मंगळवार, १० एप्रिल, २०१२

वैचारिक भोंदुगिरीला कंटाळून लोक ’भक्तीला’ लागले


   ठोकपाल हेमंतभटजी कधी समाजवादी झाले ते मला ठाऊक नाही. काही पुस्तके वाचली किंवा कुणा जुन्या नेत्यांची आत्मचरित्रे तोंडपाठ केली, म्हणून कोणी समाजवादी होत नाही. समाजवाद, मार्क्सवाद, गांधीवाद अशा ज्या विचारधारा असतात, त्या पुस्तकापुरत्या नसतात. त्यांचा सामान्य माणसाच्या जिवनाशी थेट संबंध असतो. जेव्हा तो संबंध संपतो, तेव्हा ते विचार पुराण व भाकडकथा होऊन जातात. हेमंतभटजी वा डॉ. सप्तर्षी, हुसेन दलवाई किंवा आजच्या पिढीतले अनेक बाजारू समाजवादी आहेत, त्यांनी आपापल्या व्यक्तीगत स्वार्थासाठी अशा महान विचारांचा बाजार करून टाकला आहे. धर्मकर्मकांड करून जसे पुर्वाश्रमीच्या भटजींनी पावित्र्याचेच बाजारीकरण केले व धर्माच्या नावाने दुकान मांडून आपली तुंबडी भरण्याचे उद्योग केले, तेव्हाच धर्माची संकल्पना सामान्य माणसाच्या जीवनापासून दुरावत गेली. त्याचे थोतांड बनत गेले. सेक्युलर विचार, समाजवादी कल्पना अशीच आज रसातळाला गेली आहे. त्यातून समाज संपला आणि वाद तेवढा उरला आहे. मग असे भटजी त्याची कालबाह्य महती सांगून आपले पोट जाळण्याचा उद्योग करत असतात.

   ज्यांनी आपल्या आयुष्य़ाची समाजवादी विचारांसाठी होळी करून घेतली व कधी काळाच्या पडद्याआड गेले ते कुणाला कळलेच नाही.  त्यापैकी कुणाची नावे तरी या हेमंतभटजींना माहीत आहेत काय? बाबू मुंबरकर, शोशन्ना पाध्ये, लक्ष्मण जाधव, प्रभाकर मोरे, सोहनसिंग कोहली, नारायण तावडे अशा शेकडो सामान्य समाजवादी कार्यकर्ते, नेत्यांची चरित्रे उज्ज्वल होती. त्यांनी घरसंसारावर निखारे ठेवून विचारांशी एकनिष्ठा दाखवली. त्याची प्रचंड व्यवहारी किंमत मोजली. त्यापैकी कोणाच्या चरित्र, प्रामाणिकपणाची आठवण हेमंतभटजींना का होत नाही? त्यांची चरित्रे लिहिली व छापली गेली नाहीत म्हणून? मुंबईत सर्वप्रथम झोपडीवासियांच्या समस्येसाठी कंबर कसून उभा राहिलेला बाबू मुंबरकर आणि बॉम्बे लेबर युनियनची पुर्णवेळ कार्यकर्ता म्हणुन मिळणार्‍या तुटपुंज्या वेतनात बाबूचा चंद्रमौळी संसार संभाळाणारी तुळसा मुंबरकर, हेमंतभटजींना का आठवली नाही? मी त्यांच्यावर कुठला आरोप केलेला नाही. त्यांच्यावर मी चिखलफ़ेक केली नाही. कारण त्यांनी समाजवादी विचारांसाठी आपल्या जगण्याचाच चिखल करून घेतला. पण त्यातही ते समाधानी होते. घरात चुल पेटत नसतानाही पोलिसांच्या लाठ्य़ा खाऊन घरी आल्यावर तृप्तीचा ढेकर देणारे ते समाजवादी मी जवळून पाहिलेत. अठराविश्वे दारिद्र्यातही ते श्रीमंतीला लाजावणारे जीवन जगले. भागीत इराण्याचा पानिकम चहा अर्धा अर्धा पिवून सुखी होते. ते कोणी समाजवादी हेमंतभटजींना माहितसुद्धा नाहीत. त्यांना फ़क्त वृत्तपत्रात ज्यांच्यावर लेख छापून आलेत वा पुस्तके, स्मरणिका प्रसिद्ध झाल्यात, असे मधूनाना दंडवते तेवढे आठवतात. कारण त्यांचे सर्व ज्ञान पुस्तकातून आलेले आहे. वास्तव जगातल्या समाजवादी चळवळीशी अशा ग्रंथप्रामाण्यवाद्यांचा कधी संबंधच आला नाही. त्यांनी काही दंतकथा निळू दामले वा निखिलकडून ऐकल्या. त्यावरून ते मला समाजवादाच्या गप्पा सांगत आहेत.

   अंगात खादी परिधान करणारे असे टिनोपाल समाजवादी तेव्हाही खुप होते व आज तर तसलेच समाजवादी उरलेत. कोण कधी डोळा मारून बोलावतो याची प्रतिक्षा करीत आपले पावित्र्य, पातिव्रत्य सांगणार्‍यांच्या सहवासात समाजवादाच्या दंतकथा ऐकलेल्या अर्धवट भटांना समाजवाद कोणी सांगावा? त्यांनी मधूनानांच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या असतील, पण घामाच्या वासाने दरवळणारा, मळकट कपड्यातला बाबू मुंबरकर बघितला सुद्धा नसेल. अखेरपर्यंत झोपडीत वास्तव्य करून रहिवाश्यांच्या समस्या सोडवताना, घरात दाणागोटा नसलेल्या सोहनसिंग कोहलीचा संसार त्यांनी बघितलेला नाही. त्या मळकट कपड्यातही जे पावित्र्य व चारित्र्य होते, त्याची सर मधुनानांच्या कौतुकात सापडणार नाही. आणि असे एक दोन नाही, शेकडो समाजवादी कार्यकर्त्यांनी समाजवादी चळवळ बनली होती. हेमंतभटजीसारखे टिनोपाल छाप पुस्तकपंडीत त्यात घुसले त्यामुळे त्या चळवळीचा बोजवारा उडाला. त्या कार्यकर्त्यांनी  बोलघेवडेपणा करण्यापेक्षा विचारांचे अनुकरण करून लोकांसमोर आदर्श निर्माण केले होते. त्यांना कुणा एसेम, मधूनाना यांचे हवाले देण्याची गरज भासत नसे. लोकांना समाजवाद सांगत ऐषारामी जीवन जगणारे ते ढोंगी नव्हते. तेच कशाला? बॉम्बे लेबर युनियनच्या ऑफ़िसमधला लोटलीकर सुद्धा मधूनानांच्या तुलनेत कमी चारित्र्यवान समाजवादी नव्हता. पण रंगल्या तोंडाचे मुके घेतच समाजवाद वाचलेल्या हेमंतभटजींना यातले काय माहित असायचे? मग आपले अज्ञान लपवायला ते मधूनाना दंडवत्यांचे एक वाक्य समोर फ़ेकून आपले समाजवादी पांडित्य खपवू बघतात.

   समाजवादी चळवळ अशी बाजारू केली त्यांच्या गोतावळ्यातच पंगतीतून सांडलेले खरकटे पक्वान्न म्हणून खाल्ले त्या हेमंतभटजींना खरा अस्सल समाजवाद व त्याची चळवळ, त्याचे चरित्र कसे ठाऊक असायचे? आणि त्यासाठी मधूनाना दंडवते यांच्या आठवणी सांगण्याची गरज नाही. जे समा्जवादी चळवळीत होते तेच कम्युनिस्ट पक्षात, जनसंघात, शेतकरी कामगार पक्षात अगदी कॉग्रेस पक्षातही थोड्याफ़ार फ़रकाने दिसून यायचे. तेव्हा मधूनाना दंडवते यांचे दाखले देण्याचे कारण नाही. अगदी पत्रकारात देखील हेमंतभटजी सारखे बाजारबुणगे दुकान थाटून बसलेले बुद्धीवादी नव्हते. त्यांच्याच महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रवासभत्ता नाकारून प्रामाणिक जगलेला दिनू रणदिवे होताच की. त्याचे चारित्र मधूनानांपेक्षा कमी कुठे होते? त्याला आपला समाजवाद सिद्ध करण्यासाठी सेना भाजपा विरुद्ध खोट्या बातम्या वा लिखाण करावे लागले नव्हते. दिनू इतका प्रामाणिक व्यवहार हेमंतभटजी करू शकले आहेत काय? दिनू रणदिवेसारखा निष्ठावान पत्रकार जोवर महाराष्ट्र टाईम्समध्ये होता, तोवर तिथे निपाणीकर सारखे खंडणीखोर घुसखोरी करू शकले नव्हते. हेमंतभटजी सारखे लोक तिथे आल्यावर त्याच महाराष्ट्र टाईम्सची काय अवस्था झाली? तिथे शिरिष निपाणीकर सारखे खंडणीखोर बातमीदार म्हणून प्रतिष्ठीत झाले. तेव्हा मला मधूनाना सांगण्यापेक्षा हेमंतभटजींनी दिनू रणदिवेचे उदाहरण दिले, तरी पुरले असते. पण ते द्यायचे कसे? या भटजींचे हात निपाणीकराच्या पापाने बरबटलेले. तेव्हा आपले पाप झाकायला हे कोलांटी उडी मारुन मधूनानांची उदाहरणे देतात.

   जेव्हा प्रश्नाचे उत्तर नसते, तेव्हा माणुस विषय बदलण्याची कसरत करू लागतो. मी समाजवाद्यांवर किंवा आजकालच्या ढोंगी सेक्युलरवाद्यांवर टिका करत असतो. ती त्यांच्यावर टिका असते. त्या विचारावर नव्हे, तर त्यांनी त्या विचाराचे जे विकृतीकरण केले आहे, त्यावर केलेला तो हल्ला असतो. हेमंतभटजींना ते चांगलेच कळते. पण त्यांना ते पचवता येत नाही. त्यावर उत्तर नाही. मग ते मधुनाना दंडवते यांच्या चरित्राचा सातबारा आपल्या नावावर करून त्यांचे श्रेय उकळू बघतात. गांधी असो की लोहिया, मधूनाना असोत की एसेम, त्यांची पुण्याई त्यांनी सप्तर्षी वा हेमंतभटजी यांच्या उधळपट्टीसाठी जमवलेली नाही. तेव्हा त्यांच्या पावित्र्याचे दाखले देण्याची गरज नाही. जे हेमंतभटजी, आसबे, खडस, वागळे, अकोलकर, प्रकाश बाळ असे नवे सेक्युलर दिवटे आहेत, त्यांनी जो समाजवादाचा बोजवारा उडवला आहे, त्याची सफ़ाई मी मागतो आहे. त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाबद्दल दाखले द्यावे. स्वत:चा प्रामाणिकपणा दाखवावा. विलासरावांनी लाज असेल तर राजिनामा द्यावा म्हणणार्‍या हेमंत देसाईंनी निपाणीकर प्रकरण घडल्यावर काय दिवे लावले होते? त्यांना लोकमत वाहीनीवर बोलताना पेडन्युजबद्दल बोलायचे धाडस का होत नाही? मधुनाना अशा गोष्टी पाठीशी घालत होते काय?

असे भुरटे व भामटे विचारवंत म्हणुन मिरवू लागले, तिथूनच आपल्या समाजात बदमाशी प्रतिष्ठीत झाली आहे. जर संपादक म्हणुन कुमार केतकर व सहसंपादक म्हणुन हेमंत देसाई खंडणीखोर निपाणीकराला पाठीशी घालत असतील, तर खुनाची सुपारी देणार्‍या पद्मसिंह पाटलांना शरद पवार व अजित पवारांनी का संरक्षण देऊ नये? माझ्या इतक्या थेट आरोपानंतर हेमंतभटजी सत्यवादी असल्याचा टेंभा मिरवत असतील, तर विलासरावांनी कोर्टाच्या ताशेर्‍यानंतर राजिनामा कशाला द्यायला हवा? जर खोटारडे व भुरटेच प्रतिष्ठीत म्हणुन वागत असतील, तर त्यांच्याप्रमाणे अनुकरण करणे प्रतिष्ठेचे होत नाही काय? आजचे राजकारणी यांच्या आरोपांना दाद व किंमत देत नाहीत, कारण त्यांना सवाल करणार्‍यांपाशी तेवढी नैतिक ताकदच उरलेली नाही. म्हणुनच त्यांना अण्णा हजारे मोठे साधूपुरूष वाटू लागले आहेत. स्वामी रामदेव महान भासू लागले आहेत. कधी काळी अत्रे, डांगे, एसेम, गोरे यांच्या भाषणाला लोटणारी गर्दी, आता अण्णा व स्वामी यांच्याकडे वळू लागली आहे. तो धर्म व भक्तीभाव असण्यापेक्षा विश्वासार्हतेचा पुरावा आहे. भटजीगिरीला व भामटेगिरीला विटलेला समाज आज तिकडे वळतो आहे. ते अण्णांचे कर्तृत्व नाही की रामदेवांच्या योगाचा तो महिमा नाही. ती आजच्य सेक्युलर समाजवाद्यांची बौद्धिक दिवाळ्खोरी त्याला कारण आहे.  (क्रमश:)
भाग    ( २३० )  ९/४/१२    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा