बुधवार, ४ एप्रिल, २०१२

ब्राह्मण्य जपण्यासाठीच ब्राह्मण्याला शिव्याशाप


  ’अण्णा व त्यांची टीम ही मंडळी विद्वान किती, चारित्र्यवान किती आणि ते नैतिकतेचे कितपत पालन करणारी आहे? ते स्वतःला सर्वांपेक्षा ते उच्च स्तरावरील पवित्र लोक मानतात? ते खरोखर तसे आहेत की नाहीत हे शंकास्पद आहे. अण्णा व त्यांचा संच यांचा नेहमीच ‘आपण उच्च नैतिक स्तरावर जगणारे स्पेशल लोक आहोत’ असे शिफारसपत्र स्वतःला घेण्याचा पवित्रा असतो. यालाच ‘ब्राह्मण्य’ असे म्हणतात. जन्माने ब्राह्मण नसलेल्या व्यक्तीमध्ये देखील ‘ ब्राह्मण्य’ ठासून भरलेले असू शकते, हे अजून भारतीय नागरिकांना उमगलेले नाही. हा ब्राह्मण्याचा दोष अण्णांमध्ये जन्मामुळे नव्हे; तर त्यांच्या पायामधून डोक्यात शिरलेला आहे. जेव्हा लोक आपल्या पाया पडतात, तेव्हा आपण देव आहोत असा भ्रम पाया पडून घेणार्‍याच्या बुध्दीत शिरतो. तसे होणे स्वाभाविक आहे. दुसर्‍याने आपल्या पायावर माथा टेकवावा ही इच्छा हा सत्ताकांक्षेचाच अविभाज्य भाग आहे. हा मानसिक रोग आहे. तो वाढत जातो. मग देशाच्या संसदेने आपल्या पायावर डोके टेकवावे, आपण संसदेचे बाप आहोत, देशाने राज्यघटना आपल्या पायावर अर्पण करावी असेही वाटू लागते. भोवती सतत कॅमेरे असतील तर कशाचाही विधीनिषेध राहत नाही. कॅमेर्‍यांची संख्या कमी झाली की अधिक विवादास्पद बोलावे, म्हणजे कॅमेरेवाले धावत येतील हे कळते. मग माणूस काहीबाही बोलून कॅमेरे आकर्षित करू लागतो. सामान्य माणसांना चॅनेल्समधून ज्या प्रतिमा त्यांच्यावर आदळतात तेच वास्तव वाटू लागते.’

   हा सप्तर्षी यांच्या लेखातील आणखी एक परिच्छेद आहे. यात त्यांनी जे नैतिकतेचे आरोप अण्णा व त्यांच्या टीमवर केले आहेत ते तसेच्या तसे सप्रर्षी यांच्यासोबत चॅनेलवर दिसणार्‍या विद्वानांमध्ये आढळून येणारा दोष आहे ना? तिथे त्यांच्या बरोबर असणारे राजकीय नेते वा अन्य व्यावसायिक, यांच्यावर सतत आरोप करणारे, त्यांच्यावर तुच्छतेचे शब्द फ़ेकणारे, वागळे, प्रकाश बाळ, आसबे, हेमंतभटजी, समर खडस, अकोलकर काय लायकीचे आहेत? जे आरोप अण्णा टीमचे लोक करतात, तेच ही मंडळी राजकारण्यांवर करत नाहीत काय? मग असे आरोप करण्याचा विशेषाधिकार यांना कोणी दिला? तर तो ब्राह्मण्यातून आलेला आहे. सप्तर्षी यांचा अण्णा टीमवर आक्षेप आहे, तो त्याचसाठी आहे. जे आरोप करण्याचा आपला जन्मसिद्ध अधिकार समजून ते आजवर वागले व जगले, त्यावर अण्णांनी आतिक्रमण केले, याची असुया यातून दिसते. ज्या कारणासाठी ते अण्णा टीमवर ब्राह्मण्याचा आरोप करीत आहेत, तीच कारणे त्यांना व उपरोक्त इतर पत्रकार विद्वानांना लागू होत नाहीत काय? विलासरावांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर, असे म्हणणारे हेमंत देसाई यांना कधी आपल्या खोटेपाणाची लाज वाटली आहे काय? महाराष्ट्र टाईंअसमध्ये असताना त्यांच्या सोबतचा शिरिष निपाणीकर खंडणी घेताना पकडला गेल्याची त्यांना शरम वाटली काय? सप्तर्षी वा वागळे यांना वाटली आहे काय? असती तर त्यांनी अण्णा टीमवर आरोप करण्याआधी आपले चेहरे आरश्यात बघून घेतले असते. पण हे पडले मुलखाचे बेशरम. किंबहूना तिच यांनी वाहिनीवर येण्याची आजची खरी गुणवत्ता आहे. ते वे्डसर मुर्खासारखे बोलू शकतात, म्हणुन त्यांना वाहिन्यांवर आमंत्रण मिळते असे डॉक्टर महाशयांनी प्रामाणिकपणे सांगितले याचे कौतुक करा्वे लागेल. उपरोक्त परिच्छेदात ते काय म्हणतात?

   ’भोवती सतत कॅमेरे असतील तर कशाचाही विधीनिषेध राहत नाही. कॅमेर्‍यांची संख्या कमी झाली की अधिक विवादास्पद बोलावे, म्हणजे कॅमेरेवाले धावत येतील हे कळते. मग माणूस काहीबाही बोलून कॅमेरे आकर्षित करू लागतो.’    

   सप्तर्षी यांच्या याच लेखातील या विधानामुळे मला ही मडळी नियमित वाहिन्यावर का बोलावली जातात, याचे रहस्य उलगडले. विवादास्पद, वेडगळ, खुळचट काहीही बोलण्याची त्यांची क्षमता, हेच त्याचे कारण आहे ना? ठोकपाल हेमंतभटजी देसाई सर्वाधिक वेळा निखिलच्या कार्यक्रमात का असतात, ते सप्तर्षी यांच्या वरच्या विधानातून आपल्याला कळू शकते. हेमतभटजी ज्या दिवशी शहाण्यासारखे बोलू लागतील, त्या दिवशी त्यांना वहिन्यावरून गचांडी मिळाल्याशिवाय रहाणार नाही. लोकांना कळणार नाही, पटणार नाही, असे विधीनिषेधशून्य बोलण्याच्या गुणवत्तेमुळेच त्यांना सतत टीव्ही कॅमेरे चमकवत असतात. ते रह्स्य वाचकांना उलगडून दाखवल्याबद्दल मी सप्तर्षींचे आभार मानतो. राहिला ब्राह्मण्याचा आरोप.

   ’आपण उच्च नैतिक स्तरावर जगणारे स्पेशल लोक आहोत’ असे शिफारसपत्र स्वतःला घेण्याचा पवित्रा असतो. यालाच ‘ब्राह्मण्य’ असे म्हणतात. जन्माने ब्राह्मण नसलेल्या व्यक्तीमध्ये देखील ‘ब्राह्मण्य’ ठासून भरलेले असू शकते, हे अजून भारतीय नागरिकांना उमगलेले नाही.’ असे सप्तर्षी म्हणतात. हे वर्णन अण्णा टीमपेक्षा सप्रर्षी यांच्यासारखे जे भटजी वाहिन्यांवर दिसतात, त्यांनाच ते वर्णन अधिक लागू पडते. अवघे जग चुकते आहे आणि सत्य काय ते आम्हालाच उमगलेले व गवसलेले आहे, असाच त्यांचा आव असतो ना? ते ब्राह्मण्य़ समर खडस, प्रताप आसबे अशा जन्माने ब्राह्मण नसलेल्या व्यक्तीमध्येसुद्धा या हेमंतभटजी वा सप्तर्षी यांच्या संसर्गाने आलेले आहे. नुसते आलेले नाही, तर अगदी ठासून भरलेले आहे. नुसते भरलेले नाही तर संधी मिळाली तर ते ओसंडून वाहू लागते. मग ते आवरायला लोकांना यांच्या अविष्कार स्वातंत्र्यावर चाबुक उगारावा लागतो. बिचार्‍या संभाजी ब्रिगेड वा जिजाऊ ब्रिगेडवाल्यांना ते अजून ’उमगलेले’ नाही.

   चर्चेला आलेल्या इतरेजनांविषयी हेच लोक ज्या तुच्छतेने बोलत व वागत असतात, ते पाहिल्यास त्यांचे ब्राह्मण्य लपून रहात नाही. त्यांच्या अण्णांवरील टिकेत वा अन्य राजकीय सामाजिक नेते कार्यकर्त्यांविषयीच्या तुच्छतेतून, त्याचे दर्शन नियमित घडत असते. राजर्षी शाहू महाराजांना शुद्र म्हणणारे तेव्हाचे महामहोपाध्याय आणि आज वाहिन्या वा माध्यमातून लोकमान्य नेते, कार्यकर्ते यांच्यावर तुच्छतेचे शिंतोडे उडवणार्‍या या विद्वानांची जातकुळी वेगळी अजिबात नाही. त्यात काही जन्मजात ब्राह्मण असतील, तर काही त्यांच्या संसर्गाने भटाळलेले असतील इतकेच. पण त्यांच्या ब्राह्मण्याचा उग्र दर्प लपून रहात नाही. मग त्या भटांची नक्कल करणारे आसबे बघितले, की त्यांची अधिकच कींव येते. यातला ब्राह्मणी कावा लक्षात घेण्यासारखा आहे. संघ, भाजपा यांच्यासह हिंदुत्वाला शिव्या मोजायच्या, पण धुर्तपणे आपले ब्राह्मणी वर्चस्व जपून बहुजन समाजाला मान्य असेल, अशा नेतृत्वाची संकल्पनेची विटंबना करत रहायचे. शाहू, फ़ुले, आंबेडकर यांची त्यांच्या जमान्यातल्या मान्यवर विद्वानांनी अशीच हेटाळणी केली होती ना? त्यापेक्षा हे आजचे विद्वान काय करीत आहेत? तेव्हा त्यांच्यावर धर्माचे पावित्र्य बुडवल्याचे आरोप केले जात होते. आज लोकशाही, संसद, घटना यांचे पावित्र्य सांगत, हे आजचे भटजी आजच्या लोकमान्य नेते व्यक्तींची हेटाळणी करीत असतात ना? ब्राह्मण्य ते असते. यालाच बदमाशी म्हणतात, ब्राह्मण्याला लाखोली वहात पुन्हा तीच ब्राह्मणी प्रवृत्ती जोपासायची. समाजात दुफ़ळी माजवून त्याचा बुद्धीभेद करायचा.  पुन्हा त्यासाठी शाहू, फ़ुले आंबेडकरांचीच नावे वापरायची.  (क्रमश:)
भाग  ( २२५ )  ४/४/१२

२ टिप्पण्या:

  1. एख्याद्या दोषाला (नैतिक अहंगन्डतेच्या) 'ब्राह्मण्य' हे जाती-सदृश नाव देण्याला वैचारिक 'शुद्र'ता म्हणायचे का मग?

    उत्तर द्याहटवा