बुधवार, ४ एप्रिल, २०१२

आपला तो मुन्ना आणि दुसर्‍याचा तो अण्णा?


’अण्णा हजारे यांचा ‘अण्णावाद’ नाविन्यपूर्ण आहे असे कुणी म्हटले तर ते आम्ही मान्य करू. तथापि अण्णा ते ‘प्रतिगांधी’ आहेत असे कुणी म्हटले तर आम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर वा फोटोसमोर जातो आणि म्हणतो की, ‘‘बापूजी क्षमा करा. स्वतःला ‘प्रतिगांधी’ म्हणविणारा एक माणूस तुमच्या विचारसरणीचे थिल्लरीकरण करीत आहे... आणि तो थोर माणूस माझा मित्र आहे. म्हणून बापूजी, मला क्षमा करा! मी अत्यंत प्रामाणिकपणाने माझ्या या मित्राला जाहीरपणे विनंती करणार आहे.’’ मी त्याला म्हणेन की, ‘बाबा रे, कृपया गांधींच्या विचारसरणीत दुरूस्त्या करू नकोस. गांधींच्या विचारांना तसेच अडगळीत पडू दे. तू तुझ्या विचारांचा झेंडा फडकवित सिकंदर दि ग्रेट बन. आमची हरकत नाही. पण गांधीवादात दुरूस्त्या करून गांधींचे विचार मानणार्‍या लोकांच्या जीवनाची बैठक मोडून टाकू नकोस’.’

   हा आणखी एक सप्तर्षी यांच्या लेखातला परिच्छेद. कोणाला वाटेल हा नितांत गांधीवादी महात्म्याच्या विचारांचे विडंबन बघून कमालीचा विचलीत झाला आहे. मग ते शब्द वाचणार्‍याला अण्णांचा राग येऊ शकतो. कुणाला सप्तर्षींबद्दल सहानुभूती वाटू शकते. कुणाला असेही वाटेल, की हा माणुस बहूधा रोज सकाळी उठून चरखा फ़िरवत असेल, शेळीचे दुध पिवून जगत असेल. किंबहूना असेच काही लोकांना वाटावे, अशी सप्तर्षी यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी हे शब्द मोठ्या हिशोबीपणे इथे लिहिले व योजले आहेत. हे अशा भोंदू गांधीवाद्यांचे खास वैशिष्ट्य असते. कायबीइन लोकमतचा संपादक होऊन दर्डावादी होण्याआधी निखिल वागळेसुद्धा गांधीवादी होते. त्यातूनच त्यांनी निर्भय बनो आंदोलन चालविले होते. त्यासाठी त्यांना अहोरात्र पोलिस संरक्षण घ्यावे लागत होते. अखंड पोलिस संरक्षणात माणसाला निर्भय बनवणारा हा गांधी कोण होता, ते मी कित्येक वर्षे शोधतो आहे. जिवाच्या भयाने पत्रकारांना खास संरक्षण देणारा कायदा हवा, म्हणुन आवाज उठवणार्‍यांना भेदरलेले भित्रे म्हणतात, की निर्भय म्हणतात? आहे ना गंमत? ज्यांच्या भाषेत भित्रेपणाला निर्भयता म्हणतात, त्यांची भाषा आपल्याला कशी कळावी? मग त्यांचा गांधी व आपला गांधीसुद्धा वेगळाच असणार ना? सप्तर्षीसुद्धा त्याच गोतावळ्यातले आहेत. आयुष्यभर वेडगळ विवादास्पद बोलून थकल्यावर, आता ते गांधी स्मारक ’निधी’चे रखवालदार झाले आहेत. तेव्हा त्यांचा गांधी म्हणजे महात्मा गांधी नसून स्मारक निधी आहे हे आपल्या लक्षात येऊ शकते.  

   निधीवादी व गांधीवादी असे यात दोन वेगवेगळे पंथ असावेत. नाहीतर सप्तर्षींना अचानक अण्णांच्या आंदोलनात गांधींची विटंबना कशाला दिसली असती? अण्णांनी गांधींचे नाव वापरले, म्हणुन सप्तर्षी व्यथीत झाल्यासारखे लिहितात. त्यात त्यांना गांधींच्या विचारांचे थिल्लरीकरण सुद्धा दिसले आहे. हा एकू्ण लेख वाचताना मला सप्तर्षी अनेक वर्षे कोमात वगैरे होते काय अशी शंका येऊ लागली आहे. कारण चारपाच वर्षापुर्वी एका निर्माता दिग्दर्शकाने गांधींचा जो जिर्णोद्धार केला, त्याचा या डॉक्टरांना थांगपाता लागलेला नाही. याचा अर्थच हे महाशय कोमात, ग्लानी्त असावेत किंवा माणसात नसावेत किंवा त्यांनी मधल्या काळात वृत्तपत्रे, बातम्या याकडे साफ़ दुर्लक्ष केलेले असावे. त्यांना "लगे रहो मुन्नाभाई" हा गांधींचा पुनर्जन्म ठाऊकच नाही याला काय म्हणावे? त्यातले महात्माजींचे उदात्तीकरण त्यांना माहित नाही, की तो गांधी विचारसरणीचा अप्रतिम आविष्कार वाटला होता? की त्यातले त्यांना काहीच माहित नाही? संजय दत्त व विद्या बालन यांनी गांधी किती सोपा करून टाकला ते सप्तर्षी विसरले, की त्यांना निधी पुढे गांधी स्मरत नव्हता? लोकांनी अन्याय करणार्‍यांना फ़ुले द्यायची, शिव्या घालणार्‍यांशीही हसत बोलायचे, असले गांधी तत्वज्ञान गाजत होते, तेव्हा सप्तर्षी सुप्तावस्थेत होते की काय? ते गांधीवादाचे थिल्लरीकरण नव्हते काय? संजय दत्तला दिसलेला बापू यांनी कधी पाहिलाच नाही की काय? त्याला काय म्हणतात? ते महात्म्याच्या विचाराचे थिल्लरीकरण व बाजारीकरण नव्हते काय? तेव्हा हे स्मारक निधीवादी कुमारस्वामी का विचलीत झाले नव्हते?

   कुठलाही कर्मठ गांधीवादी तेव्हा चवताळून उठला असता आणि लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातून जे गांधी विचाराचे थिल्लरीकरण झाले, त्याच्यावर तुटून पडला असता. पण तेव्हा या निधीवादी सप्तर्षींनी आवाज उठवल्याचे माझ्या तरी नजरेस आले नाही. सगळ्या वाहिन्या व वृत्तपत्रे मुन्नाभाईच्या खूळचट गांधीवादाचे कौतू्क करत मोकाट सुटली होती. आणि कहर म्हणजे त्यातला गांधीवादी मुन्नाभाई संजयदत्त याने 26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यानंतर गांधीवाद नव्हे, तर अशा कसाब टोळीला हिंसेनेच उत्तर द्यायला हवे, असेही सांगून टाकले होते. तेव्हा हे निधीवादी कुठल्या बिळात लपून बसले होते? की आपला तो मुन्ना आणि दुसर्‍याचा तो अण्णा, असा यांचा नवा गांधीवाद आहे? तो महात्मा गांधींचा विचार आहे, की राहूल गांचींचा विचार आहे? कारण एकेकाळचे त्यांचे सहकारी निकटवर्तिय डॉ. रत्नाकर महाजन आजकाल राहुल सोनिया गांधीवादी म्हणुन मिरवत असतात. मग गांधी विचार असे सप्तर्षी म्हणतात, तेव्हा त्यातला गांधी कुठला ते त्यांनी जरा तपशीलात सांगितले तर आमच्यासह अण्णा हजारे आदि अडाण्यांचे अज्ञान दुर तरी होईल.

   ’अण्णांचे दोन दोष भाजपने नेमके हेरले आहेत. अण्णांच्या मनाची कवाडे त्यांच्या पायावर डोके ठेवले तरच खुली होतात हा पहिला दोष. कॅमेरा पाहिला की अण्णा कितीही भडक विधान करू शकतात हा दुसरा दोष. या दोन दोन दोषांवर भाजपचा खेळ उभा आहे’. सप्तर्षी यांचा हा आणखी एक भ्रम तीन महिन्यात खोटा पडला आहे. कारण परवाच लोकसभेत अण्णा विरोधी झालेल्या ठरावात भाजपा नेत्यांनी अण्णांवर टिका केलेली आहे. भाजपाचा खेळ त्यांना जळीस्थळी काष्टीपाषाणी दिसतो. त्यामुळे ज्याच्यावर आरोप करायचे असतात, त्याचा भाजपाशी संबंध जो्डणे ही अशा सेक्युलर लोकांची एक विकृती झालेली आहे. जे आजकाल सेक्युलर म्हणुन मिरवतात, त्यांचा खर्‍या सेक्युलर विचारांशी काडीमात्र संबंध राहिलेला नाही. त्यामुळेच ते असे वेडगळ बोलत असतात. आणि विवादास्पद बोलतात, म्हणुनच त्यांना वाहिन्या आमंत्रण देतात, हे त्यांनीच सांगितलेले आहे. एक गोष्ट मात्र कबुल करायला हवी. ही तमाम माणसे धाडसी आहेत. इतके बेधडक खोटे व बेछूट बिनबुडाचे सतत बोलायला हिंमत लागते. ती त्यांच्यापाशी भरपुर आहे. सप्तर्षी अण्णांच्या बाबतीत बोलतात ते त्यांनाच लागू होते. अण्णा अडाणीपणाने वाटेल ते बोलतात, पण रेटून बोलतात, असा त्यांचा आरोप आहे. पण या पोस्टमार्टेममधून मी सप्तर्षी व त्यांच्यासारख्या हेमंतभटजी आदींच्या खोटेपणाचे वारंवार वस्त्रहरण केलेले आहे. त्यापैकी एकही माझा प्रतिवाद करायल पुढे सरसावलेला नाही. म्हणजेच त्यांचा खोटेपणा त्यांनी स्विकारलेला आहेच. पण ते खोटे बोलायचे थांबले आहेत का? अजिबात नाही. अगदी रेटून खोटे बोलत व लिहित असतात. यालाच निर्ढावलेपणा म्हणतात. थोर संपादक व एकेकाळचे हेमंतभटजींचे बॉस कुमारशास्त्री केतकर त्याला शहाजोगपणा म्हणतात,

    सेक्युलर जानवे परिधान केले म्हणुन भटजीगिरी अशी सहजासहजी जात नसते. म्हणूनच आपल्या लेखाच्या शेवटी कुमारभटजी कार्य उरकल्याच्या थाटात अण्णांना आशीर्वाद द्यायला विसरत नाहीत. ते लिहितात, ‘‘अण्णा, माझ्या थोरल्या भावा! अकारण उपवास करून जीव जाळू नकोस. कुसंगतीचा त्याग कर. शांत रहा, सुखी रहा, तुझे कल्याण होवो, तुझे मंगल होवो!’’. आपल्या आशीर्वादानेच दुनियेचे मंगल होते, अशी ही धारणा काय सांगते? गांधीवाद त्यातून डोकावतो की भटजीगिरी? गांधीगिरी करायचा आव आणायचा, पण उपजत भटजीगिरी पाठ सोडत नाही, त्याचाच हा पुरावा नाही काय? कुसंगतीचा त्याग कर आणि कुठली सुसंगती धर? त्याचे उत्तर हे भटजी देत नाहीत. सप्तर्षी अण्णांना अडाणी ठरवतात तर हेमंतभटजी मला (बायकोच्या नथीतून तीर मारल्यासारखे) अडाणी युक्तीवाद करणारा म्हणतात. मी नाव घेऊन लिहितो. यांना माझे नाव घ्यायला कोणी अडवले आहे? की उखाण्यात बोलायला हेमंतभटजी नवविवाहिता आहे? ज्या युक्तीवादाचा प्रतीवाद करायची हिंमत होत नाही, त्याच्यावर अडा्णीपणाचा शिक्का मारणे ही भटजीगिरी नाही काय? म्हणजे करायची भटजीगिरी, पण आव आणायचा गांधीगिरीचा. दर्डाशेठ यजमान असलेल्या कायबीइन लोकमत वाहिनीवर दिसायची लाचारी असल्याने हेमंतभटजी लोकमतच्या पेडन्युजवद्दल बोलण्याची हिंमत करू शकत नाहीत. आणि तेच शिवसेना भाजपाला मोठा आव आणुन जाब विचारतात, तेव्हा केविलवाणे वाटत नाहीत काय? त्यांना दर्डां घरीचे भाट म्हणायचे की "भ" आडवा घालणारे माठ म्हणायचे? जेव्हा बुद्धीवाद असा बुद्धीभेद करू लागतो तेव्हाच समाज, संस्कृती, देश व राष्ट्र रसातळाला जात असते.  (क्रमश:)
भाग ( २२६ ) ५/४/१२

३ टिप्पण्या: