मंगळवार, १० एप्रिल, २०१२

बात निभाना बातीया


 गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे. मुंबईतल्या एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड घातली. त्यात मजा मारत बसलेल्या अनेक श्रीमंत तरूण व तरूणींची धरपकड झाली. तसे प्रकार हल्ली नवे राहिलेले नाहीत. नव्याने श्रीमंती आलेल्या कुटूंबातली मुले, अशी पैसा उधळण्यासाठी वेळी अवेळी बाहेर भरकटत असतातच. त्यालाच हल्ली पुढारलेपणा मानले जात असते. त्यांच्या त्या श्रीमंतीचे ओझे कमी करण्यासाठी मग अनेक सुविधा उदयास आलेल्या आहेत. कुठे डान्सबार, लेडीजबार, उशिरा चालणार्‍या चोरट्या नग्न पार्ट्या होतच असतात. जे काही इतरेजनांना थक्क करणारे असेल वा सामान्य माणसात न्युनतेची भावना निर्माण करणारे असेल, ते श्रीमंतीचे लक्षण असे समजणारा एक वर्गच उदयास आलेला आहे. त्याचे वैशिष्ठ्य म्हणजे तो एक नंबरचा ढोंगी असतो. दिवसा वा लोकात वावरताना, तो पावित्र्य व सभ्यतेच्या गप्पा ठोकत असतो. मात्र लोकांची पाठ वळली, मग आपले गुण उधळत असतो. तर अशाच त्या हुक्कापार्लरमध्ये एक नावाजलेली व्यक्ती पोलिसांच्या तावडीत सापडली. पोलिसांनाही अशा बातम्या थेट प्रक्षेपित करण्याचा हल्ली छंद लागला आहे. त्यामुळे एकवेळ पोलिस पिस्तुल, बंदुक घेऊन धाड घालायला जात नाहीत. पण वाहिन्यांचे कॅमेरे मात्र सोबत घेतात. त्यामुळेच या बातमी व घटनेचा खुप गवगवा झाला. कारण त्यात सध्या लोकप्रिय असलेल्या एका टिव्हीमालिकेची सोज्वळ नायिका पोलिसांच्या जाळ्यात अडकली होती.  

   "नावाची एक मालिका" सध्या स्टार वाहिन्यावर गाजते आहे. त्यात एकत्र कुटूंब, त्यातल्या सासू, सुना, संस्कार अशा गोष्टी मोठ्या ठासून सांगितलेल्या असतात. त्यात जिया मनेक नावाची अभिनेत्री गोपी बहू ही भूमिका करते. नवरा किंवा सासरा दिसताच डोक्यावर पदर घेणारी ही गोपी बहू, त्या दिवशी देहप्रदर्शन करणारी वस्त्रे परिधान करून, हुक्का झोडायला अवेळी त्या पार्लरमध्ये गेली होती. धाड पडली त्यात नेमकी सापडली. मग सगळे कॅमेरे तिचा पाठलाग करू लागले. त्यात आपला चेहरा दिसू नये म्हणून गोपी बहूने आपले लांबसडक केस चेहर्‍यावर ओढून घेतले. त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. पण गाडीत बसून पळ काढायची तिची धावापळ लपत नव्हती. जे करताना लाज वाटली नाही, ते लपवायची लाज का वाटावी? तर लोकांसमोर तिची जी प्रतिमा आहे, तिला अशा बातमीने तडा जाण्याची भिती तिला वाटली होती. तिची ही प्रतिमा कशामुळे तयार झाली आहे? तर त्या मालिकेतील तिच्या सोज्वळ भुमिकेने ती प्रतिमा निर्माण झाली आहे. व्यक्तीगत जीवनात जिया मनेक ही सोज्वळ, आज्ञाधारक मुलगी अजिबात नाही. ती अत्यंत चंचल, गुलहौशी स्वभावाची मुलगी आहे. म्हणजे त्याच मालिकेत जी तिची बहीण व जाऊ राशी दाखवली आहे, तिचे प्रत्यक्ष जीवन जिया खर्‍या आयुष्यात जगत असते. मात्र लोकांसमोर तिची प्रतिमा पतिव्रता व सोज्वळ आहे. त्यावर व्यावसायिक यश अवलंबून आहे. म्हणुनच अशा हुक्का पार्टीची बातमी त्या व्यवसायाला धक्का देऊ शकते. त्यासाठीच तिची धावपळ उडाली होती.

   मुद्दा इतकाच, की ती जिया मालिकेत जी भुमिका करते, तो फ़क्त अभिनय असतो. वास्तव जीवनात त्याप्रमाणे वागणे तिलाही शक्य नसते. नव्हे ती तसे जगतसुद्धा नाही. मात्र आपली ती सोज्वळ प्रतिमा तिला धंद्यासाठी, उत्पन्नासाठी जपावी लागत असते. थोडक्यात तो अभिनय व त्यातला सोज्वळपणा हा निव्वळ अभिनय असतो. ज्यावर तिचाच विश्वास नाही, पण लोकांना आवडते म्हणुन ती देखावा करत असते. त्यात गैर काहीच नाही. तिची भुमिका व अभिनय हे सत्य जीवन नाही, हे बघणार्‍यांना सुद्धा माहित असते. त्यामुळे त्यांची तिच्याबद्दल तक्रार नसते. कौतुक तिच्या अभिनयाबद्दल असते, कथेबद्दल असते. कारण लोक त्याकडे शो म्हणजे मनोरंजन म्हणून बघत असतात. काल्पनिक म्हणून बघत असतात. पण जे खर्‍याखुर्‍या आयुष्यातच लोकांसमोर येतात, त्यांना अशी सवलत देता येईल काय? म्हणजे जो नियम गोपी बहूला लागतो तोच वाहिन्यांवर दिसणार्‍या पत्रकार, विश्लेषक, जाणकार व संपादकांना लागू शकतो काय? ते भुमिका करत नसतात. जिया मनेक मालिकेत पडद्यावर गोपी बहू म्हणून येत असते. जिया म्हणुन नव्हे. निखिल, हेमंत, खडस वा आसबे हे भुमिका करतात काय? ते अभिनय करतात काय? नसतील तर जे शहाणपण ते वाहिन्यांवर बोलताना सांगतात, ते प्रत्यक्ष स्वत:च्या आयुष्यात  तसेच जगून दाखवतील काय? अण्णांचा गांधीवाद तपासणारे, रामदेवाचे साधुत्व भिंगातून बघणारे, स्वत:च्या पावित्र्याला किती जपतात? की वाहिन्यांवर तेही गोपी बहू असतात आणि बाहेर पडल्यावर टपोरी असतात? ते बातम्या सांगताना पोटतिडकीने बोलल्याचा आव आणतात, तो खरेपणा व प्रामाणिकपणा असतो की अभिनय असतो? त्याचा वास्तवाशी काडीमात्र संबंध नसतो काय?

   आमचा गांधी अडगळीत पडून राहिला तरी चालेल, असे अण्णांना सुनावणारे डॉ. सप्तर्षी किंवा महात्मा शब्दावरून अण्णांना गांधींचे महात्म्य सांगणारे प्रताप आसबे कधीच "ओले" झालेले नाहीत काय? की त्यांचा गांधीवाद गोपी बहू सारखा फ़क्त कॅमेरा पुरता देखावा असतो? मुद्दा तोच आहे. जे वाहिन्यांवर बसून मोठी व्याख्याने देत असतात, ते प्रत्यक्षात बातम्यांच्या मालिकाच चालवत असतात. निदान त्यातले इंग्रजी वाहिन्यावाले पामाणिक म्हणायचे. कारण ते आपल्या बातमीपत्र वा चर्चेला "शो" म्हणतात. त्यात भाग घेतलेल्यांचे शेवट करतांना शोमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार मानतात. म्हणजे एकूण तो सगळा शो असतो. त्यात पोटतिडकीने बोलल्याचा वा राष्ट्रप्रेमाचा जो अभिनिवेश आणलेल असतो, तो फ़क्त अभिनय असतो. देखावा असतो. ज्यांना आपण वाहिन्यांवर असे कार्यक्रम सादर करताना बघतो, ते न लिहिलेले संवाद बोलत असतात. पण करत मात्र नाटक असतात. त्या कॅमेरा समोरून बाजूला होताच त्यांचे वागणे, जगणे किती उलट्या टोकाचे असते, त्याचे वर्णन अतुल कुलकर्णी या लोकमतच्याच एका ज्येष्ठ पत्रकाराने लिहून ठेवले आहे. जे आपण छोट्या पडद्यावर बघतो, ते किती दिखावूच नव्हे तर धडधडीत खोटे असते, त्याचे तपशील अतुलने २६ नोव्हेंबरच्या कसाब हल्ल्याच्या विषयावर लिहिलेल्या पुस्तकात आलेले आहेत. आपल्या अंगाला गोळी चाटून गेल्याचे नाटक करणार्‍या एका इंग्रजी हिंदी वाहिनीच्या वरिष्ठ पत्रकाराचे नावही अतुलने दिले आहे. तेवढेच नाही. तर आपला वैयक्तिक सुड घेण्यासाठी तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ताजमहाल भेटीचा कसा विपर्यास करण्यात आला, त्याचाही गौप्यस्फ़ोट त्यात आहे. वाहिन्यांवरची पत्रकारिता व बातमीदारी, म्हणजे कशी अर्धवट शिजलेली, अर्धवट जळलेली खिचडी असते, त्याची अप्रतिम पाकक्रिया अतुलने लिहून ठेव्ली आहे. त्यातून वाहिन्यांच्या पत्रकारीतेचा खरा चेहरा दिसू शकतो. पण त्याची कधी हेमंतभटजींना लाज वाटली नाही. लाज असेल तर निखिलच्या खोटेपणाबद्दल त्याच्याकडे राजिनामा मागितलेला नाही. मागणार तरी कसा? निखिलने कायबीइन लोकमत सोडला तर या भटजींना कर्मकांडासाठी होमहवनासाठी बोलावणार कोण?  

   ओस्कर वाईल्ड या महान इंग्रजी साहित्यिकाने अशा नाटक्या भटजींचे नेमके वर्णन करून ठेवले आहे. जे जाहिरपणे तुमच्याबद्द्दल वाट्टेल ते लिहितात आणि खाजगीत त्याबद्दल माफ़ी मागतात, त्यांना पत्रकार म्हणतात, असे वाईल्ड म्हणतो. निदान आजच्या मोठ्या वृत्तपत्रातले वा वाहिन्यावर दिसणारे संपादक, निवेदक वा ज्येष्ठ विश्लेषक तरी त्याच व्याख्येतले आहेत असे म्हणावे लागते. त्यांची लायकी साथीया मालिकेतल्या गोपी बहूपेक्षा जास्त नाही. छोट्या पडद्यावर पावित्र्य व संस्काराचा तमाशा करायचा आणि पाठीमागे हुक्का पार्लरमध्ये झुरके मारायचे. ते बोलतात, आवेशपुर्ण भाषा वापरतात वा तत्वाचे अवडंबर माजवतात, तो सगळा निव्वळ अभिनय असतो. तो सगळा थापेबाजीचा खेळ असतो. कोणी त्यावर पुढल्या काळात "बात बनाना बातिया" अशी थापेबाजीची मालिका बनवली तर नवल वाटण्याचे कारण नाही. (क्रमश:)
भाग  ( २३१ )   १०/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा