शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१२

झुंडशाहीसमोर लोकशाही शरणागत का होते?


  आज आपण रोजच्या रोज जे घोटाळे किंवा अफ़रातफ़री ऐकत असतो, ती परिस्थिती दोनशे वर्षापुर्वीच्या भारतापेक्षा वेगळी आहे काय? आपण राजे किंवा नबाब, सुलतान आहोत तर आपल्यावर रयतेच्या कल्याणाची व सुरक्षेची काही जबाबदारी आहे; हे विसरून ऐषारामात गुंतलेले ते सरंजामदार संस्थानिक आणि आजचे सत्ताधारी राजकारणी यांच्यात नेमका कोणता गुणात्मक फ़रक आहे? दुसरीकडे तेव्हाच्या रयतेचे जीवन जसे हलाखीचे व केविलवाणे झालेले होते, त्यापेक्षा आज तुमचीमाझी अवस्था वेगळी आहे काय? कधीही कसाब टोळी येते आणि कोणाचेही मुददे पाडुन मोकळी होते. कोणीही आपली झुंड तयार करतो आणि दंगल माजवतो, लूट करतो, महिलांची अब्रू लुटतो. दुष्काळ माजला आहे, शेतकरी आत्महत्या करतो आहे, त्याची आजच्या निवडून आलेल्या सरंजामदारांना थोडीतरी फ़िकीर आहे काय? त्यापैकी कोणाच्या तोंडचा घास अशा बातम्या ऐकून अडतो का? त्यांचे सणसमारंभ नि मौजमजा छानपैकी चालू आहे. इकडे रस्त्यातून मुली पळवल्या जातात, बलात्कार करून त्यांचे मुददे कुठेही फ़ेकून दिले जातात आणि तिकडे युवती मेळावे घेऊन सुप्रिया सुळे मुलींची छेड काढणार्‍याला दुसरी थप्पड मारण्याच्या वल्गना करीत असतात. त्या वल्गनांना आमचे संस्थानिक व त्यांचे भाट हुजरे टाळ्या वाजवत असतात. दोनशे वर्षापुर्वी दरोडेखोरी, चोर्‍या, अत्याचार व टोळीबाजी माजली होती. को्णीही आपली टोळी बनवून मस्ती करू शकत होता आणि आज तसाच प्रकार चालू नाही का? कोणी बेकायदा टोळी बनवतो तर कोणी कायदेशीर अटी पुर्ण करून टोळीबाजी करतो. सर्वाची भूमिका एकच आहे. आपली संघटित ताकद निर्माण करायची आणि जी बिचारी रयत जनता आहे, तिला ओलिस ठेवायचे.

   को्णी रिक्षावाला असतो, कोणी गॅस वा औषधांचा विक्रेत्यांची टोळी संघटित करतो. कोणी जाती पोटजातीची टोळी बनवून सत्तेकडे आपली भागी मागू लागतो. चोहीकडे संघटित टोळ्यांची दादगिरी चालू आहे ना? खंबीरपणे उभे राहून त्यांच्यावर कायद्या्चा आसूड ओढू शकेल; अशी कुठली सत्ता किंवा ताकद आहे का? केंद्रात किंवा राज्यात कुठेतरी कायद्याचे राज्य म्हणावे; अशी परिस्थिती कोणाला दिसते आहे का? यालाच अराजक म्हणतात. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी एकूण स्थिती आहे. म्हटले तर देशात राज्यघटना आहे आणि शेकडो नव्हे तर ह्जारो कायदे आहेत. पण ज्यांच्या हाती ते कायदे राबवायचे अधिकार आहेत, त्यांना तशी इच्छाच नाही किंवा तेवढी ताकद त्यांच्यापाशी नाही. सहाजिकच कायदे आहेत, पण निकामी झाल्यासारखी देशाची अवस्था आहे. आणि कोणी त्याबद्दल तक्रार केली, तरी त्याला पुन्हा कायद्याचाच हवाला दिला जात असतो. कायद्याच्या नादाला लागून तुम्ही कोर्टात वगैरे गेलात. तर आयुष्य संपुन जाते. पण न्याय मिळण्याचा आशेचा किरणही दिसायची शक्यता नसते. मग लोकांनी करायचे काय? कुणाच्या भरवशावर जगायचे? शाळेत गेलेले मुल किंवा नोकरी धंद्यासाठी घराबाहेर पडलेला माणूस, सुखरूप संध्याकाळी माघारी येईल याची कोणी हमी देऊ शकत नाही. यापेक्षा दोनशे वर्षापुर्वीची अवस्था वेगळी नव्हती. कारण ज्यांच्या हाती सत्ता व अधिकार होते, त्यांना कायद्याचा अवलंब करायला आपल्या ऐषोरामातून सवडच मिळत नव्हती. उलट जिथे ज्याच्या हाती जेवढा अधिकार आलेला होता, त्याचा तो मनमानी पद्धतीने वापर करीत होता. आपल्याला जाब विचारणारा कोणी नाही, याची खात्रीच त्या मनमानीला कारण झाली होती. आजचा अनुभव काय वेगळा आहे?

   गावच्या तलाठ्यापासून चौकीतल्या पोलिस शिपायापर्यंत प्रत्येकाची मनमानी चालू नाही का? मुंबईतल्या गिरणी कामगाराला त्याच गिरण्यांच्या जमिनीच्या बदल्यात घर देण्याच्या विषयावर सरकारला चार मुख्यमंत्री बदलले तरी अनेक वर्षे निर्णय घेता आलेला नाही. कायदे व नियमांच्या जंगलातून वाट शोधतांना त्यांचीच दमछाक झालेली आहे. पण त्याच सरंजामशाही राबवणार्‍या लोकशाही नेत्यांना, आदर्श सोसायटीच्या फ़ायली त्याच कायद्याच्या जंगलातून सुखरूप बाहेर काढायला एक दिवसही पुरतो. ह्याला कायद्याचे राज्य म्हणायचे, की मनमानी म्हणायचे? माझ्या बुद्धीनुसार त्यालाच अराजक म्हणतात. ज्याच्या हाती लाठी त्याची भैस; हाच व्यवहारी कायदा झाला आहे. आणि दोनशे वर्षापुर्वी तेच होते. शिस्त नावाचा प्रकारच नव्हता. ज्याला गुंडगिरी करता येईल, त्याची हुकूमत अशी स्थिती होती आणि त्यालाच सामान्य जनता जिला म्हणतात ती कंटाळून गेली होती. अशा वेळी ज्यांनी त्या रयतेला सुरक्षिततेची हमी दिली व प्रत्यक्ष कृतीतून सुरक्षा निर्माण करून दाखवली; त्यांना रयत शरण गेली. तिने बाहू पसरून त्यांचे स्वागत केले. ज्यांनी त्या रयतेला स्थैर्याचा अनुभव आपल्या कारभारातून दिला. त्यांना कंपनी असून जनतेने नवा राजा म्हणून मान्यता दिली. पण प्रत्यक्षात ते कोण होते? ते राजे नव्हते, ते राजकारणी नव्हते, ते योद्धा नव्हते, ते होते फ़क्त व्यापारी. आणि त्यांनी शिस्तबद्ध कारभारातुन व व्यवहारातून जनजीवनात स्थैर्य आणले होते, शिस्तबद्धता आणली होती. त्यांनी इथल्या जनतेच्या कल्याणाची आश्वासने दिली नव्हती, की तिच्या राष्ट्रीय अस्मितेची जपणुक करण्याचे आश्वासनही दिले नव्हते. केवळ जीवनातील स्थैर्य व सुरक्षितता, एवढ्यासाठी भारतीय जनतेने ब्रिटीश व्यापार्‍यांच्या सत्तेला मान्यता दिली होती. कारण इथला सत्ताधारी वर्ग आपली कर्तव्ये व जबाबदार्‍या विसरून ऐषारामात गुरफ़टला होता, त्याने आपल्या नालायकीमधून अराजकाची परिस्थिती निर्माण केली होती. त्यानेच आपल्या कर्तव्यशून्य वागण्यातून परकीय व्यापार्‍यांना सत्ता हाती घेण्याचे आमंत्रणच दिले होते. ज्याला नंतर आपण पारतंत्र्य असे नाव दिले, त्याचे प्रायोजक व आयोजक इथले नालायक सताधारीच होते.

   दुर्दैवाची गोष्ट इतकीच, की आज तशा पद्धतीने राजकीय बदल होण्याची शक्यता नाही. कारण साधने व तंत्रज्ञान बदलले आहे. आपण एकविसाव्या शतकात आहोत. आणि शस्त्रबळावर सत्तांतर करण्याचा जमाना मागे पडला आहे. व्यवहारी पद्धतीनेच सता मिळवता येऊ शकेल. आणि त्यासाठी लढण्याची, युद्धाची गरज उरलेली नाही. जो कोणी खंबीरपणे उभा राहून जनतेला सुरक्षेची व स्थैर्याची हमी देईल; त्याला इथली जनता मतांनी देशाचा राजा बनवू शकेल. नुसता राजाच नव्हेतर हुकूमशहा सुद्धा बनवू शकेल. कारण आता इथली जनता लोकशाहीच्या थोतांडाला कंटाळली आहे. कायद्याच्या निकामीपणाला कंटाळली आहे. ती जनता विचार करणारी नसते, तर उद्धारकाच्या शोधात असते. तिला विचार शिकवणारा नको असतो, तर बदल घडवून आणणारा जादुगार हवा असतो. जीवन ग्रासलेल्या बजबजपुरीतुन बाहेर काढणारा कोणीतरी शुरवीर हवा असतो. जगाच्या इतिहासात असेच घडले आहे आणि आपल्या देशातही तेच घडले आहे, सामान्य जनतेला लोकशाही वगैरे नको असते. ती मुठभरांची बौद्धिक भुक असते, सामान्य जनतेला तिच्या आयुष्याला भेडसावणार्‍या समस्यांवर उपाय काढून देणारा हवा असतो आणि तसा कोणी भेटला, तर तीच जनता त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्पण करायला उत्सुक असते. दोनशे वर्षापुर्वी भारतीय नजतेने तेच केले होते आणि आजही ती त्याच मनस्थितीत आलेली आहे. ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीसह निष्क्रिय कायद्याच्या राज्यानेच गांजली आहे.

   होय मित्रांनो, जरा बारकाईने बघा, आपल्या भोवताली सामान्य माणुस कसा विचार करतो आहे, त्याच्या डोक्यात कोणते विचार घोळत आहेत, त्याचा अंदाज घ्या. मगच मी काय म्हणतो ते समजून घेता येईल. आपल्या देशाच्या संसदेत व अनेक ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक का निवडून येतात, त्याचा कधीतरी जरा गंभीर शोध त्यांना बाहुबली संबोधणार्‍यांनी घेतला आहे काय? ज्यांनी केला असेल त्यांना मी काय म्हणतो त्याचा अर्थ समजू शकेल. आपल्या सुशोभित कार्यालयात वा वातानुकुलित केबीनमध्ये बसून विवेचन करणार्‍यांची बुद्धी पुस्तकातच कुंठीत झालेली असते. वास्तव जीवनाशी त्यांचा संपर्क तुटलेला असतो. त्यामुळेच असे लोक दहशतीवर निवडून येतात हा त्यांचा सिद्धांत आहे. आणि तो तपासुन न घेताच त्यांनी मांडलेला आहे. वास्तवात त्या भागातल्या लोकांनी मनापासुन स्विकारलेला तो आधुनिक राजा असतो. ज्याच्यावर मतदानातून शिक्कामोर्तब केले जाते. निवडून येण्याची क्षमता म्हणजे फ़क्त गुंडगिरी असा होत नाही. गांजलेपणाला आधार देण्याची क्षमता असाही त्याचा अर्थ असतो. म्हणुन कायद्याच्या कसोटीवर ज्यांना गुन्हेगार ठरवले जाते ते पुन्हा पुन्हा निवडून येतात. ती लोकशाहीने झुंडशाही समोर पत्करलेली शरणगती आहे. मग ती झुंडशाही लोक का स्विकारतात?  ( क्रमश:)
भाग   ( ८ )    २/११/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा