गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

नितीश राज ठाकरे यांचे भांडण लावलेच कोणी?


   गेल्या आठवड्यात जे बिहार स्थापना दिवसाचे नाटक मुंबईत व मराठी माध्यमात रंगले, त्याची खरेच काही गरज होती का? हा प्रश्न एवढ्यासाठीच विचारावा लागतो, की ते सगळे नाटक घडले की पद्धतशीर घडवून आणण्यात आले? कारण त्याची सुरूवात माध्यमात झाली व शेवटही माध्यमातूनच झाला. नुसते ढोल वाजवले गेले; बाकी काही घडलेच नाही. इकडून आवाज दिला गेला आणि तिकडूनही तेवढाच पडसाद उमटला. बाकी काहीच नाही. दोनतीन दिवस बिहारचे मुख्यमंत्री मुंबईत बिहारस्थापना दिवस साजरा करायला येणार आणि त्यात त्यांच्यासह मनासेला भाजपा एकत्र कसे बसवणार, अशी माध्यमात चर्चा होती. त्यामागे एक गृहित होते. लौकरच म्हणजे आणखी दोन वर्षानी येणार असलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपा उत्सूक आहे. त्याची सुरूवात नाशिक महापालिकेपासून झाली आहे. तेव्हा भविष्यातील एनडीएमध्ये मनसेला भाजपा कसा सामावून घेणार, असा प्रश्न माध्यमांनी उभा केला. तसे कधी भाजपाने बोलून दाखवलेले नाही, की मनसेने त्यासाठी कधी उत्सुकता दर्शवलेली नाही. म्हणजेच सगळा माध्यमांचा भ्रामक खेळ होता व आहे. फ़ार कशाला अशी चर्चा याआधी अनेकदा झालेली आहे. त्यातून सेना भाजपा यांच्यात भांडणे लावून झाली आहेत. पण त्या प्रत्येकवेळी मनसेने स्पष्टच शब्दात त्याला साफ़ नकार दिलेला आहे.

   मनसे भाजपा सोबत जाणार काय? भाजपा उत्सुक असला तरी शिवसेना मनसेला युतीमध्ये सामावून घ्यायला मान्यता देणार काय, अशा चर्चा सुरू झाल्या तेव्हा तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याचा साफ़ इन्कार केलेला आहे. कोण आम्हाला सोबत घेतो याची चर्चा करण्याआधी, आम्ही कोणासोबत जायला तयार आहोत काय हा प्रश्न आहे, असे राजनी अनेकदा स्पष्ट केले आहे. म्हणजेच त्यांनी अशा शक्यता वारंवार नाकारल्या आहेत. मग विधानसभा लोकसभा निवडणुकीत युतीला त्याचा फ़टका बसला तरी त्यांनी त्यात रस दाखवलेला नाही. मग मनसे एनडीए हे समिकरण आलएच कुठून? पुढे पालिका निवडणुकीत सेना मनसे एकत्र आणायचे प्रश्न विचारून, त्यांना एकत्र आणण्यासाठी जणू माध्यमांनी प्रयत्नच सुरू केले होते. पण त्यातही सगळीकडून नकारघंटाच वाजली. मग आता राज व नितीश यांना एकत्र आणायचा विषय आलाच कुठून? त्यासाठी भाजपाने प्रयत्न केल्याचा एकही पुरावा नाही. उलट नितीश मुंबईत एका कार्यक्रमासाठी येणार म्हटल्यावर हा वाद मुळात माध्यमांनी उकरून काढला. नितीश येणार म्हणजे बिहारी वर्चस्व दाखवायला येणार अशी अफ़वा कोणी उठवली? अनेकदा राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मुंबईतील आक्रमकतेबद्द्ल बोलत असतात. बिहारी छटपूजेला त्यांनी मुंबईत विरोध दर्शवला आहे. त्याचेच निमित्त करून मनसे बिहार स्थापना दिवस सोहळा हाणून पाडणार, असे माध्यमातून रंगवण्यात आले. त्यात कुठेही मनसेचा संबंध नव्हता. मग त्याच बातम्यांच्या आधारावर तिकडे बिहारमध्ये नितीशना खोचक प्रश्न विचारून डिवचण्यात आले. मनसेचा विरोध असताना मुंबईत जाणार का? त्यांनीही तेवढ्याच खोचकपणे त्यासाठी व्हिसा लागत नाही, असे उपरोधिक उत्तर दिले. मग ते उत्तर राज ठाकरे यांच्या समोर ठेवण्यात आले. जणू नितीशकुमारांनी मनसेला टोमणा मारलाय, अशा थाटातच सर्वकाही पेश करण्यात आले. अगदी स्पष्ट सांगायचे तर दोन नेत्यांमध्ये कुठलेही कारण नसताना कळलावेगिरी माध्यमांनी केली. जणु ठरवून त्यांच्यात भांडण लावण्यात आले.  

   मुळात मनसेचा कसलाच विरोध नसताना गैरसमज निर्माण करण्याचे कारण काय होते? तसे नितीशना सांगून त्यांची उपरोधिक प्रतिक्रिया मिळवण्याचा हेतू शुद्ध होता काय? सुरूवात भाजपा दोन परस्पर विरोधी भुमिकेच्या पक्षांना एनडीएमध्ये एकत्र कसे नांदवणार अशा गृहितापासून झाली. त्यात वास्तवाचा लवलेश नव्हता. एक निव्वळ अफ़वा पसरवून गैरसमज निर्माण करण्यात आले. मग हे दोन नेते कसे भांडतात ते दाखवण्याचा प्रयत्न झाला. मुंबईत विभिन्न भाषिक, विविध प्रांताचे लोक एकत्र नांदतात. त्यांच्यात अनेक मतभेद असू शकतात. त्यांच्यात सद्भावना कशी नांदेल, हे सर्वांनी बघितले पाहिजे. त्यांच्यात वाद भांडणे होत असतील, तर त्यात तेल न ओतता समेट कसा घडेल, याकडे लक्ष द्यायला हवे. पत्रकारांचे तेच काम नाही काय? गुजरातचे मुख्यमंत्री नरएंद्र मोदी यांच्यावर दंगलखोरीचा आरोप करणारे या विषयातून मुंबईत मराठी बिहारी दंगाल माजवू बघत नव्हते काय? दिसायला हे तमाम विघ्नसंतोषी पत्रकार व त्यांची माध्यमे, बिहारी व बिगर मराठी मुंबईकरांच्या घटनात्मक अधिकाराचे समर्थन करीत असल्याचे चित्र उभे करण्यात आलेले होते. पण त्यातून मुंबईत आग पेटली असती तर कोण होरपळणार होता? इथे पोट भरायला आलेला गरीब कष्टकरी बिहारीच मार खाणार होता ना? कशी गंमत आहे बघा. ज्यांच्या घटनात्मक अधिकारासाठी आपण लढत आहोत, असे हे पत्रकार वाहिन्या दाखवत होत्या, तेच पत्रकार प्रत्यक्षात त्याच मजूरी करणार्‍या मुंबईकर बिहारींच्या जीवाला धोका निर्माण करत होते. कसा भीषण विरोधाभास आहे ना? दिसते की बिहारींना न्याय द्यायला धावले आहेत, पण प्रत्यक्षात तेच मदतीला धावलेले बिहारींना खड्ड्यात घालत होते. कारण त्याज़ंच्याच चिथावणीने मनसेला हल्ले करायला आव्हान दिले जात होते.  

   एकूण वाहिन्यांवरच्या चर्चेचा सुर पाहिला तर काय होता? हिंमत असेल तर मनसेने बिहारी मुख्यमंत्र्याला रोखून दाखवावेच. तो कार्यक्रम रोखून दाखवावाच. ही चिथावणीच नव्हती काय? दुसरीकडे राज्यसरकारने त्यांचा बंदोबस्त करून दाखवावा, असेही सुचवले जात होते. तिसरीकडे बिहारी दिवस आयोजकांनाही चिथावणीखोर आवाहने केली जात होती. एकूण माध्यमांची भुमिका काय होती या बाबतीत? समाजाच्या विविध घटकात सौहार्द रहावे निर्माण व्हावे अशी होती, की त्यांच्यात हा्णामारीचा प्रसंग यावा अशी माध्यमांचे प्रयत्न चालू होते? माध्यमे किंवा लोकशाहीतला चौथा खांब यासाठी असतो का? खळबळजनक बातम्या देणे गैर नाही. पण खळबळ माजवण्यासाठी विभिन्न समाजघटकात आग लावण्याचे काम लोकशाहीला पुरक असते, की मारक असते? राज ठाकरे यांनी कुणाही भारतीयाला मुंबईत येण्यापासून रोखणे घटनाबाह्य असेल. त्यासाठी आक्रमक हल्लेखोर पवित्रा घेणे गैर व आक्षेपार्ह जरूर आहे. पण अशी परिस्थिती निर्माण झाल्यास, त्या आगीत तेल ओतण्याचे काम हे  पत्रकारितेचे पवित्र कर्तव्य आहे काय? की अशी शत्रूत्वाची भावना वाढीस लागत असेल, तर त्यात सामंजस्य निर्माण करायला हातभार लावणे, हे पत्रकारितेचे कर्तव्य असते? मागल्या आठवड्यात बुधवार गुरूवारी माध्यमे व वाहिन्यांवर जे चालले होते, तो निव्वळ आगलावेपणा नव्हता काय? एका बाजूला मनसेच्या नेत्यांना चिथावले जात होते, तर दुसरीकडे बिहारी भावनांना आव्हान देण्याचाही उद्योग चालला होता. जेणेकरून त्यांच्यात हाणामारी व्हावी, असाच माध्यमांचा प्रयास नव्हता काय?    

   मात्र तो यशस्वी झाला नाही. कारण त्यात मनसेने उडी घेण्यास नकार दिला. तर बिहार दिवसाचे आयोजकही त्याला बळी पडायला तयार झाले नाहीत. त्यांनी शहाणपणा दाखवून एकमेकांशी संवाद साधला व माध्यमांनी निर्माण केलेले गैरसमज दुर केले. माध्यमांनी लावलेली आग विझवली. खरे तर बिहार दिवसाचे मुंबईतील आयोजक देवेश ठाकूर यांनी तसे पहिल्याच दिवशी एका वाहिनीवर बोलूनही दाखवले होते. या सोहळ्यात कुठलेही राजकारण नाही. कदाचित मनसेचे गैरसमज असतील तर आम्ही दुर करू, असे त्यांनी स्पष्टच सांगितले होते. त्याच स्टारमाझा कार्यक्रमात मनसेचे विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी स्वत: फ़ोन करून भाग घेतला आणि नितीश यांच्या कार्याचे कौतुक करीत, हा गैरसमज असेल तर तो त्यांनीच दुर करावा, असेही स्पष्ट केले होते. मग दुसर्‍याच दिवशी तशा हालचाली झाल्या आणि राज व नितीश यांच्यात कोणीतरी संवाद घडवून आणला. कदाचित भाजपा व देवेश ठाकूर यांनी ते काम केले असेल. त्यातून माध्यमानी निर्मा्ण केलेले गैरसमज दुर झाले आणि बिहार स्थापनादिवस मुंबईत साजरा होण्याचा मार्ग शुक्रवारीच मोकळा झाला. खरे तर या समजुतदारपणाचे माध्यमांनी कौतुक करायला हवे होते. पण झाले उलटेच. आपण लावलेली आग विझलेली पाहून माध्यमातल्या दिवाळखोरांचा पुरता भ्रमनिरास झाला. मग त्यांनी हा सगळा संगनमताचा म्हणजे मॅचफ़िक्सींगचा मामला असल्याचा महान शोध लावला. मॅच होती कुठे? ठेवली कोणी? दोघात भांडण लावले कोणी? शुक्रवारी वाद संपल्यावर सर्वच मराठी वाहिन्यांवरची चर्चा काय होती? सुर काय होता? मनसे व बिहार सोहळा आयोजक यांच्यातल्या मिटलेल्या भांडणाबद्दल दु:खच त्यात दिसत होते ना? मग याला चौथा खांब म्हणायचे की देशात फ़ुट पाडणारा, दुही माजवणारा पंचमस्तंभ म्हणायचे?  (क्रमश:)
भाग    ( २४० ) १९/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा