सोमवार, २ एप्रिल, २०१२

शंकासुराची पुराणकथा की बुद्धीमंताची व्यथा?



   एका माणसावर आणि एका लेखाबद्दल इतके का लिहावे असे कोणालाही वाटेल. पण मुद्दा त्या व्यक्तीचा वा लेखाचा नसतो, तर त्यातून लोकांची कशी दिशाभूल चालू असते, त्याचे नेमके पोस्टमार्टेम करणे अगत्याचे असते. पोस्ट्मार्टेम मेलेल्या माणसाला जीवंत करणार नसते. पण त्याच्या मृत्यूची नेमकी कारणमिमांसा झाली, तर पुढल्या बळीला वाचवणे शक्य असते. तेवढ्यासाठी अशी कारणमिमांसा केली जात असते. डॉ. सप्तर्षी यांचा हा लेख आजकालच्या बौद्धिक भामटेगिरीचा उत्तम नमूना आहे. म्हणुनच त्यातली भाषा, फ़सवा युक्तीवाद. विरोधाभास, परस्पर विरोधी वकव्ये; लोकांना समजून घ्यायला शिकवणे मला अगत्याचे वाटते. तुम्ही कधी सप्तर्षी यांना वाहिनीवर पाहिले असेल तर त्यांचा नेहमी हसतमुख दिसणरा चेहरा; आपण जगातले सर्वज्ञ आहोत अशा अविर्भावात दिसतो. त्यांचे बोलणे सुद्धा आपण सर्वज्ञानी आहोत अशा थाटातले असते. आणि त्याच थाटात त्यांनी अण्णांना अडाणी म्हणून टाकले आहे. पण त्याचवेळी त्याच अण्णांच्या गावंढळपणाने लोकांमध्ये लोकशाही विषयक जागृती झाल्याचेही मान्य केले आहे. पण हे सर्व अशा पद्धतीने मांडले आहे, की त्यात अण्णांचे गुण दिसू नयेत तर अण्णा हा कोणी उपद्रवी प्राणी वाटावा, असा त्यामागचा स्पष्ट हेतू आहे. आपण लोकशाहीसाठी लढलो व तुरूंगात गेलो, असे सांगून आपणच तेव्हा लोकशाही सुरक्षित ठेवली वा तिची पुनर्स्थापना केली, असा आव त्यांनी आणला आहे. पण इतिहास वा सत्य त्याची ग्वाही देते काय?

’तरीही आंतरिक शक्तीच्या आधारे १९७७ च्या निवडणुकीत देशाने इंदिरा गांधींना पराभूत केले. कॉग्रेस पक्षाची सत्तेवरून हकालपट्टी केली. लोकशाहीची पुनर्स्थापना केली. भारतीय राज्यघटनेने संकटकाळी आपले अंतर्भूत सामर्थ्य आणि तेज दाखविले. त्या संकटात लोकशाही प्रणाली एका अग्निदिव्यातून बाहेर पडली.’

   असे सप्तर्षी आपल्या लेखात म्हणतात. कोणती ही आंतरिक शक्ती ते सांगत आहेत? १९७६ साली संसदेची मुदत संपली होती. इंदिराजींनी संसदेची मुदत एक वर्षाने वाढवणारी घटना दुरुस्ती करून घेतली. ती मुदत संपली. तर त्यांनी पुन्हा एक वर्षाने मुदत वाढवताना सर्व विधानसभांची मुदत वर्षाने वाढवली होती. हे सर्व होत असताना, या ऋषींची ती आंतरिक शक्ती कुठले गवत चरत भरकटली होती? तब्बल १९ महिने इंदिरा गांधींनी मनमानी केली आणि त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत करणार्‍याला गजाआड ढकलण्याचे धाडसही दाखवले होते. त्या सर्व काळात ही आंतरिक शक्ती कुठे होती? इंदिराजींना पुन्हा निवडणूका घेण्याची सुबुद्धी झाली नसती तर कुमार म्हणतात ती लोकशाहीची पुर्स्थापना कशी होणार होती? की या सप्त ऋषींच्या आंतरिक शक्तीने इंदिराजींना निवडणूका घेण्याची सुबुद्धी दिली, असे त्यांना सुचवायचे आहे? कारण त्या १९७७ च्या निवडणूका केवळ इंदिराजींच्या इच्छेमुळेच होऊ शकल्या. इतर कुठल्या कारणाने होऊ शकल्या नाहीत. राज्यघटनेने संकटकाळी आपले अंतर्भूत सामर्थ्य व तेज दाखवले ते नेमके कुठले? ते आमच्यासारख्या सामान्य नजरेच्या लोकांना का दिसले नाही? मलाच नव्हेतर इतर कुणा पत्रकार इतिहासकारालाही ते तेज दिसलेले नाही. की सप्तर्षी हे जन्मजात ऋषी असल्याने, असे चमत्कार बघण्याची दिव्य दृष्टी त्यांनाच लाभलेली आहे. म्हणुन ते राज्यघटनेचे तेज व सामर्थ्य पाहू शकले व आम्ही पामरे बघू शकलो नाही?

   स्वत:ला विज्ञाननिष्ठ म्हणवणारा माणुस जेब्हा अशी भाषा वापरतो, तेव्हा त्याने त्याचे वैज्ञानिक नाही तरी तर्कशुद्ध स्पष्टीकरण द्यायला हवे ना? हे ऋषीमुनी नुसतेच शब्दांचे बुडबुडे उडवतात, राज्यघटनेचे तेज, आंतरिक सामर्थ्य, अग्निदिव्य असे शब्द म्हणजे निव्वळ भंपकपणा आहे. समजा इंदिराजींना सुबुद्धी झालीच नसती, तर यांची आंतरिक शक्ती काय करणार होती? पण आपले ते कर्तृत्व भासवण्यासाठी ही शुद्ध भुरटेगिरी चालली आहे. त्यांचे दुखणे वेगळेच आहे. यांच्यासारखे शेकडो हजारो शहाणे गजाआड गेले, तरी कुठले पान हलले नाही. उलट अण्णांच्या अटकेने हजारो लोक रस्त्यावर आले, हे त्यांचे दुखणे आहे. ती जाहिरात असते ना? ’भला उसकी कमीज मेरी कमीजसे सफ़ेद कैसे?’ तसा हा मत्सर आहे. आपल्या अग्निदिव्याला कोणी धुप घातला नाही आणि अण्णांच्या साध्या निरांजनासाठी महाआरतीसारखी गर्दी झाली, याची ती वेदना आहे. ती उघडपणे सांगता येत नाही. मग अर्धे श्रेय अण्णांना द्यायचे आणि आपल्या नाकर्तेपणाच्या इतिहासाचे उदात्तीकरणा करण्यासाठी त्याला आंतरिक शक्ती, सामर्थ्य, तेज वा अग्निदिव्य अशी भाषा वापरायची.  

    ’१९७५ साली पं. इंदिरा गांधींनी घटनात्मक चौकटीत राहून देशावर आणीबाणी लादली’; ’भारतीय राज्यघटनेने संकटकाळी आपले अंतर्भूत सामर्थ्य आणि तेज दाखविले.’  ही दोनच वाक्ये बघा. एकीकडे घटनेच्या चौकटीत राहून आणिबाणी लादली असेल, तर तेव्हा ते घटनेचे सामर्थ्य काय करत होते? राज्यघटना हे काही पुराण वा चमत्कार घडवणारे जादूचे पुस्तक वा मंत्र नाही. ते तर्कशुद्ध बुद्धीच्या आधारे डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेले कायदेशास्त्र आहे. त्याचे कुमारस्वामी पुराणशास्त्र बनवू बघतात काय? त्यांना बुद्धीवाद, तत्वज्ञान आणि राज्यशास्त्र म्हणजे जादूटोणा वाटला काय? त्यांच्या कृती व अनुभवाचे आकलन करताना पौराणिक भाषा वापरायची आणि अण्णांचा अनुभव तपासताना मात्र वैज्ञानिक निकष लावायचे? इथे सगळी गल्लत केली जाते. आणि हा उद्योग सर्वत्र सराईतपणे केला जात असतो. डॉ. लागूंना एक न्याय आणि अन्य बुवाबाजी करणार्‍यांना दुसरा न्याय, हा भेदभाव करणार्‍यांनाच समाजवादी सेक्युलर म्हणतात ना? सप्तर्षी त्याच वंशावळीतले असल्यावर दुसरे काय करणार? एका सेकंदात ते एका बोटावरची थुंकी दुसर्‍या बोटावर करून दाखवतात. आणि अण्णा टीमवर आरोप करताना त्यांना कुठलाही पुरावा आवाश्यक वाटत नाही. त्यांना शंका आली, संशय आला मग तोच भक्कम पुरावा असतो.

   ’प्रस्थापित राज्यघटना बदलून टीम अण्णाची अध्यक्षीय प्रणाली लागू करायची पूर्वतयारी चालू आहे की काय, अशी आम्हाला शंका येऊ लागली’. अशी शंका येण्याचे काही कारण असायला हवे ना? पुरावा नको काय? घटना बदलणे, नवी अध्यक्षीय पद्धती आणणे म्हणजे सप्तर्षींना एखादी परिषद भरवणे वाटते काय? अण्णा टीम घटना बदलणार, तर कशी बदलणार? राज्यपद्धती कशी बदलणार? त्याची पुर्वतयारी यांना कुठे दिसली? तिची लक्षणे कोणती? एका डॉक्टरला रोगाचे निदान करताना पक्की लक्षणे शोधावी, याचेही भान नसेल तर तो डॉक्टर म्हणुन घातक नाही काय? जो नुसता संशय व शंका यांच्या आधारे रोगाचे निदान करतो, त्याला डॉक्टर म्हणतात, की भोंदू, भगत, वैदू, हकीम म्हणतात? आता अशी शंका घेऊन आणि आपल्या संशयाच्या शिड्या भरभरा चढून हे महाशय इतके दुर भरकटत गेले, की त्यांनी थेट अमेरिकन अध्यक्षीय राज्यपद्धती इथे आणुन स्थापित सुद्धा केली. मग त्यांनी अण्णा टीमवर वाटेल ते आरोपही करून टाकले.
   अशी अवस्था साधारण भ्रमिष्ट माणसाची असते. त्याला वास्तवाशी काहीही कर्तव्य नसते. त्याला भिंतीवरची पाल बघून तो हत्ती आहे असे वाटले, तर तुम्ही कितीही कपाळ आपटून उपयोग नसतो. तुम्ही त्याला पुरावे देऊन भागत नाही. उलट तो भ्रमिष्ट त्याच पालीला असलेली सोंडसुद्धा तुम्हाला दाखवू शकतो. कुमारस्वामींची अवस्था काहीशी तशीच झालेली आहे. त्यांचा व तत्सम शहाण्यांचा वास्तवाशी संपर्क पुर्णपणे तुटलेला आहे. त्यामुळे त्यांना जे भास होतात, त्यालाच ते सत्य ठरवण्याचा आटापिटा करत असतात. नाहीतर एक व्यावसायिक डॉक्टर नुसत्या संशयाखातर अण्णा टीमच्या मानसिक आजाराचे निदान कसे करू धजावेल? भुतबाधा झालेल्यांना जशी भुते सर्वत्र दिसतात, तसे अशा सेक्युलरांना सर्वत्र भाजपा व त्यांचा हिंदुत्ववाद दिसत असतो. किंबहूना ज्याला दोषी ठरवायचे, त्याच्यावर तो दोष ठोकायचा की काम संपले. ताप आलाय? मग तांबडी गोळी घ्या. सर्दी झालीय? मग पांढरी गोळी घ्या. इतके वैद्यकशास्त्र सोपे केल्यावर रोग्याला मरण यायचेच ना? अशाच डॉक्टरांमुळे समाजवादी चळवळ मृत्यूपंथाला लागली. मरणासन्न झाली. पण तिला या जिवघेण्या आजारातून उठवण्याची गोष्ट दुर राहिली. तेच तेच चुकीचे औषध पाजत तिला थेट स्मशानात हे डॉक्टर घेऊन जात आहेत. कधी वाटते, की हे भ्रमिष्ट आहेत. पण कधी वाटते, की हे लोक जाणीवपुर्वक अशी लोकांची दिशाभूल करत असतात. वाहिन्यांवरचे अनेक विद्वान त्याच पंथाचे आहेत. त्यात डॉक्टर सप्तर्षी स्वत:ला शंकराचार्य समजतात इतकेच. या सेक्युलर शंकराचार्याचे ब्राह्मण्य म्हणूनच तपासण्याची गरज आहे.  (क्रमश:)
भाग  ( २२३ )     २/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा