गुरुवार, १२ एप्रिल, २०१२

आधुनिक महाभारतातील नरोवा कुंजरोवा


   "शोधन" नवाचे एक मराठी साप्ताहिक मुंबईतून अनेक वर्षे प्रसिद्ध होत असते. दिर्घकाल मला त्याचे अंक बघायला मिळाले नाहीत. पण १९७०च्या दशकात त्याचे काही अंक मी वाचलेले आहेत. त्यात स्वर्गिय हमीदभाई दलवाई यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळावर कडाडून टिका असायची. हमीदभाईला मदत करणारे जे अ. भि शहा नावाचे सेक्युलर विचारवंत होते. त्यांच्यावरही सडकून टिका असायची. त्यांनी मांडलेले मुद्दे त्यात खोडून काढायचा प्रयत्न असायचा. अर्थात हे साप्ताहिक मराठी मुस्लिमांनी चालविलेले असल्याने व ते धर्मनिष्ठ असल्याने त्यात इस्लामची बाजू समर्थपणे मांडणारा युक्तीवाद असायचा. त्यांच्या मते हमीदभाई व त्यांचे मुस्लिम सत्यशोधक मंडळातील सहकारी, इस्लामविषयी गैरसमज पसरवतात, असाही आक्षेप घेतलेला असे. त्यांचे त्या साप्ताहिकाचे अंक किती हमीद समर्थकांपर्यंत जात असतील देवजाणे. दुसरी बाब म्हणजे हमीदभाईंची चळवळ तेव्हाही मुठभर मुस्लिम व मुठभर सेक्युलर हिंदूंच्या पुरती मर्यादित होती. त्यामुळे मुस्लिमांनी त्याची दखलही घेण्याचे काही कारण नव्हते. हमीदच्या सत्यशोधनाने त्यांच्या इस्लामी धर्म तत्वज्ञानाला कुठलाही ओरखडाही उठत नव्हता. कारण ती चळवळ हजारभर मुस्लिमांपर्यतही पोहोचली नव्हती. पण तरीही त्या "शोधन"मधल्या मुस्लिम पंडित विद्वानांनी हमीदच्या आक्षेपांआ उत्तर द्यायचे टाळले नाही, त्याकडे काणाडोळा केला नाही. आपली सफ़ाई मांडण्य़ाइतके ते प्रामाणिक बुद्धीमंत होते. आक्षेपांकडे काणाडोळा करणे वा अनुल्लेखाने मारणे, हा बुद्धीवाद नसतो तर पलायनवाद असतो. त्यात आजकालचे जे सेक्युलर असतात ते नेहमी पलायवादी मार्ग अनुसरतात. मला त्याचा ताजा अनुभव आला तो "शोधन"च्याच बाबत्तीत. हमीदभाई आठवतो का? अशा शिर्षकाचा जो लेख मी उलट तपासणीत लिहिला, त्यावर मला एकाही सेक्युलर विद्वानाने उत्तर दिलेले नाही. फ़ार कशाला त्यापैकी कुणी विचारणाही केली नाही. पण त्याच दिवशी मला "शोधन" साप्ताहिकातून नौशादभाई या मुस्लिम लेखकाने अगत्याने फ़ोन केला. माझ्या लेखातील मुद्दे व त्यावर चर्चा केली. त्यातल्या आक्षेपांना आपल्या साप्ताहिकातून उत्तर देणार असल्याचेही अगत्याने सांगितले. याला बुद्धीवाद म्हणतात.  

   आता तुलना करा. स्वत:ला बुद्धीवादी म्हणवणारे डॉ. सप्तर्षी, हेमंत देसाई, कुमार केतकर, निखिल वागळे, हे कुठे आणि असे कुठेही न मिरवणारे "शोधन" साप्ताहिकातले नौशादाभाई कुठे. खर्‍या बुद्धीवादाची साक्ष त्या नौशादभाईंनी दिली. त्यांना माझे मुद्दे पटले नसतील. इस्लाम संदर्भात मी लिहिलेले मुद्दे त्यांना आक्षेपार्ह वाटले असतील. पण त्यांनी त्याची दखल घेतली. त्याचा प्रतिवाद करायची तयारी दर्शवली. तो नुसता बुद्धीवादच नाही तर प्रामाणिकपणाचाही दाखला आहे. असे करायला नौशादभाई पुढे का यावेत? आणि स्वत:ला अखंड विचारवंत म्हणून समाजासमोर माध्यमातून वाहिन्यांवरून पेश करणारे दडी मारून का बसतात? त्यांना आपली सफ़ाई द्यावी असे का वाटू नये? तर त्याचे कारण एकच आहे. नौशादभाईंचा आपल्या धर्म विचारावर विश्वास आहे, त्यावर अढळ निष्ठा आहे. स्वत:ला सेक्युअलर समाजवादी म्हणवून घेणार्‍याची तेवढी स्वत:च्या विचारावर निष्ठाच नाही. आपण वैचारिक देखावा निर्माण करतो याची त्यांनाही खात्री आहे. आपण करतो ते ढोंग आहे, याचीच खात्री असल्यावर ते कुठल्या तोंडाने सफ़ाई द्यायला पुढे येणार? नौशादभाईंचे तसे नाही. त्यांची इस्लाम व त्याच्या धार्मिक तत्वज्ञानावर अढळ श्रद्धा आहे, विश्वास आहे. ज्या धर्माला हे सेक्युलर ढोंग म्हणतात, त्याची वैचारिक बाजू नौशादभाई मांडू शकतात. पण जे ढोंगाचा आरोप करणारे आहेत, तेच आपल्या सेक्युलर विचारसरणीचा बचाव मांडू शकत नाहीत. कारण ज्याला ते सेक्युलर म्हणुन पेश करतात तो सेक्युलर विचारच नाही. ती शुद्ध थापेबाजी असते. याखेरीज त्यांच्या मौनव्रताचे दुसरे कुठले कारण असूच शकत नाही.

   समाजाचे प्रबोधन असेच उलटसुलट वादविवादातून होत असते. एक बाजू मांडली गेली, मग त्याची दुसरी बाजू मांडली जाते. त्याच्याही पलिकडे तिसरी चौथी बाजू लोकांसमोर आली, मग लोकांना त्या विषयाचे चहुकडून ज्ञान होऊ शकते. त्याऐवजी एकच बाजू मांडत राहिले, मग लोकांमध्ये गैसमज निर्माण होतात. मग ते प्रबोधन न रहाता बाजारीकरण होऊन जाते. जसे दुकानात गेल्यावर तिथला विक्रेता तुम्हाला त्याच्या दुकानातला माल दाखवतो आणि त्याचे गुणवर्णन सांगत रहातो. पण त्या मालातले दोष कधीच सांगत नाही. त्यावर विसंबून तुम्ही वस्तू, माल खरेदी केलात; मग त्यातले दोष घरी आल्याव्रर, वापरातून तुमच्या लक्षात येतात. तोवर तुमची फ़सगत झालेली असते. त्यापेक्षा आजचे सेक्युलर बुद्धीमंत वेगळे वागत असतात काय? ते दुसरी बाजू लपवण्याची बौद्धीक कसरत करत असतात. कोणी प्रश्न विचारले, सवाल केले तर, त्याकडे काणाडोळा करून काय साधले जात असते? आपले पाप लपवले जात असते इतकेच. खरा बुद्धीवादी असा नसतो. पुर्वी आत्रे-फ़डके, भावे-अत्रे असे अनेक बौद्धिक वाद मराठी वाचकांच्या साक्षीने रंगलेले आहेत. १९५० च्या दशकातली मराठी साक्षर पिढी असल्या वादाने शहाणी झाली. आज असे वाद होत नाहीत. कारण तेवढे बौद्धिक सामर्थ्य आजच्या विद्वानांमध्ये नाही, तसाच तेवढा बौद्धिक प्रामाणिकपणाही त्यांच्यात उरलेला नाही. मग मला दोन शंका येतात. एक अशी की यांच्यात प्रामाणिकपणा व तेवढी बौद्धिक कुवतच नसावी म्हणून ते पलायनवादी झालेले असावेत. किंवा दुसरी शक्यता अशी, की त्यांना वादातून सामान्य माणसाचे जे बौद्धिक प्रबोधन होईल, तेच व्हायला नको आहे. तो सामान्य माणूस अडाणी व बुद्धीहीन रहावा, म्हणूनच यांनी बौद्धीक वादविवाद होऊच नये याची काळजी घेतलेली असावी.

   डॉ. सप्तर्षी यांच्या गांधीवादावर मी टिकाटिप्पणी केली आहे. केतकरांच्या बौद्धिक कोलांट्या उड्या उघड केल्या आहेत. निखिल वागळे यांच्या मुर्खपणाचे दाखले दिले आहेत. हेमंत देसाई यांच्या भंपक खोटेपणाचे त्यांच्याच लेखातले उतारे सादर केले आहेत. मग त्यांनी आपले समर्थन करायला पुढे का येऊ नये? तर त्याचे एकमेव कारण स्वत:चा खोटेपणा त्यांना झाकता येणार नाही हेच आहे. पण तो खोटेपणा त्यांना सोडताही येत नाही. कारण त्यांनी तसा खोटेपणा करायचे व्रत घेतले आहे किंवा तसे कंत्राट तरी घेतलेले आहे. त्याची सफ़ाई देणार तरी कशी? आपले पाप न्यायालयात कायद्याच्या निकषावर झाकता येत नव्हते तेव्हा एम. एफ़. हुसेन या चित्रकाराने देश सोडून पळ काढला होता ना? त्याला कोणी देशातून पळवून लावले नव्हते. तर त्याच्यावर न्यायालयात खटला होता. हजर रहाण्याचे वॉरंट त्याच्यावर होते. म्हणून तो फ़रारी झाला होता. त्याने कतार देशाचे नागरिकत्व घेऊन तिचेच आपली इहलोकीची यात्रा संपवली. तर हेच आमचे सेक्युलर शहाणे ते सत्य दडपून, त्याला देशातून पळावे लागले म्हणून गळा काढत होते. त्याच्यावर कोर्टाचे पकड वॉरट होते हे सत्य नेहमी लपवले गेले. उलट त्याला कोणा हिंदुत्ववाद्यांच्या भयाने पळावे लागले, असा गैरसमज मात्र निर्माण करण्यात या शहाण्यांनी बुद्धी खर्ची घातली. नरेंद्र मोदी विरोधात कोर्टाने आदेश दिला, मग तो पवित्र असतो. तेव्हा कोर्ट महान असते. मग त्याच न्यायालयाने हुसेनवर वॉरंट काढले तर हे सेक्युलर शहाणे तेच सत्य का चढ्या आवाजात सांगत नाहीत? तिथेच त्यांची बनवेगिरी उघडी पडत असते.

   त्यांना सत्याचे वावडे आहे. त्यांना खरे नको आहे. त्यांना लोकांच्या माथी खोटे मारायचे असते. ते धडधडीत खोटेपणा करत असतात. आणि त्यात कोणी त्यांचा खरेखोटेपणा तपासू नये, ही त्यांची इच्छा असते. माझे लिखाण त्यांना सत्य बोलायला भाग पाडणारे असल्याने, मग त्यांची वाचा बसते. ते प्रतिवाद करणार तरी कसा? जे खोटे आहे ते वाचवायचे कसे? लिहितांना व बोलतानाच आपण खोटेपणा करतोय, याची त्यांना पुरेपुरे खात्री असते. नव्हे त्यासाठीच त्यांची संपादक वा निवेदक म्हणून नेमणूक झालेली असेल, तर त्यांना सत्याची कास कशी धरता येईल? मग त्यांचा युधिष्ठीर होऊन जातो. द्रोणाचार्याला लढाईत हरवणे शक्य नव्हते, तर त्याला शस्त्र खाली ठेवायची पाळी आणण्यासाठी युधिष्ठीर खरे वाटेल, असे खोटे बोलला होता ना? अश्वत्थामा हा द्रोणाचा पुत्र. तो मेल्याची बातमी कानी पडली, तर द्रोण हत्यार खाली ठेवाणार हे नक्की होते. पण त्यांना खरे वाटावे म्हणून सत्यवादी युधिष्ठीर काय बोलला? कसे बोलला? मोठ्या अवाजात म्हणाला अश्वत्थामा मेला. आणि हळू आवाजात पुटपुटला, नरो वा कुजरोवा. म्हणजे अश्वत्थामा मेला हे खरे होते. पण मारला गेला तो त्या नावाचा हत्ती होता. कुंजर होता नर नव्हता. पण तेवढ्याने द्रोण फ़सला होता. त्याने शस्त्र खाली ठेवले होते. आजचे सेक्युलर शहाणे वेगळे सत्य बोलतात काय? तेही सामान्य माणसाची फ़सगत होईल असे अर्धवट सत्य व अर्धवट खोटे बेमालूम मिसळून बोलत असतात ना?  (क्रमश:)
 भाग  ( २३४ )   १३/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा