मंगळवार, १० एप्रिल, २०१२

यातला चेहरा कुठला आणि मुखवटा कोणता?


  कोणाला वाटेल मी व्यक्तीगत हेतूने लिहितो की काय. पण तसे अजिबात नाही. मी कोणाबद्दल व्यक्तीगत लिहीत नाही. यांच्या ज्या जाहिर भुमिका आहेत व मते आहेत त्याचीच मी उलटतपासणी घेत असतो. त्यांच्या कोणाच्या व्यक्तीगत जीवनात मी डोकावत नाही. कारण कुठल्याही व्यक्तीचे खाजगी जीवन त्याचे स्वत:चे असते. त्याचा समाजाशी संबंध नसतो. जेव्हा त्याचे खाजगी जगणे सार्वजनीक जिवनावर प्रभाव पाडू लागते, तेवढ्याशी आपला संबंध येतो. म्हणुनच पत्रकाराने कुणाच्या खाजगी जीवनात डोकवायचे नसते. मी ते पथ्य कटाक्षाने पाळले आहे. जे पाळत नाहीत पण जगाला शहाणपणा शिकवू बघतात, त्यांना त्याचा जाब विचारणे म्हणूनच मला माझे पत्रकार म्हणुन कर्तव्य वाटते. अण्णांचे जगणे, रामदेवांचे वागणे तपासणार्‍यांनी जे तत्वज्ञान सांगितले आहे, त्याचा ते स्वत:च्या जीवनात किती अवलंब करतात हे म्हणून तर मोलाचे ठरते. हेमंत देसाई असोत किंवा डॉ. कुमार सप्तरषी असोत. त्यांच्याशी माझे काही वैयक्तिक भांडण नाही. त्यांना जसा अण्णा वा रामदेव, केजरीवाल यांच्या वागण्याची तपासणी करायचा अधिकार आहे, तसाच मलाही यांच्या खरेपणाची उलटतपासणी करण्याचा अधिकार मिळाला आहे. ते ज्या थोर पुरूषांचे हवाले देतात, विधाने सांगतात, ते तपासून बघण्याचा अधिकार कुणाही नागरिक व वाचकालाही असतो. त्यांच्या वतीने बोलणारा लिहिणारा कोण आहे?

   परवाची गोष्ट घ्या. कायबीईन लोकमत वहिनीला चार वर्षे पुर्ण झाल्याचा सोहळा दाखवत होते. त्यात आपलेच कौतुक वागळे आपणच करून घेत होते. ते करायला माझी अजिबात हरकत नाही. पण तो वागळे यांना एकट्यालाच अधिकार आहे काय? कारण असेच स्वत:चे कौतुक त्यांचा महानगर मधला सहकारी कपिल पाटिल याने केले, तेव्हा त्याची याच निखिलने टिंगल केली होती. १५ नोव्हेंबर १९९६ च्या महानगरच्या कॅलिडोस्कोपमधला निखिल वागळे खरा मानायचा तर आजचा लोकमत वाहिनीचा संपादक निखिल वागळेची गणना शहाण्या माणसात होऊ शकणार नाही. त्यात कपिल पाटिलला उपदेश  करताना निखिल लिहितो,  

"महानगर घडवण्यात आपला मोठा हात होता असं पाटिल यांनी स्वत:च्या तोंडाने सांगितलं आहे. त्यांच्या हेडलाईंन्सनी महानगर तुफ़ान खपू लागला असं ते म्हणतात. सर्वसाधारणपणे या गोष्टी दुसर्‍यांनी बोलायच्या असतात. स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍यांची गणना शहाण्या माणसात होत नाही."

   हा बोध किंवा शहाणपण निखिलने सोळा वर्षापुर्वी लिहून ठेवलेले आहे. ते खरे मानायचे तर ६ एप्रिल २०१२ रोजी प्राईमटाईम मध्ये लोकमत वाहिनीवर जो चालला होता तो मुर्खपणा नव्हता काय? तो मुर्खपणा स्वत: निखिलच करत होता. यातला कुठला निखिल वागळे शहाणा मानायचा? १९९६ साली कॅलिडोस्कोप लिहिणारा, की २०१२ साली कॅमेरासमोर उभा राहून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेणारा? कुठला तरी एक निखिल शहाणा जरूर आहे. पण त्याचवेळी दुसरा निखिल नुसता मुर्खच नाही, तर त्याची गणना शहाण्या माणसात होऊ शकत नाही अशी ग्वाहीखुद्द निखिलनेच दिलेली आहे. आता यातला कुठला खरा व शहाणा निखिल वागळे व कुठला बदमाश मुर्ख वागळे ते त्यानेच पुढे येऊन सांगावे. आणि गमतीची गोष्ट अशी आहे, की दोघेही एकाच वेळी आमनेसामने येऊ शकत नाहीत. अनेक वाचकांना प्रश्न पडतो की भाऊ तोरसेकर इतके भडक भन्नाट आरोप करतो, तरी यातला एकही शहाणा व विद्वान लढवय्या पत्रकार, अविष्कार स्वातंत्र्याचा योद्धा त्याच्या समोर का येत नाही? तर त्याचे हेच उत्तर आहे. कारण मी ज्यांच्यावर असे गंभीर आरोप केले आहेत, त्यांचा एकच चेहरा नाही. ते आपल्या समोर मुखवटे लावून येत असतात. आणि खाजगी आयुष्यात त्यांचे चेहरे यापेक्षा भयंकर वेगळे व विद्रुप असतात. त्यांना सतत आपला मुखवटा फ़ाटेल याची चिंता भेडसावत असते. आणि युद्ध करायचे म्हटले मग हाणामारी आली. त्यात चुकून मुखवट्यावर घाव घातला गेला तर काय? मुखवटा फ़ाटणार व खरा विद्रुप चेहरा लोकांपुढे आला तर?  

   म्हणूनच १९९६ सालात कॅलिडोस्कोप लिहिणारा निखिल आणि २०१२ सालात कायबीइन लोकमतचा वर्धापनदिन साजरा करणारा निखिल, कधी समोरासमोर येऊ शकत नाहीत. चुकून त्यांच्यातला कोणी माफ़ीचा साक्षीदार म्हणुन टोळीतून बाहेर पडला मग त्यांची पापे जगासमोर येतात. पण लौकरच त्याची समजूत घालून त्याला गप्प केले जात असते. कपिल पाटिल असाच एक माफ़ीचा साक्षिदार होता. त्याने १९९६ सालात अबीरगुलाल उधळून निखिलचा बुरखा टराटरा फ़ादून टाकला होता. तर आधी कपिलची सोशिकता तपासताना निखिलने कपिलचे वस्त्रहरण केले होते. पण त्यातली एक बाब मोलाची आहे. आपले हे समाजवादी पावित्र्याचे थोतांड लोकांसमोर उघडे पडू नये, याची काळजी बाकीचे पाखंडी समाजवादी कसे घेतात, त्याचेही सत्य कपिल बरळून गेला होता. मोठा निखिल विरुद्ध छोटा कपिल अशा या गॅंगवॉरमध्ये समाजवादी भंपकपणाची लक्तरे चव्हाट्यावर येऊ लागली, तेव्हा त्यात नर्मदाताई पाटकर यांनी हस्तक्षेप केला होता. ते सांगताना कपिल लिहितो.

   मेधाताई पाटकरांची आठवण सांगायला हवी. आज दिनांकच्या ऑफ़िसावर सेनेने ९३ साली मोठा हल्ला करून प्रचंड मोडतोड केली होती. त्याच दिवशी काही महिला शिवसैनिकांनी वागळे यांना एका समारंभात धक्काबुक्की केली होती. त्या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ पत्रकारांनी मोठं आंदोलन केलं.माझं ऑफ़िस पाहायला त्याच रात्री वागळे स्वत: येऊन गेले. दुसर्‍या दिवशी मात्र त्यांनी महानगरच्या अग्रलेखात आज दिनांकची आणि माझी रेवडी उडवली. तरीही आमचे मित्र मलाच सांगत होते, तुम्ही दोघं एकत्र या. मी त्यांना म्हणालो कसं एकत्र येणार? काही डाव्या समाजवादी स्वयंसेवी संघटनांनी संयुक्त आंदोलन उभारण्यासाठी वागळेंच्याच पुढाकाराने सानेगुरूजी विद्यालयात बैठक बोलावली होती. मेधाताईंनी मला फ़ोन करून ’तुम्ही दोघं आता न भांडता दहशतवादाविरूद्ध संयुक्तपणे लढा’ असं आर्जवाने सांगितलं. निखिलने माझ्यावर केलेल्या टिकेचं काय म्हणून मी त्यांना विचारलं. त्या म्हणाल्या. ’माझी स्पष्ट नाराजी मी त्याला कळवली आहे. त्याचं हे लिहिणं बरोबर नाही. मला ते आवडलेलं नाही. तुझ्याबाबतीत आक्षेप घेता येणार नाही. पण तू आता मनावर घेऊ नकोस. त्या बैठकीला जा".

   ही कशाची कबूली आहे? कसली साक्ष आहे? निखिल वागळे वा कपिल पाटिल हे पत्रकार असल्याची, की ते डाव्या चलवळीचे खंदे कार्यकर्ते पुरस्कर्ते असल्याची? त्यांचे मित्र कोण, जे त्यांच्यात समझोते मिटवामिटवी करू बघत होते? पत्रकारांचा डाव्या चळवळीशी संबंध काय? की पत्रकारिता हीच डावी चळवळ आहे? कपिल पाटिल यांनी जो लेख तेव्हा लिहिला होता व त्यातला उपरोक्त परिच्छेद त्यांच्या पत्रकारितेची वेदना सांगतो आहे, की पत्रकारितेमधल्या राजकीय मुखवट्याची कहाणी आहे? सर्व डाव्या समाजवादी संघटना आणि पत्रकारीतेचा संबंध काय? मेधाताई कुठल्या दहशतवादाबद्दल बोलतात? कपिल सांगतो, ते त्या दोघांचे मित्रच आपण आजकाल वाहिन्यांवरच्या चर्चेत वेगवेगळ्या नावाने, मुखवट्याने झळकताना बघत असतो. मग मेधाताई समाजसेविका होतात, सप्तर्षी गांधीवादी होणार, हेमंतभटजी ज्येष्ठ पत्रकार होणार, अमरापुरकर कलावंत होणार, समर खडस विश्लेषक होणार. हुसेन दलवाई कॉग्रेसचे खासदार म्हणुन येणार, तर डॉ. महाजन कॉग्रेस प्रवक्ता म्हणुन आणले जाणार. प्रत्यक्षात सगळे एकाच माळेचे मणी असतात व आहेत. ज्यांना कपिल "आमचे मित्र" संबोधतात, तोच हा गोतावळा आहे.  

भामटेगिरी व भुरटेगिरी करणार्‍यांची जशी टोळी असते व त्यात ज्याला फ़सवायचे त्याच्या भोवती असे आधीच संगनमत केलेले साथीदार वेगवेगळ्या वेशभुषेने घोळका करतात, तशीच ही टोळीबाजी आहे. ही बनवेगिरी लोकांमध्ये चालली नाही म्हणुन आज त्यांच्या जुन्या राजकीय विचारधारेचा अस्त होऊन गेला आहे. एसेम जोशी, मधू दंडवते, नानासाहेब गोरे, मधू लिमये, बापूसाहेब काळदाते यांच्यासारख्या निष्ठावंतांनी उभी केलेली समाजवादी चळवळ या नव्या पिढीतल्या भुरट्यांनी आपल्या मतलब व स्वार्थासाठी वाळवीप्रमाणे पोखरून निकामी करून टाकली. तिचे नामोनिशाण आज शिल्लक उरलेले नाही. ज्या दिवाळखोरीने त्यांनी समाजवादी चलवळ मारून टाकली, ते आता पत्रकारिताही रसातळाला घेऊन चालले आहेत. आज जुन्या समाजवादी चळवळीचा वारसा सांगणारी ही टोळी म्हणजे प्रत्यक्षात एक नौटंकीची कंपनी आहे. (क्रमश:)
भाग  ( २३२ )     ११/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा