रविवार, २२ एप्रिल, २०१२

माध्यमातील भांडवली गुन्हेगारीतले भागिदार


   "इंग्रजी भाषेत ’पोलिटीकली करेक्ट’ असा एक नेहमीचा शब्दप्रयोग आहे. त्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या योग्य तेच बोलणे. त्याचाच अर्थ ते योग्य व खरे असतेच असे नाही. उलट अनेकदा जे राजकीय दृष्ट्या योग्य बोलले जात असते ते वास्तविक अयोग्य किंवा खोटे सुद्धा असू शकते. पण जे जाणकार विचारवंत वा बुद्धीमंत असतात वा त्या भूमिकेत मिरवत असतात, ते नेहमीच राजकीय दृष्टीने योग्य बोलायची, सांगायची धडपड करत असतात. त्यासाठी बेधडक खोटे बोलायलाही मागेपुढे पहात नाहीत. राजकारणातल्या लोकांकडून तुम्ही खरे बोलायची अपेक्षाच करू शकत नाही. कारण आजकाल सत्य बोलणे किंवा सांगणे राजकीय दृष्टीने योग्य असावे लागते. त्यामुळे आपल्याला जे सांगायचे आहे ते खरे असून चालत नाही. ते राजकीय दृष्टीने खरे म्हणून स्विकारले जाईल, असे बदलून बोलावे लागत असते. त्याऐवजी बेधडक खरेखुरे बोलायला गेलात, तर तुम्हाला थेट आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याइतके काहुर माजवले जाण्याचा धोका असतो."

   हा परिच्छेद आजचा नाही. आठ महिन्यांपुर्वी मी या लेखमालेची सुरूवात केली, तिच्या पहिल्या लेखाचा पहिला परिच्छेद आहे. आज अडीचशे लेख होत आले, त्याची ही सुरूवात आहे. तेव्हा सगळी माध्यमे अण्णांच्या त्या रामलिला मैदानावरील उपोषणाचे गोडवे गाण्यात गर्क होती. तेव्हा कोणाला अण्णांच्या त्या आंदोलनात कुठली खोड दिसत नव्हती. कारण तेव्हा अण्णांच्या मागे आजच्या इतकी जनशक्ती उभी राहिलेली नव्हती. तेव्हा अण्णा व त्यांचे सर्व सहकारी, हे केवळ माध्यमांच्या मेहरबानीवर अवलंबून होते. अण्णांचे आंदोलन माध्यमांची किमया होती. आणि मला खात्री होती, की जोवर अण्णांच्या मागे लोकांची गर्दी उभी रहात नाही, तोवर माध्यमे अण्णांचा उदोउदो करणार. पण ज्याक्षणी अण्णांच्या मागे लोक गर्दी करू लागतील, तेव्हा विनाविलंब माध्यमेच स्रर्वप्रथम अण्णांच्या विरोधात उभी ठाकतील, याचीही मला खात्री होती. आणि झालेही तसेच. अण्णांच्या उपोषणाला जनतेचा पाठींबा मिळाल्यावर माध्यमांना लगेच अण्णांच्या आंदोलनावर तलवार उपसणे शक्य नव्हते. विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रेक्षक लागतो, त्यामुळे त्यांना अण्णांचा रियालिटी शो चालवणे भाग होते. मग माध्यमात दुफ़ळी झाली. टिव्हीवाले अण्णांचा रियालिटी शो अहोरात्र दाखवत होते आणि छापा माध्यमे अण्णांवर तुटून पडली होती. मात्र उपोषण संपून अण्णांचे वारे कमी झाल्यावर हळूहळू टिव्हीवालेही अण्णांवर घसरले. असे का व्हावे?

   त्याची कारणे आपण माध्यम नावाच्या उद्योगात शोधू शकतो. पुर्वीच्या काळात पेशा असलेला माध्यमांचा व्यवसाय आता एक मोठा उद्योग बनला आहे. कधीकाळी विचारवंत, संपादक आपल्या लेखणीच्या बळावर वृत्तपत्र काढीत असत व चालवत असत. मग हळूहळू या माध्यमाची शक्ती ओळखलेल्यांनी त्यात भांडवली गुंतवणूक सुरू केली. तेव्हा त्यात पगारी संपादक आले. पैसा गुंतवणार्‍याने असे बुद्धीमंत पदरी बाळगून माध्यमांचा प्रसार व विस्तार खुप केला. जसजसे लोकशाहीचे लोण पसरत गेले व साक्षरता वाढत गेली, तसतसा वाचक वाढला व माहिती हे एक शस्त्र बनल्यावर लोकमत बनवण्याचे माध्यमे हे एक साधन बनून गेले. तेव्हा त्यात उत्पन्न, नफ़ा हा विषय मागे पडून गुंतवणूक महत्वाची बनत गेली. लोकांपर्यंत जाणार्‍या माहितीवर नियंत्रण ठेवायचे एक मोक्याचे साधन, अशी माध्यमांची ओळख तयार झाली. त्याद्वारे कुणाला मोठे करता येते व कुणाला संपवता येते, याचा साक्षात्कार भांडवली गुंतवणूक करणार्‍यांना झाल्यावर, त्यात इतर अनेक भांडलदारांनी राजकीय गुंतवणूक केली. यातला पहिला अडथळा विचारपत्रे किंवा जुन्या जमान्यातली ध्येयवादी वृत्तपत्रे होती. पोटाला चिमटा येत असतानाही लोकप्रबोधनाचे काम करणारी व्रतस्थ वृत्तपत्रे, साधनांअभावी अस्तित्वाची लढाई लढत होती. विचार हेच भांडवल म्हणून चाललेली ती धडपड अधिक पाने व रंगीत छपाई, अशा लढाईत गारद झाली. तरीही जी टिकून राहिली, त्यांना मग तोट्याच्या जुगारात ओढून संपवण्याचा डाव खेळला गेला. जवळपास नगण्य किंमत व जास्तीत जास्त पाने यातून वाचकाला त्या विचारपत्रांपासून तोडण्यात आले. दुसरीकडे अधिक पगार व सवलती असे आमिष दाखवून, चांगल्या गुणी विचारी पत्रकारांना लाचार करण्यात आले. हे सगळे कशासाठी झाले वा केले गेले?

   अन्य उद्योगात मिळालेला प्रचंड पैसा. अशा बुडीत उद्योगात बुडवणारे लोक, मध्यंतरीच्या काळात झपाट्याने पुढे आले. त्यांनी सुरू केलेल्या या व्यापारात, जुनी अनेक वृत्तपत्रे नष्ट करून टाकली. त्यातून त्यांच्या तालावर नाचणारे संपादक व पत्रकार उदयास आले. वाचकाला स्वस्त पेपर द्यायचा बदल्यात, त्याच्या गळ्यात आपल्याला हवी तशी माहिती घालायची, असे आता माध्यमांचे स्वरूप झाले आहे. मर्डोक नावाच्या भांडवलदाराने जगभरच्या वृत्तपत्रे व माध्यमात उच्छाद घातला. त्यात अगदी अलिकडे ब्रिटनमधील सर्वात जुन्या नियतकालिकाचा बळी गेला. एका अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यामध्ये अडकल्याने त्या वृत्तपत्राच्या संपादकाला गजाआड जाऊन पडायची वेळ आली. त्याच्या पापाचे पाढे वाचले जाऊ लागल्यावर मर्डोक या मालकाने गाशा गुंडाळला. हा माणूस किती मस्तवाल झाला असेल? तो ब्रिटनच्या मंत्री व पंतप्रधानाचे नाव ठरवण्याची भाषा बोलू लागला होता. शेवटी एका जबाबदार वृत्तपत्राने त्याच्या पापाचे पाढे वाचण्याची हिंमत दाखवली. म्हणुन मर्डोकचे पितळ उघडे पडले. तसे त्यात उघडे करण्यासारखे काही खास नव्हते. पण कोणी सत्य बोलायचे? सगळे त्याच्या ढोंगबाजीचे बळी झालेले होते. जसा आपल्याकडे अविष्कार स्वातंत्र्याचा तमाशा चालतो वा त्यासाठी कांगावा केला जात असतो, तसाच तिथे चालू होता. पण गार्डीयन नावाच्या एका वृत्तपत्राने तेवढी हिंमत केली आणि मर्डोकचे पाप उघडे पडले. एकदा ते घडल्यावर इतरांना हिंमत आली आणि त्याच माध्यम सम्राटाला संस़देसमोर उलटतपासणी घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. तत्पुर्वीच त्याने वादाच्या भोवर्‍यात सापडलेले ते जुने वृत्तपत्र थेट बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

   अविष्कार स्वातंत्र्य किंवा लेखन स्वातंत्र्य म्हणून ज्या उचापती चालू होत्या, त्या बिटनच नव्हे तर जगभरचे मोठे पत्रकार उघड्या डोळ्यांनी बघत होते. पण मर्डोकच्या प्रचंड आर्थिक गुंतवणूक व साम्राज्यासमोर त्यांची हिंमत भेदरली होती. त्यामुळेच कुठलीही नितीमुल्ये सोडून चाललेले गैरलागू प्रकार दिसत असूनही, कुठला मान्यवर पत्रकार त्यावर बोलायचे धाडस करात नव्हता. त्यातून मग मर्डोक सारख्यांची हिंमत वाढत असते. त्यांच्यातल्या गुन्हेगारी मानसिकतेला अभय मिळत असते. पण ती त्यांची हिंमत नसते, की ते त्यांचे आर्थिक सामर्थ्य नसते. त्यांचे खरे बळ असते ते इतरांच्या मौनव्रतामध्ये. तुम्ही आम्ही गप्प बसतो, सहन करतो; म्हणून त्यांची हिंमत वाढत असते. त्यातून माध्यमे मग गुंडगिरी करणारी अवजारे बनत जातात. ती लोकांच्या जिवाशी खेळणारी समाजविधातक हत्यारे बनून जातात. आणि त्यासाठीच मग त्यात नफ़ा नको असलेली प्रचंड गुंतवणूक होत असते. त्या गुंतवणूकीला त्याच उद्योगातून नफ़ा नको असतो, तर त्यातून बळ निर्माण करून त्याचे अन्यत्र लाभ उठवायचे असतात. जेव्हा आमच्यातले पत्रकार आपल्या नितीमुल्यांशी सौदे करून त्या व्यापारीकरणाला डोक्यावर चढवून घेतात तेव्हाच, असे मर्डोक शिरजोर होत असतात. दोष त्यांचा असतो, त्यापेक्षा आमच्यातल्या पत्रकारांच्या क्षुद्र मोहाचा असतो. मोठे जाडजुड पगार व ऐषारामी जीवनशैली, यांच्या मोहात सापडून आमचे काही लोक पैशाला शरण जातात; तेव्हा पत्रकारितेचे बाजारीकरण होत असते.

   त्यासाठी मग मर्डोक सारख्या मस्तवालांना गुन्हेगार ठरवून आम्हाला पळ काढता येईल काय? त्यात आम्हीही सारखेच दोषी नसतो काय? जगाच्या प्रत्येक व्यवहारात नाक खुपसणारे आम्ही, स्वत:च्या व्यवसायात शिरलेल्या अपराधी प्रवृत्तीविरुद्ध कधी उभे रहातो काय? इथे कोणी सामान्य पत्रकार खंडणीखोरी करत असेल. पण मर्डोक तरी काय वेगळे करत होता? साधनांमध्ये प्रचंड पैसा गुंतवून त्याने माध्यमांवर कब्जा मिळवला. मग याच्या आधारे त्याने अनेक ब्रिटीश वा अन्य देशातील राजकारण्यांना ओलिस ठेवण्यापर्यंत मजल मारली. पण हे सर्व होऊ शकले, कारण आमचे विचारवंत पत्रकार सत्य बोलण्यापेक्षा राजकीय दृष्टीने योग्य तेवढेच बोलत राहिले होते ना? वास्तविक सत्य दडपण्यात त्यांचाही हात होता ना? (क्रमश:)
भाग  ( २४४ )   २३/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा