शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

मोगॅम्बो खुश व्हायला नको तर काय करायचे?


    शब्दांचे अर्थ परिस्थिती व प्रसंगाप्रमाणेच संदर्भानुसारही बदलत असतात. त्या चार वर्षापूर्वीच्या घटनेनंतर तुकाराम ओंबळेने मला हे शिकवले असेच मी मानतो. त्याक्षणी त्याने सगळे नियम व कायदे बाजूला ठेवले. त्याने कुणा वरीष्ठांच्या आदेशाची प्रतिक्षा केली नाही. जितका एकटा अजमल कसाब आपले निर्णय घेऊन बेधडक वागत होता, तितकाच तुकाराम ओंबळे त्याक्षणी एकटा होता. हा देशावरचा हल्ला असेल तर तो माझ्यावरचाही हल्ला आहे आणि मला वाचवायचे तर देश वाचवला पाहिजे, अशी त्याची त्या क्षणीची भूमिका होती. देश आणि तुकाराम ओंबळे यांच्यात फ़रक राहिला नव्हता. सगळेच आपापले जीव वाचवायला पळत असताना तुकाराम ओंबळेने स्वत:लाच भारत देश समजून कसाबवर प्रतिहल्ला चढवला होता. तेव्हा त्याच्यात सव्वाशे करोड भारतीयांचे बळ संचारले होते.

   खुप वर्षापुर्वी मुलांसोबत एक अत्यंत पोरकट वाटणारा ‘मिस्टर इंडीया’ नावाचा चित्रपट मी बघितला होता. त्यामध्ये मोगॅम्बो नावाचा एक काल्पनिक खलनायक भारत उध्वस्त करण्याचे कारस्थान खेळत असल्याची कथा होती. तेव्हा अदृष्य होऊन त्याच्याशी झुंज देणारा अनील कपूर त्याला आपले नाव मिस्टर इंडिया असे सांगतो. एका प्रसंगी तो मोगॅम्बोला सांगतो, तुझ्यासारख्यांना संपवायला एक सामान्य भारतीय सुद्धा पुरेसा आहे. मला त्या वाक्यावर पडणार्‍या टाळ्या ऐकून हसू आले होते. तसे मी तेव्हा लिहिले सुद्धा होते. एक सामान्य भारतीय एवढा पराक्रम कसा काय करू शकतो? अद्ययावत हत्यारे, रॉकेटस, तोफ़ा वा बॉम्ब घेऊन कोणी समोर आला, तर सामान्य भारतीय काय करू शकणार आहे? माझ्या तर्ककठोर बुद्धीवादाला न पटणारी ती बाब होती. आणि माझ्याच कशाला कोणाच्याही विवेकी बुद्धीला ते पटणारे नव्हते. पण माझा तो तर्ककठोर बुद्धीवाद २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री मुखवट्यासारखा गळून पडला. कारण मी बघत होतो, त्या छोट्या पडद्यावर तुकाराम ओंबळे नावाचा एक सामान्य भारतीय हातात एक साधा वेताचा दंडूका घेऊन समोर साक्षात मोगॅम्बो बनून आलेल्या अजमल कसाब नावाच्या मोगॅम्बोवर तुटून पडला होता. कुठून हे बळ त्याच्या अंगात संचारले होते? त्याने मिस्टर इंडिया बघितला होता काय? त्या अनील कपूरच्या वाक्याचा ओंबळेवर परिणाम झाला होता काय? तो चित्रपट बघतांना तिथली गर्दी सुखावताना बघून मला त्यांची कींव आलेली होती. कोणी असा मिस्टर इंडीया नसतो, आणि तो तुम्हाला वाचवणार नाही, असे शेवटी एका प्रसंगी अनील कपूरच सांगतो आणि त्याच्या टोळीतली मुले एकजूटीने त्या प्रसंगाला सामोरी जातात. यापेक्षा ओंबळेने व त्याच्या तात्कालीन सहकार्‍यांनी दाखवलेले धैर्य वेगळे नव्हते. आमचे लेख वा बौद्धीक अग्रलेख वाचून त्यांच्यात एवढे धैर्य कधी येण्याची शक्यता नाही. पण चित्रपटातल्या मनोरंजनातून किंवा कुठल्या पुराणकथा किंवा प्रवचन, शिवचरित्र ऐकण्यातून त्यांच्यात जो पुरूषार्थ संचारतो, तेव्हाच असा अचंबित करणारा पराक्रम त्यांच्यकडून होऊ शकतो. तो पराक्रम वा ते धैर्य आमचे लेख वा कुठल्या कायद्याच्या शब्दांनी वा अधिकारांनी त्यांच्यात संचारू शकत नाही. त्यासाठी सामान्य माणुस असावे लागते. बुद्धीमंतांचे ते कामच नाही.  

   आणि बुद्धीमंत म्हणजे तरी कोण असतात? जे सत्तेसमोर किंवा बलदंडासमोर शेपूट घालतात व शरणागत होतात. पण जरा टिकेची संधी दिली, मग स्वातंत्र्य देणार्‍यालाच लाथा झाडू लागतात. खरे तर विचारवंत किंवा अभिजनवर्ग म्हणुन जे अखंड समाजाला शहाणपण शिकवत असतात, त्यांच्यासारखा कोणी पळपुटा दुसरा नसतो. एक उत्तम इंग्रजी चित्रपट आहे, त्यामध्ये एका भणंगाच्या तोंडी बुद्धीवादी वर्गाचे नेमके वर्णन आलेले आहे. ‘विथ ऑनर्स’ नावाचा हा चित्रपट आहे. त्यात हॉवर्ड विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये एक प्राध्यापक मुलांना अमेरिकन राज्यघटनेविषयी प्रश्न विचारून त्यांची भंबेरी उ्डवत असतो. अचानक तिथे वर्गात विद्यार्थी नसलेला एक भणंग बसल्याचे प्राध्यापक महाशयांच्या लक्षात येते. त्यांनी विचा्रणा केल्यावर तो भणंग जायला निघतो. तर त्याची टवाळी केल्याच्या सुरात प्राध्यापक त्यालाच प्रश्न विचारतो. प्रश्न असा, अमेरिकन राज्य घटनेचे महात्म्य कोणते? आणि अमेरिकन अध्यक्ष एका आदेशाने युद्ध पुकारू शकत असेल तर लोकशाहीला काय अर्थ आहे? त्यावर पाच डॉलर दारू प्यायला दिल्यास उत्तर देईन असे तो भणंग उत्तरतो आणि जायला निघतो, तेव्हा प्राध्यापकाचा पचका होतो. अखेर तो पैसे द्यायचे मान्य करतो, पण तो भणंग आधी पैसे घेतल्यावरच जे उत्तर देतो, ते जगभरच्या मिरवणार्‍या बुद्धीमंतांचे नेमके वर्णन आहे. ते उत्तर थोडक्यात असे,

    ‘माझ्यासारखा दारूडा भणंग व अमेरिकेचा अध्यक्ष दोघेही टगेच असतात. बरे असो की वाईट; जे काही करायचे ते आम्हीच काही करतो. ते तुम्हा बुद्धीमंतांचे काम नाही. तुम्ही नुसती बडबड करता, बाकी तुम्ही नंपुसक असता. आम्ही जे काही केले त्याचे अर्थ लावण्यात तुमचे आयुष्य संपून जाते. राहिला मुद्दा राज्यघटनेचा. ती राष्ट्राची स्थापना करणार्‍यांनी बनवली, त्यांनाही ती कायमस्वरूपी उपयोगी व परिपुर्ण नाही याचे भान होते. म्हणूनच त्यांनी दोन शतकांपुर्वीच त्यात काळानुरूप तिला बदलण्याची तरतूद करून ठेवली आहे. आणि म्हणूनच दुरुस्तीची व्यवस्था हेच राज्यघटनेचे महात्म्य आहे.’

   मुद्दा इतकाच, की स्वातंत्र्याच्या गप्पा अहोरात्र ठोकणारे जे विद्वान आपण वाहिन्यांवर बघतो किंवा वृत्तपत्रातून त्यांचे बोजड लेख वाचतो, त्यांना आपल्या स्वातंत्र्याचा बचाव करण्याची कधीच हिंमत वा धैर्य नसते. अन्य कुणा ओंबळे सारख्याने येऊन त्यांच्या स्वातंत्र्याचा बचाव करावा लागत असतो. अन्यथा समोरून जो आक्रमक येतो व आपली सत्ता प्रस्थापित करतो, त्याच्यासमोर हे बुद्धीमंत शरणगत होत असतात. मग तो हिटलर असो किंवा स्टालिन असो. अगदी रोमन बादशाहा निरो हा मनोरुग्ण होता, त्याच्या सत्तेसमोर शरणागत होऊन गुडघे टेकत त्याची भाटगिरी करणार्‍या ग्रीक बुद्धीमंतांची वर्णने उपलब्ध आहेत. तेव्हा शाहीन किंवा तत्सम कोणा मुलीचा आडोसा घेऊन स्वातंत्र्याचे जे नाटक दोनचार दिवस वाहिन्यांवर चालू होते, त्यांचे स्वातंत्र्य जपायचे कोणी? त्यासाठी बलीदान व आत्मसमर्पण करायचे कोणी? जे कोणी असे बलिदान करतात व या दिवट्यांच्या स्वातंत्र्याची किंमत मोजत असतात, त्यांच्यावरच हे शहाणे आरोप करतात, तेव्हा संताप येतो. ज्या दिवशी ओंबळेला नि:शस्त्र असूनही कसाबच्या अंगावर धावून जाताना मी बघितले; त्या दिवशी माझा बौद्धीक अहंकार लयास गेला. मला माझ्या भित्रेपणाची लाज वाटली. त्याने माझ्या सुरक्षेसाठी व ज्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो. त्याच्या रक्षणासाठी आपला प्राण पणाला लावला, त्या दिवशीपासून माझे स्वातंत्र्य मी त्याच्या चरणी अर्पण केले. पुढले काही दिवस मी त्याच्यासाठी काय करू शकतो; याचाच विचार करत राहिलो आणि माझी मलाच लाज वाटली. ज्याने आपल्यासाठी जीव ओवाळून टाकला, त्याची आपण कुठलीच भरपाई करू शकत नाही, याची असे स्वातंत्र्य उपभोगणारे व मिरवणारे आहेत, त्यांना लाज वाटली पाहिजे. निदान मला वाटते. म्हणूनच त्याचे ते शौर्य कित्येक महिने माझी पाठ सोडत नव्हते. त्या घटनेला वर्ष उलटण्याची वेळ आली, तेव्हा मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला आणि माझ्या मनाची घुसमट काहीशी थांबली.

   ओंबळे गेला त्याला येत्या २६ नोव्हेंबरला चार वर्षे पुर्ण होणार आहेत. २००९ साली पहिल्या वर्षी त्याच्या पुण्यतिथीपासून मी एक व्रत माझ्यापुरते घेतले. तो दिवस अनवाणी चालून मी माझ्यापुरता ओंबळेला श्रद्धांजली देतो. त्याने त्या क्षणी व दिवशी असह्य वेदना व यातना सोसल्या. तेवढ्या सोसण्याची आपली क्षमता नाही. पण त्याचा किंचितसा पुसट अनुभव तरी घ्यावा व ओंबळेने काय सोसले व आपल्याला काय दिले; त्याची जाणीव ठेवावी म्हणुन मी तो दिवस अनवाणी पायांनी साजरा करतो. गेल्या तीन वर्षात अनेक मित्रांना व वाचकांना मी हे सांगितले आहे, लिहिले आहे. अनेकांनी तो दिवस तसा साजरा करण्यात माझी साथ दिली आहे. ज्यांना ते पटले आहे, त्यांनी आपल्या मित्रांना सांगून त्यात सहभागी करून घेतले आहे. ह्यावर्षी चौथे वर्ष आहे. कसाबला फ़ाशी देण्याचा आनंद व्यक्त करण्यापेक्षा ओंबळेसारखा मनाचा निग्रह करण्यातून आपण त्य शहीदांना अधिक चांगली व मनापासून श्रद्धांजली वाहू शकतो. ओंबळे होणे शक्य नसेल, पण त्याच्याइतके निग्रही व निर्धारी होण्याचा संकल्प मनाला खुप धीर देणारा असू शकतो. ज्यांना असे काही करावेसे वाटेल, त्यांनी जरूर करावे. दुसर्‍या कोणाला दाखवण्यासाठी वा काही सिद्ध करण्यासाठी नव्हेतर ओंबळे व अन्य शहिदांच्या वेदनांशी एकरूप होण्याचा तो एक सोपा प्रयत्न आहे असे मला वाटते.     ( क्रमश:)
भाग  ( ६ )     २५/११/१२

1 टिप्पणी:

  1. खरेच कुठून आली असेल ओंबळेंना ही शक्ती? एके४७ शी एका साध्या वेताच्या दंडुक्यानीशी लढण्याची. लहानपणी एकदा ऐकले होते की ताकद नुसती शरीरात असून भागत नाही... जिगर हवी. इथे तर देश पणाला लागलेला. त्यांच्या काठीने कसाब मेला असता तर फार बरे झाले असते. निदान ही चार वर्षे झाला तो मनस्ताप, इतका पैसा बरबाद झाला नसता. पण... :(

    सलाम! त्रिवार सलाम !

    उत्तर द्याहटवा