रविवार, २९ डिसेंबर, २०१३

मोदींसाठी ‘आप’त्ती, की इष्टापत्ती?

==================================================
दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल (कंसात जिंकलेल्या जागा)
२००८:  कॉग्रेस ४०.३१% (४३), भाजपा ३६.३४% (२३), बसपा १४.०५ %(२),   
२०१३:  कॉग्रेस २५% (८),     भाजपा ३४% (३२),   आप ३०% (२८) 
==================================================


   नुकत्याच चार महत्वाच्या विधानसभा निवडणूका झाल्या आणि त्याचे निकालही आलेले आहेत. त्यात सर्वत्र कॉग्रेसचा सफ़ाया झाला आणि तीन राज्यात भाजपाने जबरदस्त मुसंडी मारलेली आहे. मात्र त्याचे प्रतिबिंब दिल्ली या शहरी राज्यात पडू शकले नाही. तरीही तिथे पहिल्या क्रमांकाच्या जागा व मते मिळवण्यापर्यंत भाजपाने मजल मारलेली आहे. येत्या म्हणजे २०१४ सालाच्या पुर्वार्धात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीची ही उपांत्य फ़ेरी असे वारंवार संबोधले जात होते. त्यामुळेच त्यात भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अपुर्व मेहनत घेतली. त्याचा परिणाम तिथल्या मतदानाच्या टक्केवारीवर झालेला दिसला. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यात पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक मतदानाचे विक्रम साजरे झाले आणि त्याच लाटेत कॉग्रेस पुरती वाहून गेली. दिल्लीतही कमी प्रमाणात, पण मतदानात वाढ झाली. ह्या मतदारांच्या उत्साहाचे कारण एका बाजूला नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला आशावाद आहे; तसेच दुसरीकडे कॉग्रेसविषयी निर्माण झालेली कमालीची नाराजी आहे. हे उघड व स्पष्ट असताना मोदींच्या लोकप्रियतेची लाट नाकारण्यात धन्यता मानण्य़ाचा अट्टाहास माध्यमांपासून सेक्युलर अभ्यासकांपर्यंत पुर्वीसारखाच चालू आहे. आपले अंदाज व भाकिते साफ़ फ़सल्यावर याच लोकांनी मग बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, त्याप्रमाणे दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांनी नवखा असून मिळवलेल्या यशाचे देव्हारे माजवण्यात पुढाकार घेतला तर नवल नाही. त्यातला दुटप्पीपण लपूनही रहात नाही.

   एका बाजूला दिल्लीतल्या ‘आप’चे यश अनपेक्षित असेच आहे. पण ज्या कारणास्तव ते व तेवढे यश त्या पक्षाला मिळालेले आहे, त्याच निकषावर देशात मोदीही मोठे यश मिळवू शकतात, हे नाकारण्याचे तर्कट चालू आहे. दिल्लीत या पक्षाकडे पुर्वापार संघटनात्मक ढाचा नव्हता, की पुर्वपुण्याई नव्हती. तरीही त्या पक्षाकडे लोकप्रिय चेहर्‍याचा व जनमानसात आशेचा किरण जागवणारा नेता होता. केवळ तेवढ्याच बळावर त्याने इतके मोठे यश मिळवले आणि कॉग्रेसपेक्षा अधिक मते व जागा जिंकल्या. मग देशात आज जे मोदींच्या लोकप्रियतेचे वारे वहात आहेत; त्याचेच प्रतिबिंब तीन राज्यात पडून भाजपाला इतके मोठे यश मिळाले, हे निखळ सत्य आहे. किंबहूना त्याच निकषावर देशातल्या कॉग्रेसविरोधी प्रक्षोभाचे प्रतिक बनलेल्या मोदींना लोक पंतप्रधान करायला उतावळे झालेले आहेत. मग आजवर जिथे भाजपाचे संघटनात्मक बळ नव्हते; तिथेही त्या लाटेचा परिणाम दिसू शकतो. जो नियम संतप्त मतदार केजरीवाल यांना मते देण्यासाठी लावतो, त्याच निकषावर देशाच्या कानाकोपर्‍यातला मतदार भाजपाच्या संघटनात्मक बाजूची पर्वा न करता मोदींसाठी त्या पक्षाला बहूमत देऊ शकतो. कारण त्या मतदाराला मोदी जितके आवडतात व विश्वासार्ह वाटतात; त्यापेक्षाही कॉग्रेसच्या तावडीतून सुटायची घाई झालेली आहे. अशावेळी तो मतदार कॉग्रेसला नक्की पराभूत करणारा व पर्यायी सरकार देऊ शकेल, अशा नेत्याचा शोध मतदार घेत असतो. दिल्लीत भाजपाने असा नेता लोकांसमोर आणण्यात विलंब केला. त्यामुळे त्याचे बहूमत हुकले. देशाच्या पातळीवर तसे घडणे शक्य नाही. पण ज्यांना मोदी व भाजपाच्या नावाचेच वावडे आहे; त्यांना मोदी बहूमत मिळवून पंतप्रधान होऊ शकतात, हे मानायची सुद्धा भिती वाटते, त्यांना मग मोदींच्या अपयशासाठी नवनवे तर्क शोधावे लागणारच ना? त्यातूनच मग ही मंडळी केजरीवाल नावाच्या काडीला धरून आपले तर्क बुडणार नाहीत, अशी खुळी आशा बाळगत आहेत आणि त्यावर अतिशयोक्त युक्तीवादही करू लागली आहेत. वास्तवात केजरीवाल व त्यांच्या यशामुळे बदललेल्या राजकीय समिकरणाचे मांडले जाणारे युक्तीवाद, त्यांनाही पटलेले नाहीत. म्हणून तर वाहिन्यांवरल्या चर्चेतून भाजपाच्या गळी ते उतरवण्याचा उतावळेपणा सुरू झाला आहे. पण त्यातला फ़ोलपणा अजिबात लपत नाही.

   कुठलेही संघटन पाठीशी नसताना आम आदमी पक्षाला अनेक राज्यात अचानक जागा व यश मिळू शकतात. पण किमान चारशे मतदारसंघात भाजपाकडे लढण्याइतकी संघटना असूनही मोदींच्या लोकप्रियतेचा त्याला लाभ मिळू शकत नाही, हा कुठला युक्तीवाद आहे? पहिली गोष्ट म्हणजे दिल्लीतील ‘आप’च्या यशाचे नेमके विश्लेषण कोणीही केलेले नाही. बारकाईने बघितले, तर केजरीवाल यांच्या यशामागे जितके कॉग्रेसचे अपयश आहे; त्यापेक्षा अधिक नुकसान त्या पक्षाने मायावती यांच्या बसपाचे केले आहे. मागल्या निवडणूकीत तिसर्‍या क्रमांकाची मते व दोन आमदार असलेला बसपा, यावेळी पुरता नामशेष झालेला आहे. त्याची सर्वच मते ‘आप’ने खाल्लेली आहेत. कॉग्रेसचाही मोठा हिस्सा त्याने खाल्ला आहे. पण भाजपाच्या मताचा किंचित हिस्सा त्याला बळकावता आला. याचा अर्थच सरळ असा, की संसदेच्या निवडणूकीत ‘आप’वाले उतरले; तर ते कॉग्रेसची मते काही प्रमाणातखाऊ शकतील. पण भाजपाच्या विरोधात लढून कॉग्रेसच्या वळचणीला जाणार्‍या पक्षांचा सर्वाधिक लचका तोडणार आहेत. म्हणजे उत्तरप्रदेशात मायावती, मुलायम, बिहारमध्ये लालू, पास्वान, नितीश, तर कर्नाटकात देवेगौडा वा महाराष्ट्र व बंगालमध्ये डावे पक्ष आहेत; अशा सेक्युलर नाटके करणार्‍यांचे लचके ‘आप’ तोडणार आहे. त्या पक्षाच्या लोकसभा निवडणूकीत उतरण्याने भाजपाला मोठाच धक्का बसेल; असा दावा शुद्ध मुर्खपणाचा आहे. कारण दिल्लीतही त्याला तसे करता आलेले नाही. मग अन्य राज्यात तरी त्या पक्षाच्या मैदानात येण्याचा धोका भाजपाला कशाला असेल? तेच सत्य लपवण्यासाठी तथाकथित सेक्युलर पत्रकार, प्राध्यापक, विश्लेषकांनी दिल्लीच्या निकाल व आकडेवारीचे सत्यस्वरूप लपवण्याचा आटापिटा चालविला आहे. गेले पंधरा दिवस असे भासवले जात आहे, की केजरीवाल यांनी मोदींचा विजयरथ रोखला आहे. पण वास्तवात त्याच पक्षाने आपले बस्तान देशाच्या राजधानीत बसवताना (तिसर्‍या आघाडीत राहून कॉग्रेसशी चुंबाचुंबी करणार्‍या बहूजन समाज पक्षाला) मायावतींच्या सेक्युलर नाटकाला संपवले आहे. तेच हा पक्ष देशात जिथे जिथे निवडणूकीत उतरणार तिथे होणार आहे. त्यामुळेच भाजपा वा मोदींना रोखण्यासाठी सेक्युलरांनी केजरीवाल यांना घोड्यावर बसवले असेल; तर मोदींसारखा समाधानी माणुस दुसरा कोणी असू शकत नाही. कारण ‘आप’ सेक्युलर पक्ष व नेत्यांची मते खाऊन मोदींचे बहूमत मिळवण्याचे काम अधिक सोपे करणार आहे.

   २०१३ची अखेर मोदींच्या मोहिमेला प्रतिसाद देणारी झाली आहे आणि ज्याला गेले सहा महिने उपांत्य फ़ेरी संबोधले जात होते; ती मोदींनी जिंकली आहे. पण ते कबुल केल्यास मोदीच अंतिम फ़ेरी आगामी मे महिन्यात सहज जिंकतील, हेसुद्धा मान्य करावे लागेल. तेच टाळण्यासाठी मग तीन राज्यातील भाजपाच्या अपुर्व यशाला झाकायचे उद्योग सुरू झाले. त्यातूनच मग नवख्या ‘आप’ पक्षाच्या यशाचा डंका पिटला जात आहे. त्यामुळे मोदींचे काहीही बिघडत नाही. याच २०१३च्या आरंभी जयपूरमध्ये राहुल गांधी यांच्यासाठी कॉग्रेसमध्ये उपाध्यक्षपद निर्माण करून त्यांना पक्षाची धुरा तिथे सोपवण्यात आली. तेव्हा त्यांनी वाचून दाखवलेल्या भाषणाचे केजरीवाल यांच्याप्रमाणेच अतिशयोक्त कौतुक झाले होते. तेवढेच नाही तर राहुलच्या भाषणाच्या तुलनेत मोदींचे दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधले भाषण फ़िके व अर्थहीन असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. अकरा महिन्यानंतर ८ डिसेंबरला त्याचे परिणाम समोर आले. तसेच आजच्या केजरीवाल यांच्या कौतुकाचे परिणाम मे महिन्यात समोर येतील. ते काय असू शकतात, त्याचे उत्तर दिल्लीच्या निकालात दडलेले आहे. दिल्लीत केजरीवाल यांनी मोदींचा विजयरथ अडवलेला नाही किंवा त्यात किंचितही बाधा आणलेली नाही. तिथले केजरीवाल यांचे यश खरेतर मागल्या दोन वर्षात सातत्याने झालेल्या विविध आंदोलनांचा एकत्रित परिणाम आहे. त्यात मोदींचा अजिबात सहभाग नव्हता आणि स्थानिक भाजपा नेत्यांनी त्यात दाखवलेल्या उदासिनतेचा परिणाम होता. अखेरच्या क्षणी मोदींनी दिल्लीत जोर लावला नसता, तर केजरीवाल स्वत:चे बहूमत आणु शकले असते. इतकी त्यांची व्यक्तीगत लोकप्रियता दिल्लीत होती. त्यामुळे त्यांच्याच बहूमताला मोदींनी अपशकून केला, असे म्हणता येईल. मात्र आता केजरीवाल दिल्लीच्या यशावर स्वार होऊन देशाच्या अन्य भागात जाणार असतील; तर तिथे त्यांना कुठला मतदार मिळू शकतो, त्याचे चित्र दिल्लीने स्पष्टपणे समोर आणलेले आहे. दिल्लीत कॉग्रेसवर नाराज असलेला मतदार संपुर्णपणे केजरीवाल यांच्या वाट्याला आला. कारण भाजपा तिथल्या आंदोलनात मागे होता. देशाच्या अन्य भागात तशी स्थिती नाही. देशाच्या अन्य राज्यात कॉग्रेस विरोधी रोषाचे नेतृत्व भाजपाने समर्थपणे केलेले आहे. त्यामुळेच कॉग्रेसच्या विरुद्ध जाणारी मते पर्याय म्हणून भाजपा म्हणजे मोदींनाच मिळणार आहेत. मग केजरीवाल कुठली मते मिळवू शकतात?

 केजरीवाल हे कॉग्रेस इतकाच भाजपाला पर्याय म्हणून पुढे आलेले आहेत आणि त्यांनी जनमानसातील आपला तोच चेहरा जपण्याचा आटापिटा चालविला आहे. त्यामुळे अशी जी मते आहेत तीच त्यांच्या ‘आप’ पक्षाला मिळू शकतात. अशी भरपूर मते आपल्या देशाच्या विविध राज्यात आहेत, ज्यांचा तिसर्‍या आघाडीवाल्यांनी मोठाच भ्रमनिरास केलेला आहे. लालू, पासवान. नितीशकुमार, मायावती, मुलायम, देवेगौडा, डावे पक्ष, तेलगू देसम, अनेक प्रादेशिक पक्ष यांनी नेहमी कॉग्रेस विरोधी निवडणूका लढवल्या. पण प्रत्यक्षात त्यांनी आपला कॉग्रेस विरोध जपला नाही. सेक्युलर नाटक करून कसोटीच्या क्षणी त्यांनी कॉग्रेसच्या पारड्यात वजन टाकून आपल्या पाठीराख्या मतदाराचा विश्वासघात केलेला आहे. त्या मतदाराला त्यांनी त्यासाठी कधी विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळेच तो मतदार अशा कॉग्रेस व भाजपा विरोधी खर्‍या पर्यायाच्या शोधात कायम राहिला आहे. केजरीवाल यांचे सध्या तरी तेच लक्ष्य आहे. त्यामुळेच त्यांनी दिल्लीत सत्ता हाती घेताना कॉग्रेसचा उघड पाठींबा घेतला नाही किंवा तिच्याशी बोलणीही केलेली नाहीत. उलट पाठींबा दिला असतानाही कॉग्रेसवर विषारी टिका चालविली आहे. त्यामुळे त्यांचे खरे लक्ष त्याच तिसर्‍या आघाडी वा तिसर्‍या शक्तीची मते आपल्या खात्यात ओढण्याकडे आहे. जे त्यांनी दिल्लीत मायावतींचा बसपा संपवून साधले आहे. अशा पक्ष वा नेत्याच्या विजयाने मोदींचा रथ रोखला गेला, म्हणून तेच पक्ष खुश असतील; तर मोदींनी अस्वस्थ होण्याचे कारण काय? नेपोलीयन म्हणतो, ‘तुमचा शत्रू आत्महत्या करीत असेल तर त्यात हस्तक्षेप करू नका’. मोदी नेमके त्याचे पालन करीत आहेत. केजरीवाल यांना प्रोत्साहन देणार्‍या सेक्युलर पक्षांवर किंवा केजरीवाल यांनी भाजपावर केलेल्या टिकेची, म्हणूनच मोदी दखलही घेत नाहीत. कारण २०१४च्या लढाईत मोदींसाठी आम आदमी पक्ष ही ‘आप’त्ती नसून इष्टापत्तीच ठरणार आहे. जे सेक्युलर पक्ष उद्या कॉग्रेसच्या गोटात हमखास जाण्याची शक्यता होती, त्याची मते व जागा कमी होऊन मतविभागणीचा लाभ भाजपाला मिळू शकतो आणि पर्यायाने कॉग्रेसच्या युपीएची दुर्बळता त्यामुळे वाढणार आहे, त्याची चिंता मोदींनी कशाला करावी? उलट त्यामुळे एकट्या भाजपालाच थेट बहूमताचा पल्ला गाठायला केजरीवाल मोठा हातभार लावणार आहेत. २०१४ च्या मध्यास हा भारतीय राजकारणात घडणारा सर्वात मोठा चमत्कार असणार आहे. केजरीवाल हा ज्या बुडत्यांना काडीचा आधार वाटतो आहे, ती काडी बुडणार नाही. पण तिच्या आशेवर असलेल्यांना मात्र तीच काडी आगामी लोकसभा निवडणूकीत अलगद बुडवणार आहे.४ टिप्पण्या:

  1. उत्तम माहितीयुक्त लेख, भाऊ! दिल्लीतील पूर्वीचे बलाबल, पक्षीय मतविभाजन, इत्यादि आकडेवारी दिली असती तर अधिक वाचनीय झाला असता.
    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-NMAH-JAL-four-minute-video-clip-in-mobile-4358721-NOR.html

    प्रत्युत्तर द्याहटवा