सोमवार, १६ एप्रिल, २०१२

लोकशाहीच्या चौथ्या खांबाला पोखरणारी वाळवी


   लोकशाही ही एक गुंतागुंतीची मानवी सामुहि व्यवहाराची  रचना आहे. त्यात प्रत्येकावर आपापली जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. त्यात कोणीही कसूर केली, तर ती रचना वा यंत्रणा बिघडू लागते. त्यात गडबड सुरू होते. एखाद्या प्रचंड कारखान्यातील अगडबंब यंत्रणा वा विमान, मोटारीच्या यंत्रणेतील प्रत्येक घटकाची नेमून दिलेली जबाबदारी असते, तशीच लोकशाहीत देशाची सत्ता राबवणार्‍या सत्ताधार्‍यापासून सामान्य नागरिकापर्यंत प्रत्येकाला त्याची जबाबदारी असते. त्यात गफ़लत केली; तर ती रचना निकामी होऊ शकते. जसजसे अधिकार व सत्ता वाढते, तसतशी जबाबदारी वाढत असते. त्याच्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे, त्यातल्या कुठल्या घटकाने आपले काम सोडून दुसर्‍याच्या कामात ढवळाढवळ केल्यास अनर्थ ओढवू शकतो. अशा लोकशाहीच्या गुंतागुंतीच्या रचनेमध्ये चार प्रमुख आधारापैकी एक असलेल्या माध्यमांची मग केवढी मोठी गंभीर जबाबदारी आहे, ती लक्षात येऊ शकेल. त्यातून मिळणारा अधिकार व प्रतिष्ठा मोठी नक्कीच आहे. पण त्याबरोबरच जबाबदारीचे मोठे ओझे येत असते. त्याचे कितीसे भान ठेवले जाते?

   पोलिस असतो त्याच्या हाती कायदा राबवण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यात जीवावरचा धोका संभवतो, म्हणून स्वसंरक्षणार्थ त्याला हत्यार देखिल दिलेले असते. त्याच्या तुलनेत सामान्य जनता नि:शस्त्र असते. पण म्हणून त्याने ते शस्त्र मिरवायचे नसते, तो कायद्याचा अधिकार व शस्त्र जबाबदारीचे ओझे घेऊन आलेले असतात. त्याच्याशी खेळ करून चालत नाही. घरातल्या चाकूसुर्‍या वा महत्वाची उपकरणे यापासून आपण मुलांना दुर कशाला ठेवतो? त्यांना त्यातले धोके उमगलेले नसतात म्हणुन. त्यांच्या हातून चुकून अशा वस्तूंचा गैरवापर झाला, तर प्राणघातक ठरू शकते. तसेच कायद्याचे अधिकार असतात. त्याच्याशी पोरखेळ करून चालत नाहीत. ते अधिकार तुम्हाला सामान्य माणसापासून वेगळे जरूर बनवत असतात, पण त्याचवेळी तुमच्यावरची जबाबदारी वाढवत असतात. चौथा खांब म्हणुन मिरवणार्‍या माध्यमांनी त्याचे भान ठेवायला हवे असते. लोकशाहीच्या अन्य तीन खांबांवर नजर ठेवायची जबाबदारी आपल्यावर आहे, म्हणून उठसुट धोक्याचे इशारे देणे वा सत्ताधार्‍यांना फ़ैलावर घेणे, हे चौथ्या खांबाचे काम नाही. त्याचप्रमाणे जे तीन खांब आहेत, त्यांच्या कामात ढवलाढवळ होईल; असेही चौथ्या खांबाने वागता कामा नये. कुठल्याही प्रकारे त्यात हस्तक्षेप होईल असे वागून चालणार नाही. आजची माध्यमे तेवढी जबाबदार राहिली आहेत काय? ती अलिप्तपणे आपली लोकशाहीतली जबाबदारी पार पाडताना दिसतात काय?

   घडणार्‍या घटनांचे विश्लेषण करणे, त्यातल्या त्रूटी दाखवणे, त्यातून लोकशाहीला संभवणारा अपाय दाखवून लोकांना सावध करणे; ही माध्यमांही मुळ जबाबदारी आहे. कारण घटना व कायद्याने लोकशाहीतले जे अधिकार राजकारणी, सत्ताधीश व नोकरशाहीला दिलेले आहेत, त्याचे काटेकोर पालन होते किंवा नाही, यावर पाळत ठेवणे ही चौथा खांब म्हणून माध्यमांची खरी जबाबदारी आहे. ती कितीशी गंभीरपणे पार पाडली जाते? अनेकदा तर असे दिसते, की माध्यमेच अशा राजकीय, प्रशासकीय घटना घडवून आणण्यात पुढाकार घेत असतात, त्याला चिथावणी व प्रोत्साहन देत असतात. थोडक्यात त्यांच्या ज्या मर्यादा आहेत, त्याचे पालन पत्रकार व माध्यमांकडून होत नाही. प्रभू चावला. बरखा दत्त, वीर संघवी असे नामवंत पत्रकार तर स्पेक्ट्रम घोटाळा घडवणार्‍या राजा नामक मंत्र्याला, तेच मंत्रालय मिळावे म्हणून प्रयत्न करत होते. त्याला चौथा खांब म्हणता येईल काय? काही पत्रकार विविध पक्षातील नेत्यांसाठी मध्यस्थ वा राजकीय सौदेबाजी करण्यात भाग घेतात. राजकारण करण्यात उघडपणे भाग घेतात. मग त्यांच्या चौथ्या खांबाची भूमिकाच संशयास्पद बनून जाते. यातून काय धोके संभवतात?

   तीन पायांचे जे स्टुल असते ते तेवढ्यावर ठिक उभे असते. त्यात चौथा आधार घुसू लागला, मग रचना गडबडू लागते. कारण त्या रचनेमध्ये चौथ्या पायाला जागाच नसते. प्रत्येक पाय एकाच समान उंचीचा असल्याने तोल छान संभाळला जात असतो. त्यात चौथा समान उंची नसलेला पाय अकारण लावला गेला, तर उर्वरित तीन पायांना भक्कमपणे उभेच रहाता येत नाही. मध्यंतरी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ राष्ट्रवादी पक्षात जाणार अशी बातमी देण्याचे काय कारण होते? जे घडले नाही व घडण्याची शक्यताच नव्हती, ते लोकांना सांगून कोणते राष्ट्रीय व समाजोपयोगी कार्य महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राने पार पाडले? त्यातून फ़क्त गोंधळ माजवला गेला. त्यांच्या कार्यालयावर हल्ला झाला. मोडतोड झाली. गैसमज निर्माण झाले. बेबनाव तयार झाला. हे लोकशाहीत चौथ्या खांबाचे काम आहे काय? ज्यातून राजकीय अराजक व सावळागोंधळ निर्माण होईल, असे काही करण्यासाठी माध्यमांना लोकशाहीत चौथा खांब म्हटले आहे काय? अशाप्रकारे समाज व देशात अराजक माजवण्याच्या कामाला चौथा खांब नव्हे, तर पाचवा खांब म्हणतात, जे देशद्रोही, राजद्रोही, समाजद्रोही कृत्य करतात, त्यांना पंचमस्तंभीय संबोधले जात असते. आज चौथा खांब म्हणून मिरवणारे तेच काम करत नाहीत काय?

   चौथा खांब म्हणुन नुसते मिरवता येणार नाही, तर चौथा खांब म्हणून तेवढ्या अलिप्त व जबाबदारीने कामही करणे भाग आहे. त्याऐवजी आजची पत्रकारिता भरकटत चालली आहे काय? ज्याप्रकारच्या चर्चा व लिखाण आपण, वाहिन्या व वृत्तपत्रातून बघतो, त्यात तो पक्षपात आता लपेनासा झाला आहे. इथे मी तर अनेक पत्रकारांची नावे त्यांच्या पक्षपाती राजकीय भूमिकांसह उघडपणे मांडली आहेत. ते पत्रकार दाखवायला आहेत. पण मनाने व वागण्यातून कुठल्यातरी राजकीय विचारसरणीचे म्हणूनच पत्रकारीतेला राबवत असतात. किंबहूना आपले राजकारण पुढे नेण्यासाठी, त्यांनी पत्रकारितेचा मुखवटा लावलेला असतो. म्हणजे तो पाकिस्तानचे सेनापती जनरल याह्याखान यांच्या गोटात जसा भारतीय हस्तक बसलेला होता, तसेच हे पत्रकारितेच्या गोटात राजकीय पक्ष वा नेत्यांचे हस्तक बनून वावरत असतात. जसे आपले हस्तक पाकिस्तानच्या गोटात असतात, तसेच आपल्या देशातही मोक्याच्या जागी बसलेले काही लोक पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे असू शकतात. मध्यंतरीच्या काळात एक माधुरी गुप्ता नावाची महिला अधिकारी पाकची हेर म्हणून पकडण्यात आली होती. पाकिस्तानात भारतीय वकिलातीमध्ये ती अधिकारी म्हणून काम करत होती. पण प्रत्यक्षात ती पाकहेरांना भारताची गुपिते पुरवत असल्याचा तिच्यावर आरोप होता. त्याला देशद्रोह म्हणतात. पण जिथे त्याच पद्धतीने आपल्या नैतिक जबाबदार्‍या विसरून वा जाणीवपुर्वक कर्तव्यात कसूर केली जाते, तेव्हा तो समाजाशी द्रोहच असतो. मग तो कुणा राजकारण्याने केलेला असो; किंवा पत्रकार, पोलिस वा शासकिय अधिकार्‍याने केलेला कर्मद्रोह असो. आज पत्रकारीतेत किती लोक दाखवायला पत्रकार व प्रत्यक्षात आपली राजकीय भुमिका पार पाडायला वावरत असतात? त्याही पलिकडे काही लोक तर पत्रकारिता धा्ब्यावर बसवून आपले व्यक्तीगत स्वार्थ साधण्यासाठी हा मुखवटा पांघरून वावरत असतात. तेव्हा ते नुसत्या कर्तव्याची होळी करत नसतात, तर प्रत्यक्षात लोकशाहीचीच हत्या करत असतात. कारण ते लोकशाहीचा चौथा खांबच पोखरून निकामी करत असतात.

   त्याचे शेकडो पुरावे मी आजवर दिलेले आहेत. त्यात राजकीय नेत्यांसाठी हस्तक म्हणुन वावरणारे आहेत, तसेच अगदी गुन्हेगारी टोळ्यांसाठी कामगिरी बजावणारे सुद्धा आहेत. त्यांचे काम व कृत्य लोकशाहीचा चौथा खांब म्हणून योग्य आहे काय? लोकशाहीचा चौथा खांब हा कायदा व घटनात्मक चौकटी बाहेरून लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी आहे. जेव्हा जेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती येईल, तेव्हा त्यापासून सामान्य जनतेला सावध करण्याबरोबरच तिला हिंमत देण्याची जबाबदारी चौथ्या खांबावर असते व आहे. ती किती कर्तव्यबुद्धीने पार पाडली जात असते? खळबळ माजवणे, सनसनाटी निर्माण करणे, म्हणजे पत्रकारिता नाहीच, पण ते चौथा खांब म्हणुनही अयोग्य आहे. एक अगदी ताजे उदाहरण त्यासाठी पुरेसे ठरावे. अण्णाटीमचे एक आक्रमक सदस्य अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल माजवण्यात आलेले काहूर माध्यमांच्या कर्तव्याची पुर्तता आहे, की त्या कर्तव्याला फ़ासलेली काळीमा आहे? ज्यांनी लोकप्रबोधन करावे त्यांनीच सामान्य जनतेमध्ये गैरसमज निर्माण करायला हातभार लावणे, हे लोकशाहीला उपकारक आहे की घातक आहे? (क्रमश:)
भाग  ( २३७ )     १६/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा