शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

‘मार्मिक’ सुरू करण्याच्या वेळची परिस्थिती




  १९६० सालात आचार्य अत्र्यांच्या वाढदिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा आरंभ केला. तत्पुर्वी त्यांनी अनेक ठिकाणी नोकर्‍या केल्या होत्या किंवा वृत्तपत्रासाठी कामही केले होते. त्यांच्याच इतके उत्तम चित्रकला साधलेले धाकटे बंधू श्रीकांत ठाकरे त्यांच्या जोडीला होते. त्यांनी प्रकाशक म्हणून जबाबदाली उचलली आणि बाळासाहेब संपादक झाले. तेव्हाचे सिद्धहस्त पत्रकार द. पां. खांबेटे कार्यकारी संपादक होते. ही झाली टीम ठाकरे. पण या सर्व उद्योगाला प्रबोधनकार ठाकरे यांचा आशीर्वाद लाभला होता. आचार्य अत्र्यांपासून एसेम जोशी, कॉम्रेड डांगे आणि थेट शहू महाराजांपर्यंत सर्वांच्या संपर्कात आलेले प्रबोधनकार हे चालतेबोलते विद्यापीठच होते. पुढल्या काळात सेक्युल्रर विचारवंत लेखक म्हणून नावारूपास आलेले डॉ. य. दि. फ़डके; त्याच प्रबोधनकारांना गुरू मानायचे. त्यांनीच युती शासनाच्या कारकिर्दीमध्ये समग्र प्रबोधनकार साहित्य संकलित करुन प्रकाशित करण्याची जबाबदारी पार पाडली. असा डोंगराएवढा माणुस व पिता पाठीशी उभा असताना; ‘मार्मिक’ बाळासाहेबांनी सुरू केला, ती मग मराठी माणसासाठी चळवळच बनत गेली. एका साप्ताहिकाने असे चळवळीचे रूप का धारण करावे? तसे पाहिल्यास त्याच काळात अनेक मराठी साप्ताहिके व नियतकालिके जोरात चालू होती. पण त्यांच्या मर्यादा होत्या. लेखन वाचन व चर्चा यापलिकडे त्यांची झेप नव्हती. नाही म्हणायला दैनिक ‘मराठा’ हे आचार्य अत्र्यांचे दैनिक खास मराठी चळवळीचे केंद्र होते. चळवळ्यांसाठी ‘मराठा’ हे त्याआधीपासूनचे व्यासपीठच होते. मात्र मराठी भाषिकांचे संयुक्त महाराष्ट्र हे वेगळे राज्य स्थापन झाले आणि ‘मराठा’चे स्वरूप काहीसे बदलत गेले होते. त्यामुळे ‘मार्मिक’ला आपले स्थान निर्माण करणे सोपे होऊन गेले. म्हणूनच शिवसेनेकडे येण्यापुर्वी मुळात ‘मार्मिक’ महाराष्ट्राला का आवश्यक झाला होता ते बघायला हवे.

   तसे पाहिल्यास ‘मराठा’सुद्धा एकटाच नव्हता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्र व्हायला धडपडणार्‍या लेखक व पत्रकारांचे आणखी एक वृत्तपत्र त्या काळात तात्पुरता अवतार घेऊन अंतर्धान पावले होते. ‘लोकमित्र’ असे त्याचे नाव. समाजवादी नेते एस. एम. जोशी त्याचे संपादक होते. जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभारी घेऊ लागली; तेव्हा मराठीमध्ये ‘लोकमान्य’ नावाचे एक प्रमुख दैनिक होते. आजही प्रकाशित होणार्‍या गुजराती ‘जन्मभूमी" दैनिकाचे मराठी भावंड; असे त्याचे स्वरूप होते. पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ केवळ मराठी भाषिक राज्यापुरती नव्हती, तर द्वैभाषिक राज्याच्या विरोधातली होती. द्वैभाषिक म्हणजे आजचा गुजरात व कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचा मिळून जो भूभाग होतो, तेवढे मुंबई राज्य. तिथे मराठी व गुजराती भाषिकांनी एकत्रित गुण्यागोविंदाने नांदावे; असा दिल्लीश्वरांचा आग्रह होता. मात्र तो मराठी विद्वान, साहित्यिक, पत्रकारांना अजिबात मान्य नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भाषिक तत्वावर नवी प्रांतरचना करायचा निर्णय झाल्यावर; त्या भूमिकेला नवी उभारी मिळाली. पण त्याच्याही खुप आधीपासूनच साहित्य संमेलन वा पत्रकार संमेलनातून मराठी भाषिक राज्याचे ठराव वेळेवेळी मंजूर केले जातच होते. मात्र जेव्हा हट्टाने गुजरात-मराठी एकच राज्य बनवायचा निर्णय लादला गेला, तेव्हा तो सुप्त विरोध प्रचंड प्रमाणावर उफ़ाळून आला. त्याचीच पार्श्वभूमी ‘लोकमान्य’ दैनिकातील पेचप्रसंगाला लाभली होती. तिथे काम करणारे संपादक किंवा पत्रकार आजच्यासारखे रस्त्यावर उतरून अविष्कार स्वातंत्र्याचा झेंडा खांद्यावर नाचवणारे नाचे नव्हते. तर पगार वा नोकरीवर लाथ मारून आपल्या तत्वाशी व विचा्रांशी प्रामाणिक राहू शकणारे आणि त्यासाठी किंमत मोजायची क्षमता अंगी असलेले निव्वळ पत्रकारच होते. त्यातूनच ‘लोकमान्य’चा पेचप्रसंग निर्माण झाला आणि ‘लोकमित्र’ एसेमना सुरू करावा लागला.

   ‘जन्मभूमी’ व ‘लोकमान्य’ ही दोन्ही दैनिके चालविणारी कंपनी व मालक मंडळी गुजराती होती आणि त्यांचे द्वैभाहिकाला समर्थन होते. अशा परिस्थितीत ‘लोकमान्य’च्या संपादक, पत्रकारांनी आपला मराठी बाणा दाखवत संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या मराठी भूमिकेला पाठींबा देणे व त्याचे समर्थन करणे मालकांना मान्य नव्हते. किरकोळ बातम्यांपुरते तिकडे लक्ष द्यावे. पण संपादकीय भूमिका मात्र द्वैभाषिकाचे समर्थन करणारी असावी असा मालकांचा आग्रह होता. पण संपादकांनी तो झुगारून लावला. आपण दैनिकाचे संपादक आहोत तर त्यातली वैचारिक भूमिका व संपादकीय स्वातंत्र्य आपण सोडणार नाही, ही ठाम भूमिका घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पाठींबा देणारा अग्रलेख ‘लोकमान्य’मध्ये छापून आणला गेला. बहुधा पां. वा. गाडगिळ ‘लोकमान्य’चे तेव्हा संपादक होते (मला आता सगळेच आठवत नाही. कारण मी तेव्हा फ़ारतर आठनऊ वर्षाचा होतो). पण घरातल्या शेजारच्या मोठ्या माणसांच्या चर्चेतून ऐकलेले आठवते. त्या संपादकीय लेखाने त्या वृत्तपत्रात खळवळ माजली. ज्या दिवशी तो अग्रलेख छापून आला; त्याच दिवाशी मालक व पत्रकार-संपादक यांच्यात खटका उडाला. पण आपल्या भूमिकेपासून माघार घ्यायला संपादक तयार नव्हते. अखेरीस मालकाने ‘लोकमान्या’चे प्रकशन थांबवण्याची धमकीच दिली. तर संपादकांनी माघार घेण्याची गोष्ट बाजूला राहिली. ‘लोकमान्य’चे तमाम पत्रकार आपल्या संपादकाच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि ‘लोकमान्य’ हे मराठी दैनिक त्या दिवशी बंद झाले. आज आपल्या अविष्कार स्वातंत्र्याचा टेंभा मिरवणार्‍या किती पत्रकारांमध्ये अशी नोकरी गमावून तत्वासाठी बेकार व्हायची हिंमत आहे? कोणा शिवसैनिकाने दोन थपडा मारल्या किंवा संभाजी ब्रिगेडवाल्यांनी घराच्या दारावर डांबर फ़ासले, मग हौतात्म्याचा आव आणणारे नाटकी मराठी संपादक; आज स्वातंत्र्यवीर म्हणून मिरवत असतात. त्यापैकी एकाची तरी लायकी त्या ‘लोकमान्य’च्या पत्रकाराच्या पायाजवळ बसण्याइतकी तरी आहे काय?

   एका दिवसात मराठी भाषिक राज्य व अविष्कार स्वातंत्र्यावरची गदा यासाठी त्या पत्रकारांवर बेकार व्हायची पाळी आली होती. तेव्हा त्यांना काम मिळावे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बातम्या लोकांपर्यंत वास्तव रुपात पोहोचाव्या; म्हणून एसेम जोशी यांच्या नेतृवाखाली नवे दैनिक सुरू करण्यात आले, त्याचे नाव होते ‘लोकमित्र’. मात्र त्याच्याकडे साधने अपुरी होती; तशीच व्यवस्थाही अपुरी होती. दरम्यान मराठी राज्याच्या मागणीसाठी लढणार्‍या नेत्यांमध्ये नाटककार व साहित्यिक आचार्य अत्रे यांचाही समावेश होता. त्यांचे ‘नवयुग’ साप्ताहिक होते. तर लोकांनी त्यांच्याकडे दैनिक काढण्याचा आग्रह धरला होता. खिशात दिडकी नसताना त्यांनी लोकांकडे वर्गणी मागून दैनिक सुरू करण्याचा पवित्रा घेतला. त्यातून सुरू झाला तो ‘मराठा’. अधिक खाडिलकरांचा ‘नवाकाळ’ होताच. या तीन दैनिकांनी संयुक्त महाराष्ट्राची लढाई उभी केली होती. त्यात मग अनेक लहानसहान व प्रादेशिक मराठी साप्ताहिके व नियतकालिकांनी आपल्याला जमेल तसा हातभार लावला होताच. तेव्हाचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. आज प्रत्येक वृत्तपत्र खपाचे आकडे सांगण्यासाठी आटापिटा करत असतात. आपणच किती लोकप्रिय आहोत ते सांगणार्‍या जाहिराती आपल्याच अंकात छापतात किंवा आपल्याच वाहिन्यांवर बोलबाला करीत असतात. पण वृत्तपत्र वा माध्यमावर लोक किती प्रेम करतात, त्याचा उत्तम नमूना म्हणजे ‘मराठा’ हे दैनिक होते. रात्री उशिरा खिळ्याच्या टाइपची जुळणी पुर्ण झाल्यावर छपाई सुरू झालेल्या ‘मराठा"ची छपाई दुसर्‍या दिवशी दुपार उजाडली तरी चालू असायची आणि संध्याकाळपर्यंत ते दैनिक विकले जात असे. कारण मागणी भरपूर असली, तरी आजच्या सारखी झटपट लाखो प्रती छापायची यंत्रणा उपलब्ध नव्हती आणि ‘मराठा’ चालवणार्‍यांना परवडणारी नव्हती.

   तर मुद्दा इतकाच, की ‘मार्मिक’चा मराठी माध्यमांच्या जगात उदय झाला त्याची अशी पार्श्वभूमी होती. आधीच मराठीचा विषय व मराठी माणसाच्या न्यायाचा संघर्ष करणारी अनेक नियतकालिके बाजारात उपलब्ध होती. त्यांच्याच मेहनत व संघर्षातून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली होती. विविध राजकिय पक्ष व संघटना महाराष्ट्रात होत्या. पण त्यांना मराठी अस्मितेसाठी एकत्र आणायचे व एकत्र लढायला उभे करण्याचे महत्वपुर्ण काम; तात्कालीन मराठी नियतकालिकांनी बजावले होते. या लेखक, पत्रकार, संपादक व बुद्धीमंतांनी मराठी समाजाची अस्मिता अशी काही जागवली व बुलंद बनवली, की मराठी अस्मितेकडे पाठ फ़िरवून राजकारण करणेच अशक्य होऊन बसले होते. त्यामुळेच आपापल्या राजकीय भूमिका व अट्टाहास, तत्वज्ञान, आग्रह बाजूला ठेवून त्या सर्वच राजकिय पक्षांना संयुक्त महाराष्ट्र समिती बनवण्याचे काम हाती घ्यावे लागले. वर्तमानपत्र किंवा लेखणीसह अविष्कार स्वातंत्र्याची ताकद किती अगाध असते; त्याची साक्ष देणारा तो कालखंड होता. त्याचा उदय तरूणपणी बाळासाहेब बघत होते, त्यापासून शिकत होते. कदाचित त्यातूनच त्यांनी आपल्या मनाशी काही खुणगाठ बांधून ‘मार्मिक’ सुरू केला असेल काय?   (क्रमश:)
भाग   ( ११ )    २९/११/१२

1 टिप्पणी:

  1. "कोणा शिवसैनिकाने दोन थपडा मारल्या किंवा संभाजी ब्रिगेडवाल्यांनी घराच्या दारावर डांबर फ़ासले, मग हौतात्म्याचा आव आणणारे नाटकी मराठी संपादक; आज स्वातंत्र्यवीर म्हणून मिरवत असतात. त्यापैकी एकाची तरी लायकी त्या ‘लोकमान्य’च्या पत्रकाराच्या पायाजवळ बसण्याइतकी तरी आहे काय?" , भाऊ जो भी मारा सॉलिड मारा! आम्हाला हे दोघेही पत्रकार माहीत आहेत.

    उत्तर द्याहटवा