बुधवार, १ ऑगस्ट, २०१२

तेव्हा कुणाच्या कुशीत दडी मारून बसले होते हे बाळ


   आज अण्णा हजारे आंदोलनात नव्याने उतरलेले नाहीत. तब्बल अठरा वर्षापेक्षा अधिक काळ अण्णा आंदोलनाच्या पवित्र्यात कायम राहिले आहेत. पण त्यांनी जेव्हा आंदोलनाला सुरूवात केली तेव्हा त्यांना अजिबात अनुभव नव्हता. तरीही अण्णा लढायला सिद्ध झाले. प्रकाश बा्ळ किंवा त्यांच्यासारखे बोलघेवडे नुसते बोलत वा लिहित होते, तेव्हा अण्णा मैदानात उतरले. मग याच बाळासारखे बौद्धिक रांगणारे अनेकजण त्याच अण्णांच्या मांडीवर जाऊन बसले होते. तेव्हा हे प्रकाशाचे बाळ कुठ्ल्या पाळण्यात होते? ज्यांचे लेख व भाषणे वाचून प्रकाश बाळ यांना बुद्धी वगैरे काही असते असा शोध लागला किंवा विचार करण्याचे बालवयात धडे गिरवले, त्यामध्ये प्रधान मास्तर नावाचे एक गुरूजी होते. त्याच ग.प्र. प्रधानांनी तेव्हा ‘साधना’ साप्ताहिकात लेख लिहुन अण्णांच्या नेतृत्वाखाली लढायची घोषणा केली होती. मग त्या मास्तरांना अक्कल नव्हती काय? प्रकास बाळ ज्या पंथातले आहेत त्या समाजवादी पंथातले बहुतेक लोक अण्णांच्या आंदोलनाचे आरंभीचे समर्थक राहिले आहेत. अण्णांना तेव्हा स्वत:चे असे समर्थक राळेगण सिद्धीबाहेर फ़ारसे नव्हते. तर सेना भाजपा युतीच्या यशाने राजकारणात पुरते नामोहरम झालेल्या समाजवादी पंथाच्या लोकांना निष्क्रियतेच्या कुपोषणाने मरायची वेळ आलेली होती. एसेम जोशी किंवा तत्सम थोर कर्तबगारांच्या पुण्याईवर खुशालचेंडू जगताना समाजवादी चळवळ दिवाळखोरीत घालवणार्‍या अशा बांडगुळांना नेहमीच कुठलेतरी सशक्त झाड आवश्यक असते. कारण अशी मंडळी परोपजीवी असतात. त्यामुळेच एसेम वा सानेगुरूजी यांची पुण्याई संपल्यावर त्यांना कुठलातरी महात्मा हवाच होता. अण्णा त्याचवेळी भ्रष्टाचार विरोधी झेंडा खांद्यावर घेऊन उभे राहिले. मग त्यांच्या आडोश्याने अशा समाजवादी व सेक्युलर पक्षांच्या बांडगुळांनी सेना भाजपा युतीच्या विरोधातले राजकारण सुरू केले. त्यात जसे त्या दिवाळखोर पक्षातले नामोहरम कार्यकर्ते होते, तसेच पत्रकारिता किंवा जाणकाराचा मुखवटा लावलेले आसाबे, बाळ, अकोलकर इत्यादीही समाविष्ट होते. त्यांनीच आरंभीच्या काळात अण्णांचे महात्म्य सामान्य लोकांच्या मनात निर्माण करण्याचे कार्य केलेले आहे. त्यांना अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे कौतुक नव्हते, की अण्णांच्या प्रामाणिक हेतूविषयी कर्तव्य नव्हते. त्यांना सेना भाजप-युतीवर शरसंधान करण्यासाठी अण्णांचा आडोसा तेवढा हवा होता. म्हणूनच तेव्हा अण्णांचे काम व अनुभव एका गावापुरता आहे, हे प्रकाश बाळ यांना दिसत होत, पण कळत नव्हते. तेच कशाला प्रताप आसबे किंवा प्रकाश अकोलकर अशा लोकांनाही अण्णांचे राळेगण सिद्धी म्हणजे जणू एक स्वायत्त देशच वाटला होता तेव्हा. आणि त्याचेच गोड्वे गायले जात होते.

   आज प्रकाश बाळ अण्णांच्या अनुभवावर प्रश्नचिन्ह लावत आहेत, तेच सवाल त्यांना पंधरा वर्षापुर्वी का सुचले नव्हते? अण्णांचा लोकशाहीतीत संस्थांवर विश्वास नाही, ते कायदेमंडळ जुमानत नाहीत, न्यायालयाचा मार्ग मानत नाहीत, असे अण्णाविरोधी आक्षेप प्रकाश बाळ यांनी त्या दिवशी कायबीईन लोकमत वाहिनीवर बोलताना उपस्थित केले. बिचारी गलका चुपकर नवोदित पत्रकार. अण्णा जेव्हा आंदोलनाच्या आखाड्यात उतरले तेव्हा कुठेतरी आईच्या कडेवर बसून कॅडबरी किंवा आइस्क्रीमचा हट्ट करायच्या वयात असेल. त्यामुळे 1995 ते 2000 या कालखंडात काय घडले तेच तिला माहित नसेल, मग ती या आजच्या वयोवृद्ध बाळाला कसे गप्प करणार? तेव्हा अण्णा हजारे यांनी घटनात्मक सरकारला आव्हान दिलेले नव्हते काय? त्यांनी मंत्र्यांचे राजीनामे तेव्हाही चौकशी होण्याआधीच मागितले होते ना? मग देशात घटना आहे आणि कायद्याचे राज्य आहे, याचा तेव्हा या "प्रकाशित" बाळाला थांगपत्ता लागलेला नव्हता काय? की तेव्हा हे बाळही अलकाप्रमाणे आईच्या कडेवर बसून कॅडबरीसाठी हट्ट करत होते? तेव्हाही प्रकाश बाळ पत्रकार होते आणि लिहित होते. त्यांनी अण्णांच्या त्या आंदोलनाला घटनाबाह्य ठरवल्याचा एखादा तरी दाखला आज त्यांना देता येईल काय? कसा देणार, तेव्हा हेच बाळ अण्णांच्या कौतुकाचे बडबडगीत गाणार्‍यांच्या संगतीत समुहगीत गाण्यात गर्क होते ना?

   तेव्हा अण्णा युती सरकार विरुद्ध गदारोळ उठवीत होते आणि त्यामुळे ही सेक्युलर बाळे हुंदडत होती. अण्णांना टाळ्या वाजवत होती. अण्णांना तेव्हा गर्दी जमवता येत नव्हती. तरी त्यांचे कौतुक करताना किंवा त्यांचे महात्म्य सांगताना अशा बाळांच्या घशाला कोरड पडत नव्हती. फ़ार कशाला तेव्हा एका मंत्र्याने अण्णांच्या विरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला होता. त्यात आपला बचाव मांडायलाही अण्णा फ़िरकले नाहीत आणि त्यांना तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने फ़र्मावली होती. ती शिक्षा कायदा न जुमानण्यासाठी झाली होती. तेव्हा याच प्रकाश बाळाने अण्णांचा निषेध केला होता काय? की तेव्हा अण्णांच्या महात्म्यापुढे घटना किंवा कायद्याला पावित्र्य नव्हते आणि आजच त्याला पावित्र्य प्राप्त झाले आहे? लोकशाही संस्थांची महती अण्णांना आज ठाऊक नसेल तर तेव्हा ठाऊक होती काय? प्रकाश बाळाला तरी नक्कीच ठाऊक नव्हती. कारण तेव्हा त्यांनी अण्णांचा कान त्याच कारणासाठी पकडल्याचे कोणाच्या ऐकिवात नाही. बहुधा बबनराव घोलप असे त्या मंत्र्याचे नाव होते. अण्णांची एक मुलाखत तेव्हा नवाकाळमध्ये छापून आली होती. मग कोर्टाचा ससेमिरा मागे लागला, तेव्हा नवाकाळच्या संपादकांनी माफ़ी मागून आपली शेपूट सोडवून घेतली. पण अण्णा मात्र शब्द मागे न घेता तुरूंगात गेले होते. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी सरकारच्या अधिकारात त्यांची शिक्षा माफ़ केली होती व अण्णा तुरूंगातून बाहेर पडले होते. हा सगळा इतिहास इतक्यासा्ठीच इथे सांगितला, की आज ज्यांना लोकशाही संस्था व कायद्यासह राज्यघटनेचा पुळका आलेला आहे, ते किती खोटारडे आहेत त्याचे वाचकाला व आजच्या पिढीला स्मरण द्यावे.

   पण हे सांगून बाळ यांच्या बाळबुद्धीमध्ये फ़रक पडेल अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. की आपला तथाकथित सेक्युलर बाणा वाहिन्या व माध्यमे बदलतील अशीही अपेक्षा नाही. कारण एका सीमेच्या पलिकडे गेल्यावर मुर्खपणा अंगात बाणत असतो. त्यांना शहाणपणा शिकवणेच मुर्खपणाचे असते. तो उद्योग मी कशाला करु? आईनस्टाईन म्हणतो तशी त्यांची अवस्था असते. "तीच तीच चुक सातत्याने करत राहून काही वेगळे घडते का बघणारा प्रयोगशील नव्हे तर मुर्ख असतो" असे आईनस्टाईन म्हणतो. बाळासारखे सेक्युलर शहाणे त्याच वर्गातले असतात. कारण सत्य बघण्याची क्षमताच ते गमावून बसलेले असतात. तर सत्य स्विकारणे त्यांच्याकडून शक्य आहे काय? ते आपल्या मुर्खपणाला घट्ट चिकटून बसलेले असतात. म्हणुनच विषय अण्णा आंदोलनाला कॉग्रेस कसे हाताळते हा असताना ते कशावर बोलत होते? तर अण्णा टीम येदीयुरप्पाच्या भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाही? मग तोच सवाल पंधरा सतरा वर्षापुर्वी अण्णांनाही विचारता आला असता. तेव्हा सेना भाजपा युतीविरोधात भ्रष्टाचार निर्मुलनाचा झेंडा खांद्यावर घेतलेले अण्णा तत्पुर्वीच्या कॉग्रेस वा शरद पवार यांच्या भ्रष्टाचाराबद्दल अवाक्षर बोलत नव्हते. मग युतीबद्दल बोलणारे अण्णा कॉग्रेसच्या पापाबद्दल गप्प कशाला, असा सवाल त्यांना प्रकाश बाळासह आसबे, अकोलकर, केतकर किंवा अरूण टिकेकर का विचारत नव्हते? समर खडसबद्दल मी बोलणार नाही. तेव्हा तो ज्येष्ठ बगैरे झाला नव्हता. किंबहूना त्याला त्यातले काही कळतच नव्हते. मुद्दा असा, की ही मंडळी आपली समाजवादी ओळख हरवून बसली आहेत. आणि शिवसेना भाजपाला शह देण्याच्या नशेत त्यांनी आपले राजकीय अस्तित्वच गमावले आहे. मग हे लोक कधी कॉग्रेस प्रवक्ता कधी पत्रकार कधी राजकीय विश्लेषक तर कधी अभ्यासक म्हणुन तीच पोटातली मळमळ बाहेर काढायला पुढे येत असतात, तशी संधी शोधत असतात. याला नशा का म्हणायचे? त्याला मुर्खपणा का म्हणायचे? त्यात कुठला मुर्खपणा आहे? असे अनेक सवाल वाचकाच्या डोक्यात एव्हाना आलेले असतील. प्रकाश बाळ यांना अनेक गोष्टी आठवतात तर त्यांना भाजपाचे भ्रष्ट माजी मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांचा भ्रष्टाचार कोणी बाहेर काढला, ते तरी ठाऊक आहे काय? अण्णा टीममध्ये कोण कोण आहे, त्याचा तरी थांगपत्ता या बाळाला आहे काय? आपण काय बोलतो ते त्याला तरी कळत होते काय? बिचार्‍या गलका चुपकरविषयी बोलायलाच नको. तिला अजून पत्रकारिता कशाशी खातात तेच माहित नसावे. अन्यथा तिनेच तिथल्या तिथे या बाळाला चपराक हाणून गप्प केले असते. इतका गंभीर मुर्खपणा कायबीइन लोकमतवर त्या दिवशी चालु होता. कुठला ते उद्या बघू.     ( क्रमश:)
भाग  ( ३४३ )  १/८/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा