रविवार, ८ एप्रिल, २०१२

कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचं बोलण आज नाही


   विलासरावांना लाज वाटत असेल तर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे जाहिरपणे लिहिणार्‍या हेमंतभटजींना थोडीतरी लाज आहे का? असेल तर त्याचा पुरावा काय?  ढोंगबाजीचा उरूस या लेखात ठोकपाल हेमंतभटजी अखेरीस म्हणतात, ’महाराष्ट्रातील शहरांत, अगदी मुंबईतही कुपोषण आहे. खरे तर यांची आपल्याला लाज वाटली पाहिजे’. वाटली पाहिजे म्हणजे काय? वाटत नाही असेच ना? कारण लाज असेल तर मंत्रीपदाचा राजीनामा मागणार्‍याला लाज असेल तर तो ’वाटायला हवी’ कशाला म्हणाला असता? याचा अर्थच असे की लिहिणार्‍याला लाज वगैरे काही नाही, अशीच तो कबुली देत असतो ना? आणि असेलच कशी? रोजच्या रोज बेशरमपणा करायचा असेल, तर लाज वाटून कसे चालेल? त्यांचा इतका खोटेपणा मी चव्हाट्यावर आणला आहे. पण त्यांनी कधी एकदा तरी लाजेकाजेस्तव का होईना, त्याचा खुलासा स्पष्टीकरण करून आपण "लज्जतदार" आहोत, याचा पुरावा वाचकाला दिला आहे काय? उलट तेवढ्याच जोशात ते अधिक निर्लज्जपणा करतच असतात. त्याच त्या उरुसामध्ये आपल्या ढोंगाचा ताबूत नाचवताना हे भटजी म्हणतात, ’अर्थकारणाचे रूपांतर शूद्र राजकारणात केल्यास या राज्यास कोणीच वाचवू शकणार नाही’. याला निर्लज्जम सदासुखी म्हणतात. कारण अर्थकारणाचे शुद्र राजकारण कोणी केले?  

   बारा वर्षापुर्वी महाराष्ट्रात युती सरकार होते. त्यांनी शेकडो महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या होत्या. त्यासाठी जे करोडो रुपयांचे कर्ज काढले, त्याबद्दल त्यांना शिव्याशाप देण्यात हेच हेमंतभटजी आघाडीवर होते. शरद पवारांच्या हातून युतीने सत्ता घेताना राज्याच्या डोक्यावर 20 हजार कोटीचे कर्ज होते. साडेचार वर्षांनी युतीने सत्ता सोडली तेव्हा तो कर्जाचा बोजा 38 हजार कोटी रुपयांच्या घरात गेला होता. तर राज्य दिवाळखोरीत गेले, म्हणून बोंबा ठोकण्यात हेच ठोकपाल आघाडीवर होते. आज तेच राज्य आणखी बारा वर्षे उलटल्यावर पुरते देशोधडीला लागले आहे. अडिच तीन लाख को्टी रुपयांचे कर्ज राज्याच्या डोक्यावर चढले आहे. ते पाप कोणाचे? एकट्या कॉग्रेस व राष्ट्रवादीचे आहे काय? त्यात हे तेव्हाच्या होळीतले शिमगेकरी सारखेच भागीदार नाहीत काय? माणुस किती बेछुट खोटे बोलतो, याचे हेमंत भटजी हा उत्तम नमूना आहे. ताज्या अर्थसंकल्पावर लिहितांना यांनीच काय म्हटले आहे बघा. अजितदादांचा दणका या लेखात हेमंतभटजी लिहितात, "विलासरावांच्या काळापासून राज्याचे आर्थिक अध:पतन गतिमान झाले." आणि हा विलासरावाचा काळ कधीपासून सुरू होतो? युतीने सत्ता गमावली तिथूनच विलासरावांचा काळ सुरू होतो ना? मग भटजींच्या या वाक्याचा अर्थ काय होतो? विलासराव सत्तेवर येईपर्यंत महाराष्ट्राचे गतिमान आर्थिक अध:पतन सुरू झालेले नव्हते. मग विलासराव सत्तेवर येईपर्यंत कोण सत्तेवर होता? शिवसेना भाजपा युतीच सत्तेवर होती ना? मग तोवर राज्याचे अर्थकारण छान होते वा निदान अध:पतन गतिमान झालेले नव्हते, तर दिवाळखोरीच्या बोंबा कशाला मारत होते हे भटजीबुवा?

   1999 सालात युतीची सत्ता असताना किंवा निवडणुकीत युतीने सत्ता गमावल्यावर एकसुरात असे सारे सेक्युलर भटजी दिवाळखोरीची भजने गात होते. आणि आज तेच हेमंतभटजी युती सत्तेत असेपर्यंत अध:पतन सुरू झाले नव्हते, अशी ग्वाही देत आहेत. मग तेव्हा हे दिवटे समाजवादी अर्थशास्त्रज्ञ काय दिवे लावत होते? कसले अर्थकारण करत होते? विलासराव तेव्हा मुख्यमंत्री व्हायला गुडघ्याला बाशिंग बांधून बसले नव्हते. याच सेक्युलर पत्रकारांनी त्यांना बाशिंग मुडावळ्या बांधून घोड्यावर बसवले होते. तो दोष विलासरावांचा कसा म्हणता येईल? कोणीही अजून विलासरावांना विचारू शकतो. तेवढेच नाही. तेव्हाची वर्तमानपत्रे काढून तपासू शकतो. विलासरावांची नेमणुक वा निवड मुख्यमंत्री म्हणून झालीच नव्हती. कारण कॉग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात निवड्णूक लढले होते. जे कॉग्रेस आमदार निवडून आले त्यांचा नेता म्हणुन विलासरावांची निवड झाली होती. ते विरोधी नेता व्हायच्या तयारीत होते. पण बहुमताचा पल्ला न गाठू शकलेल्या युतीला सत्तेपासून दुर ठेवण्याची घाई झालेल्या हेमंतभटजीसारख्या पत्रकार व त्यांच्या दोनचार आमदार असलेल्या जनता दल वगैरे सेक्युलर समाजवादी पक्षियांनी कॉग्रेस व राष्ट्रवादीला एकत्र येऊन बसायला भाग पाडले होते. सोनिया परदेशी असल्याला दावा विसरून शरद पवार शरण गेले आणि राज्यात पुन्हा सेक्युलर सरकार आल्याचा जो आनंदोत्सव हेमंतभटजी व इतर पुरोगाम्यांनी साजरा केला, तिथून विलासरावांची कारकिर्द सुरू झाली. तिचे श्रेय त्यांच्यापेक्षा या सेक्युलर ब्रम्हवृंदाला द्यावे लागेल. त्यामुळेच विलासरावांना अर्थकारणाच्या अध:पतनासाठी सत्तेवर बसवायला जे कारणीभूत झाले, तेच आजच्या आर्थिक अध:पतनाला खरे जबाबदार नाहीत काय?

   विलासराव आल्यावर अध:पतन सुरू झाले तर आधी जे सुरळीत चालले होते, त्यात बिब्बा कोणी घातला? त्या सुरळीत अर्थकारणाला दिवाळखोरी म्हणत लोकांची दिशाभूल कोणी केली? विलासरावांनी नव्हे तर हेमंतभटजी यांच्यासारख्या सेक्युलर अर्धवटरावांनी केली होती. त्याला विलासराव बळी पडले इतकेच. थोडक्यात आज जी आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे, त्याचे पाप हे याच सेक्युलर पुण्यवंतांनी पुण्य लेबल लावून केलेले पाप आहे. त्याचे खापर एकट्या विलासरावांच्या डोक्यावर फ़ोडून कसे चालेल? विलासराव हेमंतभटजी एवढे अर्थशास्त्री नाहीत. त्यामुळे तेसुद्धा अशा भटजींना फ़सले म्हणायला हवे. आणि आता बाजू उलटल्यावर हेच भटजीबुवा काय म्हणतात बघा, "अर्थकारणाचे रूपांतर शूद्र राजकारणात केल्यास या राज्यास कोणीच वाचवू शकणार नाही." कोणी शुद्र राजकारण केले? विलासरावांनी की अजितदादांनी? बारा वर्षापुर्वी जे सेक्युलर राजकारण करण्याच्या बौद्धिक दिवाळखोरीत पुढाकार घेतला त्यांनीच हे अर्थकारणाचे शुद्र राजकारण केले होते व आहे. अर्थकारण व सेक्युलर राजकारण याची जी गल्लत तेव्हा करण्यात आली त्यानेच, हे अध:पतन घडवून आणले आहे. पण हे आमचे सेक्युलर हेमंत भटजी वा त्यांचे सहयोगी नेहमी वाल्याकोळ्याच्य कुटूंबियांसारखे वागत असतात. जेव्हा फ़ायदा असतो वा श्रेय घ्यायचे असते, तेव्हा हे पुढे असणार आणि पापाचे धनी व्हायची वेळ आली, मग यांचे कानावर हात असतात. तेव्हा यांना सेक्युलर सरकार हवे होते आणि त्यासाठी अर्थकारणाचा विचका झाला, तरी बेहत्तर म्हणुन यांनी युतीला दिवाळखोर ठरवण्याच्या थापा ठोकल्या. आता त्याचे दुष्परिणाम दिसू लागल्यावर मात्र पापाचे धनी विलासराव.

   आता यात मी समाजवाद्यांना वा त्यातल्या हेमंतभटजींना का दोषी मानतो, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचे उत्तर त्यांच्या सेवादलीय समाजवादी संस्कारातच सापडू शकते. वसंत बापटांनी सेवादलासाठी लिहिलेले व त्याचे संस्कार घेतलेले अनेकजन, आज सेक्युलर विचारवंत म्हणुन मिरवत असतात. ते गाणे असे

तुझ्या घामामधून तुझ्या कामामधून
उद्या पिकंल सोन्याचं रान
चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार
तुला नव्या जगाची आण

   याचा अर्थ असा, की मी काम करत नाही, मला घाम येत नाही. जे कष्टाचे काम आहे ते तुच करायचे आहे. आणि त्यातून सोन्याचं पिक येणार आहे. पुढे हे गाणे काय म्हणते?

भाग्य लिहिलेलं माझंतुझं
घाम आलेल्या भाळावरी
स्वप्न लपलेलं माझंतुझं
इथं बरड माळावरी

   आहे ना गंमत? काम करतानाचा घाम यांचा नाही. पण भाग्याचा विषय आला, मग लगेच आधी माझं आणि त्यातून उरलंच तर तुझं. असा यांचा समाजवाद आहे. त्यात काम हे करणार नाहीत आणि घाम गाळणार नाहीत. पण जेव्हा स्वप्न साकार व्हायची वेळ येईल, भाग्य फ़लफ़ळेल; तेव्हा मात्र आधी माझं मग तुझं. कामाच्या वेळी मात्र माझं काहीच नाही. कष्ट तुझे आणि पिक वा फ़ळ माझं. याला म्हणतात समाजवादी मनोवृत्ती. त्याच सुत्रानुसार अध:पतन झाल्यावर विलासराव आरोपी आणि मुळात सेक्युलर सरकार आणायला खोटेपणा करणारे हेमंतभटजी नामानिराळे. आणि तेच पुन्हा वर तोंड करून विलासरावांना "लाज असेल तर" अशा शपथा घालणार. याला बेशरमपणा नाही अर दुसरा चांगला सभ्य शब्द आहे काय? हा नुसता निर्लज्जपणाच नाही तर कोडगेपणसुद्धा आहे. म्हणुन त्याला शुद्र राजकारण म्हणतात.  (क्रमश:)
भाग ( २२८ )  ७/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा