गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

मालकाच्या इशार्‍यावर नाचणारे स्वतंत्र असतात का?


   लोकशाही किंवा देशाची राज्यघटना म्हणजे काही तरी मोठी अनाकलनिय बाब आहे असा आभास तयार करण्यात आला आहे. जी घटना व लोकशाही रचना देशातल्या सामान्य गरीब माणसाला न्याय मिळण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केली, तिचाच आडोसा आज गुन्हेगार घेत असतील तर त्या घटनेचा खरा अर्थ व उद्देश शोधून काडण्याची आत्यंतिक गरज आहे. केजरीवाल यांनी ज्यांच्यावर टिका केली त्यांना आपली सफ़ाई देता आलेली नाही किंवा आरोप आक्षेप फ़ेटाळता आलेले नाहीत. अशा वेळी त्या आरोपांची छाननी करणे हे समाजाच्या वतीने दक्षतेची जबबदारी घेतलेल्यांनी करायला हवे आहे. पण जे घडताना दिसते आहे ते नेमके उलट आहे. ज्यांनी आरोपांबद्दल विचारणा करावी, तेच त्या आरोपावरून लोकांचे लक्ष विचलित करायला धडपडताना दिसत आहेत. चौथा खांब अशा रितीने आपल्या कर्तव्याकडे नुसती पाठ फ़िरवताना दिसत नाही, तर विपरित भूमीका पार पाडतो आहे. मग शंका येते, की हे अनवधानाने चालू आहे काय? की जाणीवपुर्वक त्यामागे शिजवलेले कारस्थान आहे?

   कुठल्याही लढाईत नेहमी शत्रू वा प्रतिस्पर्ध्याच्या दुबळ्या बाजू शोधल्या जातात व त्यावरच हल्ला चढवला जात असतो. लोकशाहीची सर्वात दुबळी बाजू म्हणजे त्यात मिळणारे अनिर्बंध स्वातंत्र्य व मोकळीक. त्यात मग कायदेशीर जबाबदारी नसलेला वा बंधने नसलेला चौथा खांब, ही लोकशाहीची सर्वात दुबळी बाजू असते. त्याला समाज मोबदला देत नसतो, की त्याची कुठली जबाबदारी समाज उचलत नसतो. त्यामुळेच त्याच्यावर समाजाचे कुठले कायदेशीर बंधन नसते. तो जाब विचारू शकतो, तो आरोप करू शकतो, तो आक्षेप घेऊन लोकमत बनवू, बिघडवू शकतो. पण कायदा त्याच्यावर सहजासहजी हात उगारू शकत नसतो. तिथेच चौथा खांब मोकाट होण्याचा धोका संभवतो. लोकशाहीचे शत्रू वा देशाचे दुष्मन त्याचाच लाभ त्यांच्या कारस्थानासाठी वापरू शकतात. मध्यंतरी भारताचे सेनाप्रमुख व्ही. के. सिंग यांचे पंतप्रधानांना लिहिलेले एक गोपनिय पत्र माध्यमांनी जाहिर केले. त्यावरून खुप खळबळ माजली. तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अशा देशविघातक व शत्रूला मदत करणार्‍या बातम्या देण्यापुर्वी जबाबदारी ओळखा, असा सल्ला माध्यमांना दिला होता. तो सल्ला माध्यमांना भूषणावह होता काय? की माध्यमांच्या बेजबाबदार मनोवृत्तीचा दाखला होता? त्याच्याही आधी यापेक्षा भीषण पाप वाहिन्यांकडून झालेले आहे.  

   २६ नोव्हेंबर २००८ रोजी कराची पाकिस्तानातून जी कसाब टोळी मुंबईत आली व तिने सार्वजनिक हत्याकांड सुरू केले, त्याच्या बंदोबस्तासाठी चाललेल्या कारवाईत माध्यमांची मजल व्यत्यय आणण्यापर्यंत गेली होती. ताजमहाल हॉटेलमध्ये घुसलेल्या जिहादींच्या बंदोबस्तासाठी जे कमांडो पथक आले, त्यांनी अन्य मार्ग नसल्याने हेलिकॉप्टरमधून तिथे उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची कारवाई जिहादींना गाफ़ील ठेवण्यावरच यशस्वी होऊ शकणार होती. कारण हॉटेलमध्ये पोलिस वा कमांडो नाहीत आणि हाती लागलेले लोक आपल्या तावडीत आहेत, याबद्दल जिहादी निश्चिंत होते. पण त्याचवेळी त्यांचे कराचीत बसलेले सुत्रधार त्यांना टीव्हीवर दिसणार्‍या बातम्या व माहीती पुरवित होते. त्याप्रमाणे जिहादी हल्लेखोरांना चढाईचे मार्गदर्शन करत होते. मग हेलिकॉप्टरमधून कमांडो छपरावर उतरत आहेत, असे दृष्य थेट वाहिन्यावर प्रक्षेपित करून कोणाला मदत चालली होती? जणू उतरणार्‍या कमांडोचा जीव धोक्यात घालण्याचेच काम या वाहिन्या करत होत्या ना? कारण थेट प्रक्षेपणात दिसेल ते पाहून कराचीतले सुत्रधार आत लपलेल्यांना सुचना देत होते. आणि त्यांना बाहेर घडणारे सर्वकाही कोण सांगत होता? स्वत:ला चौथा खांब म्हणवणारेच तो मुर्खपणा किंवा गद्दारी करत नव्हते काय?

   आपण बातमीदारी करत नसून आपल्याला, म्हणजे जनतेला वाचवण्यासाठी जीव पणाला लावणार्‍या कमांडोंचे जीव आपण धोक्यात घालत आहोत; याचे भान कोणी ठेवायचे? क्रिया झाली तर प्रतिक्रिया उमटणारच; असे गोध्रानंतर नरेंद्र मोदी म्हणाले, म्हणून तिथे पेटलेल्या दंगलीसाठी मोदींना जबाबदार धरण्यात माध्यमेच पुढे असतात. मग अशा घातक उतावळ्या बातमीने जे संकट ओढवले जाते, त्याला जबाबदार माध्यमेच नाहीत काय? कमांडो येत आहेत, अशी बातमी व त्यांच्या येण्याचा मार्ग, रणनिती जनतेला कळण्याची काहीही गरज नव्हती. त्यापेक्षा त्या जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवला जाणे अगत्याचे होते. त्यात पुढाकार घेणार्‍यांना मदत करणे ही माध्यमांची जबाबदारीच नव्हे, तर कर्तव्य होते. ते राहिले बाजूला आणि आमचे हे चौथे खांबवाले शत्रूलाच मदत करत होते. काहीजण उत्साहात मुर्खपणा करत असतील, पण सगळेच मुर्ख उतावळे म्हणता येणार नाही. त्यातले मोजके का होईना पद्धतशीरपणे ते पाप करत असतील, यात शंका बाळगणाचे कारण नाही. त्यांनी असे का करावे? पत्रकार संपदक म्हणून काम करणा‍र्‍यांना असा समाजद्रोह, देशद्रोह करण्याचे कारणच काय? त्यांनी आपल्या देशाशी गद्दारी का करावी?

   जेव्हा असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा तमाम पत्रकार व माध्यमे माझ्यावर शंकासूर म्हणुन तुटून पडतील याची मला खात्री आहे. कारण त्यातल्या बहुतांशी लोकांना व सर्वसामान्य जनतेला या माध्यमाची सुत्रे कोण हलवतो याचाच थांगपत्ता नसतो. आज विविध वाहिन्यांवर, बड्या भांडवलदारी वृत्तपत्रातून जाडजुड पगारात काम करणार्‍या कितीजणांना त्यांचा खरा मालक ठाऊक आहे? मध्यंतरी इटीव्ही नेटवर्कच्या डझनभर वाहिन्या विकण्यात आल्या. त्या तोट्यात चालू होत्या म्हणुन विकल्या, असे आर्थिक वृत्तपत्रातून छापून आले. नेहमीच्या वृत्तपत्रात त्याची बातमी नव्हती. त्या तोट्यातल्या वाहिन्या मुकेश अंबानी यांचा ताबा असलेल्या एका कंपनीने विकत घेतल्या. म्हणजे काय? तर त्या वाहिन्यांचा तोटा यापुढे अंबानी भरून देणार आहेत. याचप्रकारे प्रत्येक मोठ्या माध्यम कंपन्यात कोणाकोणाचे किती शेअर्स आहेत, हे सामान्य माणसाला ठाऊक नाही आणि त्यात पत्रकारिता करणार्‍यांनाही ठाऊक कितपत आहे, याची शंकाच आहे. आज रोजच्या रोज निखिल वागळे कायबीइन लोकमत वाहिनीवर झळकत असतात. त्यांचा आव मोठ्या स्वयंभुत्वाचा असतो. पण खरोखरच ते कोणासाठी काम करतात? त्यांनीच अशा भांडवली माध्यमसम्राटांचे साम्राज्य आपल्या अविष्कार स्वातंत्र्यगाथेत लिहून ठेवले आहे. थोडक्यात आपण मोठ्या पगारासाठी कुणा भांडवलदाराचा पट्टा गळ्यात बांधून घेतला ते वागळे आज बोलत नाहीत इतकेच. पण प्रत्यक्षात मालकाच्या इशार्‍यावर भुंकणे यापेक्षा अशा पत्रकारितेला जास्त कुठला अर्थ नाही. हे मी म्हणत नाही. खुद्द वागळे यांनीच लिहून ठेवलेले तत्वज्ञान आहे.

आयबीएन लोकमत ही वाहिनी ज्या कंपनीच्या मालकीची आहे, ती आयबीएन नेटवर्क कंपनीची उपकंपनी आहे. ती नेटवर्क कंपनी स्वतंत्र भारतीय कंपनी नाही. त्यात अमेरिकन सीएनएन चालवणार्‍या कंपनीचे शेअर्स गुंतलेले आहेत. अशा प्रकारे कंपन्यांचे गुंतागुंतीचे नेटवर्क म्हणजे जाळे असते. त्यापैकी कुठल्या जाळ्यात आपण फ़सलो आहोत, ते त्यात गरजणार्‍यांना ठाऊकसुद्धा नसते. कुठे खून झाला, बलात्कार झाला वा दरोडा पडला किंवा गावच्या राजकारणात काय घडले, यावर मतप्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य या लोकांना असते. पण जिथे मोठ्या घटना घडत असतात वा घडवल्या जात असतात, तिथे त्यांना मालकाने नेमलेल्या सुत्रधाराच्या तालावर नाचावे लागत असते. आणि हे आजचे नाही. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरू झाले तेव्हा लोकमान्य नावाचे मराठी दैनिक होते. आजच्या गुजराती दैनिक जन्मभूमीचे ते मराठी भावंड. त्यात मराठी राज्याचे समर्थन करणारी संपादकीय भूमिका मांडली गेल्यावर गुजराती मालकाने ती बदलण्याचे दडपण आणले. पण बाणेदार संपादकाने ते नाकारले. त्याच्या पाठीशी तिथले तमाम पत्रकार उभे राहिले. रातोरात ते दैनिक बंद करण्यात आले. सर्व पत्रकार बेकार झाले. त्यातल्या कोणी अविष्कार स्वतंत्र्याचा झेंडा खांद्यावर घेऊन रस्त्यावर तमाशा केला नव्हता. कारण ते अविष्कार स्वातंत्र्य जगत होते. त्याचा देखावा त्यांना करण्याची गरज भासत नसे. कारण तेव्हाचे पत्रकार सेवक असले तरी बाणेदार होते. आजचे कुणाच्या इशार्‍यावर ओरडा करतात ते वाचक प्रेक्षकाने स्वत:च ओळखावे. मालकाच्या इशार्‍यावर चालणारी पत्रकारिता देशाच्या सोडा, समाज वा सामान्य माण्साच्या हिताची कशी असेल? नसेल तर ती कोणाच्या हितासाठी राबत असेल?  (क्रमश:)
भाग    ( २३९ ) १८/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा