कॉगेसला पर्यायी पक्ष बनण्याच्या मोहिमेत सेक्युलर नाटकाने भाजपाला बहूमोलाचा हात दिला. कारण १९९० सालात अडवाणी यांची रथयात्रा लालुंनी बिहारमध्ये रोखली, तेव्हा दिल्लीतल्या व्ही. पी. सिंग सरकारला व बिहारात लालूंच्या जनता दल सरकारला भाजपाचा पाठींबा होता. अडवाणींना अटक केल्यामुळे भाजपाने सगळीकडचा जनता दला्ला दिलेला पाठींबा काढून घेतला. त्यात मग उत्तर प्रदेश, बिहार व गुजरातमधील जनता दलाची सरकारे सिंग सरकारप्रमाणेच गोत्यात आली. परंतू सेक्युलर सरकारांना वाचवण्याचा पवित्रा कॉग्रेसने राज्यापुरता घेतला आणि तिथे त्या त्या स्थानिक नेत्यांना प्रतिष्ठा मिळाली. लालू व मुलायम त्यातूनच मोठे झाले. मात्र राजीवनी दिल्लीतील सिंग सरकारला पाठींबा द्यायचे नाकारले आणि सरकार गडगडले. पुन्हा फ़ुटीर जनता दल गटाच्या चंद्रशेखर यांना पंतप्रधान व्हायला राजीवनी मदत केली. पण सरकार चालवू दिले नाही. त्यातून मग मध्यावधी निवडणूका अपरिहार्य होऊन दहाव्या लोकसभेसाठी मतदान झाले. तिथून भाजपाचा पर्यायी पक्ष म्हणून उदय सुरू झाला. कारण स्वबळावर ती पहिलीच (१९९१) निवडणूक भाजपाने लढवली होती. त्याच निवडणूकीच्या दरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली तरी उरलेल्या मतदानात कॉग्रेसला मोठे यश मिळवता आले नाही. पण अल्पमताचे सरकार बनवता येईल; इतकी मजल कॉग्रेसने मारली. पण कॉग्रेसची घसरगुंडी मात्र सुरू झाली होती. १९८४ ते १९८९ मध्ये दहा टक्के मते गमावणार्या कॉग्रेसने राजीव हत्येची सहानूभूती असूनही आणखी तीन टक्के मते त्या निवडणूकीत गमावली. सोबतच्या कोष्टकावरून नुसती नजर फ़िरवली तरी इंदिरायुग संपल्यानंतरच्या प्रत्येक निवडणूकीत कॉग्रेस आपल्या मतांची टक्केवारी कशी गमावत आलेली आहे व त्यातून सावरणे त्या पक्षाला किती अशक्य झाले आहे, ते सहज लक्षात येऊ शकते.
माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी बुडवलेली व सीताराम केसरी यांनी रसातळाला नेलेली कॉग्रेस, सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद हाती घेतल्यापासून सावरली असा एक देखावा नेहमीच उभा केला जातो व त्याचा डंका खुप पिटला जातो. पण वस्तुस्थिती सोबतच्या कोष्टकातून स्पष्ट होऊ शकेल. १९९६ सालात राव यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसचा जो दारूण पराभव झाला, पण राव यांनी पराभवातही जितकी मते मिळवली तिथपर्यंतही अजून सोनियांना मजल मारता आलेली नाही. पण याच इंदिरायुगानंतरच्या चोवीस वर्षाच्या कालखंडात भाजपाने मात्र कॉग्रेसशी तुल्यबळ राष्ट्रीय पक्ष होण्यापर्यंत मजल मारली आहे. इंदिरा गांधी यांच्या निर्वाणानंतरच्या या सात लोकसभा निवडणूकांचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोणीही लाट निर्माण करू शकणारा वा मतांचे धृवीकरण करू शकणारा नेता लोकांच्या समोर नव्हता. काही प्रमाणात अडवाणी हा खमक्या खंबीर नेता असल्याचा आभास लोकांना झालेला होता. पण त्यांच्यासह वाजपेयी यांच्यावर जो उत्तरभारतीय नेता असल्याचा शिक्का बसलेला होता, तो त्यांना पुसता आलेला नव्हता. सहाजिकच दक्षिणेत त्यांचा प्रभाव अजिबात नव्हता. इंदिरा हत्येनंतर त्यांचा पुत्र व वारस म्हणून त्यांनीच पुढे आणलेल्या राजीव गांधींबद्दल सर्वसामान्य जनतेच्या खुप अपेक्षा होत्या आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांना मिळालेल्या यशात दिसत होते. पण शहाबानू खटल्याचा निकाल व अयोध्येतील रामजन्मभूमी विषयात त्यांनी कच खाल्ली; तेव्हा त्यांच्याविषयी लोकांचा भ्रमनिरास झाला होता. राष्ट्रव्यापी चेहरा म्हणजे लोकांना ज्याच्याबद्दल खुप आशा वाटतात, असा नेता असतो. त्याच्यावर अतीव विश्वास व तितकाच त्याचा कडवा विरोध अशी एकूण लोकसंख्या वाटली जाते, असाच नेता मग लाट निर्माण करू शकतो. कधी त्याच्या विरोधात वा कधी त्याच्या बाजूने लाट उठत असते. तसे कोणी व्यक्तीमत्वच इंदिराजींनंतर शिल्लक राहिले नाही वा उदयास आले नाही. त्यामुळे मग मतदानातही विखुरलेपणा आपल्याला दिसू शकतो. विविध स्थानिक, प्रादेशिक पक्षिय नेत्यांच्या प्रभावाखाली मतदानाचे वाटप झालेले दिसते. जिथे ज्याचा प्रभाव तिथे त्याच्या प्रभावाखालच्या पक्षाचे प्राबल्य असे मतदान झालेले दिसते. २६
तसा नेता नसला तरी प्रभावी राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपाकडे लोक आशेने बघत होते. उत्तरेतल्या या पक्षाला दक्षिणेत कर्नाटकातही प्रतिसाद मिळत होता. अन्य राज्यात बिगर कॉग्रेस पक्षातील निराश मतदार त्याच्याकडे येत होता. पण सत्तेच्या हव्यासाने अडवाणींपासून त्या पक्षाचे सर्वच नेते सरकारमध्ये दाखल झाले आणि मग सरकार टिकवणे व त्यासाठी बहूमताचे गणित सावरत बसणे; हेच त्याचे काम होऊन बसले. त्यामुळे मग प्रभावी राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपा पुढे येण्याची प्रक्रिया तिथेच थांबली आणि इतर कोणी राष्ट्रीय व्यक्तीमत्वाचा नेताच उपलब्ध नसल्याने डझनावारी महत्वाकांक्षी नेत्यांचा जमाना सुरू झाला. त्यालाच आजकाल सगळे राजकीय अभ्यासक वा निरिक्षक आघाडीचे युग म्हणतात, प्रत्यक्षात कुणी राष्ट्रीय कुवतीचा प्रभावी नेता नसल्याची ती कबुली आहे. म्हणून १९९८-१९९९ या दोन निवडणूकांपासूनचे निकाल बघितले, तर दोन्ही राष्ट्रीय पक्ष समान पातळीवर आहेत आणि कोण अन्य पक्षांच्या मित्रांच्या कुबड्या मिळवतो, त्याच्या गळ्य़ात सत्तेची माळ पडते आहे. दोन्हीपैकी कुठल्याच पक्षाला स्वबळावर सत्ता मिळवण्याची इच्छा व आकांक्षा उरलेली नाही. त्यापेक्षा जागांची व पदांची सौदेबाजी करून सत्ता मिळवणे; हेच कॉग्रेस व भाजपाचे उद्दीष्ट होऊन बसले आहे. म्हणजेच १९६७ सालात कॉग्रेस विरोधी आघाड्यांचे जे राजकारण सुरू झाले, व त्यातून जी अनागोंदी माजलेली होती; तशीच अवस्था मागली पंधरा वर्षे कायम आहे. पण त्यातून देशाची व जनतेची मुक्ती करू बघणारा कोणी नेताच पुढे आला नाही. परिणामी अगतिक होऊन अशा नेत्याची प्रतिक्षा करण्यात मतदार थकून गेला आहे. १९६७-७० दरम्यान ज्या परिस्थितीतून देशाला व समाजाला बाहेर काढण्याचे स्वप्न इंदिरा गांधींनी दाखवले होते, नेमकी तशीच स्थिती एक दिड दशक आपल्या देशात नांदते आहे. सरसकट अराजक, भ्रष्टाचार, गुन्हेगारी बोकाळली आहे. जोवर असे तडजोडीचे व आघाडीचे राजकारण चालणार तोपर्यंत त्यापासून सुटका नाही. पण सुटका तरी कशी व्हायची? कोणी करायची? एकमुखी नेता व एकपक्षीय सत्ता; हाच त्यावरचा उपाय आहे. पण असा नेता व पक्ष आणायचा कुठून? ती क्षमता कॉग्रेस गमावून बसली आहे आणि तिच्या नेत्याकडे तशी इच्छाशक्तीच उरलेली नाही. दुसरीकडे पर्याय म्हणून असलेला भाजपाही उमेद गमावून बसला आहे. स्वबळावर सत्ता मिळवायची तर पक्षाची संघटनात्मक ताकद उभारण्याची भाजपाकडे इच्छाच दिसत नाही.
सोनियांनी पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्यावर तसा प्रयत्न केला होता. आरंभकाळात पंचमढी येथे पक्षाचे चिंतन शिबीर घेतले; तेव्हा त्यांनी कॉग्रेसची नव्याने संघटना बांधणी व स्वबळावर सत्ता मिळवण्याचे बोलून दाखवले होते. पण २००४ च्या निवडणूका जवळ येईपर्यंत त्यांचीही उमेद संपून गेली आणि त्यांनी भाजपाप्रमाणे मित्र पक्ष व आघाडीच्या राजकारणासमोर नांगी टाकली. मिळतील तेवढ्याच मतांमधून अधिक जागा व मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता बळकावण्याचा मार्ग त्यांनी स्विकारल्यावर, सर्वांना आघाडीचे युग आल्याचे वाटल्यास नवल नाही. वास्तविक ती जशी सोनियांची चुक होती; तशीच ती भाजपाच्या नेतृत्वाचीही चुक होती. आज जे प्रादेशिक पक्ष व नेत्यांचे प्राबल्य वाढलेले दिसते; त्याला राष्ट्रीय पक्षाची सत्तालंपटता खरी जबाबदार आहे. तेव्हा म्हणजे १९९६ सालात भाजपा लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष झालेला असला तरी तो बहूमताच्या किंचितही जवळ पोहोचला नव्हता. त्यामुळेच त्याने सत्तेवर दावा करण्याचे कुठलेही कारण नव्हते. अर्थात तांत्रिक कारणास्तव राष्ट्रपती सर्वात मोठ्या पक्षाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रण देतात, त्याप्रमाणे भाजपाला तसे आमंत्रण मिळाले होते. पण शिवसेना व अकाली दल अशा काही निवडणूकपूर्व मित्रांची सोबत असताना भाजपाने शपथविधीची घाई केली. जर बहूमताचे समिकरण आपल्या अटीवर जमत नव्हते, तर सत्तेपासून दूर बसायला काय हरकत होती? अन्य पक्ष सेक्युलर म्हणून एकत्र येणार असतील, तर त्यांना तसे करू देण्यात काही गैर नव्हते. पण तेरा दिवसाचे अल्पायुषी सरकार बनवून भाजपाने आपल्या सत्तालंपटतेची पहिली साक्ष दिली आणि तिथून त्याच्याविषयी मतदाराचा भ्रमनिरास सुरू झाला. मग भाजपाला बाजूला ठेवून जे सेक्युलर खिचडीचे सरकार तयार झाले; त्याला दोन वर्षेही कारभार करता आला नाही. त्यामुळे दोनच वर्षात ती लोकसभा बरखास्त करावी लागली. बाराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची जागा व मते आणखी वाढली. पण सरकार स्थापन करण्यासाठी धावत सुटलेल्या भाजपाच्या नेत्यांनी मग कुणालाही सोबत घेऊन, सत्ता संपादनासाठी वाटेल त्या तडजोडी सुरू केल्या. मतदाराकडे मते मागताना दिलेल्या शब्दांना हरताळ फ़ासून भाजपाने आपले महत्वाचे मुद्दे सोडुन दिले. तरीही सत्ता टिकू शकली नाही आणि दिड वर्षात पुन्हा मध्यावधी निवडणूकीची पाळी आली. त्यात जागा टिकवणार्या भाजपाने दोन टक्के मते गमावली आहेत. त्यातून राष्ट्रीय पर्याय होऊ बघणार्या या पक्षाविषयी मतदाराचा भ्रमनिरास होऊ लागल्याची लक्षणे आकड्यात स्पष्ट दिसतात.
(अपुर्ण)
============================================
एकूण पंधरा लोकसभा निवडणूकातील कॉग्रेस व भाजपा(जनसंघ) यांची तुलनात्मक आकडेवारी
निवडणूक कॉग्रेसची टक्केवारी मिळालेल्या जागा भाजपाची टक्केवारी जागा
पहिली लोकसभा १९५२ ४४.९९% ३६४ ३.०६% ३
दुसरी लोकसभा १९५७ ४७.७८% ३७१ ५.९७% ४
तिसरी लोकसभा १९६२ ४४.७२% ३६१ ६.४४% १४
चौथी लोकसभा १९६७ ४०.७८% २८३ ९.३१% ३५
पाचवी लोकसभा १९७१ ४३.६८% ३५२ ७.३५% २२
सहावी लोकसभा १९७७ ३४.५२% १५४ --------------------------
सातवी लोकसभा १९८० ४२.६९% ३५३ ---------------------------
आठवी लोकसभा १९८४ ४९.१९% ४०४ ७.७४% २
नववी लोकसभा १९८९ ३९.५३% १९७ ११.३६% ८५
दहावी लोकसभा १९९१ ३६.२६% २३२ २०.११% १२०
अकरावी लोकसभा १९९६ २८.८०% १४० २०.२९% १६०
बारावी लोकसभा १९९८ २५.८२% १४१ २५.५९% १८२
तेरावी लोकसभा १९९९ २८.३०% ११४ २३.७५% १८२
चौदावी लोकसभा २००४ २६.५३% १४६ २२.१६% १३८
पधरावी लोकसभा २००९ २८.५५% २०६ १८.८०% ११६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा