बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

सोवळेपणातून मिळवले काय अण्णा टीमने?


   पहिल्या दिवसापासून अण्णा राजकारण नाकारत राहिले. पण शेवटी त्यांना त्याच मळलेल्या पायवाटेवर यावे लागले आहे. त्यातून सुटकाही नव्हती. कारण ज्या देशात सर्वच गोष्टींवर राजकीय नियंत्रण असेल आणि अगदी प्रत्येक गोष्टच जर राजकीय निकष लावून मोजली जात असेल, तर राजकारणापासून पळता येणार नाही. आणि म्हणूनच अण्णांनी पहिल्यापासून राजकिय भूमिका घ्यायला हवी होती. उशीरा का होईना ते तिकडे वळत आहेत. मात्र अजून त्यांची किंवा त्यांच्या सहकार्‍यांची राजकीय भूमिका स्पष्ट नाही. समोर दिसणारे सत्य नाकारल्याने अण्णा स्वत:च राजकीय जाळ्यात येऊन अडकले आहेत. तो सापळा आहे. तुम्ही जेव्हा सरकारच्या विरोधात म्हणजे एका राजकीय पक्षाच्या राजकीय सत्ताकारणाच्या विरोधात उभे रहाता; तेव्हा तुम्हाला त्याच पक्षाच्या विरोधात उभे रहावे लागते. ते नाकारून कसे लढता येईल? आणि असे एका बलवान पक्षाच्या विरोधात लढताना दुसर्‍या अन्य पक्षांना सोबत घेणे भाग असते. हे सत्य समजायला अण्णांनी वेळ लावला. कॉग्रेस अण्णांचे आंदोलन चिरडून काढायला निघाली होती आणि अन्य पक्ष अण्णांना पाठींबा देऊ शकत होते, इच्छित होते. अण्णांनी त्यांचा पाठींबा घेण्यात उशीर केला. कारण अण्णा सुद्धा राजकारण करतात हा शिक्का त्यांना नको होता. आणि अण्णा कितीही नाकारत होते, तरी कॉग्रेसवाले त्यांच्यावर राजकारण करीत असल्याचा शिक्का मारतच होते. पण तिथेच अण्णांची फ़सगत झाली. त्यांच्या या अलिप्ततेने अन्य पक्षांना अण्णांपासून दुर ठेवण्यात कॉग्रेस यशस्वी झाली आणि आता एकाकी पडल्यावर अण्णांना राजकीय कवचाची गरज वाटू लागल्यावर त्यांनी राजकीय पर्याय देण्याचा विचार मांडला आहे. पण तो देण्यासाठी अण्णांसमोर कोणते पर्याय आहेत?  

   आठनऊ दिवस अण्णा टीमने उपोषणाचा मार्ग चोखाळल्यावर त्यांच्याकडे कॉग्रेस पक्ष व सरकारने साफ़ दुर्लक्ष केले होते. तेवढेच नाही तर अन्य पक्षांनीही त्यांच्याकडे दुर्लक्षच केले होते. त्याचे कारण उघड आहे. अण्णांनी कधीच अन्य पक्षांना विश्वासात किंवा सोबत घेण्याचा विचार केला नाही. उलट आपण राजकीय लढा लढत नाही, असे भासवण्यासाठी अण्णा टीम नेहमी सर्वच पक्षांवर कारण नसताना तोफ़ा डागत राहिली. त्यातून त्यांनी पाठींबा देतील अशा अन्य राजकीय पक्षांनाही दुखावण्याची चुक केली होती. ती चुक अनावधानाने झालेली नाही. अण्णांना ती चुक करायला भाग पाडण्यात आलेले आहे. अण्णा हजारे यांचे सहकारी कायम माध्यमांच्या सहवासात राहिले आहेत. काही प्रमाणात ते माध्यमांच्या आहारी सुद्धा गेलेले आहेत. त्यामुळेच अण्णांचे आंदोलन सामान्य लोकांच्या सहानुभूतीपेक्षा माध्यमांच्या पाठींब्यावर अधिक अवलंबून राहिले. आपल्या मागे गांजलेली जनता मन:पुर्वक येते आहे वा उत्सुक आहे, हे लक्षात आल्यावर देखिल अण्णा टीमने त्या जनतेला संघटि्त करण्यापेक्षा तिला नुसताच जमाव राहु दिले. तिच्याशी संपर्क यंत्रणा निर्माण केली नाही, की तिला संघटित केले नाही. गेल्या वर्षी अण्णांना जो पाठिंबा मिळाला, तो अत्यंत उत्स्फ़ुर्त असाच होता. त्याचे श्रेय माध्यमांना द्यावेच लागेल. पण त्यानंतर अण्णा टीमने माध्यमांवर अवलंबून रहाण्याचे कारण नव्हते. त्यांनी जमलेल्या गर्दीतून आपली निदान तालुका पातळीपर्यंतची संघटना उभी करायला हवी होती. पण त्यात लक्ष घालण्यापेक्षा अण्णांचे सहकारी माध्यमातून आपल्या भूमिका मांडण्यात गर्क राहिले. त्यांनीच जमलेली गर्दी पांगू दिली. त्याचा पहिला परिणाम लगेच म्हणजे डिसेंबरच्या मुंबई उपोषणात मिळाला होता. माध्यमांनी अण्णांच्या आंदोलनातील त्रुटी दाखवण्याचा पवित्रा घेतल्यावर परिस्थिती बिघडत गेली.

   खरे तर अण्णांच्या आंदोलनाला कॉग्रेसने पक्ष पातळीवर विरोध केलेला असल्याने, त्या टीमने थेट कॉग्रेस विरोधी राजकीय भूमिका तेव्हाच घ्यायला हवी होती. काही प्रमाणात घेतली सुद्धा होती. पण माध्यमातून अण्णा एकट्या कॉग्रेसला लक्ष्य बनवतात असा आरोप झाला, तेव्हा अण्णा टीमने डगमगण्याचे काही कारण नव्हते. जर कॉग्रेस एक पक्ष म्हणुन आमच्या आंदोलनाच्या विरोधात राजकीय अपप्रचार करीत असेल, तर आपण कॉग्रेस विरोधी आहोत असे म्हणायला काय भिती होती? आपण कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही; असे सोवळे दाखवण्याचे अण्णांना काय कारण होते? जो पक्ष राजकीय भूमिका घेऊन तुमच्या विरोधात वागतो आहे आणि त्यासाठी सरकारी यंत्रणा वापरतो आहे, त्याच्या विरोधात बोलायची लाज कसली? त्याच्या विरोधात अन्य पक्षांची मदत घेण्यात पाप कसले? पण अण्णा पक्षनिरपेक्षतेचे पावित्र्य जपत बसले आणि त्यासाठी अन्य पक्षांनाही दुखावत गेले. त्यामुळेच मग ते कॉग्रेसी सापळ्यात अडकत गेले. लक्ष्य व उद्दीष्ट  एकच असेल तर ते साध्य करण्यासाठी कुठल्याही टोकाला जाण्याची तयारी असली पाहिजे. त्यालाच युद्ध म्हणतात. लोकपाल हवा, मग तो आणू शकेल अशा कुणाचाही पाठींबा घेऊ आणि कुणालाही पाठींबा देऊ; असा राजकीय पवित्रा अण्णा टीमने घ्यायला हवा होता. लोकांच्या मनात ते होते आणि त्याचा अंदाजच अण्णा टीमला आलेला नव्हता. कारण त्यात कोणीही राजकीय चळवळीतून आलेले नाही. म्हणुनच राजकीय संबंधाचा प्रश्न विचारला; मग अण्णा टीम लगेच विरोधी पक्षांवरही दुगाण्या झाडू लागत होती. अण्णांच्या रामलिला उपोषणानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढायची घोषणा केल्यावर, केजरीवाल यांनी त्या रथयात्रेची टवाळी केली होती. त्याची गरज होती काय? त्यांच्याच व्यासपीठावर येऊन पाठींबा दिलेल्या शरद यादव यांच्यावर शिसोदियांनी ‘दाढीमे तिनका’ असल्या शेलक्या भाषेत आरोप करायची काय गरज होती?    

   थोडक्यात अण्णा टीम लोकपालसाठी राजकीय लढाईच्या मैदानात उतरली होती आणि राजकारणात मुरलेले उपलब्ध योद्धे मात्र त्यांना नको होते. उलट कॉग्रेसला तेच हवे होते. जशी कॉग्रेस अन्य लहान मोठ्या पक्षांना एकेकटे पाडून त्यांची शिकार नेहमी करत आली; तशीच त्यांना अण्णांची शिकार करायची होती आणि अण्णा टीमने त्यांचे काम सोपे करून ठेवले होते. इथे महाराष्ट्रामध्ये अन्य वेळी शिवसेना भाजपा हे जातियवादी पक्ष असतात. पण त्याच शिवसेनाप्रमुखांच्या निवासस्थानी मते मिळवण्यासाठी प्रणबदा मुखर्जी गेले ना? तेव्हा ठाकरे जातियवादी नव्हते का? तेव्हा शिवसेना हिंदूत्ववादी नव्हती का? मग त्यांचा पाठींबा घेतल्याने कॉग्रेस वा प्रणबदा मुखर्जी जातियवादी होत नाहीत का? म्हणजेच जेव्हा सोयीचे असेल तेव्हा जातियवाद वगैरे महत्वाचा नसतो. ही कॉग्रेसची निती राहिली आहे. कारण निवडणुक जिंकायची असते. लढाई जिंकायची असते. आणि ती जिंकण्यासाठी वाटेल ते करायचे असते. मग अण्णा टीमला सोवळेपणा करण्याची गरज काय होती? लोकपालसाठी जो पक्ष पाठींबा देईल, त्याला निवडणुकीत पाठींबा देण्याचा पवित्रा, अण्णा टीमने का घेऊ नये? रोजच्यारोज हिंदुत्वाला शिव्या घालणार्‍या कॉग्रेसला आपला उमेदवार मातोश्रीवर गेलेला चालतो, तर संघाने अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा दिला हे मान्य करण्यात अण्णा टीमला लाज वाटण्याचे कारण काय? ह्या सोवळेपणानेच अण्णा टीम गोत्यात येत गेली. कारण जी लढाई अण्णा टीम सामाजिक वा सुधारणावादी समजत होती, ती लढाई कॉग्रेसने राजकीय बनवलेली होती. ती राजकीय डावपेचांनीच लढणे भाग होते. त्याकडे राजकारण विरहीत लढाई म्हणून बघण्यात अण्णा टीमची चुक झालेली आहे. आणि ती चुक नाकारून पुढली वाटचाल करता येणार नाही.

   राजकारण हे जिंकण्यासाठी असते हे विसरता कामा नये. कॉग्रेसचा विरोध अण्णा टीमला नाही, की त्यांच्या मागण्यांना नाही. विरोध आहे तो अण्णांच्या वरचढ वृत्तीला. म्हणूनच त्या पक्षाने कधीच अण्णा टीमकडे आंदोलन म्हणुन बघितले नाही, त्यांच्या लढ्याकडे चळवळ म्हणून बघितले नाही. त्यांनी नेहमी अण्णा टीमकडे एक राजकीय विरोधक म्हणुनच बघितले होते आणि राजकीय विरोधकाप्रमाणेच त्यांना वागवले होते. अण्णा भले सत्याग्रही म्हणुन तुरूंगात गेले असतील, पण कॉग्रेसने त्यांना आपल्या सत्तेचा विरोधकच मानले होते. म्हणुन तर पहिल्या दिवसापासून त्यांच्यावर संघ वा भाजपाच्या पाठींब्याचा आरोप कॉग्रेसकडून होत राहीला. कॉग्रेस प्रवक्त्याने अण्णांवर व्यक्तीगत आरोप केले. मग अण्णांनी थेट कॉग्रेसला राजकीय विरोधाचा पवित्रा का घेतला नव्हता? तिथेच त्यांच्या आंदोलनाची मोठी चुक झाली होती. आता तरी ती चुक सुधारली जाणार आहे काय?      ( क्रमश:)
 भाग  ( ३५० )  ८/८/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा