विचारधारा, राजकीय तत्वज्ञान, भूमिका वा आर्थिक सामाजिक कार्यक्रम, अशा शब्दांचे बुडबुडे कितीही उडवले, तरी संसदीय लोकशाही म्हणजे कायदेमंडळातील बहुसंख्येचा आकडा; हेच एकमेव अंतिम व्यवहारी सत्य असते. त्यामुळेच ज्या पक्षाकडे, आघाडीकडे वा नेत्याच्या मागे बहुमताचा आकडा असतो; तो म्हणेल तसेच राज्य चालणार असते. ते राजकीय विद्वानांना, अभ्यासकांना, संपादक पत्रकारांना अमान्य असले म्हणून बिघडत नाही. तसे नसते तर एव्हाना गुजरातचे मुख्यमंत्री कधीच फ़ासावर गेले असते आणि त्यांच्या नावाची भावी पंतप्रधान म्हणून त्याच शहाण्यांना चर्चा करण्याची वेळच आली नसती. पण विद्वानांच्या बुद्धीनुसार लोकशाही चालत नसून समाजातील मतदाराची संख्या व त्याने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या संख्येनुसारच राज्य वाटचाल करीत असते. त्यामुळेच उद्या होणार्या लोकसभा निवडणूका वा यापुर्वी झालेल्या निवडणूकीतले आकडे फ़ार महत्वाचे असतात. आपल्या देशातली लोकशाही म्हणजे पर्यायाने लोकमत कुठल्या दिशेने झुकते आहे; त्याची चाहूल त्याच आकड्यातून लागत असते. किंबहूना जे स्वत:ला राजकीय पंडित म्हणवतात, त्यांना तर त्याचा थांगपत्ताही लागत नाही, असेच आजवरच्या निकालांनी दाखवून दिलेले आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी हा आगामी निवडणूकीतला घटक समजून घेताना, मागील विविध निवडणूकीतले आकडे अत्यंत मोलाचे आहेत. सोळाव्या लोकसभेचे भाकित करायचे, तर म्हणूनच आधीच्या पंधरा लोकसभातील जनमानसाने दिलेल्या कौलाचा आधार घ्यावाच लागतो.
इथे त्यासाठीच मी मागल्या पंधरा लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीची दोन कोष्टके दिलेली आहेत. त्यापैकी एक कोष्टक आज देशातले दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष मानले जातात, त्या कॉग्रेस व भाजपा यांची त्या प्रत्येक निवडणूकीतील कामगिरी मतांच्या आकड्यात व मिळवलेल्या जागांमध्ये दिसू शकते. त्यापैकी पहिल्या पाच निवडणुका भाजपाने जनसंघ म्हणून तर नंतरच्या दोन जनता पार्टीचा घटक म्हणून लढवल्या आहेत. उरलेल्या मागल्या आठ लोकसभा निवडणूका त्याने भाजपा म्हणून लढवल्या आहेत. तर कॉग्रेसने दोन फ़ाटाफ़ुटीनंतरही आपले अस्तित्व कायम राखले आहे. त्या प्रदिर्घ सहा दशकांच्या कालखंडात शून्यापासून सुरूवात करणारा जनसंघ उर्फ़ आजचा भाजपा कसा कॉग्रेसला तुल्यबळ होत आला; त्याचा स्पष्टपणे साक्षात्कार घडू शकतो. पण त्याच कालखंडात दुसरीकडे कॉग्रेस पक्षाने आपले एकमेवाद्वितीय स्थान होते, तेही कसे क्रमाक्रमाने गमावले त्याचेही स्वच्छ दर्शन घडू शकते. विसाव्या शतकाची अखेर येईपर्यंत भाजपाने कॉग्रेसला तुल्यबळ होण्यापर्यंत मजल मारली होती. पण त्याच्याही पुढली मजल मारून पहिल्या क्रमांकाचा वा सर्वात प्रबळ राष्ट्रीय पक्ष होण्यापर्यंत भाजपा पोहोचू शकला नाही, हे त्या पक्षाच्या नेतृत्वाचे अपयश मानता येईल. कारण कॉग्रेससहीत अन्य पक्षांच्या वैचरिक व्यवहारी दिवाळखोरीला वैतागलेला भारतीय मतदार क्रमाक्रमाने भाजपाकडे कसा झुकत होता, त्याचीच साक्ष हे आकडे देतात. दुसर्या कोष्टकात केवळ प्रमुख बिगर कॉग्रेसी पक्षांचे आकडे दिलेले आहेत. त्यातूनही अर्धा कालखंड मतदार कसा विविध पक्षांना संधी देऊन बघत होता व त्यातून कोणाची निवड पर्याय म्हणून करायला बघत होता, त्याची साक्ष मिळू शकेल. म्हणूनच ते आकडे समजून घेण्याची गरज आहे.
पहिल्या पाच निवडणूका जनसंघ म्हणून लढताना भाजपाची मजल केवळ आठ नऊ टक्के मतांपर्यंतच गेली होती आणि आणिबाणीनंतर जनता पक्षात विलीन होऊन बाहेर पडल्यावर नव्याने भाजपा म्हणून चुल मांडली; तेव्हाही भाजपा नेमका त्याच टक्केवारीपर्यंतच अडकून पडलेला आहे. पाचवी व आठवी लोकसभा निवडणूक लढवताना जनसंघ-भाजपाने मिळवलेली मते साडेसात टक्क्यांच्या आसपास आहेत. तर पहिल्या आठ निवडणूका लढवताना कॉग्रेसने नेहमी चाळीस टक्क्यांच्या आसपास आपली मते कायम राखलेली आहेत. त्यातून एक गोष्ट सिद्ध होते, की तोपर्यंत कॉग्रेस पक्षाला कधीच खरे राजकीय आव्हान उभे राहिले नव्हते किंवा कुठल्याच पक्षाने तसा प्रयत्नही केला नव्हता. त्याला अपवाद होता १९७७ सालचा चार पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जनता पक्षाचा. पण तो पक्ष एकाच विचारधारेचा वा तत्वज्ञानाचा बांधील नव्हता. त्यामुळेच त्यात लौकरच फ़ाटाफ़ूट झाली. एकप्रकारे एका चिन्हावरच निवडणूक लढवलेली ती चार पक्षांची आघाडीच होती. त्यात समाजवादी, जनसंघीय, चरणसिंग यांचे भारतीय लोकदल, संघटना कॉग्रेस व आणिबाणीनंतर फ़ुटलेला कॉग्रेसचा जगजीवनराम गट असे घटक होते. त्यांची एकत्रित मते जनता पक्ष म्हणून दिसतात. तिथे त्या पक्षाने कॉग्रेसवर मतांच्या टक्केवारीसह जागा मिळवण्यात मात केलेली दिसते. पण तो प्रयोग टिकणारा नव्हता व टिकलाही नाही. त्यामुळेच त्याला कॉग्रेस समोरचे राजकीय आव्हान म्हणता येत नाही. याच अवस्थेमुळे कॉग्रेस पक्षाला कधीच निवडणूका जिंकण्याचे भय वाटले नाही. हे विखुरलेले पक्ष इंदिरा हत्येच्या लाटेत वाहून गेल्यावर राजीव गांधी थट्टेने म्हणाले होते, ‘इनका लोकदल तो परलोक दल हो गया.’ मात्र त्यात भाजपाचा धुव्वा उडाला आणि त्या एका पक्षात गंभीरपणे आपला भक्कम पाया उभारण्याचे चिंतन सुरू झाले. तिथून मग कॉग्रेसला खर्या अर्थाने पर्याय उभा करण्याचा प्रयास भाजपाने हाती घेतला, त्याचे प्रतिबिंब मग पुढल्या निवडणूक निकालांच्या आकडेवारीमध्ये पडलेले दिसू शकते. १९८४ सालात विक्रमी ४९ टक्के मते व ४०४ जागा जिंकणार्या कॉग्रेसच्या तुलनेत भाजपाची काय अवस्था होती? दोन जागा मिळवणार्या भाजपाला अवघी पावणे आठ टक्के मते मिळाली होती. पण त्याच भाजपाने पुढल्या चौदा वर्षात व चार निवडणूकीत थेट कॉग्रेसशी बरोबरी करण्यापर्यंत मजल मारलेली आहे. तर दुसरीकडे कॉग्रेसच्या मतांची निम्मे आणि जागांची ६५ टक्के घसरण झालेली आहे.
१९८४ सालात अवघ्या दोन जागा जिंकणार्या भाजपाने पाच वर्षात ८५ जागा जिंकल्या त्याचे सर्वत्र खुप कौतुक झाले व आजही त्याचा अगत्याने उल्लेख केला जातो. पण वास्तवात ते भाजपाचे यश खुप फ़सवे आहे. कारण बोफ़ोर्स भानगडीने विरोधकांना एकत्र आणले, मतविभागणी टाळण्याच्या डावपेचातून ते यश भाजपाला मिळाले होते. त्यासाठी जनता दल व अन्य पक्षांशी भाजपाने युती आघाडी केलेली होती. त्यामुळेच कमी मते व अधिक जागा असे गणित साधले गेले. पण त्यातून जी भूमिका मांडण्यात भाजपाने पुढाकार घेतला होता, तिला प्रतिसाद मिळू लागल्याचे परिणाम त्यानंतरच्या निवडणूकीत दिसू लागले. कॉग्रेस विरोधी मते घेऊन नंतर सेक्युलर थोतांड करीत पुन्हा विरोधी मतांचा विचका करणार्या समाजवादी व जनता दलाच्या राजकारणाला विटलेला मतदार, त्यानंतर क्रमाक्रमाने भाजपाकडे वळत गेलेला दिसेल. एकीकडे कॉग्रेस विरोधी जागा भाजपा व्यापत चालला होता आणि दुसरीकडे कॉग्रेसचा मतदार अन्य (स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे) पक्ष वा प्रादेशिक नेते बळकावत चालल्याचे दिसून येईल. कॉग्रेसने आपल्याच प्रादेशिक व स्थानिक नेत्यांचे खच्चीकरण केल्याने जी पोकळी निर्माण झाली होती, तिथे तिथे बिगर भाजपा पक्षातून उदयास आलेले स्थानिक नेते कॉग्रेसची जागा व्यापत गेलेले आहेत. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग, मायावती, ओरिसामध्ये पटनाईक, कर्नाटकात देवेगौडा, बिहारमध्ये लालूप्रसाद, पासवान, बंगालमध्ये कॉग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या ममता बानर्जी, अशा नेत्यांनी मोठ्या प्रमाणात कॉग्रेसची जागा व्यापलेली आहे. तर जिथे सेक्युलर असलेले अन्य पक्ष कॉग्रेसशी सेक्युलर चुंबाचुंबी करीत गेले, तिथे तिथे भाजपाने आपले बस्तान पक्के केलेले दिसेल. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक अशा राज्यांचा समावेश होतो. तर बिहार, उत्तरप्रदेश अशा राज्यातही भाजपाला तीच संधी मिळाली. पण तिथल्या सेक्युलर अन्य पक्षांना कॉग्रेसने आपली जागा मोकळी करून दिली. यातून कॉग्रेसची ताकद घटत गेली आणि तितक्या प्रमाणात भाजपाचा आकार वाढत गेला. याचे प्रमुख कारण असे दिसेल, की कॉग्रेसकडे इंदिराजींप्रमाणे जनमत प्रभावित करू शकेल असा कोणी नेताच उरला नव्हता. तर अडवाणी यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली भाजपा हिंदूत्व घेऊन पुढे निघाला होता. तुलनेने भाजपाकडे तेव्हा सर्वात आक्रमक नेता होता.
(अपुर्ण)
============================
एकूण पंधरा लोकसभा निवडणूकातील कॉग्रेस व भाजपा(जनसंघ) यांची तुलनात्मक आकडेवारी
निवडणूक कॉग्रेसची टक्केवारी मिळालेल्या जागा भाजपाची टक्केवारी जागा
पहिली लोकसभा १९५२ ४४.९९% ३६४ ३.०६% ३
दुसरी लोकसभा १९५७ ४७.७८% ३७१ ५.९७% ४
तिसरी लोकसभा १९६२ ४४.७२% ३६१ ६.४४% १४
चौथी लोकसभा १९६७ ४०.७८% २८३ ९.३१% ३५
पाचवी लोकसभा १९७१ ४३.६८% ३५२ ७.३५% २२
सहावी लोकसभा १९७७ ३४.५२% १५४ --------------------------
सातवी लोकसभा १९८० ४२.६९% ३५३ ---------------------------
आठवी लोकसभा १९८४ ४९.१९% ४०४ ७.७४% २
नववी लोकसभा १९८९ ३९.५३% १९७ ११.३६% ८५
दहावी लोकसभा १९९१ ३६.२६% २३२ २०.११% १२०
अकरावी लोकसभा १९९६ २८.८०% १४० २०.२९% १६०
बारावी लोकसभा १९९८ २५.८२% १४१ २५.५९% १८२
तेरावी लोकसभा १९९९ २८.३०% ११४ २३.७५% १८२
चौदावी लोकसभा २००४ २६.५३% १४६ २२.१६% १३८
पधरावी लोकसभा २००९ २८.५५% २०६ १८.८०% ११६
निवडणूक कॉग्रेसची टक्केवारी मिळालेल्या जागा भाजपाची टक्केवारी जागा
पहिली लोकसभा १९५२ ४४.९९% ३६४ ३.०६% ३
दुसरी लोकसभा १९५७ ४७.७८% ३७१ ५.९७% ४
तिसरी लोकसभा १९६२ ४४.७२% ३६१ ६.४४% १४
चौथी लोकसभा १९६७ ४०.७८% २८३ ९.३१% ३५
पाचवी लोकसभा १९७१ ४३.६८% ३५२ ७.३५% २२
सहावी लोकसभा १९७७ ३४.५२% १५४ --------------------------
सातवी लोकसभा १९८० ४२.६९% ३५३ ---------------------------
आठवी लोकसभा १९८४ ४९.१९% ४०४ ७.७४% २
नववी लोकसभा १९८९ ३९.५३% १९७ ११.३६% ८५
दहावी लोकसभा १९९१ ३६.२६% २३२ २०.११% १२०
अकरावी लोकसभा १९९६ २८.८०% १४० २०.२९% १६०
बारावी लोकसभा १९९८ २५.८२% १४१ २५.५९% १८२
तेरावी लोकसभा १९९९ २८.३०% ११४ २३.७५% १८२
चौदावी लोकसभा २००४ २६.५३% १४६ २२.१६% १३८
पधरावी लोकसभा २००९ २८.५५% २०६ १८.८०% ११६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा