सोमवार, २० ऑगस्ट, २०१२

५ जुलै ते ११ जुलै २००६ दरम्यानच्या घटना


   आता त्याला सहा वर्ष  होऊन गेलीत. ५ जुलै २००६ रोजी भिवंडीत रझा अकादमीच्या पुढाकाराने कबरस्तानच्या प्रश्नावर निषेध मेळावा आयोजित करण्यात अला होता. एका जमीनीवर पोलिस ठाण्याचे बांधकाम चालू होते. म्हणजे आधीपासूनच ते काम सुरू होते. त्याबद्दल तिथल्या मुस्लिमांची तक्रार होती. जिथे बांधकाम चालू होते त्या भूखंडाला लागूनच मशीद आहे आणि म्हणून ती जागा आपलीच आहे, असा मुस्लिमांचा दावा होता. त्यांच्या मते तिथे मुस्लिमांची स्मशानभूमी म्हणजे कबरस्तान आहे. तेव्हा तो वाद मिटवण्यासाठी मुस्लिमांनीच वक्फ़ बोर्डाकडे धाव घेतली. मुस्लिम धर्मदाय मालमत्ता व स्थावरजंगम यांचे निवाडे करणारी ती धर्मदाय आयुक्तांसारखी संस्था आहे. तिथेही मुस्लिमांचा दावा फ़ेटाळला गेला. त्यानंतरच पोलिस ठाण्य़ाच्या उभारणीचे काम सुरू झाले होते. म्हणजे वाद निकालात निघाला होता. पण ज्यांनी निवाडा मागितला होता, त्यांनाच तो मंजूर नव्हता. त्यातूनच वाद पेटला किंवा जाणिवपुर्वक पेटवण्यात आला. ५ जुलै रोजी तिथे नमाजासाठी जमा झालेल्या जमावाने पोलिसांवर जबरदस्त हल्ला चढवला. तेव्हा (आझाद मैदानासारखीच) तणवपुर्ण परिस्थिती निर्माण झाली. की तशी परिस्थिती निर्माण केली जाते? मग अधी अश्रूधूर व लाठीमाराचा अवलंब पोलिसांनी केला. पण त्याने जमाव आवरेना तेव्हा गोळीबार करावा लागला. जो आझाद मैदानच्या घटनेत टाळला गेला. पण गंमत बघा, परिणाम नेमका आझाद मैदान सारखाच होता. दोन लोक गोळीबारात ठार झाले. पण अधिक पोलिसच जखमी झाले होते. दोन पोलिस उपायुक्त त्यात जखमी झाले होते. शिवाय ३९ पोलिस कर्मचारी जखमी झाले.

   ही घटना आजची व आझाद मैदानची नाही तर सहा वर्षापुर्वी भिवंडीत घडलेली घटना मी कथन करतो आहे. त्या मेळाव्याचे आयोजन सुद्धा रझा अकादमीनेच केले होते. नंतर ज्या दोन पोलिसांना भोसकून ठार मारण्यात आले त्यांच्या खुन प्रकरणात भिवंडी येथील रझा अकदमीचा अध्यक्ष युसूफ़ रझा हा प्रथम क्रमांकाचा आरोपी होता. तर अकादमीचा सचिव शकील दुसर्‍या क्रमांकाचा आरोपी होता आणि फ़रारी होता. अशी ज्या संस्थेची ख्याती आहे, त्यांना मुंबईत मेळावा भरवायला परवानगी देताना पोलिसांनी सामान्य माणसाच्या नव्हेतर स्वत:च्याच सुरक्षेच्या कारणास्तव ती परवानगी नाकारायला नको होती काय? पण ती परवानगी दिली जाते, म्हणजे पुढल्या संकटालाच आमंत्रण दिले जात नाही काय? ज्यांना आपल्याच भाईबंदांवर सहा वर्षापुर्वी झालेला भीषण हल्ला व त्यांच्या हत्या आठवत नाहीत, त्यांना माणूस म्हणता येत नाही; तर त्यांना पोलिस म्हणता येईल काय? आणि ती दंगल कशासाठी झाली होती? जी जागा व जमीन कबरस्तानची नाही किंवा मशीदीची सुद्धा नाही असे खुद्द वक्फ़ बोर्डाने स्पष्ट केले होते, त्या जमीनीसाठी दंगल माजवून दोन पोलिसांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तेव्हाही आर. आर. आबाच गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांना तरी ते आठवायला हवे होते आणि त्यांनीच पुढाकार घेऊन मुंबई पोइसांनी रझा अकादमीला आझाद मैदान देऊ केले असेल तर ती परवानगी रद्द करायला हवी होती. त्यांनी तसा धा्डसी निर्णय घेतला असता तर हा माणूस शेपटी घालनारा नसून शेपटी पिरगाळणारा आहे असेच लोकांनी म्हटले असते. आबांना स्वत:च्या तोंडाने तसे सांगायची नामुष्की आलीच नसती.

   १९२० सालपासून जी जमीन पोलिस खात्याच्या ताब्यात आहे, तिच्याबद्दल वाद होण्याचे कुठलेही कारण नव्हते. तरीही तो वाद उकरून कढण्यात आला आणि ते काम रझा अकादमीने ठप्प करून दाखवले. त्या वादानंतर तेच टुमणे पुन्हा लावण्य़ात आले. सध्या सर्व विषय बाजूला ठेवुन आधी शांतता प्रस्थापित करा. आणि शांतता आली मग विषय विसरून जा; याला शेपटी पिरगाळणे म्हणत नाही. यालाच शेपटी घालणे म्हणतात. आणि आबा पाटलांनी शेपूट घालूनच दाखवली. कोणाला त्याचा पुरावा हवा असेल तर भिवंडी पोलिस ठाण्याचे ते तस्सेच अर्धवट पडलेले बांधकाम दाखवता येईल. अर्थात त्यानंतर घटनाच अशा घडल्या, की आबांना खुर्चीच खाली करावी लागली. मुद्दा इतकाच, की रझा अकादमी या संस्थेची ख्याती अशी असताना त्यांच्यावर पोलिसांनी किती विश्वास ठेवायचा? भिवंडीची दंगल इतक्या झपाट्याने पेटवण्यात आली आणि झपाट्याने पसरवण्यात आली, की तातडीने आसपासच्या शहरातील व भागातील पोलिसांची कुमक भिवंडीकडे वळवण्यात आली. थोडक्यात आसपासच्या म्हणजे मुंबई परिसरातल्या पोलिसांचे लक्ष स्थानिक बंदोबस्तावरून उडवून देण्यात आले होते. कल्या्ण, ठाणे अशा भागातून पोलिसांची कुमक भिवंडीला पाठवण्यात आली आणि एकू्णच गृहखात्याचे लक्ष मुंबईवरून उडवण्यात आले. ही कथा आहे ६/७ जुलै २००६ मधली. मग एक दिवस शांततेत गेला आणि ९ जुलै २००६ रोजी नवीच धमाल उडाली. भिवंडी पेटली असताना जी मुंबई अगदी शांत होती, तिचा ९ जुलै रोजी भडका उडाला. शिवाजी पार्क मैदानाच्या गेटपाशी स्व. मीनाताई ठाकरे यांचा अर्धपुतळा आहे. त्याला कोणीतरी चिखल फ़ासल्याचे भल्या सकाळी दिसून आले आणि मुंबईभरच्या शिवसैनिकांनी चिडून रस्त्यावर धाव घेतली. मुंबईसह अनेक शहरांमध्ये वाहतुक रोखून सत्याग्रह व निषेध सुरू झाला.

   अर्थात हे फ़क्त मीनाताईंच्या पुतळ्यापुरते मर्यादित नव्हते. आणखी कुठल्या तरी मंदिरातील गणेश मुर्तीला शेण फ़ासण्यात आले होते. त्याचाही गवगवा झाला. त्यातून परिस्थिती अधिकच बिघडत गेली. मग भिवंडी संभाळणारे पोलिस सोडून उरलेसुरले पोलिस शिवसैनिकांच्या मागे लागले. बाकीची मुंबई कुठल्याही बंदोबस्ताला पारखी झाली. याचा अर्थच कोणीतरी हे सर्व घडवून आणत होता. एकीकडे भिवंडीत दंगल माजवून ठाण्यातले पोलिस तिकडे गुंतवून ठेवण्यात आले आणि दुसरीकडे शिवसैनिकांच्या भावना भडकावून मुंबईतले पोलिस त्यांच्या मागे गुंतवण्यात आले. याला केवळ योगायोग म्हणता येईल काय? जशी भिवंडीतली घटना कुरापत काढून सुरू करण्यात आली होती तशीच मुंबईतली घटना नाही काय? तिथे नसलेल्या वादातून पोलिसांवर हल्ला चढवून परिस्थिती तंग करण्यात आली. मुंबईत शिवसैनिकांना रस्त्यावर आणायला भाग पाडुन इथले पोलिस गुंतवण्यात कोणाचा काय हेतू असू शकतो? आज त्याची आठवण करून दिली तर त्याने गांभिर्य चटकन लक्षात येणार नाही. पण त्या दिवशी, म्हणजे ९/१० जुलै २००६ मुंबईची काय परिस्थिती होती? मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तातडीने सर्व प्रमुख अधिकार्‍यांची बैठक बोलावली आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आणायची उपाययोजना आखायला सुरूवात केली होती. केंद्र सरकारने आवश्यक तेवढे अधिक निमलष्करी जवान पाठवण्याचे तात्का्ळ आश्वासन दिले होते. राज्यात मुंबईसह अनेक शहरात ५०० हून अधिक लोकांची त्या चोविस तासात धरपकड झाली होती. म्हणजेच आता मुंबई पेटणा्र असेच सरकारचे गृहीत होते. पण तेवढे काही झाले नाही. कारण असे काही शिवसेनेला करायचेच नव्हते. ज्यांना असे काही करायचे असते ते कधीच उघडपणे मैदानात येत नाहीत. ते लोकांचे व सरकारचे भलतीकडे लक्ष वेधत असतात आणि आपला दुष्ट हेतू साध्य करत असतात. शिवसेनेला दंगल वगैरे करायचे असते तर त्यांनी रस्त्यावर येऊन धमाल केली नसती. भिवंडीतल्या रझा अकादमीच्या निषेधाप्रमाणे थेट पोलिसांवरच हल्ला चढवला असता. लाठीमार, गोळीबराची परिथिती निर्माण केली असती. पण तसे काही झाले नाही, होऊही दिले नाही. मात्र आपला संताप व्यक्त करण्यापुरती सेनेची कारवाई मर्यादीत राहिली.

   सवाल इतकाच उरतो, की भिवंडीतल्या दंग्याला रझा अकादमीला जबाबदार धरता येईल. पण त्याच्याच पाठोपाठ मुंबईत आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात असे काही करून शिवसैनिकांना रस्त्यावर आणण्यात कोणाचा काय हेतू असावा? आजपर्यंत कोणीही त्या गुन्ह्यासाठी पकडला गेलेला नाही. कोणी मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना केली? कोणी अन्य मंदिरातल्या मुर्तींना शेण फ़ासले? या प्रश्नांची उत्तरे आजवर मिळालेली नाहीत. कोणी शोधायचा प्रयत्नही केलेला नाही. आणि तिथेच पोलिसांची व सरकारच्या नालायकीची साक्ष मि्ळते. अशा घटनांचा तपास एवढ्यासाठी करायचा असतो की त्यातून तशा घटना पुन्हा घडू नयेत आणि घडणार असतील तर त्या रोखता याव्यात. पण तेव्हा त्याचा कसून तपास घेतला गेला नाही. आणि भिवंडीतली दंगल एक गुन्हा म्हणून हाताळण्यात आली आणि मुंबईतील या कुरापतखोरीचा शोधच घेतला गेला नाही. म्हणुन मग दोनच दिवसात शेकडो लोकांना आपले जीव गमवावे लागले आणि पुढे थेट कत्तल करायला अजमल कसाबच इथे येऊन थडकला. असे काय घडले पुढल्या दोन दिवसात?      ( क्रमश:)
 भाग  ( ६ )     २१/८/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा