याला दुर्बोध अनाकलनिय बोलता येते तो विद्वान? हा सगळा लेख मुळात अशाच मुर्खपणाची साक्ष आहे. (क्रमश:)
भाग  ( २२२ )  १/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा