सोमवार, २ एप्रिल, २०१२

सेक्युलर जानव्यातले पुरोगामी सव्यापसव्य



   आपल्या त्याच सत्याग्रही लेखात डॉ. सप्तर्षी अमेरिकन राज्यघटना व राज्यपद्धतीचेही तज्ञ झालेले आहेत व त्यावरही त्यांनी मुक्ताफ़ळे उधळलेली आहेत. मात्र तसे काही लिहिताना त्यांना, भारतात सध्यकाळात काय घडामोडी चालू आहेत, त्याचा थांगपत्ता नाही असेच दिसते. आपण भारतिय राज्यघटना व लोकशाही, त्यात निवडून आलेल्यांचे राज्य, असल्या गोष्टी सांगतो तेव्हा तशा इथे सध्या घडत आहेत काय, त्याचे तरी भान असायला हवे ना? उदाहरणार्थ ते काय लिहितात वाचा,

   ’जनलोकपाल बिल आणि त्यासाठी जनआंदोलन नामक बाजारू प्रदर्शन ही अध्यक्षीय लोकशाहीची रंगीत तालीम आहे असा संशय आम्हाला येऊ लागला. त्याला कारण होते. अमेरिकेच्या अध्यक्षाला तेथील सिनेटपेक्षा (संसदेपेक्षा) अधिक अधिकार आहेत. तेथील संसदेने बहुमताने एखादा ठराव संमत केला तरी त्या ठरावाच्या विरोधात अध्यक्षाला निर्णय घेता येतो. अमेरिकेच्या अध्यक्षावर निवडून आलेल्या सिनेटर्समधूनच काहींना मंत्रिमंडळात सदस्य म्हणून घेण्याचे बंधन नसते. त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही व्यक्तीला तो मंत्रिमंडळात घेऊ शकतो. याचा अर्थ सार्वजनिक जीवनाचा स्पर्श नसलेली मंडळी अमेरिकेच्या जनतेवर राज्य करू शकतात.’      

   जनलोकपाल बिलासाठी लोकांचे रस्त्यावर उतरणे बाजारू प्रदर्शन, अशी संभावना त्यांनी केली आहे. मग हे शहाणे वाहिन्यांवर येऊन जी मुक्ताफ़ळे उधळतात त्याला काय म्हणायचे? कारण त्यांच्या त्या चर्चेत अधूनमधून कमर्शियल ब्रेक जाहिरातीच्या पैशासाठी घेतला जातो, त्याला काय अध्यात्म म्हणतात काय? तो बाजारूपणा नसतो काय? जगभरातून एनजीओ म्हणून गोळा केलेल्या पैशावर जी आंदोलने चालवली जातात, त्याला बाजार नाहीतर काय म्हणतात? परवाच पुण्यात अनेक ठिकाणी पोस्टर्स लावून, प्रसिद्धी करून याच डॉक्टर मजकुरांनी परिवर्तनवादी युवक परिषद भरवली होती. त्यात वृत्तपत्रांचे, वाहिन्यांचे संपादक वक्ते म्हणून बोलवताना प्रसिद्धीचा हव्यास नव्हता काय? त्यांना पाहुणे केले मग आयती प्रसिद्धी मिळते, त्याला बाजरूवृत्ती नाही तर काय म्हणतात? यांना मुख्य वक्ते म्हणून संपादक आणावे लागतात, त्यांचे ऐकावे लागते. मग ते आपल्या माध्यमात स्वत:ची प्रसिद्धी करणार त्यात गाड्या बरोबर नळ्याला यात्रा तशी यांच्या परिवर्तनवादाला प्रसिद्धी मिळणार. त्याला बाजारूपणा म्हणतात. आणि ती बाजारबसवेगिरी करणारे गांधीगिरी केल्याच्या थाटात अण्णांच्या आंदोलनाला बाजारू प्रदर्शन म्हणणार. या परिषदेनंतरच सप्तर्षी गेल्या महिन्यापासून वाहिन्यावर दिसू लागले. मग त्यांनी ’गांधी स्मारक निधी’ची आपल्या मार्केटींगसाठी परिषेदेतून केलेली ती गुंतवणूक म्हणायची काय?

   लोकपाल आंदोलनाला त्यांनी बाजारू म्हणायलाही हरकत नाही. मग त्याच बाजारात आपापली दुकाने थाटून टीआरपी कमावणारे दुकानदार तुमच्या परिषदेत कशाला आणता? की अण्णांच्या बाजारात न खपलेला माल स्वस्तात विकायचा बाजार डॉ. सप्तषींनी परिषदेचे नाव घेऊन मांडला होता? त्यात स्टार माझा व लोकमतचे संपादक कशाला आणायचे? यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना? त्या अण्णांच्या प्रदर्शनात यांना अध्यक्षिय लोकशाहीची रंगीत तालीम कुठे दिसली? अमेरिकेत अशा प्रकारचे निवडणूक प्रदर्शन होते काय? तिथल्या निवडणूका अशा होतात काय? तालीम म्हणजे तरी काय? अमेरिकेत अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार्‍याला आधी स्वत:च्या पक्षात आपले वर्चस्व सिद्ध करावे लागते. पक्षातच त्याला मतांच्या जोरावर उमेदवारी मिळवावी लागते. सोनिया वा राहुल, अडवाणी वा वाजपेयी, मुलायम वा मायावती अशा कुणाच्या कृपेने तिथे उमेदवार्‍या मिळत नाहीत. मग निवडणुक मेयरपदाची असो, की अध्यक्षपदाची असो. आपल्या महान देशात सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष पदावर कशा निवडून आल्या? जो अध्यक्ष पक्ष अधिवेशनात निवडून आला होता त्या सीताराम केसरीला चपलांनी चोपून पळवून लावण्यात आला. त्याच्या जागी सोनिया जाऊन बसल्या. आणि नंतर त्यांनी ज्यांना उमेदवारी दिली ते निवडणूक लढवणार.  

   आपल्या देशात आठ वर्षे जो माणूस पंतप्रधान म्हणुन सर्व कारभार चालवतो आहे, तो निवडून आला आहे काय? एकदाच लोकसभेची निवडणूक लढवून पराभूत झालेले मनमोहनसिंग, आज देशातले सर्व सत्ताधीश आहेत. सोनिया गांधी म्हणतील त्या तालावर नाचणे त्यांना भाग पडते. इथे महाराष्ट्रात तरी काय आहे? मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कुठून निवडून आलेत? त्यांना सोनियांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळालेले आहे. निवडून आलेल्या सत्ताधीशांची कुठली लोकशाही सप्तर्षी सांगतात? अमेरिकेत अध्यक्षाच्या हाती सर्व अधीकार जरूर आहेत. पण त्यासाठी आधी त्याला जनतेतून थेट निवडून यावे लागते. मंत्री तो कुणालाही करू शकतो. पण त्याची जबाबदारी त्याला घ्यावी लागते. इथे कोण कुठली जबाबदारी घेतो? सप्तर्षी कुठल्या युगात आहेत? त्यांना मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झालेत हेच ठाऊक नाही, की ते लोकसभेतही निवडून आलेले नाहीत याचा थांगपत्ता नाही? असेल तर त्यांनी निवडून आलेल्यांना मंत्री करण्याची भाषा कशाला वापरली? अमेरिकेचा अध्यक्ष निदान फ़क्त मंत्रीच बिननिवडलेले घेऊ शकतो. बिना निवडता कुणाला तिथे अध्यक्ष होता येत नाही. इथे कोणीही बिना निवडून येता देशाचा सर्वसत्ताधीश होऊ शकतो, नव्हे झालेलाच आहे. त्यासाठी अध्यक्षीय लोकशाही आणायची घटनात्मक तरतुद करण्याची गरज नाही. सप्तर्षीसारख्या दिवाळखोर सेक्युलर बेअक्कल लोकांनी ती कधीच आणली आहे.

   आठ वर्षापुर्वी भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याचे जे मत्सरी राजकारण सुरू झाले, त्यातून ही अवस्था आधीच आली आहे. त्यात देशाचा पंतप्रधानही अगतिक होऊन गेला आहे. तेव्हा सोनिया गांधींना कॉग्रेस पक्षाने संसदिय नेता म्हणून निवडले. मग त्यांनी आपल्या पादुका मनमोहन यांना देऊन ’रामराज्य’ आणले आहे ना? भरताने चौदा वर्षे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन त्याच्याच नावाने राज्य चालवले म्हणतात, त्या पुराणकथेची आज पुनरावृत्ती इथे चालू नाही काय? सोनिया व राहुल यांच्या पादुका पंतप्रधान पदावर ठेऊन, मनमोहन सिंग राज्य चालवत नाहीत काय? की एकविसाव्या शतका्चा उदय झाला, याचाच पत्ता अजून सप्तर्षी यांना लागलेला नाही? ते अजून 1970 वा 1980 च्या काळात घुटमळत आहेत? इथे अध्यक्षिय लोकशाही ऐवजी कॉग्रेस अध्यक्षिय लोकशाही आहे इतकेच. फ़रक किरकोळ आहे. अमेरिकेत घराण्यातला वारस अध्यक्ष नेमून देशाचा कारभार चालवला जात नाही. निदान अध्यक्षाला तरी निवडून यावे आगते. इथे सामान्य जनतेला नेहरू गांधी घराण्याचे पुण्य सांगणारे भाडोत्री विद्वान उपलब्ध आहेत. उरलेले काम सप्तर्षी सारखे सेक्युलर मुर्ख पार पाडत असतात. घटना वगैरे बदलण्याची गरज उरलेली नाही.

   डोळ्यासमोर देशातली ही अध्यक्षिय लोकशाही यांना दिसत नाही. पण यांच्या मनात शंका आहेत, त्यांना संशय येतो, त्या आधारावर ते न घडलेल्या वा न घडणार्‍या घटना बघून लांडगा आलारे आला अशा बोंबा ठोकत असतात. म्हणुन त्यांना विद्वान म्हणायचे. आणि डोळसपणे जे समोरचे बघू शकतात व लोकांना समजावू शकतात, ते अण्णा अडाणी. आहे ना अजब युक्तीवाद? जे लोकांना पटेल व समजेल ते बोलणारा यांना अडाणी वाटतो. सगळी ही जमातच मुर्खांच्या नंदनवनात वावरत असते. मग ते आमचे हेमंत भटजी असोत वा डॉ. सप्तर्षी असोत. अमेरिकन अध्यक्ष सिनेट म्हणजे अमेरिकन संसदेने केलेल्या ठरावाच्या विरुद्ध जाऊ शकतो असा जावईशोधही त्यांनी लावला आहे. पण दुसरीकडे त्याने घेतलेल्या निर्णयाला संसद अडवून ठेऊ शकते, हे त्यांना कोणी सांगायचे? बुश यांची सिनेटने गोची केली ते यांच्या गावीही नाही. आज अमेरिकन सिनेटमध्ये कर्ज उचल करणयासाठी अध्यक्ष ओबामा यांना सिनेटच्या नाकदुर्‍या काढाव्या लागत आहेत, हे यांच्या गावीही नाही. मग हे अशी बिनबुडाची माहीती कुठून काढतात? तर ते बेधडक थापा मारतात. वाचक व श्रोता मुर्ख अडाणी आहे, यावर अशा सेक्युलर शहाण्यांची इतकी गाढ श्रद्धा असते, की ते बिनधास्तपणे लोणकढ्या थापा सर्रास मारत असतात. ही अमेरिकन अध्यक्षिय लोकशाही व तिथल्या घटनात्मक तरतुदींची थाप त्यापैकीच एक आहे.

   आपल्याला जे सांगायचे आहे वा पटवायचे आहे, ते सांगताना रेटून बोलायचे, ठोकून बोलायचे, असा निर्ढावलेपणा त्यांनी अंगी बाणवलेला असतो, त्याचाच हा परिणाम आहे. इथली संसद त्यातल्या सेक्युलर डाव्यांसह 2004 सालात सोनियांच्या पायावर डोके ठेऊन त्यांना पंतप्रधान होण्यासाठी विनवत होती, तो तमाशा वाहिन्यावरून अवघ्या जगाने बघीतला आहे. तेव्हा हे सप्त ऋषी कुठल्या सप्त पाताळात तपश्चर्या करायला बसले होते की काय? नाहीतर त्यांनी आपले सेक्युलर जानव्याचे सव्यापसव्य करीत अण्णांवर ब्राह्मण्य थोपण्याचा उद्योग कशाला केला असता?  (क्रमश:)
भाग  ( २२४ )       ३/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा