बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

येदीयुरप्पाची पापकर्मे चव्हाट्यावर आणलीच कोणी?


   मी कायबीईन लोकमत असे का म्हणतो त्याचा हा एक आणखी दाखला आहे. ज्या सवाल कार्यक्रमाबद्दल मी दोन दिवस लिहिले; त्यात प्रकाश बाळ यांचा अट्टाहास कसासाठी चालला होता? तर जी अण्णा टीम कॉग्रेसच्या युपीएप्रणीत सरकारच्या पंधरा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करते आहे, ते येदीयुरप्पा यांच्याबाबत अवाक्षर बोलत नाहीत. म्हणजेच अण्णा टीम व भाजपा यांचेच साटेलोटे आहे, असेच त्यांना सुचवायचे आहे व असते. पण अण्णा टीम किंवा येदीयुरप्पांचा भ्रष्टाचार याबद्दल बाळ यांची माहिती काय आणि त्यात त्यांची अक्कल किती; असा सवाल विचारणे खरे तर आवश्यक होते. म्हणजे निदान तिथे एन्कर म्हणून बसलेल्या व्यक्तीने तसे विचारणे भाग होते. पण जिथे आधीच अक्कल नसलेले पाहुणे खास शोधून बोलावले जातात, त्यांची अक्कल थेट प्रक्षेपणात तपासणार तरी कशी? ज्याला कायबी बरळता येते, जीभ टाळ्याला लावून आवाज चढवता येतो, असेच खास पाहुणे आणले मग मुर्खांचा बाजार छान भरवता येत असतो. त्यांना शहाण्यासारखे प्रश्न तरी कसे विचारता येतील? मला थोडी गंमत वाटते, ती अण्णा टीमच्या काही सदस्यांची. कारण ज्या कार्यक्रमात प्रकाश बाळ अण्णा टीमविषयी खोटे किंवा बिनबुडाचे बरळत होते, त्याच कार्यक्रमात अण्णांचे दोन पाठीराखे समर्थकही सहभागी झाले होते. त्यांनी तरी अंधारात चाचपडणार्‍या या प्रकाशावर थोडा उजेड पाडायला नको होता काय? की सतत अशा मुर्खांच्या सहवासात वाहिन्यांवर हजेरी लावल्याने त्यांचीही स्मृती दुबळी होत चालली आहे? पुन्हा पुन्हा अण्णा टीम येदीयुरप्पा यांच्या भ्रष्टाचाराबद्दल मुग गिळून गप्प बसली आहे, या प्रकाश बाळाच्या खोटेपणाला त्यांनी तिथल्या तिथे का खोडून काढले नाही?

   पहिली गोष्ट म्हणजे येदीयुरप्पा या कर्नाटकातील व दक्षिणेतील भाजपाच्या पहिल्याच मुख्यमंत्र्याच्या भ्रष्टाचार व पापकर्माचा गौप्यस्फ़ोट प्रकाश बाळ किंवा त्यांच्या लाडक्या कॉग्रेस पक्षाने अजिबात केलेला नाही. किंवा बाळसारख्या कोणा सेक्युलर पत्रकारानेही तो भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलेला नाही. ते महत्कार्य असेल तर ते खुद्द अण्णा टीमनेच ते केले आहे. ज्याचे खरकटे त्या कार्यक्रमात प्रकाश बाळ मोठे पक्वान्न म्हणून पुन्हा पुन्हा ताव मारून चघळत होते, ती घाण मुळातच अण्णा टीमचे सदस्य असलेल्या न्यायमुर्ती संतोष हेगडे यांनी चव्हाट्यावर आणलेली आहे. अण्णा टी्मच्या सदस्यांना म्हणजे हेगडे यांना भाजपच्या पापांना पाठीशी घालायचे असते तर हे खरकटे प्रकाश बाळ यांच्यासारख्यांना कधी असे भुरकून खायलाही मिळाले नसते. तेव्हा येदीयुरप्पा यांच्या संदर्भात अण्णा टीम गप्प कशाला, असा सवाल प्रकाश बाळ सातत्याने विचारत होते, म्हणजेच त्यांना त्या प्रकरणाचा काडीचाही गंध नसावा. मग लोकमत वाहिनी अशा अडाणी माणसाला त्याच विषयाचा जाणकार म्हणून कशी आमंत्रण देते? की एखाद्या विषयात संपुर्ण अज्ञान हेच कायबीईन लोकमतसाठी अभ्यास असतो?

   संतोष हेगडे हे दिर्घकाळ कर्नाटकचे लोकायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यापुर्वी त्यांनी न्यायपालिकेमध्ये काम केलेले होते. मग लोकपाल म्हणुन काम करताना त्यांचा आणि येदीयुरप्पा यांचा खटका उडाला. त्यामुळे त्यांनी राजिनामा सुद्धा दिला. पण त्यांच्याच अहवालामुळे भाजपाचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांचा भ्रष्टाचार पुराव्यांसह चव्हाट्यावर आला. तेवढेच नाही, त्यावर न्यायालयीन कारवाई होत असतानाच त्या मुख्यमंत्र्याला आपल्या सत्तापदाचा राजिनामा देण्याची पाळी आली. तेच न्या हेगडे आरंभापासून अण्णा टीमचे सदस्य आहेत. मग अण्णा टीमने येदीयुरप्पा विषयी मौन पाळण्याचे कारण काय? मुळात असा आरोप करणे म्हणजे "ऐ मेरे वतनके लोगो" गीतामध्ये लता मंगेशकरचा आवाजच ऐकू येत नाही, म्हणण्यासारखे नाही काय? जो आरोप व पुरावेच अण्णा टीमच्या सदस्याने चहाट्यावर आणले, त्याबाबत अण्णा टीम मौन पाळते; असे म्हणणे मुर्खपणा नाही तर नशाबाजीचाच पुरावा नाही काय? आता प्रकाश बाळ म्हणतील संतोष हेगडे सोडा, केजरीवाल किंवा किरण बेदी यांनी कुठे आरोप केला आहे? त्याची गरज आहे काय? सामुहिक काम करताना जबाबदारी वाटून घेतलेली असते. गीत गाताना प्रत्येकानेच गाणे म्हटले व प्रत्येक शब्द उच्चारला तर लता मंगेशकर आणि इतर साथिदार यांच्या एकदम गायनाने गाण्याचा चुथडा होऊन जाणार नाही काय? जे प्रकरणच अण्णा टीमच्या एका सदस्याने उघडकीस आणले, त्याचे श्रेय टीमचे नाही काय? उद्या हेच बाळ आपल्या बाळबुद्धीने विचारील मग केजरीवल बेदी करतात, ते आरोप संतोष हेगडे यांनी का केलेले नाहीत? जणू प्रकाश बाळ यांना ऐकायचे आहेत म्हणून अण्णा टीम आरोप करते अशी त्यांची समजूत आहे काय? बाकी त्या आरोपांचे कारण नाही किंवा हेतू नाही असे त्यांना वाटते काय?

   आपल्या केसांच्या बटा सावरत सवालाला पुढे नेणार्‍या अलका नामक मुलीला त्यातले गांभिर्य कळत नसेल तर माफ़ आहे. पण त्याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुरेश पठारे व विशंभर चौधरी या अण्णा सहकार्‍यांचे काय? की त्यांनाही संतोष हेगडे हा अण्णा टीमचा सदस्य आहे ते आठवत नाही? की त्यानेच येदीयुरप्पा यांच्या भ्रष्टाचाराचा छडा लावला ते त्यांना ठाऊक नाही? की सतत वाहिन्यांच्या गदारोळात वावरू लागल्यापासून त्यांच्याही स्मरणशक्तीला विस्मृतीचा झटका आला आहे? त्यांनी या किरकिर्‍या बाळाला तिथल्या तिथे हेगडे यांच्या कर्तबगारीची आठवण सांगून गप्प का करू नये? एकूणच अशा चर्चा लोकांच्या ज्ञानात भर घालण्यापेक्षा लोकांच्या मनात गोधळ माजवण्यासाठीच असतात. तेव्हा माझी त्यातून तीच अपे्क्षा असते. पण आता त्या चर्चा त्यात सहभागी होणार्‍यांच्याही मनाचा गोंधळ उडवू लागल्या आहेत, म्हणुन तिकडे वाचकांचे लक्ष वेधणे मला अगत्याचे वा्टले. मला म्हणूनच वाटते लोकही त्यात मनोरंजनच बघतात. कोण किती मुर्खपणा करतो ते लोक मजेने बघत असतील.

   यातून एक गोष्ट लक्षात येऊ शकते. की अशा चर्चेत बोलावलेले किंवा त्यात सहभागी होणारे, विद्वान वगैरे असतातच असे नाही. त्या वाहिनीला किंवा तिथल्या संपादकाला जो मुद्दा लोकांसमोर आणायचा असेल, त्यासाठी सोयीचे कलाकार निवडावे तशीच पात्रे आमंत्रित केली जात असावीत. त्यात थोडी मौज असावी म्हणुन प्रकाश बाळ यांच्यासारखे जोकर आमंत्रित केले जात असावेत. एक गोष्ट मात्र त्यातून अगदी स्पष्ट होते, की प्रकाश बाळ यांना कुठल्याच बाबतीत माहिती नसते किंवा असावी असेही त्यांना वाटत नाही. धड त्यांना कॉग्रेसचे समर्थन करता येत नाही, की त्यांना भाजपाला शिव्याशापही धड देता येत नाहीत. पण नशेत काय पितो आहे किंवा काय बोलतो आहे, त्याचे भान कुठल्या नशाबाजाला असते? बाळ किंवा तत्सम शहाण्याची अवस्था त्यापेक्षा वेगळी नसते. मग पंधरा वर्षापुर्वी अण्णांच्या आंदोलनाचे आपणही समर्थन केल्याचे त्यांना आठवत नसते, की आज आपण कशाला अण्णांवर आरोप करतोय त्याचे त्यांना भान नसते. मग नशाबाज जसा आपल्या वेडाचाराने स्व:लाच जखमी करून घेत असतो किंवा वागण्यातून स्वत:लाच हास्यस्पद करून घेत असतो, तशी या सेक्युलर शहाण्याची आजकाल दुर्दशा झालेली आहे. त्यातून जेव्हा अधिक शहाणे आहोत असा आव आणला जातो तेव्हा अधिकच खुळेपणा त्याला करावा लागत असतो. प्रकाश बाळ असोत, की त्यांचे सेक्युलर समव्यावसायिक असोत. त्यांची अशीच दुर्दशा होत असते.

   दिल्लीत अशाच एका शहाण्याला सध्या न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याचे नाव शाहिद सिद्दीकी असे आहे. त्याला दिल्लीहून इथे बोलावणे शक्य नाही. पण ज्या कायबीईन लोकमतवर नेहमी प्रकाश बाळ आपल्या दिवट्या सेक्युलर विद्वत्तेचे दिवे उजाळत असतात, त्याच वाहिनीचे प्रमुख असलेले कॉग्रेस राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी मोठे पाप अलिकडेच केले आहे, त्यांना वाहिनीचे मालक असल्याने आमंत्रित करणे निखिल वागळे यांना अशक्य नाही ना? त्यांनी जरा त्याच दर्डांना एक सवाल विचारावा आणि त्या सवालाची चर्चा करण्यासाठी याच बाळाला पाळण्यात घालून स्टूडीओमध्ये बोलावून घ्यावे. त्याच दिवशी अण्णांच्या नावाने लाखोली वाहणार्‍य़ा प्रकाश बाळाने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरही तोंडसुख घेतले. त्याच्याच दुसर्‍या दिवशी तिकडे अहमदाबादेत विजय दर्डा यांनी मोदींना राष्ट्रसंत अशी उपाधी देऊन टाकली. आता बाळ किंवा त्यांचे सेक्युलर मित्र दर्डांना त्याचा जाब कधी विचारणार आहेत? तेवढी हिंमत त्यांचे लढवय्ये सेक्युलर मित्र निखिल वागळे दाखवतील काय? मोदींना संत ठरवणार्‍या विजय दर्डांना वागळे सवाल कधी विचारणार आहेत? आपण कोणाला घाबरत नाही अशी फ़ुशारकी मारणार्‍यांनी ही किरकोळ हिंमत दाखवावी. समर्था घरीच्या असमर्थांनी फ़ुशारक्या मारण्यात अर्थ नसतो बाळ.     ( क्रमश:)
भाग  ( ३४४ )  २/८/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा