गुरुवार, १२ एप्रिल, २०१२

यांच्यापेक्षा माफ़ियासुद्धा प्रामाणिक म्हणावे लागतील


   मुंबईतले गॅंगवॉर आता खुप जुने झाले आहे. लोकांच्या अंगवळणी पडले आहे. त्यातली नावेसुद्धा आता लोकांना तोंडपाठ झालेली आहेत. मग छोटा शकील म्हटले की दाऊदचा कराचीत लपलेला बगलबच्चा, तर छोटा राजन म्हणजे दाऊदवर मुंबईतील बॉम्बस्फ़ोटानंतर उलटलेला सहकारी हे लोक जाणतात. अशा माफ़ीयांची एक खास गुन्हेगारी नितीमत्ता असते. ते एकमेकांची हिशोब अगदी मुडदे पाडून चुकते करत असतात. पण ते कधीही पोलिस वा कायद्याची मदत घेत नाहीत. दाऊदने राजन वा गवळीच्या कुणाचा मुडदा पाडला म्हणून ते पोलिसात तक्रार करायला जात नाहीत. आपला सुड आपणच घेत असतात. एकमेकांची अनेक पापे ठाऊक असूनही शत्रूत्वासाठी एकमेकांच्या विरोधात चव्हाट्य़ावर येत नाहीत. दुसरीकडे त्यातल्या कुणाच्या बाबतीत खोट्या वावड्य़ा उठल्या, तर मात्र ते वाहिन्या किंवा पत्रकारांना फ़ोन करून आपली सफ़ाई अगत्याने देत असतात. मला त्यांचा हा प्रामाणिकपणा खुप आवडतो. ते आपल्या पापावर पांघरूण घालायला फ़ोन करत नाहीत. आपण शुद्ध चारित्र्याचे निर्दोष असल्याचाही दावा करत नाहीत. फ़क्त त्यांच्याविषयी जी बातमी आली आहे व त्यात त्यांचा संबंध नसेल, तर तेवढाच खुलासा करतात. पण निदान दुसर्‍याचा गुन्हा आपल्या नावावर लागू नये, एवढी तरी काळजी घेतात. साक्षात गुन्हेगार असूनही आपले चरित्र जपणारे ते माफ़ीया व आमचे वागळे, हेमंतभटजी, सप्तर्षी वा केतकर कुठे? यांच्यावर खोटेपणाचे जाहीर आरोप होत असतानाही, त्यांना खुलासे करायची हिंमत होत नाही. आपल्यावरचे आरोप साफ़ करण्याची इच्छा होत नाही. मग यांचे चारित्र्य त्या माफ़ियांपेक्षा शुद्ध आहे काय? की त्यांच्यापेक्षाही हे विद्वान पत्रकार अधिक चारित्र्यहीन आहेत म्हणायचे?    

   मागे एकदा मी अमेरिकन माफ़ियांच्या नितीमत्तेबद्दल लिहिले होते. इटालीमधून अमेरिकेत माफ़िया पोहोचले ते तिथली गुन्हेगारी नैतिकता घेऊनच. त्या नितिमत्तेनुसार एकमेकांशी लढायचे, पण एकमेकांच्या पापाबद्दल जाहिर बोलायचे नाही, अशी ती नितीमत्ता असते. तिला माफ़िया जगात ओमेर्टा म्हणतात. ती नितीमत्ता झुगारणार्‍याला माफ़िया सर्वांचा एकत्रित शत्रू मानतात. हल्ली मराठी पत्रकारांमधे तीच ओमेर्टा नितीमत्ता आली आहे, काय अशी मला शंका येते. कारण मराठी पत्रकार, संपादक तसेच एकमेकांच्या पापाकडे काणाडोळा करताना दिसतात. तेवढेच नाही तर अगदी माफ़ियांच्या थाटात प्रतिकाराचा आवेशसुद्धा दाखवतात. एक अमेरिकन माफ़िया न्युयॉर्कच्या टोळीचा बॉस होता. त्याने तर माफ़िया अशी काही भानगडच नाही. त्या शब्दाचा वापर करून अमेरिकेत वसलेल्या इटालियन नागरिकांची अवहेलना केली जाते, असा कांगावा सुरू केला होता. त्यासाठी इटालियन अमेरिकन संघ स्थापन करून त्या्ने मेळावेसुद्धा भरवले होते. त्या मेळाव्याच्या दडपणामुळे अखेर एफ़बीआय व पोलिसांनी माफ़िया शब्द आपल्या शब्दकोषातून काढून टाकला होता. म्हणून सत्य चव्हाट्यावर यायचे थांबले नाही. त्याच संघटनेच्या पहिल्या वर्धापनदिनी न्युयॉर्क येथे आयोजित केलेल्या जाहिर कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच त्या बॉसचा मुडदा पडला गेला होता. सत्य असे भीषण असते. आम्ही ते कितीही लपवले वा झाकून ठेवले, म्हणुन बाहेर यायचे थांबवता येत नसते.  

   मध्यंतरी मुंबईत महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राच्या कचेरीवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. त्याचे कारण सेनेचे एक खासदार आनंदराव अडसूळ राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याची बातमी, त्या वृत्तपत्राने छापली होती. ती तद्दन खोटी होती. त्याबद्दल माफ़ी मागणे दुर राहिले. त्याबद्दल मटाला पत्रकार संघटनांनी कानपिचक्या द्यायला हव्या होत्या. त्याऐवजी मोर्चा घेऊन पत्रकार मुख्यमंत्र्यांना भेटले व संरक्षणाची मागणी करण्यात आली. कशासाठी संरक्षण? खोटेपणा करण्यासाठी? त्याच्याही आधी ज्योतिर्मय डे नावाच्या पत्रकाराची दिवसाढवळ्या मुंबईत हत्या झाली. तेव्हाही अशीच मागणी करण्यात आली होती. पण डे प्रकरणात काय चव्हाट्यावर आले? तो खुन कोणा गुंडाने केला नाही, कुणा राजकारण्याने त्याची सुपारी दिलेली नाही. त्यात खुन्याचा साथीदार म्हणून पकडली गेली ती एक महिला पत्रकार. मग संरक्षण कोणापासून हवे आहे पत्रकारांना? त्यांच्यातल्या हेव्यादाव्यातून जे धोके त्यांना निर्माण झाले आहेत, त्यात सरकार वा कायदा संरक्षण कसे देणार? आणि ज्योतिर्मय हत्या कशामुळे झाली? तो शकीलसाठी काम करतो असा छोटा राजनला संशय होता. तर तशी माहिती त्याला देणारी सुद्धा पत्रकार महिलाच आहे. जिग्ना शहा आता गजाआड जाऊन पडली आहे. तिच्यावर कसला आरोप आहे? तर डे याची हत्या करण्यासाठी तिने छोटा राजन टोळीला मदत केल्याचा आरोप आहे. यातला तपशील अजून बाहेर यायचा आहे. पण मुद्दा इतकाच, की डे याच्यासाठी रस्त्यावर आलेल्या किती पत्रकारांनी जिग्ना या पत्रकाराच्या पापकर्माबद्दल निषेधाचा सुर लावला आहे? का नाही लावला? आजही मोठ्या व मान्यवर पत्रात काम करणारे पत्रकार, प्रत्यक्षात गुन्हेगारी स्वरूपाच्या उचापती करत असतात, त्याचा निषेध ज्यांना करता येत नाही, त्यांना पत्रकारितेचे पावित्र्य सांगायचा अधिकार उरतो काय? नसेल तर सगळा मामलाच संशयास्प्पद होऊन जातो ना?  

   अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल किंवा किरण बेदी यांनी कुठले आरोप वा विधान केल्यावर त्यांची भिंग घेऊन तपासणी करणारे पत्रकार, स्वत:च्या सहकार्‍यांचे व्यवहार व वागणे का तपासून बघत नाहीत? की पत्रकारांना मनमानी करण्याची मुभा कायद्याने व अविष्कार स्वातंत्र्याने दिलेली आहे? कायद्याचे संरक्षण मागणार्‍याने मुळात कायद्याचा आदर करायला शिकले पाहिजे. जेव्हा तोच कायदा बेछूटपणे मोडतो, तेव्हा त्याला कायद्याचे संरक्षण मागायचा नैतिक अधिकार उरत नाही. सर्वसामान्य नागरिकाला उपलब्ध आहेत तेच अधिकार त्याला मिळू शकतात. आणि असे संरक्षण कायदा सर्वांनाच देत असतो. अगदी कायदा झुगारणार्‍या व धाब्यावर बसवणार्‍या दहशतवादी अजमल कसाबलाही भारतीय कायदा तेवढे संरक्षण देतोच की. कराचीहून मुंबईत बेकायदा घुसून बेधूंद गोळीबार करणारा कसाब व बेताल बातमी देऊन दिशाभूल करणारा महाराष्ट्र टईम्स, यात फ़रक तो काय? केजरीवाल यांनी संसदसदस्यांवर गुन्हेगारीचे आरोप केल्यावर जे पुरावे मागायला घसा कोरडा करतात, त्यांनी खासदार अडसुळ प्रकरणात महाराष्ट्र टाईम्सकडे पुरावे मागितले होते काय? की बेछूट व बेताल आरोप करण्याचा अधिकार पत्रकारांना अविष्कार स्वातंत्र्य म्हणुन मिळतो, पण केजरीवाल यांना पत्रकार नसल्याने तो नसतो म्हणायचे आहे? की केजरीवाल बोलले, मग संसदेचे व तिथल्या सदस्यांचे पावित्र्य मोठे असते आणि मटासारख्या वृत्तपत्राने त्यापैकीच एकाची निंदानालस्ती केली तर तेच पावित्र्य कवडीमोलाचे असते? निकष व नियम तरी काय आहेत? ते माणुस व पेशानुसार बदलत असतात काय?  

   हा सर्व बुद्धीभेद असतो. आपण केले मग ते पवित्र धर्मकार्य असते आणि तेच कृत्य इतर कोणी केले मग घोर पाप असते, अशी ही बनवेगिरी नाही काय? त्याचा जाब कोणी विचारायचा? की आजची पत्रकारिता व्यवहारात माफ़ियागिरी झाली आहे? आम्ही वाटेल ते करू आम्हाला कोणी जाब विचारायचा नाही; अशी भूमिका आहे? नसेल तर ज्योतिर्मय डे याच्यावर छोटा शकीलशी संबंध असल्याची जी वदंता आहे, त्याबद्दल पत्रकारात मौन कशाला? त्याच्या हत्याप्रकरणी जिग्ना शहा नावाची जी पत्रकार आरोपी संशयित म्हणून पकडली गेली, त्याबद्दल निषेधाचा सुर का उमटलेला नाही? भाजपा, कॉग्रेस असे पक्ष निदान आपल्या पापावर पांघरूण घालत असले तरी एकमेकांची पापे उघडी होताना गप्प बसत नाहीत. त्यात दुसर्‍याचे वाभाडे काढायला तरी पुढे येतात. अण्णांशी सहमती नसलेल्या स्वयंसेवी संस्था संघटना अण्णांच्या चुका सांगायला पुढे सरसावतात तरी. पण पत्रकारी विश्वाचे काय? त्यात एकमेकांच्या पापाबद्दल माफ़ियांसारखे मौनव्रत धारण केले जाते, ते सभ्यपणाचे लक्षण आहे काय? त्यामुळेच मग त्यात एखादा कपिल पाटिल सारखा माफ़ीचा साक्षिदार पुढे आल्याशिवाय यांच्या पापाचा घडा फ़ुटत नाही. हा बुद्धीवाद राहिला नसून निव्वळ ढोंगबाजी झाली आहे. त्याच्याही पुढे जाऊन त्याला माफ़ियागिरी म्हणावे, अशी वेळ येत चालली आहे. आज राजकीय कार्यकर्ते व कुणी ठेकेदार बिल्डर  मारहाण करत असतील. उद्या हे फ़ार झाले तर लोकच रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या या ढोंगबजीचा बंदोबस्त करू लागतील. मग तोंड लपवायलाही जागा शिल्लक उरणार नाही. (क्रमश:)
 भाग  ( २३३ )  ११/४/१२

1 टिप्पणी:

  1. आमच्या कडे भीमा नदीतून वाळू उपसा चालतो त्यामुळे हे बेटे पत्रकार मजेत आहेत . आंदोलने वगैरे करण्याच्या भानगडीत पडायला वेळच नसतो . कारण ट्रक मोजायचे असतात . अगदी हिशोबानी कारभार चालतो .

    उत्तर द्याहटवा