शनिवार, १४ एप्रिल, २०१२

रणानिती, अर्थात षटकर्णो भिद्यते मंत्र:



   व्युह, युद्धनिती, रणनिती असे शब्द पुर्वी इतिहास व पौराणिक कथांमध्ये वाचायला मिळत असत. अलिकडल्या वृत्तपत्रे व वाहिन्यांच्या बातम्यांमध्ये रणनिती हा शब्द सर्रास ऐकायला मिळत असतो. विशेषत: राजकीय बातम्यांमध्ये त्याचा सढळ हस्ते वापर होत असतो. मला आठवते, एकदा चौरसिया नावाचा एक आजतकचा बातमीदार जॉर्ज फ़र्नांडीस यांची कुठल्या तरी राजकीय पेचप्रसंगी रस्त्यातच मुलाखत घेत होता. त्यानेही सहजगत्या फ़र्नांडीस यांना रणनितीबद्दल विचारले. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर त्याला अजिबात समजले नाही. कारण त्याने फ़र्नांडीस यांना पुढल्या रणनितीबद्दल सवाल केला होता आणि ते म्हणाले, "जर काय करणार ते आताच तुम्हाला सांगितले, तर जे ठरवले आहे ती रणनितीच उरणार नाही." चाणक्याने त्यालाच षटकर्णो भिद्यते मंत्र: असे संबोधले आहे. म्हणजे जेव्हा एखादी बाब सहा कानापर्यंत पोहोचते, तेव्हा त्यातली गोपनियता संपुन जाते. जी बाब महत्वाची व मोक्याच्या क्षणी करायची असते, त्यात धक्कातंत्र महत्वाचे असते. ती होणार असल्याचे आधीच सर्वांना ठाऊक असेल तर त्यातले नवल संपून जाते. रणनिती ही अशीच धक्कातंत्र असते. त्यात दुष्मन वा शत्रूला नुसता ताकदीने धक्का द्यायचा नसतो, तर चकित करायचे असते. अनपेक्षित घडते तेव्हा समोरच्या माणसाची मती गुंग होऊन जाते. त्यात तो अर्धा पराभूत होत असतो. कारण त्याने योजलेले डाव निरुपयोगी ठरत असतात. म्हणुनच रणनिती, व्युहरचना ही बाब अत्यंत गोपनिय राखली जात असते. मग कुठला सेनापती आपली रणनिती जगाला आधीपासून सांगेल? तसे केल्यास त्याचे डावपेच शत्रूपर्यंत जाण्याचा धोका असतो ना? ते घडले तर ती रणनिती अंमलात आणण्याआधीच पराभूत होत असते. जॉर्ज फ़र्नांडीस यांना तेच सांगायचे होते. पण त्यातला बोध सबसे तेज वाहिनीवर बातमीदारी करणार्‍या चौरसियाला उमगलाच नाही.

   आजकाल तर कुठल्याही बाबतीत रणनिती हा शब्द सर्रास वापरला जात असतो. क्रिकेटचा सामना असो किंवा एखाद्या महापालिकेतील नगराध्यक्ष महापौराची निवडणूक असो. विधानसभेचे अधिवेशन असो किंवा दोन पक्षांच्या युती आघाडीतील जागावाटप असो. पत्रकार सहजगत्या त्यातल्या नेत्यांना रणनिती विचारत असतात. कारण रणनिती म्हणजे काय तेच या पत्रकार बातमीदारांना उमगलेले नाही. उघड झालेली रणनिती किती घातक व आपल्यावरच उलटणारी असते त्याचे एक उदाहरण इथे सांगायचा मोह मला आवरत आही. चार दशकांपुर्वी जे बांगलादेश मुक्तीचे भारत पाक युद्ध झाले, त्यात भारताच्या विजयाला फ़ुटलेल्या पाक रणनितीने मोठा हातभार लावला होता. पुर्व असो की पश्चिम सीमा असो, तिथे कोणत्या व कशा हालचाली करणार, हे पाकचे वरिष्ठ सेनापती ठरवायचे, ती त्यांची रणनिती असे. मग त्याप्रमाणे सीमेवरील सेनाधिकार्‍यांना युद्धसुचना दिल्या जात असत. भारतीय सीमेवर वा ठाण्यावर कुठे आक्रमण करायचे, कुठे हवाई हल्ले करायचे, याचा हा सगळा तपशील म्हणजे पाकची रणनिती असायची. पण त्यांचे दुर्दैव असे, की त्यांच्या रणभूमीवरल्या अधिकार्‍यांना त्याचे आदेश मिळण्यापुर्वीच, तो तपशील भारतीय हेरखात्यामार्फ़त आपल्या वरीष्ठ सेनापतींपर्यंत येऊन पोहोचत होता. सहाजिकच आपले व्युहरचनाकार त्याला तोंड द्यायला सज्ज असायचेच. पण भारतीय सेना गाफ़ील असल्याच्या समजूतीने अंगावर येणारे पाक सैन्यच गाफ़ीलपणे सापळ्यात अडकत होते. याला पाकची फ़ुटलेली रणनिती कारणीभूत होती. त्यामागचे रहस्य असे होते, की पाकचे सेनाप्रमुख व लष्करी हुकूमशहा याह्याखान यांचा विश्वासू सहाय्यकच भारतीय हेरखात्याने फ़ोडला होता. तो तमाम माहिती रणनितीच्या बैठका संपताच भारतीय हेरखात्याला कळवत होता. मग त्यानुसार भारतीय रणनिती आखली जात होती. एकीकडे येणार्‍या हल्ल्याचा मुहतोड जबाब दिला जायचा. तर दुसरीकडे जिथे पाक सेना शांत व गाफ़ील बसणार होती तिथे भारतीय फ़ौजा आकस्मिक हले करून सोपा विजय मिळवत गेली.  

   रणनिती ही कशी गोपनिय़ असते वा असायला हवी. त्यासाठी अशा घटना समजून घ्यायला हव्यात. रणनिती म्हणजे क्रिकेटचा खेळ नसतो. शत्रूला वा प्रतिस्पर्ध्याला गाफ़ील ठेवून त्याच्यावर मात करण्याच्या डावपेचांना रणनिती म्हणतात. पण आपल्याकडे बातमीदार, पत्रकार व वाहिन्यांनी त्या शब्दाचा पुरता पोरखेळ करून टाकला आहे. मला तर कधीकधी वाटते, की यामागेच काही बनीबनायी रणनिती आहे काय? पत्रकारीता, माध्यमे यांना निकामी व निरूपयोगी बनवण्याचा हा खास डाव कोणी रचून त्याची पद्धतशीर अंमलबजावणी चालू आहे काय, अशी मला शंका येते. म्हणजे लांडगा आलारे आला या गोष्टीत जसा तो उनाड मुलगा सारखा थापा मारून लोकांची गंमत करतो. मग त्यातून लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचेच बंद होतात. मग एके दिवशी खरोखरच लांडगा येतो. तेव्हा तो पोरगा घशाला कोरड पडेपर्यंत ओरडा करत रहातो, पण खरेच लांडगा आलेला असताना कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कारण आधी गंमत केल्याने तो पोरगा ओरडतो म्हणजेच लोकांना थापा वाटू लागलेल्या असतात. आजच्या माध्यमांना व पत्रकारांची विश्वासार्हता संपवण्याचे काही कारस्थान शिजवून अंमलात आणले जाते आहे काय, अशी हल्ली मला शंका येऊ लागली आहे. इतर राजकारण्यांना वा सार्वजनिक व्यक्तींना रणनिती विचारणारे पत्रकारच, एका वेगळ्या रणनितीची शिकार झाले आहेत व होत आहेत काय, याचा मला संशय येऊ लागला आहे. त्यातले काही समजून उमजून त्यात सहभा्गी झालेले असतील पण बहुतांशी नकळत त्यात सापडले असू शकतात. ही काय व कोणती रणनिती आहे? त्यामागे कोणता कुटील हेतू असावा? कोण कारस्थानी त्यामागे असावे?  

   पाकिस्तानच्या त्यावेळच्या सेनाधिकार्‍यात कोणी भारताचा हस्तक नव्हता. पण जो याह्याखानचा विश्वासू सहाय्यक होता, तो जाणीवपुर्वक भारताला साथ देत होता. त्याच्या समोर रणनिती बोलणारे अनवधानाने त्यालाच साथ देत होते. तसेच आजच्या पत्रकारितेत अनेकजण अनवधानाने सापळ्यात फ़सलेले असू शकतात. पण पत्रकारीता व माध्यमे यांना असे अविश्वासार्ह बनवून कोणाचा काय फ़ायदा होऊ शकतो? त्या लांडग्याने त्या पोराला आपला हस्तक बनवले नव्हते. त्या पोराने गंमत म्हणून मुर्खपणा केला होता. त्यामुळेच सगळी मेंढरे लांडग्याच्या तावडीत अलगद सापडली, त्यांना कोणी वाचवू शकला नाही. वाचवायला धावला नाही. मानवी व्यवहारात लांडगेतोड करणारे श्वापदापेक्षा घातकी असतात. ते खट्याळ पोरालाच नव्हे तर एखाद्या मेंढरालाच आपला हस्तक बनवून अवघ्या कळपाचा फ़डशा पाडण्याचे डाव खेळू शकतात. आणि तसाच काहीसा प्रकार सध्या चालू आहे काय अशी कधी कधी शंका येते. माध्यमांना किंवा वृत्तपत्रांना लोकशाहीत चौथा स्तंभ मानले जाते. चौखांबी राज्यव्यवस्थेमध्ये माध्यमांचे काम हे एखाद्या वॉचडॉग म्हणजे राखणदार शिकारी कुत्र्यासारखे अपेक्षित आहे. त्याने सभोवार नजर ठेवून कुठे लांडगे येतात, कुठे शिकारी श्वापदे येतात व लोकशाहीचा फ़डशा पाडू शकतात, त्यावर सतत व अखंड नजर ठेवावी, हीच अपेक्षा आहे. पण तसे होताना आज दिसते काय? चौथा खांब वा अविष्कार स्वातंत्र्याचे योद्धे म्हणून नाचणारे खुप दिसतात. पण ते सत्याची रखवाली करत असतात, की खोटेपणाला पाठीशी घालायला धडपडत असतात?  सामान्य माणसाला चौथा खांब म्हणजे नेमके काही कळत नाही. त्यासाठी संरचना समजून घेण्याची गरज आहे. माध्यमांचे म्होरके त्याबाबतीत लोकांचे प्रबोधन करताना दिसत नाहीत. की लोकांना चौथ्या स्तंभाचे वास्तव रुप व जबाबदारी समजली तर चलाखी करता येणार नाही, याची भिती पत्रकारांना भेडसावत असते?

   अखेर पत्रकारिता म्हणजे चौथा खांब असेल तर उरलेले तीन खांब कुठे आहेत? त्यांची ओळख काय आहे? त्याबद्दल का बोलले जात नाही? त्याचे नेमके महत्व काय आहे? त्या व्यवसायाला लोकशाहीत इतके महत्व का असावे? लोकांना याची नेमकी जाणीव झाली तर पत्रकारितेला लोकांचेच भक्कम संरक्षण मिळू शकेल. खास कायदा वा सरकारी संरक्षण मागण्याची वेळ पत्रकारावर येणार नाही. पण दुर्दैव असे, की त्याबद्दल पत्रकारच लोकांचे प्रबोधन करायला तयार नाहीत. फ़क्त लोकशाहीचा चौथा खांब असे गोलमाल बोलले जात असते. त्याचे कौतुक सांगितले जाते, पण जबाबदारी मात्र सांगितली जात नाही. सामान्य माणसाने चौथा खांब म्हणुनच समजून घेतला पाहीजे.   (क्रमश:)
भाग  ( २३५ )     १४/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा