सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

महापुरूषांची शोकांतिका

ज्ञान की जैसे सीमा ज्ञानी
गागर मे सागर का पानी

   ‘आम्रपाली’ नावाचा सम्राट अशोकाच्या जीवनावर आधारीत एक हिंदी चित्रपट चार दशकांपुर्वी येऊन गेला. त्यामध्ये लतादिर्दींच्या स्वरातील एका गीतामधल्या या ओळी आहेत. कवीचे हे बोल अतिशय उदबोधक आहेत. विद्वान किंवा बुद्धीमंत स्वत:ला सर्वज्ञानी समजत असतो. त्याला अवघ्या जगाचे ज्ञान प्राप्त झाले अशीच त्याची समजूत असते. म्हणूनच आपणच ज्ञानाची सीमा किंवा हद्द आहोत; अशी त्याची ठाम समजूत असते. आपल्याला जेवढे उमगले आहे, त्यापेक्षा विश्वात आणखी काहीच ज्ञान नाही; म्हणूनच आपण ज्ञानाची परीसीमा आहोत, अशी त्याची धारणा असते. पण ती कितपत सत्य व वास्तव असते? विशाल सागराचे पाणी घागरीत भरून घ्यावे आणि त्यालाच सागर समजावे, असेच ते अ‘ज्ञान’ असते. कारण घागरीतल्या पाण्याच्या अनंत पटीने सागर शिल्लक असतो आणि कुठल्याही घागरीत वा पात्रामध्ये मावणार नाही; असे त्याचे अथांग आकारमान असते. पण त्याचे भान सुटले, मग व्यक्ती स्वत:ला ज्ञानाची परीसीमा मानू लागते. ज्ञानाचा विद्वत्तेचा अहंकार चढलेल्या बुद्धीमंताची ही स्थिती असेल, तर मग त्याच्या अनुयायाची किंवा भक्ताची अवस्था काय असू शकते? त्याला तर आपला गुरू वा बुद्धीमंत स्वामीच सर्वव्यापी व जगाचा नियंता वाटू लागतो. पण प्रत्यक्षात त्याच्या गुरूचे ज्ञानच घागरीत मावेल, इतक्या सागराच्या पाण्यासारखे क्षुल्लक असते. पण स्वामी वा गुरूपेक्षा त्या अनुयायी भक्ताचा अहंकार अधिक मोठा असतो. त्याला तर अवघ्या जगाचे ज्ञानच आपल्या मुठीत बंद झाल्यासारखे वाटत असते. त्याबद्दल चर्चा वा चिकित्साही करायची त्या भक्ताची तयारी नसते. आणि असे कोणी सामान्य बुद्धीचे भक्तगण असतात असेही मानायचे कारण नाही. त्या भक्ताला साक्षात त्याच्या गुरू वा स्वामीनेही सत्य सांगायचा प्रयास केला, तरी भक्त त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. गुरूला मान्य असलेली स्वत:मधली त्रुटीही, त्याच्या भक्ताला मान्य होऊ शकत नाही. ही जगातील वास्तविकता आहे. ख्रिश्चन धर्माच्या प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक सेन्ट मार्टीन ल्युथर त्याचीच साक्ष देतो. तो म्हणतो,

    ‘ख्रिस्ताच्या शिकवणूकीतून जे जग आमच्या समोर मांडले गेले आहे, त्यावर माझा इतका दृढ विश्वास आहे, की त्यातील शब्द न शब्दाला आपण धट्ट धरून रहायला हवे असे मी म्हणेन. त्यामुळे उद्या स्वर्गातील सर्वच्या सर्व देवदूत जरी स्वर्गातून खाली उतरून नव्या कराराच्या विरुद्ध मला काही सांगू लागले, तरी मी त्यातील एकाही अक्षराचा विश्वास धरणार नाही. उलट त्यांचे शब्द कानांनी ऐकावे लागू नयेत, म्हणून मी कान आणि डोळे बंद करून घेईन’. असे म्हणणारा सेन्ट मार्टीन ल्युथर कोण आहे आणि कोणाची शिकवण तो सांगतो आहे? ख्रिस्ताची शिकवण म्हणजे त्या प्रेषीताला स्वर्गातल्या देवदूतांनी दिलेले संदेशच होत. म्हणजे ख्रिस्ताला देवदूतांनी जे सांगितले असे त्यानेच नव्या करारातून सांगितले आहे; त्यात देवदूतालाही दुरुस्ती करण्याची मोकळीक हा ख्रिस्ताचा अनुयायी द्यायला तयार नाही. कुठल्याही अनुयायाची व भक्ताची हीच अवस्था असते. त्याला उमगलेले ज्ञान वास्तवाशी निगडीत असायचे कारण नसते. आणि कुठल्याही महापुरूष व महात्म्याची अवस्था नेमकी अशीच असते. त्याच्या अनुयायांना तो जसा व जितका आकलन झाला आहे, त्यापेक्षा वेगळा असायची मुभा भक्तही त्या स्वामी, परमेश्वर किंवा गुरूला, महापुरूषाला देत नसतात. तिथे आपल्यासारख्या सामान्यजनांची काय कथा?


   विचार तत्वज्ञानाची ही़च तर शोकांतिका असते. त्यामागे ताकद नसते, तेव्हा ते निर्जीव निष्क्रिय दुर्लक्षित पडून रहाते. त्याच्या मागे ताकद उभी राहिल्याशिवाय त्याची परिणामकारक सिद्ध होत नाही. पण ती ताकद म्हणून जी झुंड उभी रहाते, त्या झुंडीच्या आकलनानुसार त्या विचार किंवा तत्वज्ञानाचा व्यवहारी अविष्कार होत जातो. त्यात पहिला बळी पडत असतो, तो ज्याने विचार मांडले खुद्द त्याच विद्वानाचा. कारण त्याचे अनुयायी म्हणवणारे त्या थोरपुरूषाच्या नावावर स्वत:चे आकलनच सक्तीने लोकांच्या गळी मारायचा उद्योग भरभराटीस आणतात. अशा आक्रमक शक्तीशाली आकलनाखाली वास्तविक मुळचा विचार गाडला जात असतो. म्हणूनच मानवी इतिहासात बहुधा कुठलाही विचारवंत वा महापुरूष, महात्मा आपल्याच अनुयायांच्या तावडीतून सुटू शकलेला नाही. इतिहास त्याचा साक्षीदार आहे. आज विविध पातळीवर होणार्‍या चर्चा, वादविवाद किंवा आंदोलने व संमेलने, यातला विसंवाद त्यातूनच आलेला दिसेल. अगदी एकाच विचारधारेचे पाईक एकमेकांवर धावून जाण्याइतके परस्पर विरोधी दावे करीत असतात. समान विचारधारेचा वारसा सांगणारेच एकमेकांचे असे शत्रू का होतात; असा आपल्याला अनेकदा संभ्रम होतो. त्याचे हेच कारण आहे. त्या विचारांचे भिन्न आकलन त्या अनुयायांना एकमेकांच्या विरोधात उभे करत असते. जसे एकाच घरातले भाऊबंद पराकोटीचे दुष्मन व्हावेत, पण एकाच मूळपुरूषाचा वारसा सांगत त्याच्या मालमत्तेवरचा मक्तेदार हक्क सांगत भांडावेत, तसे हे एकाच विचारधारेचे अनुयायी भाऊबंदकी करताना दिसतात. त्याला विचारातील विरोधाभास नव्हे, तर आकलनातला विरोधाभास कारण होत असतो. असे अनुयायी मूळपुरूषाचा वारसा सांगणारे असतात, तरी दुसर्‍या तिसर्‍या पिढीतल्या आपल्या अत्यंत निकटच्या जन्मदात्याचाच वारसा घेऊन लढायला उभे ठाकलेले असतात. इथे विचारधारेचे अनुयायी सुद्धा तसेच समोरासमोर उभे ठाकलेले दिसतील. ते मूळ विचारवंत महापुरूषाचा वारसा तोंडाने सांगत असले, तरी ज्याचे आकलन स्विकारलेले असते, त्याच्या बाजूने लढायला उभे राहिलेले असतात. म्हणूनच मग समान विचारधारेचे अनुयायीच परस्पर विरोधी दावे करीत हमरातुमरीला आलेले दिसतात. त्यातून त्याच विचारधारा किंवा परंपरेचे धिंडवडे काढण्यात पुढाकार घेत असतात. त्याच विचारांची व तत्वांची अक्तरे करीत असतात.

   भारताच्याच नव्हेतर जगाच्या इतिहासात त्याची शेकडो उदाहरणे सापडतील. भारताला हजारो वर्षाचा इतिहास आहे. त्या इतिहासात शेकडो महात्मे उदयास आले आणि त्यांनी आपापल्या परीने चिंतन करून या समाजाला उन्नत करण्याचा आपापल्या मार्गाने प्रयास केलेला आहे. कोणी निव्वळ चिंतन, तत्वज्ञानाने तर कोणी हाती शस्त्र घेऊन अस्मितेच्या रुपाने, कोणी विविध प्रकारचे संशोधन व अभ्यासातून समाजाची उन्नती घडवली, तर कोणी वैचारिक सामाजिक उत्थानातून देशाला घडवण्याचा प्रयास केलेला आहे. त्या त्या कालखंडातील परिस्थिती व साधनांच्या उपलब्धतेनुसार त्यांनी कार्य तडीस नेण्याचा प्रयत्न केला. पण ज्यांना आपण महात्मे, महापुरूष, चिंतक म्हणून ओळखतो, अशा प्रत्येकाचा प्रयास समाज व देशाला उन्नतीकडेच घेऊन जाण्याचा होता. दुर्दैवाने त्यांच्या अनुयायांनी, भक्तांनी, पाठीराख्यांनी किंवा शिष्यांनीच त्यांचा पराभव केलेला दिसतो. ज्या जंजाळातून समाजाला मुक्त करण्याचे प्रयास त्या महात्म्यांनी केलेले असतात व त्यासाठीच आपले जीवन समर्पित केलेले असते; त्यांच्याच विचार व उत्थानाच्या तत्वांचा उपयोग पुन्हा त्या समाजाला प्रथा परंपरांच्या जंजाळात गुरफ़टून टाकण्यासाठी होत असतो. मात्र त्यासाठी त्या महात्म्यांच्या विचार व चिंतनाचे जसे ज्याला आकलन झाले, त्याचाच अशी वारस व्यक्ती एक जंजाळ बनवते आणि त्यालाच प्रतिक बनवून त्याचा मायाबाजार बनवत असते. अशारितीने मग त्या महात्म्याला बाजूला टाकून अनुयायीच स्वत:चे महात्म्य निर्माण करीत असतात. त्यासाठी मग दुसर्‍या कुणा महात्म्याची खिल्ली उडवली जाते. दोन वा अधिक महापुरूषांमध्ये भिंती उभारल्या जातात. त्यांचे विचार परस्पर विरोधी वा एकमेकांसमोर युद्धाच्या तयारीत उभे केले जातात. असे महापुरूष एकमेकांचे शत्रू होते किंवा त्यांच्यात वैरभावना होती, असे आभास निर्माण केले जातात. पण वास्तवात पाहिल्यास सर्वच महात्म्यांनी परस्पर विच्छेदक भूमिका न घेता, परस्पर पुरक समाज उत्थानाचेच कार्य केलेले दिसते. त्यांच्या दिशा भिन्न वा छटा वेगवेगळ्याही दिसतात. पण एकूणच मानव जात किंवा समाजाच्या उन्नती वा भल्यासाठीच त्यांनी कार्य केलेले दिसते. मात्र ते सत्य मानले व त्यानुसार वाटचाल केली, तर त्याच तत्वांचे व विचारांचे मायाबाजार उभे करणार्‍यांची दुकाने बंद होण्याचा धोका असतो. म्हणूनच या दुकानदारांना महात्मे व महापुरूष एकमेकांच्या विरोधात युद्धसज्ज अवस्थेत आणून उभे करावे लागतात. ज्यांनी समाज जोडायचे काम केले, त्यांनाच समाज तोडण्याचे हत्यार म्हणून उभे धार लावली जाते. (अपुर्ण) 

२ टिप्पण्या:

  1. आपापल्या मनाप्रमाणे विचारकांच्या मतप्रणालीची जोडतोड करणारे प्रामाणिक अनुयायी, भगतगण व त्यांचे प्रवर्तक गुरू, नेते, पुढारी यांच्या परस्पर विरोधाभास... यावरील सुंदर भाष्य... पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

    उत्तर द्याहटवा
  2. क्रांती तिच्या पिल्लाना खाते ! ठीकाय ! खाऊ नये म्हणून काय करायला हवे ?

    उत्तर द्याहटवा