दिवाळीच्या दुसर्या दिवशी सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयाला सुटटी होती. त्यामुळे मलाही लिहिण्यापासून सुट्टी होती. मात्र त्या दिवसाची वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली होती. त्यामुळेच फ़ोन येत होते. तशाच शुभेच्छा चालु होत्या. माझ्या लागोपाठच्या दोन शुभेच्छा विषयक लेखांनी वाचकात खळबळ उडवली होती. खरेच एका बाजूला सरकार औपचारिकता म्हणून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देते. पण तेच सरकार गोळीबार सुद्धा करते, हा विरोधाभास वाचकाला भावला होता. शुभेच्छांचा असा विचार सहसा मांडला गेला नसल्याने, लोकांना त्या दोन लेखांनी चक्रावून सोडले तर नवल नाही. पण योगायोग कसे असतात बघा. त्याच सुट्टीच्या दिवशी सर्वच लोक आपापल्या परीने दिवाळीचा आनंद लुटण्यात गर्क असताना; कुठून तरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त पसरले आणि दिवाळीचा तो दुसरा दिवस संपत आला असताना कलानगर परिसरात लोकांची गर्दी जमू लागली. कलानगर परिसरात शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान मातोश्री आहे. तिथूनच जवळच्याच म्हाडा कॉलनीमध्ये माझे वास्तव्य आहे. त्यामुळे गर्दी जमू लागल्या्चा सुगावा मला लगेच लागला होता. आसपास गजबज सुरू झाली होती, गाड्य़ांची वर्दळ वाढली होती. एकदोघांचे फ़ोनही आले. त्यामुळे मी रात्री अकराच्या सुमारास पाय मोकळे करायला बाहेर पडलो व कलानगरकडे फ़ेरी मारली. तोपर्यंत भोवतालच्या परिसराला पोलिसांनी वेढा दिलेला होता. कलानगर वसाहतीच्या एकदम आतल्या टोकाला मातोश्री बंगला आहे. गेटपासून तो दिसतही नाही. तरी वीसपंचवीस हजाराची गर्दी तिथे घोटाळत होती आणि त्या मोक्याच्या वळणावरून होणारी सर्व वाहतुक पोलिसांना बंद करावी लागली होती. मध्यरात्र व्हायच्या सुमारास गर्दी वाढू लागली होती. तेव्हा मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी बांद्रा येथे मुक्काम ठोकला आणि वाढत्या गर्दीचे लक्षण ओळखून त्यांनी तडकाफ़डकी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्याची घोषणा केली. कलानगर परिसरात बंदोबस्तासाठी हजारपेक्षा अधिक पोलिसांची फ़ौज तैनात करण्यात आली. शेकडो गाड्या तिकडे येऊन धडकत होत्या. गर्दी फ़ुगतच चालली होती. ऐन दिवाळीचा दिवस असताना त्याकडे पाठ फ़िरवून ही गर्दी तिथे काय करत होती?
शिवसेनाप्रमुखांची तब्येत अकस्मात बिघडल्याची बातमी कुठून तरी लोकांपर्यंत पोहोचली आणि बघताबघता त्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात लोकांची रिघ लागली. असे का व्हावे? ऐन दिवाळीचा दिवस होता आणि आप्तस्वकीयांसोबत मजा करायचे सोडून हे लोक बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता करत रात्री उशीरा कलानगरच्या परिसरात का ताटकळत होते. मी स्वत: टिव्हीवरच्या बातम्या बघत होतो. तर कलानगरच्या परिसरातली गर्दी हटायचे नाव घेत नव्हती. दुसर्या दिवशी भाऊबीज होती. म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस अजून शिल्लक होता. मग तिथे जमलेल्या आणि अजून येतच असलेल्या गर्दीला तिथे येण्याचे काय कारण होते? अत्यंत चांगले अनुभवी कसलेले डॉक्टर्स बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी मात्तोश्री बंगल्यात घेतच होते. गेले काही दिवस अहोरात्र त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर मंडळी नजर ठेवून आहेत. त्यापेक्षा ही कलानगर परिसरात जमलेली गर्दी अधिक काही करू शकणार नव्हती. मग त्यांनी तिथे जमण्याचे कारणच काय होते? त्या प्रत्येकाला कसली हुरहूर तिथे घेऊन आली होती? त्यांच्या मनातल्या शंका कुशंकाच त्यांना कलानगरच्या गेटपाशी घेऊन आल्या होत्या. आणि प्रत्येकाला माहित आहे, की आपल्याला मातोश्रीपर्यंत पोहोचता येणार नाही. सुरक्षा कवच भेदून बाळासाहेबांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही; हे त्या गर्दीतल्या प्रत्येकाला चांगलेच माहित होते. तरीही असे लोक तिथे हजारोच्या संख्येने जमले होते, येत होते व तिथेच रेंगाळत होते. मग तिथे हे हजारो लोक घुटमळत कशाला होते? आपल्याला प्रिय असलेला एक अफ़ाट माणूस आता सुखरूप नाही, ही जाणीव त्यांना तिथून हलू देत नव्हती. त्या अस्वस्थतेला शुभेच्छा म्हणतात. त्यातला कोणी साहेबांना शुभेच्छा देत नव्हता, त्यापैकी कोणाच्या तोंडी शुभेच्छा असा शब्दही नव्हता. पण त्या प्रत्येकाचे मन शुभेच्छा व सदिच्छांनी ओतप्रोत भरलेले होते. काही व्हायचे ते होवो, चमत्कार घडो, पण साहेबांच्या जीवावर आलेला हा प्रसंग टळलाच पाहिजे; अशी अतीव इच्छा त्या सर्वांना तिथे घेऊन आली होती, तिथेच घुटमळत ठेवत होती. शुभेच्छा किती चमत्कारिक गोष्ट आहे ना?
गेला आठवडाभर त्यातल्या प्रत्येकाने कोणाला ना कोणाला दिवाळीच्या शुभेच्छा अगत्यपुर्वक दिल्या असतील. त्यापैकी किती लोकांनी बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्या होत्या? बहूधा एकानेही नाही. कारण त्या गर्दीत घुटमळणार्या कोणालाही मातोश्रीपर्यंत पोहोचणेच शक्य नाही. त्यांना कलानगरच्या गेटमधून आत जायलाही मिळत नाही. पण त्याच लाखो करोडोंच्या शुभेच्छांनी शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांना एवढे मोठे यशस्वी राजकीय नेता बनवले आहे. त्यामध्ये १९६६ पासूनचे तरूण व आज साठीच्या पलिकडे वृद्धत्वाकडे झुकलेले जुने निष्ठावान शिवसैनिक आहेत. तसेच त्यांच्या मुले व नातवांच्या पिढीतल्या शिवसैनिकांचाही समावेश आहे. त्यातल्या कित्येकांना साहेबांशी आमनेसामने दोन शब्दही बोलण्याची संधी आयुष्यात कधी मिळालेली नसेल. पण ती सामान्य माणसे आपल्या घरातल्या दिवाळीच्या सणापेक्षाही साहेबाच्या प्रकृतीच्या आरामात आपला आनंद शोधणारी आहेत. साहेबांच्या प्रकृतीला आराम पडल्याची बातमी त्यांची दिवाळी आनंदाची करू शकते, असे ते निष्ठावान आहेत. त्यांनी कधी समोर हात मिळवून साहेबांना शुभेच्छा दिलेल्या नसतील. किंवा ज्याला दैवत मानले त्या साहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्या गर्दीतल्या शिवसैनिकांना आशीर्वादही दिलेला नसेल. पण त्यांनी मात्र अगत्याने आपल्या यशाचे श्रेय बाळासाहेबांच्या आशीर्वादालाचे दिलेले दिसेल आणि ज्या शुभेच्छा-सदिच्छा समोर येऊन ज्या सामान्य शिवसैनिकाने दिलेल्या नाहीत, त्याच्याच इच्छेने आपण इतके मोठे झालो; अशी कबूली बाळासहेब नेहमी देत आले. हे नेमके काय प्रकरण आहे? जे दिले-घेतलेले कुणाला दाखवता येत नाही, पण मिळते आणि पोहोचते सुद्धा. त्याचे दृष्य परिणामही दिसतात.
मी जेव्हा शुभेच्छा विषयावर लिहिले ते अनेकांना चकित करणारे होते. पण त्याचा इतका मोठा साक्षात्कार इतक्या लौकर बघायला मिळेल; असे मलाही वाटले नव्हते. माणसे जेव्हा कुणावर सदिच्छांचा मारा करतात आणि त्या मनापासून असतात तेव्हा त्याला त्याचे मन शांत बसू देत नाही. बाळासाहेबांनी दिर्घकालीन जीवनात अशा शेकडो लोकांच्या सदिच्छा व शुभेच्छा जमा केल्या. तीच त्यांची कायमची ताकद होती. गुरूवारी त्यांच्या निवासस्थानी जी थोरामोठ्यांची झुंबड उडाली होती, त्यापैकी कोणी त्यांना ताकद दिली नव्हती. जी गर्दी गेटच्या बाहेर ताटकळत उभी होती, मनोमन प्रार्थना करत होती, तिच बाळासाहेबांची खरी ताकद आहे. त्यापैकी कोणी कधी त्यांच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा घेऊन पोहोचू शकला नसेल. पण त्याच गर्दीच्या मनातल्या शुभेच्छा इतक्या शक्तीशाली आहेत, की बाकीच्या नावाजलेल्या, ख्यातनाम लोकांना मातोश्रीवर खेचून आणत असतात. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या अफ़ाट शुभेच्छा मिळवलेला बाळासाहेब हा एकमेव माणूस असावा. ज्याने लोकांच्या शुभेच्छा व मनावर राज्य केले. त्यांना होणार्या वेदना त्यांच्या चहात्यांना, अनुयायांना जाणवत होत्या. ती वेदनाच त्या गर्दीला तिथे घेऊन आली होती. त्यातला कोणीच त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला आला नव्हता. त्या गर्दीतल्या प्रत्येकाला आपले दैवत आपला नेता सुखरूप आए एवढेच ऐकायचे होते, खात्री करून घ्यायची होती. तो सुखरूपच आहे, अशी मनाची भावना होती. त्यावर कुणीतरी शिक्कामोर्तब करावे, एवढीच त्या गर्दीची अपेक्षा होती.
म्हणूनच त्यातल्या कोणी शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण आपल्या शुभेच्छा व्यक्त करण्याची त्या गर्दीला कधी गरजच वाटली नाही. बाळासाहेब व शिवसेनाप्रमुख हेच त्या गर्दीच्या शुभेच्छांचे मुर्तीमंत रुप आहे. गेल्या चारपाच दशकात शिवसेनाप्रमुख हा आपल्या अनुयायांचा, चहात्यांचा नेता होण्यापेक्षा त्या सामान्य शिवसैनिकाच्या मनातली शुभेच्छाच होऊन गेले होते. शिवसेनाप्रमुख हीच मराठी माणसासाठी एक शुभेच्छा होऊन गेली होती. कारण या एका माणसाने मराठी माणसाच्या शुभेच्छांचेच रूप धारण केले होते. मग जी साक्षात शुभेच्छाच आहे, तिला कुठल्या कोणाच्या शुभेच्छेची गरजच काय? तिच्या उच्चाराची, शब्दांची, देण्याघेण्याची गरजच काय? ज्यांना त्यांनी कधी कुठले सत्तापद दिले नाही, उमेदवारी दिली नाही, अधिकारपद दिले नाही अशा लाखो शिवसैनिकांची शुभेच्छा होऊन गेलेला माणुस म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्या शुभेच्छेची प्रकृती नाजूक आहे हे कळल्यावर कोणाची दिवाळी आनंदात जाईल? त्या दिवाळीच्या शुभेच्छा शोधायलाच ती गर्दी तिथे अपरात्रीही जमा झाली होती. फ़रक अगदी किंचित होता. तिथे कोणीही शुभेच्छा हा शब्द उच्चारला सुद्धा नाही. पण अवघ्या परिसरात मात्र शुभेच्छा गर्दी करून दाटीवाटीने वावरत होती. ( क्रमश:)
भाग ( २१ ) १६/११/१२
Atyant marmsparshee...satya..!
उत्तर द्याहटवाजय महाराष्ट्र..!!
उत्तर द्याहटवा