रविवार, २२ एप्रिल, २०१२

ज्येष्ठ खोटारडे आणि खास थापाडे


   लोकशाहीत मतभिन्नतेला महत्व आहे. एकाच एका मताचा आग्रह लोकशाहीला मारक असतो. शिवाय संवाद हा लोकशाहीचा पाया असतो. त्यामुळे जे विविध विचारप्रवाह येत असतात ते समजून घेणे आवश्यक असते. ते मतप्रवाह काय आहेत, त्याची माहिती लोकांना करून देण्याची महत्वपुर्ण कामगिरी माध्यमांनी पार पाडायची असते. आणि म्हणूनच माध्यमांनी म्हणजेच पत्रकारने तटस्थ असणे अपरिहार्य असते. त्याऐवजी माध्यमे वा पत्रकारच एका ठराविक भूमिकेला चिकटून बसले, मग ते बुद्धींमंत उरत नाहीत, तर प्रचारक होऊन जातात. डॉक्टर हा चिकित्सक असला पाहिजे. त्याच्याकडे रोगी आला, मग त्याला कसली बाधा झाली आहे त्याची चिकित्सा करून डॉक्टरने उपचार करावेत ही अपेक्षा असते. तशीच पत्रकाराची भूमिका चिकित्सक असायला हवी. तो गांधीवादी असेल अतर तो सावरकर विचारांचे विश्लेषण करताना पुर्वग्रहदुषित असतो. कारण गांधीवादी असणे म्हणजे सावरकर विचारांचा विरोधक असणे अशीच त्याची ठाम समजूत असते. मग तो डोळसपणे सावरकर विचारांचे वा त्यानुसार काम करणार्‍य़ा संस्था संघटनेचे विश्लेषण करूच शकत नाही. तीच गोष्ट जो सावरकर विचारांनी भारावलेला आहेत्याची. तो गांधीवादी विचार वा संस्थेला न्याय देऊ शकणार नाही. न्याय याचा अर्थ त्यातले गुणदोष मांडणे असते. मनात अढी असली, मग समोरच्या घटना कृतीमधले गुण बघताच येत नाहीत. त्याचप्रमाणे जर तुम्ही विचारांना बांधील असाल, तर त्या विचारांशी बांधील असलेल्या संस्था संघटनांचे दोष दिसत असूनही बघता येत नाहीत. आणि दिसले तरी ते लपवायचा मोह आवरता येत नाही. समर खडस, निखिल वागळे, प्रकाश अकोलकर वा हेमंत देसाई असे पत्रकार तसेच समाजवादी वा सेक्युलर विचारसरणीचे गुलाम आहेत. त्यामुळे त्यांना त्यातले दोष बघता येत नाहीत व दिसले तर सांगता येत नाहीत. दुसरीकडे भाजपा किंवा कुणा हिंदूत्व मानणार्‍या संस्था संघटनाचे चांगले काम त्यांना बघताच येत नाही. अशा चांगल्या गोष्टीतही ते दोष शोधू लागतात. कारण मुळातच त्यांना तटस्थपणे चिकित्सा करता येत नसते. मग आपली पक्षपाती चिकित्सा लपवताना त्यांची अधिकच तारांबळ उडते.  

   आता गेल्या आठवड्यातलीच गोष्ट घ्या. नितीशकुमार व मनसे यांची जुंपली होती. महाराष्ट्रात बिहारदिन नको असे मनसेचे म्हणणे होते. मग तो सांस्कृतिक कार्यक्रम आहे, म्हणून त्याबद्दल मनसेचा विरोध मावळला. त्या आधी स्वर्णिम गुजरात कार्यक्रमात सेना वा मनसेने भाग घेतला. म्हणुन त्यांच्या मराठी अस्मितेची टवाळी करण्यात हे तमाम पत्रकार आघाडीवर दिसत होते. त्यांना मुळात अस्मिता हिच हास्यास्पद गोष्ट वाटते. पण त्यापैकी कितीजणांना अस्मिता म्हणजे नेमके काय ते ठाऊक आहे? मनसे स्थापन झाली तेव्हापासून कोणी लगेच बिहारी लोकांवर मुंबईत हल्ले चढवले नव्हते. उत्तर भारतीयांना मुंबईतून पळवून लावले नव्हते. तो विषय ऐरणीवर केव्हा आला? अमरसिंग यांनी शिवाजीपर्क येथील सभेत डंडा घेऊन मनसेची खोड मोडण्याची भाषा वापरली, तेव्हा हाणामारीचा विषय सुरू झाला. म्हणजे मुद्दा इथे येणार्‍या परप्रांतियांचा नसून, इथे येऊन इथल्याच भुमिपुत्रांना दमदाटी करण्याचा मुद्दा आहे. तो अस्मितेपेक्षा अस्तित्वाच सवाल आहे. हा फ़रक सहज समजून घेण्यासारखा आहे. पण तो समजून घ्यायचा तर आधी कोण काय करतो व म्हणतो, ते समजून घ्यावे लागेल. वाहिन्यांवरील चर्चेत भाग घेणार्‍यांकडे पाहिले तर लक्षात येईल, की त्यांना काय घडले वा बोलले गेले, त्याच्याशी कसलेच कर्तव्य नसते. त्यांचे मत आधीपासून तयार असते. जे ठामपणे मनसेला चुकीचे ठरवून बसले आहेत, त्यांनाच तिथे आमंत्रित केलेले असते.

   गेल्या काही महिन्यात गो. रा. खैरनार कुठल्या वाहिनीवर दिसले आहेत काय? अण्णांचे आंदोलन ऐन भरात असताना प्रत्येक वाहिनीवर खैरनार दिसत होते. अगदी मराठीच नव्हे तर हिंदी वाहिन्यांवरही त्यांना खुप मागणी होती. आता लोकपालचा मोसम मागे पडला आणि खैरनारना कोणी कुठल्या चर्चेत भाग घ्यायला बोलावत नाही. कदाचीत अण्णांचे आंदोलन पुन्हा जोरात पेटले, तर खैरनार यांना वाहिन्यांवर आंमंत्रणे मिळू लागतील. हा काय प्रकार आहे? तर खैरनार हे अण्णांवर बेछूट आरोप करण्यातले ज्येष्ठ आहेत. तेव्हा मग खडस, आसबे कनिष्ठ होतात आणि त्यांची जागा खैरनार यांना दिली जाते. कशाला बरे? तर त्या चर्चेतून अण्णांच्या आंदोलनाचे विश्लेषण, चिकित्सा वगैरे करायची नसते; तर अण्णांवर चिखलफ़ेक करायची असते. मग ती हमखास करू शकतील, त्यांनाच त्यात खास पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले असते. राजू परुळेकर यांचेही तसेच आहे. अण्णांवर चिखलफ़ेक करायची होती, तेव्हा त्यांना प्रत्येक वाहिनी आग्रहाने बोलावत होती. आज त्यांचा गोंडस चेहरा कुठल्याही वाहिनीच्या संपादकाला नकोसा वाटतो. कारण काय असावे? राजू परुळेकर किंवा खैरनार हे अण्णांच्या आंदोलनाचे खास अभ्यासक आहेत काय? बाकी जगातल्या घडामोडींबदाल ते ठार अडाणी आहेत काय? नसतील तर त्यांना अन्य विषयावर बहिष्कृत ठेवायचे कारण काय? अण्णा सोडून अन्य अनेक विषयावरही ते दोघे आपले ’बहुमोल’ मत देऊ शकतील की. पण ती माहिती हवीच कुणाला आहे? त्यांचे मत कोणालाच नको असते. तर त्यांनी अण्णांच्या आंदोलनाबद्द्ल शंका व संशय निर्माण करावेत, एवढ्यासाठीच त्यांना तेव्हा बोलावले जात होते. पुन्हा तशी गरज भासली तर त्यांना वाहिन्यांच्या चर्चेत तेजी येईल सुद्धा.

   तर मुद्दा इतकाच, की अशा चर्चांमध्ये कुठली चिकित्सा होत नाही, की करण्याची इच्छा नसते. त्यातून कोणाला तरी बदनाम करण्याचा हेतू साध्य करायचा असतो. नाहीतर उखाळ्या पाखाळ्या काढायच्या असतात. त्यामुळेच तिथे प्रत्येक आमंत्रित हा पक्षपाती व पुर्वग्रह दुषित असेल याची पुर्ण खात्री करून घेतली जात असते. तुम्ही दिर्घकाळ या चर्चा ऐकत वा बघत असाल तर आठवून बघा. कधी एकदा तरी प्रकाश बाळ यांनी भाजपाचा एखादा चांगला गुण कथन केला आहे काय? निखिल वागळे यांनी शिवसेनेच्या कुठल्या चांगल्या कामाचा उल्लेख केला आहे काय? हेमंत देसाई यांच्या बोलण्यात कधी मनसेच्या एखाद्या उल्लेखनिय कर्तृत्वाचा दाखला दिला गेला आहे काय? इतक्या काळ चाललेल्या या संघटना वा संस्थांकडून एखादे तरी चांगले काम झालेले असेल ना? मग त्याचा उल्लेखही यांच्या तोंडून का होत नाही? त्यांच्या तुलनेत फ़डतुस म्हणाव्यात अशा संस्था संघटनांच्या कामाचेही कौतूक याच लोकांनी केलेले आहे. पण सेना, भाजपा वा मनसे यांच्याविषयी त्यांच्या मनात कायमची अढी आहे. आणि त्याचसाठी त्यांना अगत्याचे आमंत्रण असते. ते चिकित्सा करण्यासाठी नसते, तर त्या संघटनांवर चिखलफ़ेक करण्यासाठीच असते. त्या चर्चेचा हेतूच मुळात चिकित्सेचा नसतो तर त्यातून त्या संघटनेला बदनाम करायचा वा तिच्याविषयी गैरसमज पसरवण्याचा असतो. मग त्यासाठीच उपयोगी पडतील असे पाहूणे आमंत्रीत केलेले असतात. ते तटस्थ असणार नाहीत याची निवड करतानाच काळजी घेतली जात असते. सहाजिकच या चर्चा बारकाईने अभ्यासल्या तर पक्षपाती व फ़सव्या व दिशाभुल करणार्‍या असतात.

    आजचा सवाल हीच चर्चा घ्या. एका बाजूला त्यावरील चर्चा चालू असते आणि दुसरीकडे त्याबद्दल प्रेक्षक आपले मत नोंदवत असतो. त्यांचाच प्रेक्षक आमंत्रितांच्या मताविरुद्ध कौल देत असतो. ’लोकमत’ नावाच्या वाहिनीवर होणार्‍या चर्चेच्या विरोधात त्यांच्याच प्रेक्षकाचा कौल हे लोकमत मानायचे, की तिथे चाललेला पक्षपाती चर्चेचा देखावा हे लोकमत मानायचे? इंटरनेटवर या मतविभागणीचे आकडे उपलब्ध आहेत. जवळपास प्रत्येक विषयात वाहिनीवरची चर्चा विरुद्ध प्रेक्षकांचा कौल असेच चित्र दिसते. म्हणजे या चर्चा खोट्या व दिखावू असतात हे प्रेक्षकही ओळखू लागला आहे. मागल्याच आठवड्यात अण्णांच्या विश्वासार्हतेबद्दल चर्चा चालली होती व तिथले शहाणे अण्णांवरील लोकांचा विश्वास उडत चालल्याचे मतप्रदर्शन करत होते. मात्र त्याच वेळी वाहिनीचा प्रेक्षक ९० टक्क्याहुन अधिक मतांनी अण्णाच बरोबर असल्याची ग्वाही देत होता. अशावेळी प्रत्येक ब्रेक घेताना हे आकडे सांगणार्‍या निखिलचा ओशाळवाणा चेहरा बघताना माझ्याप्रमाणेच प्रेक्षकांना मजा येते काय? नसेल तर ते असे मतदान कशाला करत असतील? हे मतदान व त्याचे आकडेच खुप काही सांगतात. सामान्य माणसाला आता अशा फ़सव्या चर्चा व त्यातून दाखवले जाणारे धडधडीत खोटे समजू लागले आहे, एवढाच त्या मतविभागणी आकड्याचा अर्थ आहे. अण्णांच्या विश्वासार्हतेपेक्षा माध्यमांची विश्वासार्हता आता पणाला लागायची वेळ आली आहे. कारण आता या ज्येष्ठ खोटारडे व खास थापाडे यांच्यावर लोकांचा विश्वास उरलेला नाही.    (क्रमश:)
भाग  ( २४३ )   २२/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा