शनिवार, २१ एप्रिल, २०१२

म्हैस घ्यावी की सायकल घ्यायची?


   दोन मित्रांची गोष्ट आहे. त्यातल्या एकाने सायकल विकत घ्यायचे ठरवले होते. ही बाब दुसर्‍याला कळल्यावर त्याने पहिल्याला गाठले. विचारणा केली तर पहिल्यानेही सायकल घेणार असल्याचे कबूल केले. तर दुसरा म्हणाला सायकल कशाला घेतोस? त्यापेक्षा तु आपली म्हैस विकत घे. त्याच्या या सांगण्याने तो पहिला हैराण झाला. कशाला म्हैस घेऊ मी? मला कामावर जायला खुप चालावे लागते, तो त्रास वाचेल म्हणून सायकल घ्यायची आहे. थोडी दामटली की पोहोचलो आपला कामावर. पायपीट करण्याचा ताप नाही.

   पण दुसरा त्याचे ऐकून कुठे घेत होता? त्याचे आपले टुमणे चालूच. मित्रा तु म्हैस घेतली पाहिजेस. नाहीतर उगाच पस्तावशील. कशाला पस्तावणार? म्हैस मला घ्यायचीच नाही. कारण मला म्हशीचा काही उपयोगच नाही ना? असे कसे म्हणतोस, मित्रा? म्हैस असली तर तुला दुध काढता येईल. आयते दुध मिळेल ना घरातल्या घरात? शिवाय काही वेगळा खर्च नाही. अंगणात बांधली मग तिथले गवत खाऊन भागेल तिचे. दुसर्‍याचे आपले टुमणे सुरूच होते.

   मुद्दा असा, की मला कामावर जाण्यासाठी सोय हवी आहे. ती सोय म्हैस विकत घेऊन कशी होणार? म्हशीवर बसून कामावर जाता येईल काय? लोक हसतील मला. पहिल्याने आपला सायकल घेण्याचा हेतू अधिक स्पष्ट करण्यासाठी सांगण्याचा प्रयत्न केला. पण दुसरा कसला ऐकतो. तो "ठाम मत" वाहिनीवर अनुभव घेतलेला. तो आपली चुक कबूल थोडाच करील? त्यानेही चोख उत्तर दिले. वेड्या सायकलचे दुध काढायला गेलास, तर लोक हसणार नाहीत का? त्यापेक्षा तु आपली म्हैस खरेदी कर. आता पहिला वैतागला. कशाला हवी म्हैस? आणि मी सायकलचे तरी दूध कशाला काढेन? दुध हा विषयच कुठून येतो? मी सायकल घेतोय, कारण मला कामावर जाण्याची सुविधा मिळावी. दुध हा विषयच येत नाही. म्हणूनच म्हैस घेण्याचे काही कारणच नाही.

     मात्र तो दुसरा त्याची पाठ सोडायल तयार नव्हता. त्याचे टुमणे चालूच होते. म्हैस नाही तर दुध नाही. दुध नाही तर लोणी नाही. लोणी नाही तर तुप नाही. मग तू पोळी कोरडी खाणार का? वरणभातावर काय घेशील?

  आता मात्र पहिल्याचा कडेलोट झाला. काय तु म्हशीची गोष्ट घेऊन बसला आहेस? गरज काय त्याची? एवढीच हौस असेल तर तुच घे की म्हैस. मला कशाला आग्रह धरतोस? मला कामावर जाण्यासाठी सोय हवी आणि मी सायकलच घेणार. त्या संतप्त उदगाराचा दुसर्‍यावर काडीमात्र परिणाम झाला नाही. तो उत्तरला. तुझ नशीब. मी आपला धोका दाखवला. सायकल घेण्यातला. दुध काढता येणार नसेल तर माझं नुकसान होणार नाही. जे व्हायचं ते तुझंच नुकसान आहे. घे सायकल अणि बस मग कपाळाला हात लावून, दुध देत नाही म्हणून.

   आता त्यापुढे तो पहिला काय कपाळ आपटणार होता? त्याने त्या मित्राकडे पाठ फ़िरवली आणि पळ काढला. कारण त्या शहाण्याला समजावणे कोणाच्याही आवाक्यातली गोष्ट नव्हती. पळतापळता या पहिल्या मित्राला एक जुना परिचीत भेटला. त्याने पळण्याचे कारण विचारले. तर धापा टाकत त्याने हा सायकल म्हशीचा किस्सा त्याला कथन केला. तेव्हा त्या नवागताने त्याला धोका सांगितला. म्हणाला, यापुढे तो इसम दिसला मग रस्ता बदलून पळ काढ. गावातले  लोक त्याच्या तोंडाला लागत नाहीत. मागल्या दोन वर्षात तो कुठल्या टिव्ही चॅनेलवर बातम्या देण्याचे काम सोडुन गावात आल्यापासून असाच वागतो. असाच भलतेसलते बोलतो. त्याच्यापासून चार हात दुर रहाण्यातच शहाणपणा आहे. जास्त वेळ त्याच्या नादाला लागलास, तर म्हैस घेशील आणि तिच्यावर बसून कामावर निघालास तर लोक यमराज आला म्हणुन तुला बघून पळ काढतील. त्यापेक्षा यानंतर त्या माणसापासून दुर रहा म्हणजे झाले. वाचलास समज. अरे त्याच्या आणि चॅनेलवाल्यांच्या नादाला लागून अनेक राजकीय अक्ष बुडाले म्हणतात.

   यातला विनोद बाजूला ठेवला तर आजकालच्या वाहिन्यांवरच्या चर्चा व बातम्या नेमक्या अशाच असतात हे लक्षात येईल. जे त्या चर्चा घडवून आणतात व कुणाच्या मुलाखती घेतात, ते काय बोलत असतात; ते त्यांनाच ठाऊक असते का? अमुक एक गोष्ट व्हावी किंवा करावी असे त्यांचे आग्रह कशासाठी असतात? अण्णा हजारे यांनी अमुक करावे किंवा रामदेव वा भाजपा-सेनेने तमुक करावे, असे यांनी का सुचवावे? यांना कुणी असेच सल्ले दिले तर? म्हणजे उद्या लोकहितासाठी कायबीइन लोकमत वाहिनीवर बातम्या बंद करून, चित्रपट दाखवायचा आग्रह कोणी धरला तर? चालेल का? त्यातला आजचा सवाल कार्यक्रम बंद करून, त्याऐवजी डिस्कव्हरी वाहिनीवरचे छान शिकारीचे श्वापदांचे कार्यक्रम दाखवा म्हटले तर चालेल का? का नाही चालणार? ते म्हणतील आमची वाहिनी आहे. आम्हाला हवे तेच सांगू व दाखवू. मग तोच अधिकार व निवड अण्णा वा रामदेव यांना नाही का? त्यांनी आपल्या संघटना चळवळी सुरू केल्या, त्यामागे त्यांचे त्यांचे काही हेतू आहेत. जसे लोकमत वाहिनी सुरू करताना त्यात बातम्या दाखवायचे उद्दीष्ट बाळगण्यात आलेले आहे. तसेच कुठल्याही चळवळ, संघटनेच्या स्थापनेमागे आधीच हेतू ठरलेले असतात. त्याच हेतूने तिचा आरंभ झा्लेला असतो.

   तिस्ता सेटलवाड यांनी हिंदुत्वाचा प्रचार करावा असा आग्रह धरता येईल काय? मेधा पाटकर यांना कोणी नर्मदा किंवा सरदार सरोवर धरणाचे समर्थन करायला सांगितले तर चालेल का? आधी दिल्ली दंगलीतल्या हत्याकांडासाठी कॉग्रेस पक्षाचा निषेध करा, असे कधी निखिल वा अन्य कोणी मेधा पाटकर यांना सुचवले होते का? नसेल तर तोच आग्रह कारण नसताना गुजरातच्या दंगलीसाठी अण्णांकडे का धरला जातो? अशा आग्रहाचा अण्णांच्या चळवळीशी संबंधच काय? तर त्यांच्या मुळ हेतूला दिशाहीन करायचे असते. जसा त्या मित्राला सायकल आपल्या सोयीसाठी घ्यायची होती, तर हा शहाणा त्याला म्हैस घ्यायला सांगतो. तसा अण्णांकडे गुजरात दंगलीचा निषेध किंवा आरएसएसशी संबंध स्पष्ट करण्याचा आग्रह कशाला? त्याचा लोकपालशी संबंधच काय? मनसे हा पक्ष राज ठाकरे यांनी आपल्या काही ठराविक हेतूने स्थापन केला आहे. त्यांची काही उद्दीष्टे आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या भूमिका ठरवलेल्या आहेत. निखिल वा कुणा अन्य शहाण्यांच्या भूमिका, उद्दीष्टांसाठी राजने मनसे स्थापन केलेली नाही. तेव्हा तुमच्या हेतू उद्दीष्टांसाठी मनसेने आपल्या भूमिका बदलाव्या कशाला? तुमच्या वृत्तपत्रात काय छापावे वा वाहिनीवर काय दाखवावे, हे त्यांनी सांगितलेले चालत नाही ना? मग ज्यांच्या भूमिका योग्य वाटत नसतील त्यावर चर्चा करा, तो तुमचा अधिकार जरूर आहे. पण त्यांच्या भूमिका बदलण्याचा वा नव्या भूमिका सुचवण्याचा आगावूपणा कशाला?  

   तुम्हाला जे पटणार नाही, योग्य वाटणार नाही; त्यावर जरूर टिका करावी. पण मुर्खपणा दिसणार नाही याची तरी काळजी घ्यावी. नाही तर अंतर्यामी महाराज असल्याच्या थाटात बोलणार्‍या समर खडसचा पोपट होतो, तसेच इतरेजनांचेही होणार ना? एका कार्यक्रमात असाच काही मुर्खपणा समर बोलला आणि नामदेव ढसाळ यांनी तो मित्राचा मुलगा लहान आहे, तेव्हा त्याची बडबड आपण गंभीरपणे घेत नाही; असे लाईव्ह शोमध्येच सांगून टाकले. परवाही समरने असाच गंभीर चेहरा करून अत्यंत खुळचट विश्लेषण केले. भाजपाला कुठल्याही राज्यात स्वत:चा बेस (पाया) नाही. त्यांनी नेहमी अन्य कुठल्यातरी पक्षाशी मैत्री करून आपला विस्तार वा्ढवला, असे अत्यंत अडाणी विधान केले. महाराष्ट्रात शिवनेनेचा विस्तार होण्याआधी जनसंघ सेनेपेक्षा बलवान होता. आजही मनसेपेक्षा भाजपाचा अधिक मजबूत पाया आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल या राज्यात जनसंघ आधीपासून प्रमुख विरोधी पक्ष होता. १९६७ सालच्या निवडणूकीत जनसंघाचे समाजवाद्यांपेक्षा अधिक खासदार होते. पण दुर्दैवाने तेव्हा सम्रर खडसला राजकारण कशाशी खातात याचीच अक्कल नव्हती. किंबहूना खातात कुठल्या तोंडाने व ते बाहेर पडते त्याला तोंड म्हणतात, की दुसरेच काही; याचीही अक्कल आलेली नव्हती, तेव्हाचे हे पायाभूत राजकारण आहे. पण बेसलेस समाजवादी संस्कारातच शहाणपण आल्यावर, समर सायकल घेऊ बघणार्‍याला म्हैस घ्यायला शिकवणारच ना? ज्याला बेस म्हणजे बुड
तेच ठाउक नाही त्या बिनबुडाच्या माणसाला विश्लेषक ठरवून कॅमेरासमोर आणुन बसवले, मग त्या वाहिनीवर मर्कटलिला सुरू झाल्या तर नवल कुठले? आधीच आसबे तिथे असतात. त्यत पुन्हा समर खडस यांची भर पडली, मग बंदर कोण आणि मदारी कोण तेही ओळखता येत नाही.

   स्टार माझा वाहिनीचे घोषवाक्य असे का आहे, ते मला आता लक्षात आले. तिथे एक तर आसबे असणार. त्यांना त्या प्रखर प्रकाशझोतासमोर डोळे उघडे ठेवताना अतिशय कष्ट घ्यावे लागतात. त्यात पुन्हा समर खडस आणले, मग डोळे उघडे ठेवणे म्हणजे तपस्याच होऊन जाते. झापडलेल्या डोळ्यांच्या या खास पाहुण्यांनी डोळे सतत उघडे ठेवावेत, असे लाईव्ह प्रक्षेपणात पुन्हा पुन्हा सांगता येत नाही. कदाचित त्यासाठीच ते घोषवाक्य करून टाकले असावे. "उघडा डोळे बघा नीट". की प्रसन्नाने हे सतत आसबे सरांना सांगता सांगता, त्याचे घोषवाक्य होऊन गेले? त्यांच्या चर्चेतील सुर बघितला तर ते सायकल सोडून नेहमीच म्हैस घेण्याच्या आग्रहात दंग असतात.  (क्रमश:)
भाग     ( २४२ ) २१/४/१२

३ टिप्पण्या:

  1. लेखावर टिप्पणी करणे म्हणजे ' म्हॆस घ्यायला ' लावण्यासारखे आहे....:-)

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ, हा मूर्खपणा नक्कीच नाही, तर ही विचारपूर्वक केलेली चाल आहे. लोकपालाच्या मुद्द्याला बगल देण्यांसाठी अण्णांच्या आंदोलनात किती मुस्लिम आहेत असा सवाल केला होता आणि अण्णा देखील त्या चालीला बळी पडले आणि दुस-या दिवशी रामलीला मैदानावर काही मुस्लिम नमाज पडताना टीवी वरून दाखवले गेले. कोणताही सुधारणेचा मुद्दा आला की, धर्मनिरपेक्षता, मुस्लिम मागास, बहुजन सहभागाचा विषय काढायचा आणि मुळ मुद्दा गोंधळ घालून भरकटून द्यायचा. ही सवय फक्त माध्यमांनाच नाही तर स्वानुभवावरून सांगतो, शिक्षण क्षेत्रातील तथाकथित पुरोगामी विद्वानांना देखील लागली आहे. कोणत्याही प्रश्नावर फुले, शाहू, आंबेडकर घुसाडायचे, घटना धोक्यात अशी आरोळी ठोकायची आणि संशोधक म्हणून मिरवायचे. महाराष्ट्रात तर हे फारच चालले आहे. आपण कदाचित विद्यापीठ आणि महाविद्यालयातील इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मराठी या विषयावरील आयोजित केलेली तथाकथित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र अनुभवलिहि असतील. या सर्व ठिकाणी हाच भोंगळपणा चालतो आणि थोडेसे वेगळे मत मांडले की संघाचा हस्तक किंवा प्रतिगामी ठरविले जाते. हा एकप्रकारचा वैचारिक दहशतवादच आहे.

    उत्तर द्याहटवा