रविवार, ८ एप्रिल, २०१२

हेमंतभटजींच्या गुणगौरवातला एक कौरव


   मी समाजवाद्यांवर टिका करतो म्हणत ठोकपाल हेमंतभटजींनी गळा काढला आहे. मी चिखलफ़ेक करतो असाही त्यांचा आक्षेप आहे. ते स्वत:च्या चारित्र्यावर खंडणीखोर निपाणीकराने पाडलेले डाग पुसून वा धुवून काढू शकलेले नाहीत. म्हणुनच त्यांनी कारण नसताना माजी केंद्रिय अर्थमंत्री व रेल्वेमंत्री मधू दंडवते यांना आणले आहे. जणू दंडवते यांचे गुण वा चारित्र्य त्यांनी मृत्यूपत्र लिहून हेमंतभटजींना वारशात दिले असावे, अशा थाटात त्यांचा उल्लेख हेमंतभटजी करतात. त्यातून आजचे सर्वच समाजवादी मुखवटा लावणारे यांच्यासारखे भंपक चारित्र्यसंपन्न होते वा आहेत, असे भासवण्याचा त्यांचा लबाड प्रयास आहे. तसे असेल तर कुठल्याही साधूपुरूषाचे सर्वच अनुयायी पवित्र ठरू शकतात. दुसरीकडे मधूनाना दंडवते यांचे काही दुर्गुण असल्यास दाखवून द्यावे असे ते आव्हान सुद्धा असू शकते. मला अशी आव्हाने आवडतात. मी हेमंतभटजी यांच्याप्रमाणे मधूनाना वा ईमेलच्या मागे लपून बसणार्‍यातला नाही. म्हणूनच त्यांचे आव्हान मला मान्य आहे. त्यांना हौसच असेल तर त्यांनी मला खुले आव्हान द्यावे, मग त्यांना अंधभक्तीमुळे मधूनानांचे न दिसलेले काही "दुरदुरचे गुण" मी मुद्दाम भिंग आणून दाखवीन. कारण कोणीही मोठा माणूस असतो, त्याचा आदर करण्यात मला कमीपणा वाटत नाही. पण त्याच वेळी हेमंतभटजी वा तत्सम सेक्युलर समाजवाद्यांप्रमाणे, मला अशा मोठ्या माणसाविषयी अंधभक्ती करणे शक्य झालेले नाही. कारण त्यांच्यासारखा मी वैज्ञानिक अंधश्रद्ध नाही. माणुस लहान असो की मोठा, त्याच्याही हातून वा वागण्यातून चुका होऊ शकतात. मग तो भाऊ तोरसेकर असो, हेमंतभटजी असो, की मधूनाना दंडवते असोत. मधूनाना किंवा एस. एम. जोशी हे मोठे होते, कारण ते आपल्या चुका कबूल करून त्यात सुधारणा करण्याइतके प्रामाणिक होते. ज्या गुणाचा लवलेश हेमंतभटजी वा त्यांच्यासारख्या आधुनिक तोतया सेक्युलर समाजवाद्यांमध्ये आढळत नाही. तेव्हा गुणगौरव करायचा तर बाकीच्या गुणांपेक्षा त्यांच्या प्रामाणिकपणाचा करायला हवा. हेमंतभटजींनी जरा त्यातला एक टक्का स्वत:च्या जीवनात अनुसरून दाखवावा.  

   1978 सालात पुलोद सरकारने मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव विधीमंडळात संमत करून घेतला, तेव्हा त्याला कडाडून विरोध करणारे कोण होते? कोणी शिवसैनिक नव्हते, की ठाकरे नव्हते. स्वत:ला समाजवादी व गांधीवादी म्हणवून घेणारे अनंतराव भालेराव व गोविंदभाई श्रॉफ़ हेच होते. त्यातून दंगल उसळली व दलितांची ससेहोलपट झाली, त्याची आठवण हेमंतभटजींना आहे काय? तेव्हा यांच्यातले किती समाजवादी तिथल्या दंगलखोरांना सामोरे गेले होते? एकच मोठा हिंमतीचा माणुस तेवढे साहस करू शकला. कुठलेही पोलिस संरक्षण न मागता एस. एम. जोशी तिकडे गेले होते. नुसते गेले नाहीत तर संतप्त जमावाला सामोरे गेले होते ते एसेम उर्फ़ अण्णा. त्यांच्या गळ्यात त्या संतप्त जमावाने चपलांच्या माळा घातल्या होत्या. तेव्हा हेमंतभटजींचे बाकीचे चारित्र्यसंपन्न समाजवादी कुठे होते? आज जेव्हा केव्हा त्या नामांतराचा विषय निघतो तेव्हा हेमंतभटजीसारखे लोक अगत्याने शिवसेनेवर नामांतराचे विरोधक म्हणुन दोषारोप करू लागतात. त्यांना कधी तरी त्यातले इतिहासपुरूष अनंतराव भालेराव किंवा गोविंदभाई श्रॉफ़ आठवतात का? याला आजच्या भटजी समाजवाद्यांचे चारित्र्य म्हणतात. त्यांना 1977 चे मधूनाना आठवतात, पण त्याच दरम्यानचे 1978चे भालेराव आठवत नाहीत. आठवत सुद्धा असतील, पण सांगायचे नसतात. त्यालाच मी लबाडी म्हणतो. जेव्हा आपल्याच समाजवाद्याने आग लावली, तेव्हा ते होमहवन असते आणि तशीच आग मोदी वा कुणा शिवसैनिकाने लावली, मग ती जाळपोळ असते. त्यावर पांघरूण घालायचे. तिकडे कुणाचे लक्ष जाऊ नये, यासाठी जीवाचा आटापिटा करायचा.

   याचा अर्थ मला भालेरावांना गुन्हेगार ठरवायचे नाही. त्यांचे काही मुद्दे होते आणि त्यांनी अगदी एसेमना सुद्धा त्यावेळी दाद दिली नाही. एसेमही तेवढेच प्रामाणिक; त्यांनी भालेराव किंवा गोविंदभाई यांच्यावर दोषारोप केले नाहीत. त्यांचा राग क्षोभ अंगावर झेलला. लोक दगड मारतील, हल्ला करतील म्हणुन एसेमनी संरक्षण मागितले नाही. ते लोकांच्या प्रक्षोभाला सामोरे गेले. त्याला गुणवत्ता म्हणतात. त्याचा लवलेश या आजकालच्या भोंदू समाजवाद्यांमध्ये आढळून येतो काय? मग हे आपला नाकर्तेपणा व पापे लपवण्यासाठी एसेम वा मधुनाना यांच्या पाठीशी जाऊन दडी मारतात. त्यांचे गुणगान करत आपल्या पापाचरणावरचे लोकांचे लक्ष उडवण्याची बौद्धिक मर्कटलिला करतात. त्या प्रामाणिक लोकांच्या पुण्याईवर आपली पापे खपवू बघतात. भोंदुगिरी यापेक्षा कुठे वेगळी असते? आपले पाप लपवण्यासाठी जागृत देवस्थानचे भोंदू पोटभरू भटजी असेच चमत्कार सांगून जगत असतात ना? सध्या शिर्डी संस्थानचे प्रकरण कोर्टात आहे. ते कोणाच्या पुण्याईवर साईभक्तांची लुबाडणूक करत असतात? भक्तांसमोर साईमहात्म्य सांगणारे आणि इथे मधूनाना महात्म्य सांगणारे हेमंतभटजी, यातला नेमका फ़रक तो काय? ते साईंच्या नावावर आपला गोरखधंदा चालवत असतात तर हे मधूनाना वा एसेमच्या पुण्याईवर आपला माल खपवायची कसरत करतात. मी त्यांना त्यांच्या स्वत:च्या चारित्र्याबद्दल सवाल केला आहे. आजच्या समाजवाद्यांच्या गुणवत्ता व कर्तृत्वाबद्दल प्रश्न विचारले आहेत. ते सोडून मधूनाना कशाला मध्ये आणायचे? आणि हेमंतभटजींना मधूनाना तरी किती माहित आहेत?

   आज समाजवादी म्हणुन हेमंतसारखे नवे मुंज झालेले भटजी ज्या शिवसेनेचा अतीव द्वेष करतात, त्यांच्याशी पहिली राजकीय हातमिळवणी कोणी केली होती? सेनेला सर्वप्रथम राजकीय प्रतिष्ठा कोणी बहाल केली, त्याचा सातबारा हेमंतभटजींकडे आहे काय? 1966 साली मुंबईत स्थापन झालेल्या शिवसेनेवर कॉग्रेसची बटिक असा तमाम पुरोगामी आरोप करत होते. त्या शिवसेनेने 1967 सालात प्रथमच निवडणुका लढवल्या त्या ठाणे नगरपालिकेच्या. त्यात त्यांच्याशी तेव्हाचा भाजपा म्हणजे जनसंघाने युती केली नव्हती. ती युती प्रजा समाजवादी पक्षाने केली होती. मग त्यात यश मिळवल्यावर काही महिन्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणूका आल्या. त्यातही तिच युती कायम राहिली. त्या युतीचे शिल्पकार कोण होते? एकटे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नव्हे, तर हेमंतभटजींचे गुणवंत समाजवादी नेते मधूनाना दंडवते सुद्धा तिचे शिल्पकार होते. त्याच शिवसेनेच्या पाठींब्यावर तेव्हा प्रमिला दंडवते पालिकेत नगरसेविका म्हणुन निवडून आल्या होत्या. तेवढ्याच नाही. पुढे पुलोदचे शिक्षणमंत्री झालेले सेवादल सैनिक प्राध्यापक सदानंद उर्फ़ अनु वर्देसुद्धा शिवसेनेच्याच पाठींब्याने तेव्हा निवडून आले होते. शिवसेनेशी पहिला राजकीय घरोबा करण्याचे श्रेय त्याच मधूनाना दंडवते यांचे आहे.  

   या पुराणकथेचा इथे संबंध काय? हेमंतभटजी ज्या मधूनाना दंडवते यांचे चारित्र्य व गुण सांगत आहेत, त्यांचा हासुद्धा एक गुण आहे. त्यांनीच शिवसेनेला राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली. तेव्हाही बाळासाहेब ठाकरे मातोश्रीमध्येच वास्तव्याला होते. आज शिवसेनेची एखादी चांगली गोष्ट बघून सांगितली तर ते मातोश्रीवर पाणी भरणे असे हेमंतभटजींना वाटत असेल तर त्यांचे पुजनिय मधूनाना दंडवते मातोश्रीवरचे पाणकेच ठरतात ना? मग त्या गुणाचे कौतुक हेमंतभटजींनी का करू नये? शिवसेनेचा इतका तिटकाराच असेल तर त्यांनी खरे म्हणजे मधूनानांना लाखोली वहायला हवी. कारण तेव्हा नवख्या शिवसेनेला राजकारणात पावले टाकायला मधूनानांनी मदत केली होती. शिवसेना इतकीच घाण आहे, असा हेमंतभटाचा दावा असेल तर ती घाण सर्वात आधी जवळ घेणार्‍याला गुणी व चारित्र्यसंपन्न कसे म्हणता येईल? आणि हेच हेमंतभटजी म्हणतात त्याप्रमाणे मधूनाना हे खरेच गुणवान व गुणग्राहक असतील तर त्यांनी सर्वात आधी सेनेला जवळ घेऊन तिच्या गुणवत्तेचेच प्रमाणपत्र दिले होते म्हणावे लागेल. ती त्यांची निवड योग्य असेल तर हेमंतभटजी सेनेच्या नावाने शिव्याशाप का देत असतात? ती निवड चुकीची असेल तर मधूनाना हा तद्दन मुर्ख माणुस म्हणायला हवा, त्याला हेमंतभटजी गुणवान कशाला म्हणतात? किंवा सेनेसारख्या उपद्व्यापी संघटनेला आरंभीच्या काळात प्रोत्साहन देण्याचे पाप केले म्हणून या भटजींनी मधूनानांचा उद्धार करायला हवा ना? अर्थात तसे होणार नाही. कारण या हेमंतभटजींना मधूनानासुद्धा धडपणे ठाऊक नाहीत. वेदशास्त्रसंपन्न महामहोपाध्याय असल्याचा आव आणायचा आणि मम म्हणा, पाणी सोडा, आचमन करा, असली भिक्षुकी करण्यापलिकडे यांची लायकी नाही. मग ते उगाच एसेम, मधु दंडवते, नानासाहेब गोरे यांचे हवाले देत बसणार. ज्यांच्या आडात नाही ते पोहर्‍यात येणार कसे?  म्हणुनच मी त्यांना निर्बुद्ध, व खोटारडे म्हणतो. धड खोटेही बोलता येत नसेल मग अधिकच केविलवाणी स्थिती होते ना? पांडव असल्याचा आव आणताना त्यांचा कौरव उघडा पडतो.  (क्रमश:)
भाग  ( २२९ )     ८/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा