शनिवार रविवारी शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर जो धुमाकुळ माध्यमातून व अन्यत्र चालू होता, त्यातल्या तीन प्रतिक्रिया एकत्रित बघण्याची गरज आहे. त्या प्रतिक्रिया सामान्य माणसाच्या नाहीत तीन भिन्न पण सार्वजनिक क्षेत्रातील लोकांच्या आहेत. एक आहे एका राष्ट्रीय वाहिनीचा संपादक, दुसरा आहे यशस्वी अभिनेता आणि तिसरा आहे लहान मुलांसाठी व्यंगचित्रकथा सांगणारा. त्यातली पहिली प्रतिक्रिया अंत्ययात्रा व अंत्यविधी होण्यापुर्वीची म्हणजेच क्रमाने आधी आलेली आहे. ती आहे आयबीएन वाहिनीचे संपादक राजदीप सरदेसाई यांची. शनिवारी रात्री झोपण्यापुर्वी त्यांनी ती प्रतिक्रिया ट्विटर माध्यमातून दिली होती. शेवटी गुडनाईट असे म्हटले आहे. म्हणजेच झोपण्यापुर्वीची असावी असे मान्य करायला हवे. ते लिहितात, ‘दिल्लीत नेता मरण पावला तर महानगरात भितीने वा आदराने व्यवहार बंद पाडले जात नाहीत, मुंबईत तसे होते. त्यातून काय सिद्ध होते?’ ही राजदीपची प्रतिक्रिया वाचल्यावर मला पहिला धक्का बसला तो त्याच्या दिसण्याचा व वयाचा. कारण वाहिनीवरून मी या माणसाला गेली काही वर्षे बघतो आहे. त्यानुसार त्याचे वय पन्नाशीच्या पुढले असावे असा माझा गैरसमज होता. पण हा त्याचा संदेश वाचनात आला आणि त्याचे वय पंचविशीतले असल्याचे लक्षात आले. पंचविशीतले म्हणजे साधारण त्याचा जन्म १९८४ नंतरचा असावा. त्याच्या आधीचा नक्की नसावा. कारण आधीचा असता तर त्याला ३१ आक्टोबर १९८४ नंतर दिल्लीत आठवडाभर काय चालू होते ते निदान ऐकून तरी ठाऊक झाले असते. राजीव गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीला दिल्लीत काय परिस्थिती होती, त्याचे तरी ज्ञान नक्कीच झाले असते आणि दिल्लीत काय होत नाही अशा सदरात त्याने अशी मुक्ताफ़ळे उधळली नसती.
३१ आक्टोबर १९८४ रोजी भारताच्या पंतप्रधान निवासस्थानी दोघा शीख अंगरक्षकांनी जवळून गोळ्या झाडल्याने इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. ही बातमी पसरताच दिल्ली पेटली होती. एकामागून एक शीख कुटुंबाला घरातून बाहेर खेचून त्याची हत्या करण्याचा खेळ तीनचार दिवस चालू होता. हत्याकांड व घरादारांची जाळपोळ तब्बल चार दिवस चालू होती. आणि त्यावेळी पोलिस बघ्याची भूमिका घेऊन बघत राहिले होते. तीन हजार शिख त्या हिंसाचारात मारले गेले. आणि असा हिंसाचार सुरू असताना दिल्ली म्हणजे तिथले सगळे व्यवहार छानपैकी चालू असण्याची शक्यता अजिबात नाही. हे दिल्लीतच जगणार्यांना ठाऊक आहेच. पण पुढला महिनाभर त्याच बातम्यांनी देशभरची माध्यमे वृत्तपत्रे भरलेली होती. त्यामुळेच अवघ्या देशातील त्यावेळी जे लिहिणारे वाचणारे होते, त्यांना दिल्लीसुद्धा नेत्याच्य निधनाने बंद होते, हिंसक होते हे पक्के ठाऊक आहे. जर वाहिनीचा संपादक होऊन व असून राजदीपला ठाऊक नसेल, तर त्याचा जन्म नक्कीच १९८४ नंतरचा असला पाहिजे. म्हणजेच त्याचे वय पंचविशीच्या आतले असायला हवे. यातल्या दोन्ही गोष्टी नसतील तर असे काही शहाणपणा म्हणून लिहिणारा माणूस चक्क बेअक्कल वा अक्कलशून्य असला पाहिजे. यातल्या दोन्ही शक्यता नाकारायच्या असतील तर मग असे लिहिणारा माणूस अट्टल बदमाश असेल असाच निष्कर्ष काढावा लागतो. जर राजदीपच्या जन्माविषयीचा माझा अंदाज चुकीचा असेल तर मग शेवटचा निष्कर्ष एकमेव उरतो. राजदीपला बदमाश म्हणावे लागते. कारण तो असे काही लिहून लोकांची दिशाभूल करू बघतो असाच निष्कर्ष निघतो.
दुसरे दोन संदेश मला फ़ेसबुकवर मित्रांच्या कृपेने मिळाले. एक अमिताभचा तर दुसरा सकाळ दैनिकात प्रसिद्ध होणार्या चिंटूचा. पहिला शब्दातला आहे तर दुसरा चित्रातला आहे. अंत्ययात्रेला अमिताभ हजर होता. त्यानंतर घरी परतल्यावर त्याने फ़ेसबुकवर आपल्या चहात्यांसाठी एक संदेश लिहिला;
‘बाळासाहेबांच्या पार्थिवाच्या गाडीसोबत वीस लाख लोक चालत होते... असे आयुष्यात कधी बघितले नव्हते... भारतीय पातळीवरही अभूतपुर्वच... कसला आदेश नाही, कुठली सक्ती नाही, त्यांच्या बाबतीतले लोकांचे प्रेम व आदराचे ते प्रात्यक्षिक होते... कुठे अनुचित प्रकार घडला नाही... सर्वत्र शांतता आणि सदभावना होती. अंत्यविधीच्या काळात शिवाजीपार्कमध्ये त्या विराट जमावामध्ये नितांत शांतता होती. अपुर्वच... पोलिसांची व्यवस्थाही उत्तम... त्या कडेकोट बंदोबस्तासाठी त्यांनाही सलाम... अंत्ययात्रेहून परतताना एका फ़लकाने लक्ष वेधून घेतले व अंतरंगातल्या भावनांचा उमाळा उफ़ाळून आला. त्यावर बाळासाहेबांचा उल्लेख स्वर्गिय बाळासाहेब असा होता... कधीकाळी असेही वाचावे लागेल अशी कल्पनाही केलेली नव्हती.’
किती मोजके शब्द आहेत बघा. ज्याचे आज जगभर चहाते पसरले आहेत आणि ज्याने दोन पिढ्यांच्या भारतिय रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले; त्याचेही मन भावनांनी उचंबळून आलेले होते. त्या अमिताभचे वय नुकतेच सत्तरी ओलांडून पुढे गेले आहे. पण म्हणून तो भावनाविवश झाला होता आणि नव्या पिढीला बाळासाहेबांच्य मृत्यूचे काही देणेघेणे नव्हते का? नव्या सोडा आज जी कोवळ्या वयातली पिढी आहे; तिला कोण माणूस आज जग सोडून गेला, त्याच्याविषयी कर्तव्य नसेल का? त्याचे उत्तर सकाळच्या त्या व्यंगचित्र कथेत चिंटूकडून मिळाले. त्या दिवशी नेहमीचा खोडकर चिंटूही अस्वस्थ झालेला होता. त्या कथाकार चित्रकारांनी त्याचेच प्रतिबिंब आपल्या चित्रात पडू दिले. संपुर्ण एकच चौकट त्यात धावत येणारा चिंटू दचकून थबकला आहे, आणि विस्फ़ारलेल्या नजरेने बघतो आहे. त्या चौकटीतुन शाल पांघरलेला कोणीतरी निघून जातो आहे. त्याला चेहरा नाही नुसती पाठ आहे आणि दिसतो त्या एका हातात फ़क्त रुद्राक्षाची माळ आहे. त्या चित्रकारांना आपण कोवळ्या वयातल्या म्हणजे आठदहा वर्षाच्या मुलांसाठी चित्रकथा बनवतो याची जाण आहे आणि इतकी वर्षे ते लोकप्रिय आहे. म्हणजेच मुलांना काय कळू शकते, त्याचे त्यांना भान आहे. मग त्यांनी असे चित्र का काढावे? मुलांच्या भावनाच त्यातून व्यक्त होतील याची खात्री नसेल तर त्यांनी असे केले नसते. एका बाजूला सत्तरी ओलांडलेला अमिताभ हळवा झालेला होता आणि दुसरीकडे दहा वर्षे वय नसलेल्या कोवळ्या मुलांसाठीचा चित्रकार त्या मुलांच्या भावना व्यक्त करतो आहे. ही किमया होती बाळासाहेब.
किती विरोधाभास आहे बघा. जे पत्रकार किंवा समकालीन भाष्यकार म्हणुन मिरवत असतात, त्यांना यातले काहीच वाटत नसेल किंवा भावत नसेल तर त्यांच्याकडून कुठले भाष्य वास्तववादी होऊ शकेल? आसपास काय घडते आहे, त्याचे अर्थ जनतेला समजावण्याला पत्रकार म्हणतात. त्यांनाच वीस लाख लोक रस्त्यावर का उतरले, कुठल्या भावनेने उतरले, त्यांना काय गमावल्यासारखे वाटते; याचाच पत्ता नसेल तर मग ह्यांना माणसे तरी म्हणता येईल काय? माणूस म्हणजे एक जिवंत प्राणी नसतो. ती प्रचंड अगणित भावभावनांची गुतागुंत असते. ती उलगडून दाखवण्यासाठी बुद्धीमंत असायला हवेत. पण माणसे अशी का वागतात, कुठल्या क्षणी वागतात, त्याचाच थांगपत्ता नसेल तर त्यांची बुद्धी काय कामाची? माणुस म्हणजे समाज म्हणजे नुसती लोकसंख्या वा झुंड नाही. त्याला भावना, रागलोभ, आपुलकी, संताप, सुखदु:ख अशा अनेक गोष्टी असतात. त्या व्यक्त कारण्याचे विविध मार्ग असतात. त्या व्यक्त करण्यालाच माणसाची अभिव्यक्ती म्हणतात. आणि त्याचेच भान वा जाण नसलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे खांध्यावर घेऊन जेव्हा माध्यमात जागा अडवून बसतात, तेव्हा माध्यमे निरुपयोगी व निष्प्रभ होऊन जातात. आजची आपली माध्यमे व बुद्धीवाद किती निरर्थक संदर्भहीन होऊन गेला आहे; त्याचा हा नमूना आहे. त्यांना समोर घडते आहे व घडताना दिसते आहे, त्याचा अर्थच लागत नाही, ते समजण्याची बुद्धीही त्यांच्यापाशी नाही. पण ज्यांनी कधी बुद्धीसंपन्न असल्याचा दावा केलेला नाही, त्या लोकांची अशा प्रसंगातील प्रतिक्रिया बोलकी असते. खुप काही सांगून जाते.
शेकडो पुस्तके वाचण्य़ातून माणुस वा जग ओळखता येत नाही. पण प्रेम ही अडिच अक्षरे खुप काही शिकवून जातात असे म्हटलेले आहे. ते त्या चित्रकार व अभिनेत्याला कळले आहे. पण अहोरात्र वाहिन्यांवरून जगाला शहाणपणा शिकवणार्यांना ज्ञान कशाला म्हणतात व बुद्धी कशाशी खातात, त्याचाच अजून पत्ता लागलेला नाही. हीच आपल्या माध्यमे व बुद्धीवादाची शोकांतिका आहे. ( क्रमश:)
भाग ( २ ) २०/११/१२
बाळासाहेब ठाकरे नावची एक व्यक्ती कोणतेही सत्तापद नसताना अर्ध्या शतकाहून अधिक काळ तीन/चार पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते तेव्हाच ती व्यक्ती नसून एक शक्ती आहे हे सिद्ध होते. अमिताभ सारख्या महानायकालाही हे जाणवले आणि त्याने ते मान्य केले.
उत्तर द्याहटवापण ज्यांनी सदैव शिवसेनाप्रमुखांचा द्वेश केला आणि तथाकथित सेक्युलर, लोकशाही, समाजवादाची झापडे लाऊन साहेबांवर दोषारोप केले त्यांना शिवसेनाप्रमुखांचे थोरपण कसे मान्य होणार? त्यामुळे ह्या लोकांकडून ह्याच प्रकारची प्रतिक्रिया येणार त्यात आश्चर्य काय?