शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

मोदींपेक्षा राहुल ‘भारी’



  अलिकडल्या काही दिवसात राहुल गांधींनी जाहिरसभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातून त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जबरदस्त धक्का दिल्याच्या फ़ेसबुकवरील प्रतिक्रिया आणि एकूणच वाहिन्यांवरील चर्चा ऐकल्यावर मनापासून हसू आले. पहिली गोष्ट अशी, की समोर दिसते म्हणून आपण बघतोच असे नसते आणि कानावर पडलेला प्रत्येक आवाज आपण ऐकतोच असेही अजिबात नसते. त्यातले आपल्याला हवे तेच आपण बघत असतो आणि हवे तेच ऐकत असतो. पुन्हा त्यातून आपल्याला हवे तसेच अर्थ लावत असतो. राहुलने आपल्या आक्रमक भाषणातून मोदींना दणका दिल्याची प्रतिक्रिया म्हणूनच नवलाईची आहे. काहीजणांना तर मनमोहन देसाईच्या ‘अमर अकबर अंथोनी’ चित्रपटातला अमिताभही आठवला. त्यात विनोद खन्नाकडून जबर मार खाल्ल्यावर पोलिस कोठडीत जाऊन पडलेला अमिताभ उर्फ़ अंथोनी म्हणतो, ‘तुमने हमको बहुत मारा. हमने तुमको एकही मारा. लेकीन सॉलिड मारा; है की नही?’ लोकांच्या लक्षात राहिलेले ते वाक्य जरूर आहे. पण त्यानंतर अंथोनी गजाआड जाऊन पडलेला असतो. तर त्याला गजाआड टाकणारा विनोद खन्ना उर्फ़ अमर शिरजोर ठरलेला असतो. तेव्हा त्यातला अंथोनी विनोदी नव्हेतर निर्लज्ज व हास्यास्पद ठरलेला असतो. मग अशा उदाहरणातून आपण राहुल गांधींचे कौतुक करतोय, की टवाळी करतोय; हे त्यांच्या चहात्यांच्या लक्षात कधी यायचे? कसे येणार? त्यांना समोर दिसते आहे, त्यापेक्षा भलतेच बघायचे व ऐकायचे असेल, तर सत्य दाखवणार तरी कसे? अलिकडल्या काळात अंथोनीचे हे वाक्य अनेक राजकीय अभ्यासकांच्या लक्षात राहिले, कारण मागल्या लोकसभा निवडणूकांचे निकाल लागल्यावर साडेचार वर्षापुर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यातले व्यंग दाखवण्यासाठी ते उच्चारले होते. ते शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना खिजवण्यासाठी. त्यात विजयी सूर नव्हता, तर आपण आपटलो, तरी तुम्हाला भूईसपाट करीत आपटलो; असा त्याचा मतितार्थ होता. त्याही अर्थाने राहुलच्या हल्लीच्या सभेचे वर्णन वा विश्लेषण होऊ शकते काय? होणार असेल तर मोदींना संपवताना राहुल कॉग्रेसच संपवायला निघालेत असा घ्यायचा काय?

   मागल्या काही महिन्यांपासून मोदी देशाच्या विविध राज्यामध्ये जाहिरसभा घेत आहेत. भव्यदिव्य विराट सभा बघून खुद्द भाजपातल्याच जाणत्यांना नवल वाटत असेल, तर मोदी व भाजपा विरोधकांच्या पोटात गोळा येणे स्वाभाविकच आहे. कारण मोदींना गुजरातबाहेर कोणी ओळखतसुद्धा नाही, असाच त्यांच्या विरोधकांना मागली दोनतीन वर्षे दावा राहिलेला आहे. मोदींच्या पंतप्रधानकीच्या दाव्याची गोष्ट निघाल्यावर, त्यामुळे भाजपाचे नुकसान होईल; असेही वारंवार सांगितले जात होते. पण आपल्या नावाची पंतप्रधान पदासाठी घोषणा झाल्यापासून मोदींनी देशाच्या कानाकोपर्‍यात सभांचा सपाटा लावला आहे. त्यासाठी जमणारी गर्दी अचंबित करणारी असली, तरी त्या गर्दीकडून मोदींच्या विधाने व वक्तव्यांना मिळणारा प्रतिसाद विरोधकांना अस्वस्थ करून सोडणारा असल्यास नवल नाही. ज्याच्या विरोधात अखंड अकरा वर्षे बदनामीच्या मोहिमा चालवल्या गेल्या; तोच देशातला सर्वाधिक लोकप्रिय नेता होताना बघायला कुठल्या बुद्धीमंताला आवडू शकेल? आपले सिद्धांत व आग्रह खोटे पडताना बघणे, कुणाही विद्वानाला आवडणे शक्यच नसते. सहाजिकच मोदींच्या गाजणार्‍या मोठमोठ्या सभा सेक्युलर लोकांना पोटदुखी झाल्यास नवल नव्हते. अशावेळी मग मोदींच्या या घोडदौडीला कोणी रोखू पहात असेल किंवा त्यात पुढाकार घेत असेल; तर त्याचे मोदी विरोधकांना कौतुक नक्कीच वाटणार आणि त्यात गैर काहीच नाही. त्यामुळेच मागल्या काही दिवसात कॉग्रेसचे अननुभवी उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लागोपाठ सभा घेऊन भाजपाच्या नावाने व मोदींचे नाव न घेताच केलेल्या हल्ल्याने अशी माणसे सुखावली तर आश्चर्य नाही. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तशीच ही स्थिती असते. बुडणार्‍याला काडी कधीच वाचवू शकत नाही, हे सत्यच आहे. पण तरंगणारी काडी बुडणार्‍याला आशा तर दाखवते ना? त्यापेक्षा राहुलची भाषणे फ़ारशी उपयोगी वा परिणामकारक नाहीत.

   सभेत आवेशपुर्ण व चढ्या आवाजात बोलले, मग भाषण आक्रमक झाले; अशी अनेकांची समजूत आहे. खुद्द राहुलचीही अशीच कोणीतरी समजूत करून दिलेली दिसते. अन्यथा त्यांनी कुठल्याही अनावश्यक शब्दांवर जोर देत असा आक्रस्ताळेपणा केला नसता. आपल्या आजी व पित्याची दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली आणि आपल्याला त्याचा घुस्सा येतो; असे राहुलनी म्हणायला काहीच हरकत नाही. पण जो आवेश त्यांनी इतक्या वर्षांनी दाखवला, तो नाट्यमय होता. त्याच्या बुमरॅंग होण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. अन्य कोणी त्यांना त्यातले धोके दाखवण्याचे धाडसही केले नाही. त्यापेक्षा त्यांच्या चहात्यांनी टाळ्या पिटून कौतुकच केल्यावर राहुल भरकटत गेल्यास नवल नव्हते. शेफ़ारलेल्या पोराप्रमाणे त्यांनी मुक्ताफ़ळे अधिकच उधळण्यास सुरूवात केली आणि त्यांची अवस्था मग खरोखरच सिनेमातल्या त्या अंथोनी सारखी होऊन गेली. राजस्थानातील सभेत ‘दादी को मारा, पापा को मारा’ असल्या पोरकटपणाचे पुढले पाऊल मग इंदूरच्या सभेत पडले. आधीच्या सभेत भाजपा जातीय धार्मिक द्वेष फ़ैलावतो आणि ती आग आम्हाला विझवावी लागते, असे सांगितले होते. इतकेच नव्हेतर आग लागली तेव्हा भाजपावाले कुठे होते; असाही सवाल केला होता. पंतप्रधानांसमवेत गेल्याने मुझफ़्फ़रनगरच्या दंगलग्रस्त परिसराला भेट द्यायला गेलेल्या मम्मी पप्पूला तिथे प्रवेश मिळाला. पण त्याच परिसराला भेट द्यायला राहुलच्याही आधी भाजपाचे राज्यसभेतील उपनेते व अध्यक्ष गेलेले असताना, त्यांना मात्र राज्य पोलिसांनी विमानतळावरूनच परत पाठवले होते. म्हणजेच भाजपाच्या नेत्यांची मम्मी युपीएची अध्यक्ष नाही आणि तिच्याच रिमोटवर चालणारा पंतप्रधान नाही; तो भाजपावाल्यांचा गुन्हा असतो काय? गेलेल्यांना रोखायचे आणि मग वर तोंड करून विचारायचे, हे भाजपावाले आग लागली तेव्हा मुझफ़्फ़रनगरात का गेले नाहीत? याला सत्यवचन म्हणतात? इतके असत्य बोलू शकत नसेल तो फ़ेकू असतो. यात फ़ेकू कोण, ते सामान्य जनतेला नेमके कळते. पण बुद्धीमंत सेक्युलर असल्यावर ते कळू शकत नाही. मग मोदीला कसे घेरले, याचा आनंदोत्सव सुरू व्हायचाच. व्हायलाही हरकत नसावी. कोणाला मुर्खाच्या नंदनवनातून बाहेर खेचायला अधिकार आपल्याला राज्यघटना देत नाही ना?

   पण अशा चहात्यांच्या टाळ्या गुंजत असतील व कडकडाट करीत असतील; तर हा आधुनिक राजकारणातला अंथोनी आपल्या हास्यास्पद मुर्खपणाच्या कृती लगेच कशाला थांबवणार? तो अधिकच पोरकटपणा करणार ना? मुझफ़्फ़रनगरच्या स्थानिक पोलिसांनी दंगल कोणी पेटवली, त्यात पोलिसांना काम करण्यात कोणी अडथळे आणले, त्याचे छुपे चित्रण वाहिन्यांवरून लोकांनी बघितले आहे. त्यांना सत्य चांगले ठाऊक आहे. तरीही राहुल गांधी बेधडक खोटे बोलणार असतील; तर त्यांचे तोंड कोणी बांधायचे? ते मोकाटच सुटणार ना? त्यामुळेच मग राहुलनी इंदूरच्या सभेत आणखी एक लोणकढी थाप हाणली. म्हणे त्यांना कुणा गुप्तचर अधिकार्‍याने येऊन सांगितले, की मुझफ़्फ़रनगर दंगलीतल्या पिडीत मुस्लिम तरूणांना पाकिस्तानी गुप्तहेरसंस्था हाताशी धरते आहे. थोडक्यात आता दंगलीनंतर तिथले पिडीत मुस्लिम पाकिस्तानचे हस्तक बनू लागले आहेत, असाच आरोप राहुलने केला. म्हणजे ज्यांचे आप्तस्वकीय त्या दंगलीत मारले गेले, त्यांच्या जखमांवर फ़ुंकर घालणे दुर राहिले. त्यांचे पुनर्वसन मागे पडले. त्याच मुस्लिमांना पाकिस्तानचे हस्तक ठरवण्याचा अव्यापारेषू व्यापार आधुनिक अंथोनी करून बसले. प्रत्येक दंगल व घातपातानंतर आपल्या देशात पालिस्तानी हस्तक व आयएसआय यांच्यावर संशय घेतला जातो. मग त्यांचे हस्तक म्हणून काही मुस्लिम संशयितही पकडले जातात. त्यामुळे सर्वच मुस्लिमांकडे पाकिस्तानचे हस्तक म्हणून बघितले जाते, असा मुस्लिम समाज व नेत्यांचा आक्षेप आहे. त्यावर फ़ुंकर घालण्याचे प्रयास कॉग्रेस व अन्य सेक्युलर पक्ष नित्यनेमाने करीत असतात. इतकेच नव्हेतर मुस्लिमांविषयी असला संशय भाजपावालेच पसरवतात, हा सेक्युलर लोकांचा व मोदीविरोधकांचा कायमचा आक्षेप राहिला आहे. पण नेमका तोच बिनबुडाचा आरोप आता त्याच गोटातील हिरो असलेल्या राहुल गांधींनी उत्साहाच्या भरात केलेला आहे. त्यांचा हेतू तसा नाही, हे मान्यच करायला लागेल.

   मुझफ़्फ़रनगरचे मुस्लिम पाकिस्तानचे हस्तक आहेत किंवा तिथले तरूण पाकिस्तानला फ़ितूर आहेत; असे राहुलना अजिबात म्हणायचे नव्हते. उलट भाजपाने पेटवलेल्या दंगलीतून दुखावलेले मुस्लिम तरूण पाकिस्तानच्या आहारी जातात व तिथल्या गुप्तहेर खात्याच्या जाळ्यात अडकतात; असेच सुचवून राहुल यांना भाजपाविषयी मुस्लिमात द्वेष निर्माण करायचा होता. पण शब्द किंवा मुद्दे कसे योजावेत, केव्हा फ़िरवावेत आणि कुठे कशावर भर द्यावा; याचे कुठलेही भान नाही की जाण नाही. त्यामुळेच त्यांनी एकामागून एका सभेत तावातावाने आवेशपुर्ण बोलताना स्वपक्षाला अधिकाधिक अडचणीत आणण्याचा सपाटा लावलेला आहे. पण त्यांचा आवेश बघूनच खुश झालेल्यांना त्यातून बुडत्याला काडीचा आधार मिळावा, तसा आनंद झालेला आहे. आता इंदुरच्या भाषणानंतर राहुलना मुस्लिमांवर आळ घ्यायचा नव्हता किंवा त्यांचा मुद्दा वेगळाच होता; असले खुलासे देत बसायची वेळ पक्ष प्रक्त्यांवर आलेली आहे. दुसरीकडे भाजपा सोडून अन्य सेक्युलर पक्षांनाही राहुलवर टिकेचे आसूड ओढण्याची पाळी आली आहे. तिकडे कॉग्रेसच्याच गृहमंत्र्याला मुझफ़्फ़रनगरात पाक हेरसंस्थेचे जाळे असल्यास कुठे व कसे; त्याचे स्पष्टीकरण देण्याची नामुष्की आलेली आहे. तेवढेच नाही तर भारत सरकारच्या गुप्तचर विभागाचे नाक कापले गेले आहे. ज्याने राहुलना अशी माहिती दिली, त्या अधिकार्‍याला समोर आणायची मागणी पुढे आली आहे. थोडक्यात एकाच दगडात राहुलनी स्वपक्षाच्या अनेक हितसंबंधांचा फ़टाफ़ट बळी घेऊन चमत्कारच घडवला आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्कीच मान्य करावी लागेल. मोदींनी जे काम आरंभले किंवा हाती घेतले आहे, त्यातही राहुलच मोदींना ‘भारी’ पडले आहेत. मोदींनी कॉग्रेसला देशाभर पराभूत करण्याचे आव्हान स्विकारले आहे, त्याच कॉग्रेसला नामोहरम व नामशेष करण्याच्या कामात मोदींपेक्षा राहुलचे प्रयास अधिक परिणामकारक ठरत असतील, तर मोदींपेक्षा राहुलच ‘भारी’ काम करतात हे नाकारता येईल काय?

1 टिप्पणी: