रविवार, ११ नोव्हेंबर, २०१२

झुंड किंवा टोळ्या बनतात-घडतात कशा?

   आपण रोजच्या रोज कितीही कायद्याचे राज्य किंवा लोकशाही असले शब्द ऐकत असलो, तरी आजही आपल्याकडे माणसांच्या झुंडीच कार्यरत आहेत. कायदा नावाचे एक बुजगावणे जरूर आहे. पण त्याची एखाददुसर्‍याला भिती वाटत असते. पण जेव्हा माणसे झुंड वा कळप होऊन बाहेर पडतात, तेव्हा त्या कायद्याचे काही चालत नाही. अनेकदा तर कायदा थकतो आणि झुंडीच आपापला न्यायनिवाडा करत असतात. कालपरवाचीच गोष्ट घ्या. तामीळनाडूच्या अण्णानगर भागात वणियार नावाच्या झुंडीने शेजारच्या दलित वस्तीवर चाल केली; तर ३०० हून अधिक पोलिस तिथे असूनही काही करू शकले नाहीत. व्हायचे ते होऊन गेले. मग हजारापेक्षा जास्त पोलिसांची कुमक तिथे आणली, तेव्हाच शांतता प्रस्थापित झाली. याचा अर्थ कसा लावायचा? पोलिसांची झुंड मोठी आणि अधिक सशस्त्र होती; म्हणुन दुसर्‍या झुंडीने माघार घेतली ना? आणि असे फ़क्त एकदाच किंवा तिथेच घडले असे मानयचे कारण नाही. दोनच महिन्यांपुर्वी नागपूरमध्ये भुर्‍या नावाच्या गुंडाचा बंदोबस्त झुंडीलाच करावा लागला होता. एका वस्तीमध्ये हा गुंड धुमाकूळ घालत होता. पण कायदा त्याचा कुठला बंदोबस्त करू शकला नाही. तेव्हा वस्तीतल्या चिडलेल्या लोकांचा कळप त्याच्यावर चाल करून गेला. त्याच्या भावाचा त्या जमावाने मुडदा पाडला. नंतरच कायदा कार्यरत झाला आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात अशीच एक मोठी झुंड आझाद मैदानाच्या परिसरात जमून धुमाकूळ घालत होती. त्यांनीही उत्पात घडवले, महिला पोलिसांचा विनयभंग केला, जाळपोळ केली.

   त्या घटनेने मुंबईकर कमालीचा विचलित झाला. मग त्या हिंसाचाराच्या विरोधात राज ठाकरे यांच्या मनसेने मोर्चा काढायचे ठरवले. तेव्हा त्यांना चौपाटीवर जमून मोर्चा काढायला कायद्याने परवानगी नाकारली होती. पण कायदा कोणी जुमानला? तिथे माणसांचे घोळके येत राहिले आणि गर्दी वाढतच गेली. तेव्हा परवानगी नाकारणार्‍या कायद्याच्या अंमलदारांनी काय केले? आदेश मोडून जमणार्‍यांना अटक केली की त्यांची धरपकड केली? तो जमाव तिथून आझाद मैदानावर ज्या मार्गाने जाणार होता, त्या मार्गावरील वाहतुक थांबवून मोर्चाला जाण्याची सुविधा निर्माण करण्यात आली. थोडक्यात जे कायदा मोडत होते, त्यांची सरबराई पोलिसच करत होते. मग कायदा व पोलिस कोणाला शरण गेले होते? पुन्हा पोलिस व कायदा माणसांच्या झुंडीला शरण गेलाच ना? मोर्चा संपल्यावर त्या मोर्चाचे आयोजन करणार्‍या पदाधिकार्‍याला नोटिसा बजावण्यात आल्या. कायदा मोडताना बघत बसायचे आणि नंतर कायद्याची वाचाळता सुरू करायची; याला कयद्याचे राज्य म्हणता येईल काय? राज ठाकरे कायदा धाब्यावर बसवून तो मोर्चा का काढू शकले? माणसाची व आपल्या अनुयायांची प्रचंड झुंड आपण तिथे आणू शकतो, याची त्यांना खात्री होती. तेवढेच नाही तर कायदा लोकांच्या झुंडीला वचकून असतो; याची जाणिव होती म्हणूनच त्यांनी बंदीहुकूम धाब्यावर बसवला. यालाच मी झुंडीचे राज्य म्हणतो. जिथे कायदा वगैरे कागदावर असतो आणि माणसांच्या झुंडी आपल्याला हवी तशी मनमानी करू शकतात.

   हेच गेल्या वर्षी दिल्लीत अण्णा हजारे यांना पोलिसांनी रहात्या घरातुन भल्या सकाळी अटक केल्यावर दिल्लीत घडले होते. लोकांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर उतरल्या आणि अण्णांना डांबून ठेवलेल्या तुरूंगाच्या दिशेने येऊ लागल्या. तेव्हा कायद्याच्या अंमलदारांचा धीर सुटला होता. त्यांनी अण्णांना सोडून देण्याचा तडकाफ़डकी निर्णय घेतला. मग अण्णांनी तुरूंगाच्या बाहेर जाण्यास नकार दिल्यावर त्यांची तिथेच जेलरच्या कार्यालयात वास्तव्य करण्याची सोय लावण्यात आली. हे कुठल्या कायद्याच्या तरतुदीनुसार झाले होते? आठवडाभर आधी ज्या रामलिला मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारण्यात धन्यता मानली जात होती, तोच कायदा व तेच सरकार झुंडी रस्त्यावर उतरल्या; तेव्हा झुंडींना शरण आले ना? मग आपण टोळीच्या किंवा झुंडीच्या युगातून पुढे आलो असा दावा करण्यात काय अर्थ आहे? आणखी एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे. अण्णांना अटक झाली, तेव्हा रस्त्यावर आलेल्या लोकांच्या झुंडी कुठल्या प्रेरणेने आल्या होत्या? त्यांना कोणी तिथे आणून सोडले नव्हते, की जमवले नव्हते. त्या स्वेच्छेने तिथे एकवटल्या होत्या. म्हणजेच झुंड जमाव म्हणून एकत्र आल्यावरच समुहाने विचार करते असे नाही. विस्कळीत समाज सुद्धा समान व सामुहिक विचार करीत असतो. एकप्रकारे समुह विचार ही सुप्त प्रेरणा असते. ती मुलत: समुहभावना असते. मोबाईलचे बिनतारी नेटवर्क असावे, तशी ही भावना सर्वाना किंवा समान स्वभावाच्या, गुणधर्माच्या लोकांना सतत जोडून ठेवत असते. समान संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो; तेव्हा ती सर्व माणसे समान प्रेरणेने प्रवृत्त होतात, कार्यरत होतात.

   झुंड म्हणजे एकत्र आलेला मानवी जमाव असेही मानायचे कारण नाही. समान विचार वा समान संदेशाने कार्यरत होणारी माणसे असा त्याचा अर्थ असतो. ती एकमेकांपासून दूर असू शकतात. पण सारखीच विचार करणारी असतात. आणि जेव्हा त्यांना अशा समुहविचाराची प्रेरणा मिळते; तेव्हा त्यांच्यातल्या व्यक्तीगत विचारशक्तीचा लोप होतो, अशा माणसांचीच झुंड तयार होत असते. ती केवळ सामान्य बुद्धीच्याच लोकांची होते, विचार करू शकणार्‍या, बुद्धीमान लोकांची होऊ शकत नाही; असे मानायचे कारण नाही. अगदी आपण ज्यांना सुबुद्ध समजतो, त्यांच्यातही अशी झुंडीची मानसिकता उपजत असते. विवेकाला सोडचिठ्ठी दिली; मग समुहविचाराचा पगडा आपल्या बुद्धीवर चढत असतो. तिथे आपल्या सामान्यज्ञानाला किंवा सारासार बुद्धीला तिलांजली दिली जात असते. आपल्या बुद्धीला व विवेकाला न पटणार्‍या गोष्टी आपण सहजगत्या करू लागतो. कारण समुहविचाराच्या आहारी गेला किंवा फ़ेर्‍यात अडकला म्हणजे माणसाला आपल्या विवेकबुद्धीचा वापर करण्याची मुभा शिल्लक उरत नसते. समुह करील तोच विचार असतो. मग अशी माणसे अत्यंत खुळेपणाने कसालाही आग्रह धरू शकतात किंवा चुकीच्या गोष्टीचेही समर्थन करू लागतात. जेव्हा डोकेच चालत नाही तेव्हा ती समुहविचाराने पछाडलेली माणसे घोषणांचा आधार घेऊ लागता. स्वत:ला लढाऊ म्हणून मिरवणार्‍या ज्या संघटना आपल्या आसपास आहेत, त्यांचे अनुयायी बघा; काही शब्द कसे परवलीचा म्हणुन वापरतात. आपल्यातला दुबळेपणा लपवण्यासाठी व आपला लढाऊबाणा दाखवण्यासाठी त्यांना अशा घोषणा उपयोगी पडत असतात. त्यामुळेच झुंडीचे नेतृत्व करणारा किंवा मानवी कळपांना झुलवणारा, नेहमी परवलीचे शब्द वा घोषणा आपल्या झुंडीला देत असतो. त्यांच्या सततच्या उच्चरवातील उच्चाराचा आग्रह धरला जात असतो.

   अशा समुह मानसिकतेचे दोन लोक भेटले, तर ते अगत्याने परवलीच्या शब्दाचा उच्चार करताना दिसतील. सलाम आलेकु. जय महाराष्ट्र, जय भीम, गॉड ब्लेस अमेरिका, जयहिंद, जय जिजाऊ असे शब्द परवलीचे असतात. त्यातून आपली समुहभावना जोपासली जात असते. अशा शब्दांचा उच्चारही अंगात स्फ़ुरण आणत असतो. आपण एकटे नाही तर आपण कळप आहोत आणि आपल्यासमोर बाकीचे सर्व कळप क्षुद्र आहेत; अशी धारणा त्यातून येत असते. म्हणूनच कळपाच्या मानसिकतेमध्ये किंवा झुंडीच्या मानसशास्त्रामध्ये घोषणा वा अशा परवलीच्या शब्दांना अत्यंत महत्व असते. एक म्हणजे त्यातून आपला वेगळेपणा सिद्ध होतो आणि दुसरे म्हणजे समुहभावनेची आश्वस्त शक्ती अंगी संचारते. पाकिस्तानी कर्णधार शोएब मलिक जगभरच्या मुस्लिमांची माफ़ी विश्वचषक हरल्यावर मागतो. कारण त्याला तो पराभव खुप झोंबलेला होता. पण दोनशे कोटी मुस्लिम माझ्या सोबत आहेत, असे सुचवून तो पराभव पचावण्यासाठी हवी असलेली शक्ती व हिंमत शोएब मिळवत असतो. समुहाचा घटक होऊन किंवा त्यात सहभागी होऊन जोपर्यंत माणूस वागणार आहे; तोपर्यंत त्याची प्राण्यांच्या झुंडीप्रमाणे वागण्याची मानसिकता संपुष्टात येणार नाही. त्याची नागरी समाज व टोळी समाज अशा दोन टोकांमध्ये ओढाताण चालुच रहाणार आहे. सहाजिकच जो कोणी अशा सामुहिक मानसिकतेचा उपयोग करण्यात कुशल असतो, तोच लोकांवर राज्य करणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदा्ची निवडणुक दुसर्‍यांदा जिंकल्यावर ओबामांनी केलेले भाषण त्यांच्यातल्या सामुहिक हुकूमतीचे कौशल्य दाखवणारा उत्तम नमुना होता. आपला विजय त्यांनी टोळीला अर्पण करून त्याची साक्षच दिली.     ( क्रमश:)
  भाग  ( १८ )   १२/११/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा