रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२

कामे दहशतीच्या धाकातुनच का होऊ शकतात?


   सरकार किंवा कायद्याचे राज्य असा जो शब्द आपण रोज ऐकत असतो, त्याला तसा फ़ारसा अर्थ नसतो. म्हणजे जो कायदा असतो, त्याने आपल्या मनात एक भिती निर्माण केलेली असते. जो कायदा आहे त्यानुसारच काम झाले पाहिजे; अशी ती भिती असते. पण त्यानुसार काम म्हणजे तरी काय? माझा अगदी सव्वा महिन्यातला अनुभव सांगतो. माझ्या जवळच्या नात्यामधल्या एका व्यक्तीने आकस्मिक निधन झाले. घराबाहेर असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिथे असलेल्या लोकांनी दयेपोटी त्याला इस्पितळात दाखल केले. अर्थात त्यात पोलिसांची मदत घ्यावी लागली. इस्पितळात दाखल होण्यापुर्वीच त्याचे प्राणोत्क्रमण झाले होते. मग अंगावर म्हणजे परिधान केलेल्या कपड्यात जे काही ओळख पटण्यासारखे पुरावे मिळाले, तशी प्राथमिक नोंद झाली. मोबाईल सापडला त्यावरून फ़ोन करीत घरी कळवण्यात आले. त्यामुळे अल्पावधीत घरच्यांना घडलेला प्रकार कळला. त्यांनी धावपळ करण्यासारखे काही उरलेले नव्हतेच. नातेगोते जमले आणि पुढील विधी उरकण्यात आले. समस्या उभी ठाकली, ती दोनचार दिवसांनी. कारण जन्ममृत्यूची योग्य नोंद करणे कायद्याने आवश्यक आहे. इथे प्रकरण पोलिसात गेलेले आणि तिथे जी प्राथमिक नोंद झाली, त्यानुसार पुढल्या कागदोपत्री नोंदी होऊन गेलेल्या. त्यात किंचित चुक राहिलेली. म्हणजे मूळ नाव प्रफ़ुल्लचंद्र असे होते आणि ज्यांनी प्राथमिक नोंद केली त्याने चंद्रऐवजी ‘चंद’ अशी नोंद केली. इंग्रजी नोंदीमध्ये आर हे अक्षर टाकलेले नव्हते. पण जेव्हा मृत्यूचा दाखला घ्यायला गेले; तेव्हा ती चुक लक्षात आली. आता काय करायचे?

   नगरपालिकेकडून अशा नोंदी होतात आणि तिथे बसलेले ‘सरकार’ म्हणजे तिथला नोंदीचा दाखला देणारा कर्मचारी; हेच सरकार असते. झालेली चुक त्याच्या नजरेस आणून देण्यात आली. पण त्यात तो अक्षराचा बदल करायला तयार नव्हता. जसे त्याच्याकडे पोलिसांकडून आले होते; तसेच प्रमाणपत्र मिळू शकेल असा त्याचा हट्ट होता. बरे पोलिसात जाऊन दुरुस्ती करायचा प्रयत्न केला, तर तिथे कोणी खाडाखोडी करायला राजी नव्हता. आता पंचाईत झाली ना? जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला हवा. त्याच्या शिवाय पुढले पान हलणार नाही. पण तिथेच नावात चुक असेल, तर जो मेलाय तोच मेल्याचा पुरावा कसा आणायचा? कारण जन्माला येणे वा मरणे एकवेळ सोपे आहे. पण नोंद झालेल्या चुकीची दुरुस्ती अशक्य असते. कारण ती करायची कोणी व कशी; त्याचे कायदेशीर ज्ञान कोणालाच नसते. बरे त्यांनी दिले तसेच मृत्यूचे प्रमाणपत्र घेतले, तर त्याचा अन्यत्र काहीच उपयोग नव्हता. कारण मृताच्या नावात ‘चंद्र’ होता, ‘चंद’ नव्हता. त्यामुळे चंद अशा नोंदीच बॅन्क वा महसुल खात्यात कुठे नसतील; तर त्याची मृत म्हणून नोंद व्हायची कशी? मृत्यूनंतर हे प्रकरण धार्मिक विधी आटोपल्यावर लक्षात आले. त्याच्या कुटुंबियांनी दुरुस्तीसाठी जंगजंग पछाडले. पण काहीच उपयोग झाला नाही. खरे तर त्यात दुरुस्ती व्हायला काहीच मोठे नव्हते. कारण ज्याचा मृत्य़ु झाला त्याच्या आप्तस्वकीयांची ओळख घेऊनच मृतदेह हवाली करण्यात आला होता आणि जी घरी त्याची कागदपत्रे होती, त्यात सर्वत्र ‘चंद्र’ अशीच नावाची नोंद असेल तर पोलिसांपासून इस्पितळापर्यंत सर्वांनी तेवढ्या आधारे स्वत:च केलेली चुकीची नोंद तिथल्या तिथे बदलण्यात काही अशक्य नव्हते. चुक त्यांची होती. जे ऐकले वा जसे वाटले, तसे त्यांनी प्राथमिक नोंदीत लिहिले होते. प्रत्यक्ष कागद समोर आल्यावर त्याद दुरुस्ती करण्यात गैर काय होते? दुरुस्ती करून नातलगांच्या सह्या घेऊनही काम भागले असते. पण कोणी करायचे?

   मुद्दा इतकाच, की प्राथमिक नोंद करणार्‍याचा दोष असतो वा होता. पण खेटे घालावे लागत होते मृताच्या कुटुंबाला. आणि ज्यांची चुक होती, त्यांची त्यांनीच दुरुस्त करावी; यासाठी गयावया करण्याची लाचारी करत होते मृताचे आप्तस्वकीय. किती चमत्कारिक बाब आहे ना? मग चुकीच्या नावाचा मृत्यूचा दाखला तसाच न घेता त्याचे कुटुंबिय, हे बदल मुळ सरकारी नोंदीत करून घेऊ शकेल, असा महात्मा शोधू लागले. म्हणजे असा माणूस जो त्या सरकारी यंत्रणेला त्यांची केलेली चुक दुरुस्त करण्यास भाग पाडेल, असा माणुस आठ दिवस शोधला जात होता. अखेरीस असा माणूस त्यांना सापडला आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ते शोधू लागले. त्यामुळे हा गुंता माझ्यापर्यंत आला. लौकरच त्यांच्या लक्षात आले, की पत्रकार असल्याने भाऊ यात मदत करू शकेल. त्यांनी येऊन सगळा प्रकार मला सांगितला आणि त्यात झटपट बदल करून देईल, अशा वजनदार व्यक्तीचे नावही मला सांगितले. मी नुसता फ़ोन केला किंवा ओळख दिली तरी त्यांची समस्या तो माणुस सोडवणार होता. मी मान्य केले आणि त्या व्यक्तीचा फ़ोन शोधून काढला. संपर्क साधला तर ती व्यक्ती सापडली नाही. पण माझा फ़ोन ज्यांनी घेतला, ते त्या व्यक्तीचे सहकारी मला पत्रकार म्हणून ओळखत होते आणि त्यांनी काम होईल चिंता नको सांगत पिडीतांना त्यांच्या कार्यालयात पाठवायची सुचना केली. तिथून त्यांनी संबंधित सरकारी कार्यालयाला सुचना दिल्या आणि फ़टाफ़ट दुरुस्त्या होऊन दुसर्‍या दिवशी मृत्यूचा दाखला हाती पडला. याला काय म्हणायचे? सरकार म्हणायचे, की कायद्याचे राज्य म्हणायचे? कारण जे कायद्याच्याच यंत्रणेला अशक्य वाटत होते, तेच त्या यंत्रणेला त्या एका वजनदार व्यक्तीने सोपे करून दाखवले होते.

   ही कोण वजनदार व्यक्ती होती? दिर्घकाळ ज्याच्यावर बाहूबली किंवा गुंडा प्रवृत्तीचा राजकारणी असा आरोप होत राहिला आहे; असा तो माणूस आहे, ज्याने माझ्या त्या नातलगाचे अडलेले कायदेशीर काम विनाविलंब करून दिले. जे कायद्याचेच काम होते, कायदेशीर होते आणि कायद्याच्याच यंत्रणेने करायचे काम होते. पण त्यांच्याकडून होत नव्हते, ते काम कायदा न जुमानणार्‍याने करून दाखवले होते. यातले एक रहस्य समजून घ्यायला हवे. खरेच हा माणुस सभ्य गुलूगुलू बोलणारा नाही. त्याची दहशत आहे. त्या परिसरात त्याचा सार्वत्रिक धाक आहे. पण त्याच धाकामुळे कित्येक कामे सहज मार्गी लागतात, म्हणूनच लोक त्याच्या धाकाचा आदर करतात, मतदानातून त्यावर शिक्कामोर्तब करतात. इथेही तेच झाले होते. जे काम माझ्या नातलगांचे होते, ते त्यांनी सर्वकाही पटवून दिले; तरी कोणी करायला राजी नव्हता. पण तेच त्या वजनदार व्यक्तीच्या कुणा सहकार्‍याने सांगताच विनाविलंब उरकण्यात आले. याचा अर्थच असा, की कामात काही अडचण नव्हती. सहज होण्यासारखे व करण्यासारखे काम होते. पण ज्यांनी करायचे होते, त्यांनीच अडवणूक चालविली होती. पण ज्याच्या समोर अडवणूक चालणार नाही असा माणूस दाखवताच सगळे उठून कामाला लागले. जे काम कायद्यानेच अडवून धरले होते, ते कायदा मोडणार्‍याने झटपट करून दाखवले. ही आपली आजची अवस्था आहे. लोक गुंडांकडे का जातात? कारण ज्याला माध्यमे वा विचारवंत गुंड म्हणतात, तोच आजच्या अराजकातून वाट काढून देणारा वाटाड्या झालेला आहे. आणि असे वाटाडे किंवा कार्यसम्राट गल्लीबोळात व प्रत्येक विभागात तयार झाले आहेत. त्यांच्यामुळेच आजचे कायदेशीर राज्य कायद्याच्या चौकटीत चालवणे शक्य आहे. अन्यथा अवघ्या समाजाची घुसमट होऊन जाईल अशी अराजकाची परिस्थिती सरकार नावाच्या यंत्रणेने उभी करून ठेवली आहे.

   अडचण काय होती? पोलिस, प्रेतागार किंवा नगरपालिकेत जिथे प्राथमिक नोंदी चुकीच्या झाल्या, तो गुन्हा नाही. कारण मृताकडून योग्य माहिती मिळणे शक्य नव्हते. पण त्याचे आप्तस्वकीय खरी कागदपत्रे घेऊन आल्यावर चुकीच्या नोंदी तिथेच दुरुस्त करण्यात कोणती अडचण होती? पण त्यासाठी पन्नास फ़ेर्‍या मारायला लावायच्या. पण तेच काम वजनदार माणसाने सांगितले, मग झटपट बिनतक्रार का झाले? अन्यथा त्याचे ‘कार्यकर्ते’ तिथे कचेरीत येऊन कानफ़टीत वाजवतील, हा धाक त्या आळशी वा आडमुठ्य़ा कर्मचार्‍याला कार्यरत करत असतो. आणि त्याला कार्यरत करणारी प्रेरणा म्हणजे त्या वजनदार व्यक्तीचा धाक किंवा दहशत असते ना? मग एकीकडे कायदा नावाची कागदी दहशत आणि दुसरीकडे गुंड किंवा धोपटून काढण्याची दहशत; असा हा संघर्ष असतो. त्यात गुंडाची दहशत काम मार्गी लावते आणि कागदाची दहशत भयभीत होते. या कागदाच्या दहहशतीनेच आज आपल्या जीवनात अराजक आणले आहे. तशा दोन्ही दहशती नुकसान वा हानी करण्याच्या भयावरच आधारीत आहेत. आणि म्हणूनच मला वाटते, की दहशत हीच सत्ता राबवण्याची खरी ताकद वा प्रेरणा असते. कशी ते उद्या बघू.    ( क्रमश:)
भाग   ( ११ )    ५/११/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा