शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

मतचाचण्यांचा थोडासा इतिहास  आता देशात मतचाचण्य़ांचे जणू पेवच फ़ुटले आहे. पण विविध संस्थांच्या मदतीने जनमताची चाचणी घेऊन त्यावर कुठला पक्ष जिंकणार किंवा कोणा मित्रपक्षाला सोबत घेऊन सरकार बनवणार; अशा चर्चा रंगवणार्‍यांना त्यातले शास्त्र कितीसे कळते, याची मला दाट शंका आहे. कारण जेव्हा ह्या तंत्राचा भारतात प्रथमच अवलंब झाला, तेव्हा तमाम वृत्तपत्रे व पत्रकार आणि राजकीय अभ्यासक त्याविषयी कमालीचे साशंक होते. नुसते साशंकच नव्हते तर अशा अंदाजांची खिल्ली उडवण्यातही आघाडीवर होते. कारण जनमानस आपल्यालाच नेमके कळते, असा एक टोकाचा अहंकार भारतीय पत्रकारांमध्ये होता. सहाजिकच त्यांच्या अभ्यास व अनुभवाच्या पलिकडला कोणी त्याविषयी भाष्य करीत असेल; तर या ढुढ्ढाचार्यांना ते रुचणार तरी कसे? पण आज त्यांचेच वंशज किंवा वारस त्याच शास्त्राचा किंवा चाचणी अहवालाचा आधार घेऊन, असे काही छातीठोक राजकीय भाष्य करीत असतात, की त्या तंत्राचा भारतातील आद्यपुरूष मानला जाणारा डॉ. प्रणय रॉय सुद्धा त्यापासून चार हात दूर राहू लागला आहे. अर्थात ते स्वाभाविकही आहे. कारण जेव्हा अशा मतचाचण्या घेऊन निवडणूकीचे अंदाज वर्तवण्याचा उद्योग इथे भारतात सुरू झाला; तेव्हा आजच्या वाहिन्यांवरील बहुतांश पत्रकारांपासून वृत्तपत्रांचे बहुतांश संपादक नाकाचा शेंबुडही पुसायच्या अकलेचे नव्हते. तर त्यांच्याकडून ते शास्त्र समजून बोलण्याची वा त्याचे नेमके आकलन करण्याची तरी अपेक्षा कशी बाळगता येईल. त्यामुळेच सर्व्हे म्हणजे नमुना मतचाचण्या करून घेतल्या जातात आणि मग महागड्या खेळण्याचा लाडावलेल्या पोराने चुराडा करावा; तसा त्या आकड्यांचा विचका केला जातो. म्हणूनच अशा मतचाचण्यांचा थोडा इतिहास मांडणे मला आवश्यक वाटते. विशेषत: आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकात दिसणारी व आकड्यातही आढळणारी लोकप्रियता, माध्यमातील मुखंडांना उलगडता येत नसल्याने; तो इतिहास समजून घेणे अगत्याचे आहे. गुजरातच्या दहाबारा वर्षापुर्वीच्या दंगलीच्या कलंकातून बाहेर पडून मोदींना देशभर आवश्यक तेवढी बहुमतापर्यंत पोहोचणारी मते मिळतील किंवा नाही; त्याचे उत्तर त्याच इतिहासात दडलेले आहे. म्हणूनच त्या इतिहासाच्या आठवणी थोड्या चाळवणे मला अगत्याचे वाटते.

   मतचाचण्यांचा भारतातील इतिहास वा कालखंड अवघा तेहतीस वर्षांचा आहे. त्याच्याआधी भारतात कधी मतचाचण्य़ा घेतल्या जात नव्हत्या. अर्थात भारतात नाही म्हणून जगातही होत नव्हत्या, असे अजिबात नाही. पुढारलेल्या पाश्चात्य जगात तर निवडणूकच नव्हेतर सातत्याने अशा नेत्यांच्या व राजकीय पक्षाच्या लोकप्रियतेचे अंदाज व्यक्त केले जात होते. पण तसा प्रयोग भारतात करायला कोणी धजावत नव्हता. कारण पाश्चात्य देशाप्रमाणे इथेही लोकशाही व संसदीय लोकशाहीची प्रणाली असली तरी; तिथल्याप्रमाणे इथे द्विपक्षीय लोकशाही लढत नव्हती. देशव्यापी एकमेव कॉग्रेस पक्ष आणि लहानमोठ्या अन्य पक्षांच्या सोबत प्रभावी प्रादेशिक पक्षांचे कडबोळे असल्याने; जनमत कौल शोधणे जिकीरीचे काम होते. त्यामुळेच १९८० पुर्वीच्या काळात निवडणूका असल्या मग गुप्तचर खात्याचा अंदाज बहुतेक वृत्तपत्रात ग्राह्य मानला जायचा. तो क्वचितच खरा ठरायचा. उदाहरणार्थ १९७५ सालात आणिबाणी लादून देशातल्या लोकशाहीचा गळा घोटलेल्या इंदिराजींनी अकस्मात आणिबाणी उठवून १९७७ सालात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका जाहिर केल्या; त्याच मुळात गुप्तचर खात्याच्या खास अंदाजावर. तेव्हा लोकांमध्ये इंदिराजींची लोकप्रियता प्रचंड असल्याने त्या नक्कीच मोठे यश मिळवतील, असा तो अंदाज होता. म्हणून त्यांनी निवडणूकांची अकस्मात घोषणा केली आणि तुरूंगात डांबून ठेवलेल्या विरोधी राजकीय नेत्यांची सुटका करून राजकीय आव्हान स्विकारले. पण दबलेल्या जनमताचा अंदाज गुप्तचर खात्याला आला नव्हता आणि त्याच निवडणुकीत इंदिराजींसह त्यांच्या सत्ताधारी पक्षाचा इतिहासातील सर्वात दारूण पराभव झाला. राजस्थान पंजाबपासून बंगालपर्यंतच्या गंगाप्रदेशात म्हणजे संपुर्ण उत्तर भारतात कॉग्रेसचे नामोनिशाण शिल्लक उरले नाही, इतका तो नामुष्कीचा पराभव होता. चार प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन घाईगर्दीने स्थापन केलेल्या जनता पक्षाला मतदाराने बहुमत दिले होते. आधी त्या पक्षाने निवडणूका जिंकल्या आणि पुढे त्या पक्षाची औपचारिक स्थापना झाली होती. असे गुप्तचर खात्याचे निवडणूक अंदाज बेभरवशी असायचे. बाकी मग राजकीय अभ्यासक आपापल्या वार्ताहर व पत्रकारांच्या मदतीने हवेतले अंदाज बांधायचे, किंवा भविष्यवेत्ते आपल्या ग्रहमानाचे समिकरण मांडून अंदाज व्यक्त करायचे. त्यापैकी कुठलाच अंदाज खरा ठरण्याची कुठलीही हमी नसायची.

   पण त्या निवडणूकीनंतर तसा पहिला प्रयोग तेव्हा पाक्षिक स्वरूपात प्रसिद्ध होणार्‍या ‘इंडीयाटुडे’च्या संपादकांनी केला होता. प्रणय रॉय नामक एका होतकरू आकडेशास्त्रज्ञाने त्यात पुढाकार घेतला होता. त्याने भारतीय निवडणूकांचेही शास्त्रीय पद्धतीने अंदाज चाचणीतून बांधता येतील, असा दावा करीत ठोकताळे तयार केले. त्याला ‘इंडीयाटुडे’ने सहकार्य केले तरी त्यावर अजिबात विश्वास दाखवला नव्हता. कारण प्रणय रॉयने आपल्या पद्धतीने नमूना मतांची चाचणी घेऊन जे अंदाज तयार केले. त्याला ‘इंडियाटुडे’ने प्रसिद्धी जरूर दिली. पण तिथेच संपादकांनी पुस्तीही जोडली होती. या चाचणी व अंदाजाची संपुर्ण जबाबदारी लेखकाची व चाचणीकर्त्याची आहे आणि त्याविषयी खुद्द संपादकही साशंक असल्याचे स्पष्ट केलेले होते. कारण त्या पहिल्यावहिल्या मतचाचणीने काढलेले अंदाज कुठल्याही पत्रपंडीत, संपादक, राजकीय अभ्यासकाला चक्रावून सोडणारे होते. आज ‘दंगलखोर’ नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचे आकडे बघून जसे राजकीय अभ्यासक, जाणकार संपादक अविश्वास दाखवतात, तितकाच अविश्वास तेव्हा प्रणय रॉयच्या त्या पहिल्या निवडणूक अंदाजावर नेमका त्याच कारणास्तव दाखवला गेला होता. कारण अडीच वर्षापुर्वी ज्या इंदिरा गांधींना त्यांचा सुपुत्र संजय गांधी याच्यासह आपापल्या मतदारसंघात पराभूत करून मतदाराने नवा इतिहास घडवला होता; तोच मतदार इतक्या अल्पावधीत इंदिराजींचे आणिबाणीतले गुन्हे माफ़ करून त्यांना प्रचंड बहूमताने सत्ता देईल, असा रॉयचा अंदाज होता. म्हणजे त्याची मतचाचणी त्याला तसे सांगत होती. त्यावर अभ्यासक पत्रकारांनी अविश्वास दाखवण्याला आणखी एक कारणही होते. आधीच्या निवडणूकीत कॉग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर इंदिराजींनी त्या पराभूत कॉग्रेस पक्षातही फ़ुट पाडली होती आणि त्यांच्या जोडीला कोणी मान्यवर कॉग्रेस नेते शिल्लक उरलेले नव्हते. पक्षाची संघटना नेत्यांच्या हाती आणि कार्यकर्ते व लोकप्रियता इंदिराजींच्या हाती. इतक्याच बळावर आणिबाणीच्या अत्याचारांनी बदनाम असलेल्या इंदिराजी १९८०च्या मध्यावधी निवडणुकीला सामोर्‍या गेलेल्या होत्या. विस्कळीत दुबळी पक्ष संघटना व कलंकित इतिहास, यामुळे इंदिराजींना पुन्हा मतदार कौल देईल; यावर कुठला राजकीय अभ्यासक विश्वास ठेवणार? दंगलीनंतरही गुजरातच्या मतदाराने तिसर्‍यांदा मोदींना मोठे बहूमत दिले; म्हणून आजच्या राजकीय अभ्यासक पत्रकारांना तो मोदींचा विजय वाटला आहे काय? नेमकी तीच मानसिकता तेव्हाच्या पत्रकार अभ्यासकांनी दाखवलेली होती. मग त्यांना नव्याने निवडणूक अंदाजशास्त्र प्रस्तुत करणारा प्रणय रॉय मुर्ख वाटला, तर नवल कुठले? अगदी त्याचे अंदाज छापणार्‍या ‘इंडियाटुडे’च्या संपादक मंडळानेही त्याच्यावर विश्वास दाखवला नव्हता. मग बाकीच्या वृत्तपत्रे वा पत्रकारांनी त्याची दखल घेण्याचा विषयच कुठे येतो?

   पण या तमाम राजकीय पंडितांना निवडणूक निकाल लागले, तेव्हा तोंडात बोट घालायची पाळी आली. कारण प्रणय रॉयचे अंदाज नुसते बरोबर ठरले नाहीत; तर अगदी तंतोतंत खरे ठरले. ज्या इंदिरा गांधी आणिबाणीने बदनाम झाल्या होत्या आणि तोच ठपका ठेवून त्यांच्याच कॉग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्याच्यासह संजय गांधींची पक्षातून हाकालपट्टी केली होती; त्यालाच सोबत घेऊन इंदिराजी लोकांना सामोर्‍या गेल्या होत्या. तरीही त्यांना नुसते बहूमत नव्हेतर दोन तृतियांश बहूमत मिळण्याचा अंदाज रॉयने व्यक्त केला होता. आणि झालेही नेमके तसेच. अडिच वर्षे आधी ज्या जनता पक्षाला लोकांनी भरपूर मते देऊन डोक्यावर घेतले होते; त्याच्यासह इंदिराजींना हाकलणार्‍या कॉग्रेस पक्षाची धुळधाण मतदाराने उडवली होती. इंदिराजींनी ज्याला कोणाला आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून समोर उभे केले; त्याला लोकांनी भरभरून मते दिली होती. त्यांचे निवडणूक चिन्हही बदलले होते. गायवासरू निशाणी बाजूला पडून हाताचा पंजा ही नवी निशाणी घेऊन इंदिराजी जनतेसमोर गेल्या होत्या. त्यासाठी एक आटोपशीर घोषणाही तेव्हा लोकप्रिय ठरली होती. ‘ना जातपर ना पातपर, इंदिराजीकी बातपर, मुहर लगावो हातपर’. आणि लोकांनी खरोखरच हातावर पसंतीची मोहर उठवून इंदिराजींना लोकसभेत अफ़ाट बहुमताने सत्ता बहाल केली. त्यामागचे राजकारण नंतर बघता येईल. मुद्दा आहे, तो देशातल्या पहिल्यावहिल्या मतचाचणीचा अंदाज खरा ठरण्याचा. मात्र त्याची दखल कोणी फ़ारशी घेतली नाही. प्रणय रॉयचे अंदाज नशीबाने खरे ठरले, म्हणून राजकीय पंडीतांनी त्याकडे साफ़ काणाडोळा केला होता. त्याने हे अंदाज कसे काढले किंवा त्यामागचे तंत्र काय आहे, याचाही कोणी उहापोह केला नाही, की कुठे दखलपात्र चर्चाही झाल्या नाहीत. अशी ती पहिली मतचाचणी ‘इंडियाटुडे’च्या त्या अंकातच दफ़न केली गेली. पण ज्यांना इंदिराजी इतके मोठे यश मिळवू शकणार नाहीतच अशी ठाम खात्री होती; तेच राजकीय पंडीत अभ्यासक निकालानंतर त्याची मिमांसा मात्र करीत होते. आपल्या दिवाळखोर राजकीय भाकितावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयास तावातावाने करीत होते. पण लोकमताचा अंदाज काढण्यासाठी हाताशी एक नवे विश्वासार्ह तंत्र आले आहे; त्याची दखल घ्यायची बुद्धी त्यापैकी कोणा शहाण्याला झाली नाही. हीच आपल्या देशातील राजकीय अभ्यासक, जाणकार, पत्रकार वा संपादक विश्लेषकांची दुर्दैवी शोकांतिका आहे. त्यांना आपल्या पुर्वग्रहातून बाहेर पडून सत्य दिसत असले, तरी बघता येत नाही, की समजून घेता येत नाही. वास्तवापेक्षा आपल्या मनातल्या समजुतीला व भ्रमाला घट्ट चिकटून रहाण्याची मनोवृत्ती त्याला कारण आहे. आणि आज इतक्या वर्षानंतरही त्यातून नव्या पिढीचे पत्रकार अभ्यासक मुक्त झालेले दिसत नाहीत. कालपरवाच्या मतचाचणीवरील चर्चेत त्याचीच प्रचिती येत होती. म्हणूनच हा इतिहास नव्याने व थोडा सविस्तर सांगणे अगत्याचे झाले आहे. (क्रमश:)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा