शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

कुंभकर्ण जागवायचा कसा?

   दिल्लीच्या घटनेनंतर देशभर प्रक्षोभ उसळला होता. सरकारने नवा कायदा केला. म्हणून मुंबईत झालेला सामुहिक बलात्कार थांबू शकला नाही. त्यानंतरही देशाच्या विविध शहरात, वस्त्यांमध्ये होणारे बलात्कार थांबलेले नाहीत. बलात्कार करणार्‍यांना कायद्याचे किंवा शिक्षेचे भय उरलेले नाही. कारण बलात्कार करणार्‍यांना आपण काही अमानुष कृत्य करतोय असे वाटलेलेच नाही. इतर कुठला सामान्य गुन्हा करावा किंवा कायदा मोडावा, इतक्या सहजतेने आजकाल आपल्या देशात बलात्काराच्या घटना घडत असतात. दिवसेदिवस ती अमानुष प्रवृत्ती बळावतेच आहे. अर्थात त्याला कायदा किंवा सामाजिक या बाबतीतले गैरसमज कारणीभूत आहेत. मानवी संबंधांमधली ही एक भीषण विकृती आहे आणि म्हणूनच त्याकडे गुन्हा म्हणून बघण्यानेच अधिक नुकसान केले आहे. जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा महिलांचे अधिकार, स्वातंत्र्य किंवा पुरूषी अहंकार अशा विविध पैलूंवर उहापोह केला जातो. पण त्यामागची वर्चस्ववादी विकृत मानसिकता उलगडण्याचा प्रयासच होत नाही. म्हणूनच त्यावरचा नेमका उपाय कुठेच सापडू शकलेला नाही. महिलांना अबला किंवा दुर्बळ दुय्यम मानण्य़ाच्या मानसिकतेचा हा एक दुष्परिणाम आहे. महिलेकडे मालमत्ता किंवा प्रतिष्ठेचे प्रतिक म्हणून बघण्यातल्या पुरूषी वर्चस्ववादातून ही विकृती उदयास आलेली आहे. तिचे नेमके योग्य विश्लेषण होऊ शकलेले नाही. दोनतीन वर्षापुर्वी सुदान या देशातील डारफ़ोर प्रदेशामध्ये बलात्काराचा हत्याराप्रमाणे वापर झालेला होता. त्याकडे मानवी संकट म्हणून बघितले गेले. पण ती वास्तविकता नव्हती. जगातल्या रानटीपणाचा पुर्वेतिहास बघितला, तर जेत्याने पराभूत समाजातील महिलांना पळवून नेणे किंवा त्यांच्यावर बलात्कार करण्य़ाच्या घटनांचे शेकडो दाखले मिळतील. अगदी काही वर्षापुर्वी बिहारसारख्या अराजक माजलेल्या राज्यात एखाद्या वस्तीवर हल्ला करून महिलांवर सामुहिक बलात्काराचे प्रकार घडलेले आहेत. त्यापेक्षा नेहमीच्या बलात्कारामागची मानसिकता वेगळी नसते. दोन्हीकडे आपले वर्चस्व किंवा प्राबल्य सिद्ध करण्यासाठी केलेला तो लैंगिक अत्याचार असल्याचे दिसून येईल.

   बलात्कार म्हणजे नेमके काय असते? तो एक शारिरीक अत्याचार असतो. पण तो निव्वळ लैंगिक गुन्हा नसतो. त्यात त्या महिलेच्या माणूस असण्याला नाकारून तिच्या देहाचा तिच्या इच्छेविरुद्ध एखाद्या उपभोग्य वस्तूप्रमाणे सक्तीने केलेला वापर असतो. म्हणजेच तिच्या एक स्वतंत्र माणूस म्हणून असलेल्या व्यक्तीमत्वावरचा प्राणघातक हल्लाच असतो. तिच्यातल्या स्वाभिमान वा अस्मितेची ती हत्याच असते. त्यातल्या शारिरीक जखमा जितक्या यातनामय नसतात, तितका तिच्या अस्मिता, स्वाभिमान व व्यक्तीमत्व मानल्या जाणार्‍या मनाला होणार्‍या जखमा खोल व जिव्हारी लागणार्‍या असतात. शरीरावरच्या जखमा उपचाराने भरून येणार्‍या असतात. पण मनाला, समजुतीला व अभिमानाला झालेल्या जखमा कधीच भरून येणार्‍या नसतात. कारण व्यक्ती म्हणून ज्या देहाचा ती अभिमान बाळगत असते; त्याविषयीच तिच्या मनात कमालीची घृणाच त्या अनुभवातून निर्माण होत असते. आपण स्त्री आहोत म्हणून खुप सुंदर आहोत, असा जो स्त्रीला उपजत अभिमान असतो; त्यालाच अशा प्रसंगातून पायदळी तुडवले जात असते, ठार मारले जात असते. आपला देह एक वापरायची बाजारू वस्तू आहे, अशी हीन धारणा त्यातून तिच्या मनात रुजवली जात असते. ती उपटून टाकणेही तिच्या हाती मग उरत नाही. तिला स्वत:चाच तिरस्कार वाटावा अशी जी स्थिती त्या पिडीतेमध्ये त्या एकाच प्रसंगातून बाणवली जाते; तिथे तिच्या स्वयंभू व्यक्तीमत्वाचीच हत्या केली जात असते. मजेसाठी वापरून फ़ेकून द्यायची वस्तू; इतकेच तिच्या देहाचे मूल्यमापन त्या अनुभवातून येते आणि ते झटकूनही टाकता येत नाही, ही कधीही भरून न येणारी हानी एका बलात्काराने होत असते. हे त्यातले गांभिर्य आहे. म्हणूनच तो खुनापेक्षाही भीषण स्वरूपाचा गुन्हा असतो. कारण त्यात व्यक्ती जिवंत असते; पण तिच्यातली जगण्याची जी इच्छाशक्ती असते, तीच मारून टाकली जात असते. आपल्या अस्तित्वाविषयीच तिच्यावर न्युनगंड लादला जात असतो. म्हणूनच बलात्कार हा सामान्य फ़ौजदारी गुन्हा नव्हे; तर तो हत्याकांडापेक्षाही भयंकर अमानुष गुन्हा असतो. कारण तो जीव न घेणारा खुन असतो. ज्याला नरभक्षकी कृत्य म्हणावे, इतके ते अमानवी कृत्य असते. कारण त्यातला गुन्हेगार समोरच्या महिलेचे अस्तित्वच खावून फ़स्त करीत असतो.

   एका बाजूला ती त्या महिलेच्या अस्तित्वाची व स्वाभिमानाची हत्या असते आणि दुसरीकडे तिने ज्यांच्याकडे सहानुभूतीच्या अपेक्षेने बघावे; त्यांच्या नजराही त्या घटनेतून मारून टाकल्या जातात. बलात्कारिता ही गुन्ह्याची बळी असते आणि तरीही तीच नकळत गुन्हेगारही मानली जात असते. म्हणजे तिच्याकडे बघणार्‍या नजरा तिला जगणे अशक्य करून सोडत असतात. अगदी सहानुभूतीच्या नजराही धीर देण्यापेक्षा कींव करणार्‍या असतात. ही तीच आपली परिचित महिला असते. पण कालपर्यंत होती, त्यापेक्षा आपली तिच्याकडे बघणारी नजर बदलून गेलेली असते. ती आपली नजर तिला अधिक बेजार करत असते. तिच्या जखमांवरची खपली काढत असते. तू वापरली गेलीस, अशा जाणीवा तिच्यात निष्पन्न व्हाव्यात, अशी आपली सहानुभूती त्या बलात्काराच्या वेदना अधिक जिव्हारी झोंबणार्‍या करीत असतात. एखाद्या बलात्कारी गुन्हेगाराचे आप्तस्वकीय त्याच्याशी जितके अलिप्तपणे वागणार नाहीत, त्यापेक्षा बलात्कारितेचे परिचित या बळी महिलेशी अत्यंत चमत्कातिक वर्तन करीत असतात. म्हणजेच ती दोन्हीकडून बळीच होत असते. म्हणूनही असा गुन्हा सामान्य नाही तर असामान्य असतो. खुनापेक्षा भीषण असतो. ज्या देहाला व्यक्ती म्हणून जग ओळखत असते, त्याच आपल्या देहाविषयी किळस निर्माण झाल्यावर त्याच देहात वास्तव्य करणे किती यातनामय असेल; याची कल्पना एक पिडीताच करू शकते. म्हणूनच अगदी दोषी गुन्हेगाराला फ़ाशी देऊन त्या वेदनांची यातनांची भरपाई होऊ शकणार नाही. अशा गुन्ह्यासाठी कठोर कायदा वा शिक्षा पुरेशी नाही. असा गुन्हा होताच कामा नये, यासाठीची पावले उचलणे अगत्याचे व आवश्यक आहे. कारण त्याची भरपाई कशानेच होऊ शकत नसते. दुसर्‍याच्या गुन्ह्याची शिक्षा नकोशा झालेल्या देहात वास्तव्य करून त्या महिलेने उर्वरित जीवनात भोगायची असते. त्याची भरपाई फ़ाशीने होऊ शकत नाही.

   कितीही कठोर कायदे केले वा शिक्षा कठोर केल्या, म्हणून शेकडो वर्षे बलात्काराच्या कल्पनेमुळे पिडीत महिलेला आपल्याच देहाविषयी जाणवणार्‍या तिटकारा वा किळसातून तिची मुक्तता शक्य नसेल, तर मग बलात्काराची शक्यता संपवणेच अपरिहार्य आहे. कायद्याने महिलांना समान हक्क, अधिकार देऊन किंवा विविध प्रकारचे संरक्षण, आरक्षण देऊन भागणार नाही. महिलाविषयक पुरूषी मानसिकता आमुलाग्र बदलावी लागेल. भाषेपासून वर्तनापर्यंत अनेक बाबतीत असे बदल प्रयत्नपुर्वक घडवून आणावे लागतील. त्यासाठी महिलाविषयक गुन्हे करणार्‍यांना तुरुंगात कठोर शिक्षा देण्यापेक्षा त्यांना समाजाने बहिष्कृत केल्याचे लाजिरवाणे जीवन सक्तीने कंठण्याची शिक्षा द्यायला हवी. ज्या पुरूषार्थाचा किंवा नरवृत्तीचा अवास्तव गर्व अशा गुन्ह्याला चिथावणी देत असतो; त्याची पदोपदी हेटाळणी होईल, असे काही उपाय व शिक्षा असायला हवी. जेणे करून बलात्काराच्या नुसत्या कल्पनेनेच पुरूषाच्या मनाचा थरकाप उडाला पाहिजे. असे काही केल्यास आपल्या पौरुष्याची सार्वत्रिक होणारी अवहेलना किंवा पायमल्ली बघून माणसाच्या मनात भयगंड निर्माण करणे; हाच त्यावरचा सर्वोत्तम परिणामकारक उपाय असू शकतो. विनयभंग, छेडछाड याप्रकारचे गुन्हे करणार्‍यांना नंपुसक बनवणारे वैद्यकीय उपाय योजल्यास, ती दहशत निर्माण करता येईल. कारण जेव्हा समाजात असे मोजकेच दोषी दिसतील; तेव्हा त्यांची हेटाळणी व टवाळी होईल आणि नुसत्या त्या दृष्यानेच हजारो लाखो टपोरी शहाणे होऊ शकतील. शिक्षा जितकी भयकारी नसते, त्यापेक्षा अधिक शिक्षेची नुसती कल्पना परिणामकारक असते. ती दहशत निर्माण केली तरच अशा गुन्ह्याला पायबंद घालता येईल. बलात्कारामागच्या अमानुष वृत्तीला वेसण घालण्यासाठी तितक्याच अमानुष शिक्षेचे भय असायला हवे. एक महिला जसे बलात्काराच्या अनुभवानंतर आपले व्यक्तीमत्व गमावून बसते; तसा त्या स्वरूपाचे गुन्हे करणार्‍याला वा तसे विचार करणार्‍यांना अनुभव येऊ लागला, तरच बलात्काराला रोखता येईल.

   अमुक एक गोष्ट वा कृती पाप आहे आणि त्याची भीषण फ़ळे आपल्याला चाखायला लागतील, याचे भयच त्या अमानुषतेतून समाजाला मुक्ती देऊ शकेल. मानवी समाजात अमानुषतेला जर माणूसकीने आपण वागवू लागलो, तर माणूसकीवर अमानुषता शिरजोर होणारच. आज नेमके तेच झालेले आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. शेवटी कायद्यापेक्षा समाजात रुजवलेली नितीमूल्ये व जीवनमूल्येच प्रभावी ठरताना दिसतात. हजारो वर्षे विविध समाजात असलेली बंधने जितकी काटेकोरपणे पाळली जातात, तितके कायद्याचे पालन होताना दिसत नाही. जातपंचायती वा खापपंचायतीवर बुद्धीमंतांकडुन खुप टिका होते. पण ज्याला कायद्याचे बळ नाही, अशा त्याच पंचायतींच्या आदेश व फ़तव्याला त्यांचे अनुयायी वचकून असतात. कारण त्यांनी फ़तवे काढल्यावर आपले आप्तस्वकीयही पाठीशी उभे रहात नाहीत; असा धाक असतो. कायद्याच्या राज्यात तोच धाक उरलेला नाही. सामाजिक बहिष्काराचे हत्यार जितके प्रभावी आहे व असते; तितके कायदे प्रभावी नाहीत. पंचायतीचे कालबाह्य निवाडे जरूर नाकारावेत. पण त्यांच्या आदेशातील परिणामकारकता उचलायला काय हरकत आहे? कालपरवा उत्तरप्रदेशच्या मुझफ़्फ़रपुर येथील दंगलीचे कारण काय होते? मुलीची छेड काढल्यावर हिंसेपर्यंत मामला गेला आणि एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत प्रसंग ओढवला. त्यात आसपासची गावे, वस्त्या ओढल्या गेल्या. एका मुलीची छेड काढण्याच्या गुन्ह्याचे गांभिर्य पोलिस व कायद्याने वेळीच ओळखले असते व हातपाय हलवले असते; तर पुढली भीषण दंगल टाळता आली असती. पण आजचा कायदा मुली व स्त्रीयांच्या प्रतिष्ठेसाठी उभा रहात नाही; अशा धारणेने लोकांनी कायदा आपल्या हाती घेऊन थेट न्यायनिवाडा करण्यापर्यंत मजल मारली. पंचायतीचा धाक आहे तेवढा कायद्याने व शासनाने आपला धाक निर्माण केला तरी खुप होईल. आपल्या घरातील, जाती वा वस्तीतील मुलीची छेड काढली जाते, विनयभंग होतो, त्यासाठी तिथल्या लोकांनी जी संवेदनशीलता दाखवली, ती आपले शासन व कायदा दाखवू शकला तरी खुप मोठी मजल मारता येईल. पण कुंभकर्ण होऊन घोरत पडलेल्या शासनाला जागे करायचे कोणी? आपापल्या तात्विक व बौद्धिक विवेचनाच्या धुंदीत मशगुल असलेल्या विचारवंताना त्यांच्या भ्रामक जगातून जागवायचे कोणी व कसे? हे कुंभकर्ण जागे होत नाहीत, तोपर्यंत बलात्कारापासून महिलांची मुक्ती अशक्य आहे. दीडशे वर्षे मागल्या कालखंडात झोपी गेलेल्या कायदा नावाच्या कुंभकर्णाची झोपमोड कशी करणार बोला?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा